एखाद्या अभिनेत्रीला बॉलीवूडमध्ये ब्रेक मिळण्यासाठी तिचे वय आणि तिचे वैयक्तिक आयुष्य खूप महत्त्वाचे ठरते. ज्यामुळे अफेअर, लग्न, आई होणं अशा गोष्टींमध्ये अडकल्यामुळे अभिनेत्रीला करिअर सोडावं लागतं अशी समजूत होती. ज्यामुळे बॉलीवूडमध्ये यश मिळवण्यासाठी अनेक अभिनेत्रींनी या गोष्टींपासून दूर राहणंच पसंत केलं. किंवा ज्यांनी लग्न आणि आई होण्याचा निर्णय घेतला त्यांनी करिअरवर पाणी सोडलं. मात्र ही गोष्ट सर्वांच्याच बाबतीत खरी ठरली नाही. कारण आजही बॉलीवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी आई झाल्यावरही बॉलीवूडमध्ये दमदार कमबॅक केला. जाणून घ्या अशा अभिनेत्रींबद्दल
करिना कपूर खान –
करिना कपूर आणि सैफ अली खान पुन्हा एकदा आई-बाबा होणार आहेत. सैफच्या पन्नासाव्या वाढदिवशी करिनाने त्याला हे गिफ्ट दिलं आहे. आई होणार असली तरी ती तिच्या आगामी चित्रपटांचे शूटिंग करण्यात सध्या व्यस्त आहे. दुसऱ्यांदा आई होण्याआधी तिला तिच्या हातातील कामे लवकर पूर्ण करायची आहेत. ती लवकरच आमिर खानसोबत लाल सिंह चढ्ढामध्ये दिसणार आहे. करिना तिच्या कामाबाबत खूपच प्रोफेशनल आहे. एवढंच नाही तर करिना आणि सैफचा मोठा मुलगा तैमूर याचा जन्म 2016 साली झाला होता. तैमूरच्या जन्माच्यावेळी तिचं वजन खूप वाढलं होतं. करिनाकडे पाहून ती पुन्हा चित्रपटांमध्ये दिसेल असं मुळीच वाटत नव्हतं. मात्र त्यानंतर दोनच वर्षात तिने वीरे दी वेडिंगमध्ये मुख्य भूमिका साकारून जबरदस्त कमबॅक केला होता. आता दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतरही ती लवकर पुन्हा कमबॅक करेल यात काहीच शंका नाही.
काजोल –
काजोलने 1999 मध्ये अजय देवगणसोबत विवाह केला. त्यानंतर ती अनेक चित्रपटांमधून काम करत होती. कभी खुशी कभी गम च्यावेळी तिचे मिसकॅरेज झाले होते. त्यानंतर 2003 साली तिने न्यासाला जन्म दिला आणि पुन्हा तिन वर्षांचा ब्रेक घेत चित्रपटांमध्ये काम केलं. या काळात तिने फना या चित्रपटातून कमबॅक केला होता. पुढे 2010 साली तिने तिचा मुलगा युगला जन्म दिला आणि पाच वर्षांचा ब्रेक घेतला. त्यानंतर दिलवाले या चित्रपटातून ती पुन्हा मोठ्या पडद्यावर झळकली. दोन मुलांच्या जन्मानंतरही तिने तिचं करिअर यशस्वीपणे सुरूच ठेवलं. अर्थात याचा वारसा तिला तिची आई तनूजा आणि मावशी नूतन यांच्याकडून मिळाला आहे.
राणी मुखर्जी –
राणी मुखर्जीचे अनेक अभिनेत्यांसोबत नाव जोडलं गेलं. मात्र तिने दिग्दर्शक आदित्य चोप्रासोबत 2014 मध्ये गुपचूप लग्न केलं आणि चाहत्यांना धक्काच दिला. कारण या काळात राणी मुखर्जी यशाच्या शिखरावर होती. 2015 साली तिने तिची मुलगी आदिराला जन्म दिला. आदिराच्या वेळी प्रेगनंट असताना राणीचे वजन खूपच वाढले होते. त्यामुळे ती पुन्हा चित्रपटात परत येईल असं कुणालाच वाटलं नाही. मात्र तिने 2018 साली हिचकी या चित्रपटातून दमदार कमबॅक करून दाखवला. राणीचे मर्दानी 2 मुळेही खूप कौतुक झाले. लवकरच राणी बंटी और बबली मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
हेमामालिनी –
जुन्या काळातील अशा अभिनेत्री जाणून घेताना हेमामालिनी यांना विसरून मुळीच चालणार नाही. कारण हेमामालिनी यांनीदेखील प्रसिद्धीच्या टोकावर असताना आधीच लग्न झालेल्या आणि दोन मुलांचा बार असलेल्या अभिनेता धर्मेंद्र यांच्याशी विवाह केला होता. चाहत्यांसाठी हेमामालिनी यांचा हा निर्णय म्हणजे एक धक्काच होता. 1980 मध्ये हेमामालिनी यांनी धर्मेंद्र यांच्याशी लग्न केलं. 1081 मध्ये त्यांनी ईशा आणि 1985 मध्ये अहाना या दोन मुलींना जन्म दिला. विशेष म्हणजे दोन्ही मुलींच्या जन्माच्या वेळी त्यांनी चित्रपटांमधून ब्रेक घेतला नाही. मुली झाल्यावरही त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम करून स्वतःचे कर्तृत्व सिद्ध केलं होतं.
श्रीदेवी –
दिग्गज अभिनेत्री श्रीदेवी जरी आज जगात नसली तरी तिचे चित्रपटसृष्टीतील योगदान नक्कीच विसरता येणार नाही. श्रीदेवीनेही करिअरमध्ये टॉपला असताना अचानक बोनी कपूरशी विवाह केला. असं म्हणतात याचं कारण ती लग्नाआधीच गरोदर होती. त्यानंतर 1997 मध्ये जान्हवी आणि 2000 मध्ये खुशी या दोघींचा जन्म झाला. मुलींच्या संगोपनासाठी श्रीदेवीने करिअर सोडून जवळजवळ पंधरा वर्षांचा मोठा ब्रेक घेतला. मुली मोठ्या झाल्यावर तिने इंश्लिश विंग्लिश या चित्रपटातून तिने दमदार कमबॅक केला. पुन्हा अभिनय सुरू केल्यावर मॉम चित्रपटाने मिळालेल्या यशाच्या शिखरावर असतानाच श्रीदेवीने जगाचा निरोप घेतला.
या बॉलीवूड अभिनेत्रींप्रमाणेच माधुरी दीक्षित, जुही चावला, रविना टंडन यांनीही आई झाल्यावर बॉलीवूडमध्ये परत येऊन चाहत्यांना सुखावलं होतं.
फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम
अधिक वाचा –
या बॉलीवूड अभिनेत्री हुबेहूब दिसतात त्यांच्या ‘आई’सारख्या