असं म्हणतात…‘लवकर निजे, लवकर उठे त्यास आरोग्य आणि आयु लाभे’. खरंतर हाच निरोगी जीवनाचा आरोग्यमंत्र आहे. पण आजकाल आपण स्वतःला घडाळ्याच्या काट्याला इतकं बांधून घेतलं आहे की, त्यामुळे स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष द्यायला वेळच नसतो. अवेळी झोपणं, उशीरा उठणं हे तर रोजचंच झालंय. त्यात महिलांना तर सकाळचा नाष्टा स्कीप करण्याची इतकी वाईट असते की विचारुच नका. बैठी जीवनशैली, व्यायामाचा अभाव, वेळी-अवेळी जेवणं हे तर नेहमीचच झालंय. त्यात भर म्हणजे पौष्टिक जेवणापेक्षा वडापाव, पिझ्झा सारखे जंक फूड तर आपल्याला खूप जवळचे वाटतात. थोडक्यात आपण सतत अयोग्य आहार घेतो त्याने भुक नक्कीच भागते. पण वजनाचं काय???
अचानक कधीतरी संतुलित आहार, डाएट असलं काहीतरी वाचून-ऐकून किंवा पाहून जाग येते. आपण जाड झालोत हे जाणवू लागतं… नव्हे नव्हे अक्षरश: ते जाडेपण खुपू लागतं. थोडं चाललो की धाप लागते. मिडिअमचा ड्रेस साईझ आता डबल एक्सेल झालेला असतो. वैतागून आपण ‘निअरेस्ट जिम’ असा गुगलवर सर्चही मारतो. कधीकधी तिथे लगेच जाऊन चौकशी करुन अॅडमिशन देखील घेतो. काहीच नाही तर फोनवर अलार्म सेट करुन सकाळी जॉगिंगला जायचं मनाशी पक्कं करतो. सुटलेलं पोट आणि वाढणारी कंबर आपल्याला आता डोईजड होते. नाही हो करता करता एकदाचा तो दिवस उजाडतो. आणि आपल्या व्यायामाला होते. लगेच सोशल मिडियावर अपडेट करुन आपली सोशल मिडीया वॉल शे दोनशे लाईक्स आणि खचाखच कमेंट्सनी रंगते. मित्रपरिवाराच्या प्रोत्साहनामुळे व्यायामाचा उत्साह तर वाढतोच शिवाय मुठभर मांसपण वाढतं. एक आठवडा जोमात जातो. पण नंतर येतो आळशी रविवार…आठवडयाभराचं फिटनेस रुटीन तुटतं. आपण आपल्या खऱ्या रुटीनवर येतो. मग आपण वाढलेलं पोट स्टोलने झाकू लागतो.
मैत्रिणींनो, हे असं तुमच्याही सोबत होत असेलच. पण काहीही असलं तरी हे विसरु नका की, आपलं आरोग्य हीच आपली खरी धन संपदा आहे. त्याची आठवण करुन देण्यासाठी हा लेख प्रपंच. हा लेख वाचून तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं नक्कीच मिळतील. यासोबत काही सोपे घरगुती उपायही आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
वजन वाढल्याने होतात या आरोग्यसमस्या
लठ्ठपणा असल्यास काय खावे आणि काय खाऊ नये
वजन कमी करण्यासाठी घरगुती उपाय
वजन कमी करण्यासाठी डॉक्टरांचा योग्य सल्ला
सगळ्यात आधी आपल्याला वजन कमी करण्याची गरज का आहे ते पाहूया.
निरोगी आयुष्यासाठी वजनावर नियंत्रण हे असायलाच हवं. असं म्हणतात की, वजन एकटंच येत नाही तर ते त्याच्यासोबत आपले जोडीदारांनाही बरोबर घेऊन येतं. मधुमेह,कोलेस्टेरॉल पासून ते थेट हृदयविकारापर्यंत सारे त्याचे खास दोस्त असतात बरं का. आपल्या शरीराचं वजन 100 वर किंवा त्यापेक्षा जास्त झालंय हे समजल्यावर देखील काही जणींना त्याचे दुष्परिणाम कळत नाहीत. मात्र कालांतराने हळूहळू या एक-एक आरोग्य समस्या आपलं डोकं वर काढू लागतात.
