आयुर्वेदाची महती आपल्या सर्वांनाच माहीत आहे. आयुर्वेद ही 5000 वर्षापूर्वीपासून म्हणजे पार वेदीक काळापासून चालत आलेली उपचार पद्धती आहे. खरंतर ही केवळ उपचार पद्धती नसून एक जीवनशैली आहे. कारण आयुर्वेदात फक्त रोगांपुरता विचार मर्यादित न ठेवता तन, मन आणि आत्मा ह्यांचे संतुलन साधून उपचार केला जातो. ज्याचा दीर्घकाळासाठी आपले आरोग्य चांगलं राहण्यास फायदा होतो. आयुर्वेदाची पाळंमुळं जरी भारतातील असली तरी जगभरात ह्या उपचार पध्दतीचा वापर केला जातो. आयुर्वेदानुसार वात, पित्त आणि कफ या तिन्ही मूलत्तवांचे संतुलन साधल्यास तुम्हाला कोणताही रोग होत नाही. पण जेव्हा ह्यांचं संतुलन बिघडतं, तेव्हा आपल्याला एखादा आजार होतो. म्हणूनच आयुर्वेदात ह्या तिन्ही तत्त्वांचं संतुलन राखलं जातं. यामध्ये सर्वात चांगली वनसप्ती मानली जाते ती गुळवेल. गुळवेल खाण्याचे फायदे अनेक आहेत. या लेखातून आपण गुळवेल ची माहिती घेणार आहोत. गुळवेल चे फायदे (Giloy Benefits In Marathi), गुळवेल चे दुष्परिणाम, गुळवेल चा उपयोग कसा करून घ्यावा याची इत्यंभूत माहिती आम्ही तुम्हाला या लेखातून देत आहोत. त्याआधी गुळवेल म्हणजे नक्की काय ते आपण पाहू.
What Is Giloy In Marathi | गुळवेल म्हणजे काय ?
गुळवेल एक वनस्पती आहे जी मुख्यत्वे जंगल, शेतातील चिखल अथवा डोंगरावर मिळते. ही उष्ण प्रकृतीची असते. याचे फळ साधारण वाटाण्याच्या आकाराचे दिसते. उन्हाळ्याच्या दिवसात या वनस्पतीवर लहान लहान आकाराची पिवळी फुलं दिसून येतात. जी नर झाडावर एकत्र फुललेली दिसतात आणि मादी झाडावर मात्र एकट्या स्वरूपात असतात. यावरूनच झाड नक्की कोणत्या स्वरूपाचे आहे ते कळून येते. गुळवेलचे वैज्ञानिक नाव हे टीनोस्पोरा कार्डिफोलिया असं आहे. यामध्ये अनेक आजार बरे करण्याची क्षमता असते. त्यामुळे गुळवेलला अमृतासमान मानले जाते. सर्वात खास वैशिष्ट्य म्हणजे गुळवेल हे झाडाला अगदी मिठी मारून वाढते. त्यामुळे त्या झाडाचे औषधीय गुणही गुळवेलामध्ये समाविष्ट होतात. त्यामुळे जर कडुलिंबाच्या झाडावर गुळवेल वाढवली तर ती अत्यंत लाभदायी मानली जाते.
महाराष्ट्रांमध्ये सगळीकडे गुळवेल ही वनस्पती सर्वत्र आढळते. या वेलीचे खोड लांब धाग्यांसारखे आणि बोटांएवढे जाड असून त्यावरील सालंही पातळ आणि त्वचेप्रमाणे असतात. काही कालावधीनंतर त्याची सालं निघतात. या खोडांंवर लहान-लहान छिंद्रसुध्दा आढळतात. या वेलीच्या खोडातील आतला भाग चक्राकार दिसून येतो. वेलीची हिरवीगार मुळे फुटून खाली लोंबताना आढळतात. पानांचा आकार हा हृदयाकृती आणि रंग हिरवागार असतो. वेलीची पानं हाताला गुळगुळीत लागतात आणि देठ लांबच लांब असतात, ह्या येणारी फुले ही पिवळसर-हिरवी असून नियमित येतात. फळंसुध्दा गोलाकार, मोठ्या वाट्याण्यासारखी पण कठीण कवचाची असतात. साधारणतः या वनस्पतीला नोव्हेंबर ते जून या दरम्यान फुले आणि फळे येतात. गुळवेलाचे फायदे व नुकसान दोन्ही असतात. पण आपण आधी गुळवेलाचे फायदे जाणून घेऊया.
