कोरोनाचा विळखा जगभरात वाढत चालला आहे. ज्यामध्ये अनेकजणांचे कुटुंबियही दगावत आहेत आणि दुःखाची बाब ही की, आपल्या जवळच्यांच्या शेवटच्या काळात कोरोनामुळे उपस्थितही राहता येत नाही. ‘बेंड इट लाईफ बेकहम’ या चित्रपटामुळे प्रसिद्धीस आलेली दिग्दर्शिका गुरिंदर चढ्ढाच्या आत्त्याचा कोरोना व्हायरसमुळे रविवारी मृत्यू झाला. गुरिंदर चढ्ढा यांनी एका पोस्टद्वारे ही माहिती शेअर केली. गुरिंदर चढ्ढा यांनी सांगितलं की, आत्त्याच्या शेवटच्या काळात तिच्या घरचे कोणीही सदस्य तिथे नव्हते. कोरोनामुळे गुरिंदर यांच्या कुटुंबियांना त्यांचं अंतिम दर्शनही घेता आलं नाही.
गुरिंदरने आपल्या आत्त्यासोबतचे फोटो इन्स्टावर शेअर करत इमोशनल पोस्टही लिहीली. आज आमच्या लाडक्या आत्त्याला कोविड19 हा रोग झाल्याने आम्ही तिला गमावलं आहे. पुढे त्यांनी लिहीलं आहे की, माझ्या बाबांची ती सर्वात छोटी बहीण होती. आमच्यासाठी सर्वात दुःखाची गोष्ट ही आहे की, तिच्या शेवटच्या समयी आम्ही कोणीही तिच्यासोबत नव्हतो. हॉस्पिटलमधल्या दोन नर्सचं तिच्यासोबत होत्या. ज्यांनी तिच्यासाठी प्रार्थना केली. ज्यामुळे तिच्या आत्म्याला शांती मिळेल. गुरिंदर चढ्ढा यांनी सांगितलं की, आत्त्याच्या शेवटच्या काळात त्यांचा घरचे कोणीही सदस्य तिथे नव्हते. व्हिडिओ कॉलमार्फत त्यांच्या मुलांनी प्रार्थना केली. गुरिंदर यांनी इंग्लंडच्या हॉस्पिटल आणि मेडिकल स्टाफचं या संकटसमयी केलेल्या सहकार्याचं कौतुक केलं आहे.
कोण आहेत गुरिंदर चढ्ढा
गुरिंदर चढ्ढा या भारतीय वंशाच्या ब्रिटीश दिग्दर्शिका आहेत. त्यांचे चित्रपट जास्तकरून ब्रिटनमध्ये राहणाऱ्या भारतीयांवर आधारित असतात. गुरिंदर चढ्ढा यांच्या मुख्य चित्रपटांमध्ये भाजी ऑन द बीच, बेंड इट लाईक बेकहम, ब्राईड एंड द प्रेज्यूडिस आणि द मिस्ट्रेस ऑफ स्पाईसेसचा समावेश आहे. त्यांच्या ब्राईड एंड द प्रेज्यूडिस या चित्रपटात ऐश्वर्या राय झळकली होती.
कोरोना व्हायरसमुळे होणाऱ्या मृत्यूचा आकडा हा दिवसेंदिवस वाढतच आहे. यामुळे अनेक सेलिब्रिटीजनाही याचा सामना करावा लागत आहे. कारण हा रोग कोणालाही होऊ शकतो. नुकतंच एका बॉलीवूड अभिनेत्रीला कोरोनामुळे लॉकडाऊन झाल्यामुळे आपल्या वडिलांच्या अंत्यविधीला येता आलं नाही. तर दुसरीकडे गायिका कनिका कपूरला कोरोना बरा झाल्यामुळे आता घरी पाठवण्यात आलं आहे. मध्यंतरी अजय देवगणची मुलगी न्यासा हिला कोविड 19 झाल्याची अफवा होती. पण नंतर मात्र अजयने या बातम्यांना नकार दिला.