वजन वाढल्याने होतात या आरोग्यसमस्या (Health Problem Arises Due To Weight Gain)
मधूमेह
लठ्ठपणामुळे होणाऱ्या आजारांमध्ये मधूमेह हा एक प्रमुख आजार आहे. संशोधनात असं आढळून आलं आहे की, ८५ टक्के मधुमेहाचे रुग्ण हे लठ्ठच असतात. आकाराने बारीक लोकांपेक्षा लठ्ठ लोकांमध्ये कोलेस्ट्रेरॉलच्या पेशी आकाराने आणि संख्येने जास्त असतात. या पेशी प्रमाणापेक्षा जास्त वाढल्या तर शरीरातील इन्शुलीनचा पूर्ण वापर करणे अशक्य होऊन जातं. परिणामी त्यातून पुढे ‘टाइप-2’ या प्रकारचा डायबेटिस होतो.
श्वसनाच्या समस्या
वजनामुळे मानेवर अधिक चरबी वाढल्यास झोपताना श्वसन करण्यास त्रास होतो. या समस्येतून घोरण्याची सवय लागते. बऱ्याच वेळा मधेच जाग येऊन पुरेशी झोप मिळत नाही. पुन्हा अपुरी झोप आणखी वजन वाढीसाठी कारणीभूत ठरते.
सांधेदुखी
लठ्ठपणामुळे पायांच्या सांध्यांवर ताण पडतो. विशेषतः गुडघे आणि घोट्यांवर शरीराचा अधिक भार येतो. परिणामी सांधेदुखीची कटकट मागे लागते.
उच्च रक्तदाब
शरीराचं वजन वाढल्यावर रक्ताभिसरण करण्यासाठी हृदयावर अधिक ताण येतो. पेशींचा आकार वाढल्यानं रक्तवाहिन्यांमधून वाहणाऱ्या रक्तपुरवठ्यात प्रतिरोध निर्माण होतो. म्हणजेच उच्च रक्तदाबाचा त्रास जाणवू लागतो. या उच्च रक्तदाबातूनच पुढे हार्ट अॅटॅक, पॅरालिसिस सारखे आजार निर्माण होतात.
प्रजनन समस्या
लठ्ठपणामुळे शरीरातील काही हॉर्मोन्समध्ये बदल होतात. त्यामुळे महिलांना अंडाशयाच्या वेगवेगळ्या समस्या उद्भवू लागतात, जसं की पीसीओडी,मासिक पाळी उशीरा येणं,प्रजनन समस्या वगैरे.
कॅन्सर
लठ्ठ महिलांना स्तनांचा कर्करोग, गर्भाशयाचा कॅन्सर,आतड्याचा कॅन्सर होण्याची शक्यता असते.
Also Read Exercise to Reduce Belly Fat In Marathi
लठ्ठपणा असल्यास काय खावे आणि काय खाऊ नये (Healthy Eating Tips)
वजन वाढल्याचे शरीरावर काय दुष्परिणाम होऊ शकतात हे आपण पाहिलंच. पण तुम्ही तुमच्या आहारात बदल घडवून वजनावर नियंत्रण नक्कीच मिळवू शकता. म्हणूनच आता आम्ही तुम्हाला सांगणार आहोत यासाठी काय खावे आणि काय खाऊ नये.
दिवसाची सुरुवात कशी कराल
सकाळी अनोशीपोटी लिंबू, मध आणि गरमपाणी एकत्र करुन प्या. त्यामुळे चरबी कमी होण्यास मदत होईल.