Gulvel Benefits In Marathi | गुळवेलाचे फायदे
गुळवेलाचा उल्लेख आयुर्वेदात अमृतकुंभ असा आहे. तसंच ह्याला रसायनकल्प ही म्हंटले जाते. खरोखरच गुळवेल ही अगदी अमृताप्रमाणेच आहे. कुठल्याही आजारातून उठल्यावर रूग्णाच्या शरीराला पुनरुज्जीवन देण्यात गुळवेल उपयोगी ठरते. गुळवेलीचा काढा हा अत्यंत परिणामकारक आहे. याचा अनेक आजारांवर फायदा होतो. नक्की कोणकोणते फायदे आहेत ते जाणून घेऊया.
प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी
प्रतिकारशक्ती कमी होणे हेच मुळात आजारी पडण्याचे मुख्य कारण आहे. प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी आपण अनेक उपाय करतो. कोणताही आजार हा प्रतिकारशक्ती कमी झाल्यावरच होतो. त्यानुसार तुम्ही गुळवेलचे सेवन करू शकता. प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी गुळवेल अत्यंत लाभदायी आहे असं आयुर्वेदातही सांगण्यात आले आहे. यामध्ये इम्यूनोमॉड्युलेटरी नावाचा घटक अधिक आढळतो. जो प्रतिकारशक्ती वाढविण्यास मदत करतो.
क्रोनिक फिव्हर व्यवस्थित करण्यासाठी
साधारण 10-15 दिवसांनंतरही तापाची समस्या कमी होत नसेल तर त्याला क्रोनिक फिव्हर अर्थात जुना ताप असं म्हटलं जातं. तुम्ही या समस्येवर गुळवेलाचा उपयोग करून घेऊ शकता. हा ताप काढण्यासाठी तुम्हाला गुळवेलाचा उपयोग करता येतो. यासाठी तुम्ही गुळवेलाची फळं आणि पानांचा वापर करून काढा बनवू शकता. यामध्ये असणारे अँटिपायरेटिक (ताप बरा करणारा घटक) आणि अँटिमलेरियल (मलेरिया इन्फेक्शन दूर करणारा घटक) गुण तापासून सुटका मिळवून देतात. तुम्हाला हवं तर गुळवेलाची पावडर कोमट पाण्यात मिक्स करूनही घेऊ शकता.
पानफुटी वनस्पतीचे फायदे आणि उपयोग
पचनक्रिया चांगली करण्यासाठी
सध्याच्या लाईफस्टाईलमुळे अन्न पचनाची अनेकांना समस्या असते. उशीरा जेवण आणि सतत ताण यामुळे पचनक्रिया व्यवस्थित होत नाही. गुळवेलाची औषधीय गुणांमध्ये पचनक्रियेसंबंधी समस्या दूर करण्याची गुण आहेत. डायरिया आणि जुलाब होत असतील तर त्यासाठीही हे उत्तम ठरते. पचनतंत्र मजबूत करण्यासाठी याचे साह्य मिळते. त्यामुळे तुम्हाला जुलाब होत असतील तर जुलाबवर घरगुती उपाय म्हणून तुम्ही गुळवेलाचा आधार घ्या.
मधुमेह नियंत्रणात आणण्यासाठी
बदलत्या लाईफस्टाईलमुळे आजकाल फारच लहान वयात अनेकांना मधुमेहाच्या समस्यांना सामोरं जावं लागतं. पण गुळवेलाच्या पावडरचे नियमित तुम्ही उपाशीपोटी पाण्यातून सेवन केल्यास, मधुमेह आटोक्यात येण्यास मदत मिळते. मधुमेहावर उत्तम घरगुती उपाय आहे. यामध्ये असणारे अँटिहायपरग्लायसेमिक (रक्तातील साखरेची पातळी कमी करणारा घटक) गुण आढळतात. यामुळेच शरीरातील इन्शुलिनची सक्रियता वाढवून साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी मदत मिळते. मधुमेहापासून सुटका मिळविण्यासाठी हा उत्तम उपाय असल्याचे मानले जाते.