संतुलित आहार घ्या
आहारात नियमितपणे पालेभाज्या, फळभाज्या, हंगामी फळे, मोड आलेले कडधान्य,नाचणी, ज्वारी, बाजरी आणि हातसडीच्या तांदुळाचा समावेश अधिक प्रमाणात करा. यामध्ये फायबर्सचे प्रमाण अधिक असल्याने लठ्ठपणा, मधुमेह, हार्ट अटॅक, पॅरिलिसिस, कॅन्सर सारखे आजार लांब राहण्यास मदतच होते. तुमच्या रोजच्या जेवणात नियमित द्राक्षे, पेरू, सफरचंद, खरबूज, जांभूळ, आंबे, संत्री, टॉमेटो, टरबूज, अननस, लिंबू, स्ट्रॉबेरी आणि कमी कॅलेरीज असलेल्या भाज्या म्हणजेच कोबी, ब्रोकली, कांदे, मुळा, पालक, लसून, आलं इत्यादी पदार्थ असायलाच हवेत.
वाचा – मुळा खाण्याचे फायदे, मिळवा त्वचेच्या समस्येपासून सुटका
नियंत्रित आहार
बऱ्याचदा भूक लागली नसली तरी आपण वेळी अवेळी चिप्स, आणि इतर जिन्नस खात राहतो. भूक लागली असेल तर हे पदार्थ जरा जास्तच खातो. असं न करता प्रमाणात आणि पोषक आहार घ्या. प्रत्येक घास मुद्दामहून 32 वेळा चावून खा.
जेवणाची सुरुवात
थेट पोळी भाजी खावून जेवणाला सुरुवात न करता, मोड आलेले मुग – मटकी सारख्या डाळी (स्प्राऊटस्) किंवा कोशिंबीर खावून, सूप पिऊन जेवणाची सुरुवात करा. त्या खावून झाल्यानंतरच मुख्य अन्न खा. त्यामुळे आपोआपच गरजेपेक्षा जास्त अन्न पोटात जाणार नाही व उपाशी न राहता देखील तुम्हाला डायटींग करता येईल.
धान्यांवरील कोंडा
पिठातील कोंडा, तांदळावरची लालसर साल, डाळींची साल, बटाट्यावरील साल काढून टाकू नका हे पदार्थ असेच खा. पॉलिश केलेला चकचकीत पांढरा तांदूळ मुळीच वापरू नका. कारण पॉलिश केल्याने त्यातील फायबर निघून गेलेलं असतं.
मैद्याचे पदार्थ खाणं टाळा
बिस्किट, खारी, व्हाईट ब्रेड, न्युडल्स, केक सारखे बेकरी पदार्थ मैद्यापासूनच बनतात. मैदा पचायला जड असतो. मैद्याचे पदार्थ पूर्णपणे बंद करा. तुम्हाला कमालीचा फरक जाणवू लागेल. फायबर काढलेले प्रोसेस्ड फूड्स, बेकरी प्रॉडक्टस, फास्ट फूड्स बाजारात सहज उपलब्ध होतात. या पदार्थांचा वापर जाणिवपूर्वक टाळा.
साखरेचे गोड पदार्थ
आयुर्वेदानूसार साखर हा विषारी पदार्थ आहे. काही डॉक्टर्स तर सल्ला देतात की साखरेचा एकही दाणा पोटात जाऊ देऊ नका. ज्यांना हे जमलं त्यांचं वजन खरंच कमी झालंय. तुम्हाला हे पाळणं अशक्य वाटतं असलं तरी साखरेचं प्रमाण तुम्ही नक्कीच कमी करु शकता. चहा-कॉफी, कोल्ड्रींग कमी करा आणि आठवड्यातून एकदाच गोड पदार्थ खा.
हंगामी फळे
हंगामी फळे आरोग्यासाठी खरंच फायदेशीर ठरतात. त्यामधून तुमच्या शरीराला नैसर्गिक साखर तर मिळतेच पण इतरही उपयुक्त जीवनसत्व मिळतात. मात्र फळांचा रस (ज्यूस) करुन पिऊ नका. ज्यूसमधून फळांचा चोथा अर्थात फायबर काढून टाकला जातो आणि फळातली फक्त साखरच (शुगर) पोटात जाते. ज्याचा परिणाम पुढे रक्तात अतिरिक्त साखर निर्माण होण्यात होते. अतिरिक्त साखरेमुळे तुमच्या वजनात अधिक भरच पडते. यासाठी रस न करता फळं कापून खाणं कधीही चांगलं.
तेल
एका महिन्याच्या स्वयंपाकासाठी घरात किती तेल लागतं याचा हिशोब करा आणि तेवढंच तेल घरात आणा. तेलात नेहमी बदल करा, उदारणार्थ, कधी शेंगदाणा तेल तर कधी तीळाचं, सनफ्लावर,सरसो/मोहरी, राईज ब्रॅन वगैरे तेल वापरा. घरात तळलेले पदार्थ फार-फार तर आठवड्यातून एकदाच करा.
तूप खा आणि वजन घटवा
वजन वाढेल या भीतीने बऱ्याचदा आपण तूप आणि तुपाचे अनेक पदार्थ खाणं बंद करतो. मात्र खरंतर तूप खाल्यामुळे वजन वाढतं हा एक चुकीचा समज आहे. मात्र लक्षात ठेवा नेहमी गायीचंच तूप खा. शरिरावर अनेक फायदे होतात. आरोग्याच्या दृष्टीनेही तूप अत्यंत उपयुक्त असल्याने कित्येकदा डॉक्टर तूप खाण्याचा सल्ला देतात. गायीचं तूप स्वादिष्ट असण्यासोबतच वजन कमी करण्यासाठी, एनर्जी वाढवण्यासाठी, मानसिक स्वास्थ आणि त्वचेसाठी अत्यंत उपयुक्त असतं. गायीच्या देशी तुपामध्ये कॉन्जुगेटेड लिनोलिक अॅसिडचा (Conjugated Linoleic acid) समावेश असतो. हे अॅसिड शरिराचं वजन कमी करण्यासाठी प्रभावी मानलं जातं. देशी तूप शरिरामध्ये साचून राहिलेले फॅट घटवण्यासाठी आणि मेटाबॉलिझम वाढवण्यास मदत करतं. त्यामुळेच योग्य प्रमाणात तुपाचं सेवन केल्यास वजन वाढण्याऐवजी ते कमी होतं.
रात्री भात खाऊ नका
रात्री भात खाणं टाळा त्याने वजन वाढतं. खरंतर याबाबत अनेक मता-मतांतरे आहेत. पण असं केल्याने बऱ्याच जणांना फायदा झाला आहे हे ही तितकंच खरं आहे.
पाणी प्या
भरपूर पाणी प्या. आपल्या शरीरात 60 टक्के पाणी असतं. त्यामुळे शरीराला पाण्याची कमतरता कधीच जाणवू देऊ नका. दिवसांतून किमान 8 ते 10 ग्लास पाणी प्या.
कोमट पाणी
जेवणानंतर कोमट पाणी प्यायल्यानं वजन कमी होतं, मात्र जेवल्यावर लगेच किमान अर्धा ते पाऊण तास पाणी पिऊ नये.पाऊण तासाने एक ग्लास कोमट पाणी प्या. तसंच रात्री झोपण्यापूर्वी गरम किंवा कोमट पाणी प्या. यामुळं पोटाच्या समस्या तर कमी होतातच शिवाय जास्तीचं फॅट देखील बर्न होतं.
दोन जेवणांमध्ये भूक लागल्यास…
दोन जेवणांमध्ये भूक लागली की बऱ्याचदा आपण चॉकलेट, बिस्किटं किंवा चिप्स सारखे तद्दन पदार्थ खातो.खरंतर अशावेळी गोड खाणं कटाक्षाने टाळा. त्याऐवजी मधल्या काळात खाण्यासाठी सालीसकट फूटाणे, मुरमुरे, लाह्या, मोड आलेले कडधान्य, गाजर, टोमॅटो, काकडी, ताक नेहमीच चांगलं असतं.