डेंग्युवरही लाभदायक
गुळवेल हे औषधीय गुणांचे भंडार समजण्यात येते. यामध्ये अशी अनेक रसायने आहेत ज्यामुळे इम्यूनमॉड्युलेटरी प्रभाव अधिक जाणवतो. यामुळे शरीरातील प्रतिकारशक्ती वाढून अनेक आजारांपासून लढण्याची ताकद मिळते. यामध्ये मलेरिया आणि डेंग्यू सारख्या आजारांचीही नावे आहेत. याचे इन्फेक्शन दूर करण्यासाठीही गुळवेलाचा वापर करता येतो. त्यामुळे डेंग्युसारख्या आजारात गुळवेल लाभदायक ठरते. याचे निमयित सेवन तुम्हाला डेंग्यूचा ताप उतरवण्याठी मदत करते.
दम्याकरिताही ठरते उपयोगी
दम्याच्या समस्येपासून सुटका मिळविण्यासाठीही गुळवेल चे फायदे मिळतात. शरीरातील प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी श्वासासंबंधी समस्या सोडविण्यासाठीही याचा उपयोग होतो. दम्याची लक्षणे कमी करण्याची प्रबळ क्षमता गुळवेलामध्ये आहे. त्यासाठी तुम्ही याचा रस मधासह मिक्स करून सेवन करा. त्यामुळे दम्याचा त्रास कमी होण्यास मदत मिळेल.
वाचा – वडाच्या झाडाचे आरोग्याला होतात अफलातून फायदे
सूज असल्यास उपायकारक
विशेषतज्ज्ञांच्या माहितीनुसार, गुळवेलामध्ये अँटि इन्फ्लेमेटरी (सूज कमी करणारे), अँटिअर्थरायटिक (सांध्याची सूज कमी करणारे घटक) आणि अँटिऑस्टियोपोरोटिक (सांध्याचे दुखणे आणि सूज कमी करणारे घटक) असे गुण आढळतात. या तिन्ही गोष्टी कमी करण्यासाठी गुळवेलाचा फायदा मिळतो. त्यामुळे तुम्ही गुळवेलाचे कशाही स्वरूपात सेवन केल्यास तुम्हाला त्याचा शरीरावर सूज असल्यास, फायदा मिळतो. तुम्ही यापासून सुटका मिळविण्यासाठी नियमित स्वरूपात याचे सेवन करू शकता. मात्र याचे योग्य प्रमाण डॉक्टरांना विचारून घ्यावे.
सेक्सची इच्छा प्रबळ करण्यासाठी
शारीरिक आरोग्य आणि यौन अर्थात सेक्स करण्याची इच्छा होणे याचा एकमेकांशी संबंध आहे. कारण जेव्हा माणूस शारीरिक स्वरूपात निरोगी असतो तेव्हाच उत्तम सेक्स करू शकतो. सेक्सची इच्छा वाढवणारे हार्मोन्स काही काळाने कमी होतात. पण गुळवेलात असणाऱ्या इम्यूनोमॉड्युलेटरी अर्थात शरीरात प्रतिकारकशक्ती वाढविणारे गुण असतात, जे इतर रोगांशी लढण्यासह एफ्रडिजीयॅक प्रभावामुळे सेक्सची इच्छा वाढविण्यास मदत करतात.
डोळ्यांच्या समस्येसाठी
डोळ्यांच्या समस्येवरही गुळवेल गुणकारी ठरते. विशेषतज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, यामध्ये असणारे इम्यनोमॉड्युलेटरी गुण हे डोळ्यांसाठी फायदेशीर ठरतात. डोळ्यांची जळजळ, डोळे लाल होणे अथवा डोळ्यांना सूज येणे अशा समस्यांसाठी तुम्ही गुळवेल पावडर रोज पाण्यातून सेवन केली तर त्यातून सुटका मिळण्यास मदत मिळते. योग्य प्रमाणात तुम्ही रोज याचे सेवन करावे.
चमकदार त्वचेसाठीही प्रभावी
अनेक रासायनिक तत्वांच्या उपलब्धतेमुळे गुळवेलात अँटिएजिंग घटक आढळतात. त्यामुळे शरीरातील आजार दूर करण्यासह वाढत्या वयाचा त्वचेवर होणारा परिणाम कमी करण्यासाठीही याचा उपयोग करून घेता येतो. याचे संतुलित प्रमाणात तुम्ही नियमित सेवन केले तर तुमची त्वचा अधिक चमकदार राखण्यास आणि त्वचेवर सुरकुत्या न येऊ देण्यासाठी याचा उपयोग होतो.