वजन कमी करण्यासाठी टीप्स (Weight Loss Tips in Marathi)
जेवण बंद करु नका
सगळ्यात आधी लक्षात घ्या वजन कमी करायचं म्हणून रोजचं जेवण बंद करु नका. अशानं वजन तर कमी होणार नाहीच पण पित्ताचा त्रास निर्माण होईल. तुम्ही जेवलाच नाहीत तर तुमच्या शरिराला उर्जा कशी मिळेल? यामुळे अशक्तपणा देखील येऊ शकतो. न जेवल्याने फायदा तर होणार नाहीच उलट नुकसानच होईल.
दालचिनी
तुम्ही सकाळच्या चहा किंवा कॉफीमध्ये दालचिनी पावडर घालून रक्तातील शुगर नियंत्रणात ठेवू शकाल. त्यामुळे अर्थातच वजनदेखील नियंत्रणात ठेवण्यास मदत होईल.
ग्रीन टी
रात्री झोपण्यापूर्वी ग्रीन टी प्यायल्यानं शरीराची पचनक्रिया सुधारते आणि आपलं वजन कमी होण्यास मदत होते. त्याच बरोबर दिवसभरातही चहा किंवा कॉफी ऐवजी ग्रीन टी प्या. त्यात आलं आणि लिंबाचा रस टाकल्यास जास्त चांगला फायदा होऊ शकतो.
वाचा – वजन कमी करण्यास कसे ठरते फायदेशीर जाणून घ्या
गाजराचा रस
गाजराचा रस वजन घटवण्यासाठी फायदेशीर आहे. किमान 300 ग्रॅम गाजरचा रस दिवसातून एकदा घ्यावा.
सुका मेवा
सुका मेवा खाण्यामुळे शरिरातली चरबी कमी होऊ शकते. बदाम शेंगदाणे किंवा अक्रोड नियमित खा. सुका मेव्यात चरबी म्हणजे फॅट्स असतात, मात्र ते गुड फॅट्स असल्याने शरिरासाठी ते अधिक फायद्याचे असतात.
संत्री
लठ्ठ माणसांना सारखीच भुक लागते. बऱ्याचदा अशा लोकांना भुक आवरतही नाही, अशावेळी सरळ एखादं संत्र खा. संत्र्याने पोटही भरते आणि वजनही वाढत नाही.
पपई
संध्याकाळी भूक लागली असेल तर पपई खा. यामध्ये कॅलेरीज् कमी असतात व फायबरचं प्रमाण जास्त असतं. त्यामुळे चरबी कमी होण्यास मदत होते.
उकडलेला किंवा कच्चा कोबी
दररोज 250 ग्रॅम उकडलेला किंवा कच्चा कोबी खा. यामध्ये असलेले टायटेरिक ऍसिड शरिरातल्या साखरेचं आणि कार्बोहायड्रेट्सचं रुपांतर फॅट्समध्ये होऊ देत नाही.
कच्चा लसूण आणि लिंबू
लसणात चरबी कमी करण्याची ताकद असते. त्यामुळे कच्च्या लसणावर लिंबू पिळून तो चावून खाल्ल्यास पोटाचा घेर कमी होईल शिवाय रक्तप्रवाह देखील सुधारेल.
मिरची
खाण्यात मिरचीचं प्रमाण सोसेल इतकं वाढवा. मिरचीमध्ये असलेले कॅप्सीसीन नावाचे तत्व शरिरातली चरबी कमी करण्यास मदतीचे ठरते.
मध आणि गुळ
साखरे ऐवजी मध आणि गुळाचा वापर करा.याचा फरक तुम्हाला नक्कीच जाणवेलचं. मध जुनं असेल तर तब्येतीसाठी अधिक चांगलं ठरेल.
मध आणि लिंबू
मध वजन कमी करण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरते. एक चमचा मध, अर्धा चमचा लिंबाचा रस, गरम पाण्यात मिक्स करून घ्या. त्यामुळे शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होते. हे मिश्रण दिवसातून 3 वेळा घ्या.
मध आणि दालचिनी
एक कप पाण्यात, 1 लहान चमचा मध आणि लहान चमचा दालचिनी पावडर मिसळून रोज सकाळ, संध्याकाळ प्या.
आलं
रोज 1 आल्याचा छोटा तुकडा चघळा किंवा जेवणाआधी आल्याच्या रसात जरासं मीठ टाकून ते प्या.
दुधी भोपळा
रोज दुधी भोपळ्याचा ज्युस प्या किंवा सुप प्या. त्यात जास्त प्रमाणात फायबर असतं. तसेच यामध्ये कॅलेरीजदेखील फार कमी प्रमाणात असतात.
रात्रीच्या जेवणात नाचणीची भाकरी
रात्रीच्या जेवणात नाचणीची भाकरी खा. यात भरपूर प्रमाणात न्युट्रियन्ट्स असतात शिवाय यात कॅलेरीज् कमी प्रमाणात असतात.
दोन जेवणातलं अंतर
दोन जेवणांमध्ये ठराविक अंतर असायला हवं म्हणजे साधारणतः 3 तासांपेक्षा कमी किंवा 6 तासांपेक्षा जास्त अंतर ठेवू नका.
शतपावली
जेवण झाल्यावर शतपावली करावी. त्याने अन्न पचण्यास मदत होते.
झोप
रात्री पुरेशी झोप घ्या. दुपारची वामकुक्षी विसरा. जेवणानंतर लगेच झोपू नका. रात्रीचं जेवण आणि झोप यामध्ये किमान 3 ते 4 तासांच अंतर ठेवा.
व्यायाम
आपल्या जीवनशैलीत व्यायामाचा विसर पडू देऊ नका. दररोज किमान 12 सुर्यनमस्कार तरी घाला. मानसिक ताणतणावापासून दूर राहण्यासाठी प्राणायम, योगा, ध्यान-धारणा करा.
वजनावर लक्ष ठेवा
आपलं वजन हे बॉडीमास इंडेक्स, वेस्ट-हिप रेश्यो, ब्लड शुगर आणि कोलेस्टिरॉल यावर अवलंबून असतं. त्यामुळे नियमितपणे या गोष्टी मोजा आणि त्याची नोंद ठेवा.
वजन कमी करण्यासाठी घरगुती उपाय (Home Remedies To Lose Weight)
वजन कमी करण्यासाठी आता आम्ही तुम्हाला काही घरगुती उपाय सांगणार आहोत. त्यात उपायांना बरेच पर्यायही देत आहोत, जेणे करुन तुमच्या आरोग्याला सोसवतील असे पर्याय तुम्हाला उपलब्ध होतील. हो पण एक गोष्ट विसरु नका… तुम्हाला जर कोणता आजार असेल आणि त्यावर उपचार चालू असतील तर डॉक्टरांच्या सल्ल्यानूसारच या टिप्स फॉलो करा.
उपाशी पोटी हे प्या…. (Drinks For Weight Loss)
मेथीचे दाणे
मेथीचे दाणे भरडून त्याची पुड अनोशी पोटी नियमित कोमट पाण्यासह घेतल्यास वजन कमी करण्यास त्याचा उपयोग होतो.
त्रिफळा काढा
चमचा त्रिफळा चूर्ण रात्री 1 ग्लास पाण्यात भिजत घाला.सकाळी ते निम्मे होई पर्यंत उकळवून, आटवून घ्या. ते गाळून त्यात 1 चमचा मध घालून गरम गरम प्या. ते प्यायल्यावर किमान 15 ते 20 मिनिटं तरी काही खाऊ किंवा पिऊ नका. हे चवीनं खूप कडू जरी असेल तरी खूप फायदेशीर आहे. सोबत व्यायामाची जोड असेल तर भराभर वजन कमी होते. काही आजार किंवा उपचार चालू असल्यास चूर्ण घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या.
कोरफड आणि आवळा
रोज सकाळी उपाशीपोटी 1 चमचा कोरफड आणि 1 चमचा आवळ्याचा रस एकत्र करुन प्या व त्यानंतर 1 ग्लास पाणी प्या.
टोमॅटो
सकाळी अनोशीपोटी 250 ग्रॅम टोमॅटोचा रस 2-3 महिने प्यायल्याने वजन कमी होण्यास मदत होते. किंवा तुम्ही अनोशीपोटी कच्चे टोमॅटो खा तेही फायदेशीर ठरेल.