How To Use Giloy | गुळवेलाचा कसा वापर कराल
गुळवेलाचा उपयोग कसा करायचा हे बऱ्याच जणांना माहीत नसतं. तर तुम्ही याचा कसा उपयोग कराल हे आम्ही तुम्हाला सांगत आहोत.
- तुम्ही गुळवेलाच्या फळांचा आणि पानांचा रस काढून त्याचा वापर करू शकता. दिवसातून 20-30 मिली इतका दोन वेळा हा रस तुम्ही प्यावा
- तसंच काढ्याच्या स्वरूपात तुम्ही 20 मिली इतका उपयोग करू शकता. दिवसातून दोन वेळा गुळवेलाचा काढा पिऊ शकतो. त्यासाठी तुम्ही गुळवेलाच्या काड्यांचा उकळून उपयोग करून घेऊ शकता
- तसंच याच्या बियांचा तुम्ही उपयोग करू शकता
- गुळवेलाची पावडर बनवून रोज सकाळी उपाशीपोटी कोमट पाण्यातून एक चमचा प्यायल्यास मधुमेह कमी होतो
टीप – गुळवेल किती प्रमाणात घ्यायचे याबाबत आपल्या आयुर्वेदिक डॉक्टरांशी चर्चा करा आणि मगच ठरवा. स्वतःच्या मनाने याचे सेवन करू नका.
How To Make Giloy Kadha In Marathi | गुळवेलचा काढा कसा बनवावा
- गुळवेलाची भरड किंवा काड्या आणून ते प्रथम स्वच्छ धुवून घ्यावे
- काढा करण्यासाठी 1 कप गुळवेल घेतल्यास त्याच्या 16 पट पाणी घालावे.
- हे मिश्रण पावपट होईपर्यंत उकळून घ्यावे. हा काढा चवीला कडसर लागतो. पण अत्यंत गुणकारी आहे
Giloy Side Effects | गुळवेल चे दुष्परिणाम
गुळवेल ही वनस्पती किती फायदेशीर आहे. ते आपण बघितलं पण काही परिस्थितींमध्ये याचे सेवन करणे नुकसानदायक किंवा त्याचे दुष्परिणाम ही दिसून येतात
- जर तुम्ही मधुमेहाची औषध घेत असाल तर गुळवेलाचे सेवन करू नका
- गर्भवती आणि स्तनपान करणाऱ्या महिलांनी गुळवेल अजिबात खाऊ नये. त्याचे कोणत्याही प्रकारे सेवन करू नये.
- शस्त्रक्रिया झाल्यावरदेखील याचा वापर टाळावा
FAQ’s | प्रश्नोत्तरे
1. गुळवेल भाजी करता येते का?
गुळवेलाच्या हृदयाकार दिसणाऱ्या पानांची भाजीसुध्दा केली जाते. गुळवेलाच्या पानांची भाजी उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये आरोग्यदायी ठरते. हे खोडाइतके गुणकारी नसते. भाजीपासून केलेले पराठेही चवदार लागतात.
2. कावीळीसाठी गुळवेल उपयुक्त ठरते का?
कावीळीमुळे रूग्णाला येणारा अशक्तपणा गुळवेल घेतल्यास दूर होतो. तसंच गुळवेलाचा काढा हा तुम्ही नियमित मधातून दोन-तीन वेळा घेतल्यास आराम पडतो.
3. खोकला थांबविण्यासाठी गुळवेलाचा कसा उपयोग करावा?
खूप दिवस खोकला जात नसल्यास गुळवेलाच्या रसाचे सेवन करावे. हा रस रोज सकाळी घेतल्यास खोकल्यापासून आराम मिळतो. खोकला थांबवण्यासाठी उपाय करून पहा. याशिवाय गुळवेलाच्या पानांचा रस काढून तो दोन तीन वेळा मधाबरोबर चाटण करून द्यावा.
गुळवेलाचा उपयोग कसा करावा हे आपण पाहिले. तुम्हाला आमचा लेख कसा वाटला ते कळवा आणि गुळवेलाचा उपयोग तुम्ही तुमच्या डॉक्टरांना विचारून नक्की करा.