मध, लिंबू, काळीमिरी पूड
एक ग्लास पाण्यात 3 लहान चमचे लिंबाचा रस, 1 लहान चमचा मध आणि अर्धा चमचा काळीमिरी पूड मिसळून, हे मिश्रण रोज सकाळी उपाशीपोटी प्या.
हळद
रोज सकाळी उपाशीपोटी एक चमचा हळद खा व त्यावर कोमट पाणी प्या.
बडीशेप
1 ग्लास पाण्यात 1 चमचा बडीशेप रात्रभर भिजत ठेवा. हे पाणी सकाळी उकळून गाळून प्या.
अॅपल सायडर व्हिनेगर
अॅपल सायडर व्हिनेगरचे दोन लहान चमचे एक ग्लास पाण्यात टाका आणि सकाळी नाश्त्याच्या आधी प्या.
यापैकी कुठलीही कृती फॉलो करा तुम्हाला फरक नक्की जाणवेल.. आता या शिवाय तुम्ही काय केलं तर वजन कमी होईल या टिप्स…(Tips You Should Follow To Lose Weight)
1. जिरं आणि केळं
हा घरगुती उपाय नक्की करून पहा. जिरं आणि केळं दोन्ही रेचक असल्यानं पचनशक्ती वाढते.तसंच अपचनाची समस्याही कमी होते. परिणामी चयापचनाच्या क्रियेची गती वाढते.आयुर्वेदानूसार, जिरं पोटातील फॅट्स कमी करतं तर केळं, पचनमार्गाच्या आतील त्वचेला हानी पोहचवण्यापासून वाचवतं.पोटातील अल्सर कमी करण्यास मदत करतं. पचनक्रियेतील या सगळ्या प्रकिया सुरळीत झाल्या तर अर्थातच वजन कमी होण्यास मदत होईल.
कृती
वजन कमी करण्यासाठी पिवळ्या रंगाचं केळं निवडा. अर्ध्या केळ्यात भाजलेल्या जिर्याची पूड टाका. हे मिश्रण नीट मिसळून घ्या आणि नियमित दोन चमचे खा.
लक्षात ठेवा
वजनाबाबत पी हळद आणि हो गोरी असं कधीच नसतं. केळं – जिर्याचं मिश्रण खाल्ल्यानं लगेचच तुमचं वजन कमी होणार नाही. मात्र हळू हळू फरक नक्की जाणवेल.
2. हा रस रात्री प्या आणि वजन घटवा
वजन कमी करण्यासाठी आता आम्ही एका ज्यूसची रेसिपी तुम्हाला देतोय. त्यासाठी तुम्हाला विशेष जिन्नसांची आवश्यकता नाही. यात लागणारे पदार्थ तुमच्या स्वयंपाकघरात सहज उपलब्ध असतील. हा ज्यूस तयार करण्यासाठी लागणारी सामुग्री पुढील प्रमाणे आहे.
1 लिंबू
1 ग्लास पाणी
1 काकडी
1 चमचा वाटलेलं आलं
1 चमचा कोरफड रस
1 जुडी कोथिंबीर
निवडलेली कोथिंबिर, कोरफडीचा रस, साल काढलेली काकडी, आलं आणि पाणी सर्व पदार्थ मिक्सरमध्ये वाटून घ्या. त्यात लिंबाचा रस पिळा. आता हा ज्यूस रात्री झोपण्यापूर्वी प्या. याने आपलं वजन आटोक्यात येईल. या मिश्रणाने आपल्या शरीरातील चयापचय प्रक्रियेला चालना मिळेल, परिणामी झोपल्यानंतरही चयापचय सक्रिय राहील आणि लठ्ठपणा कमी होईल. दररोज हा ज्यूस प्यायल्यानं काही दिवसातच आपल्याला याचे परिणाम दिसून येतील. विशेषतः हा ज्यूस पोटातील चरबी कमी करण्यात मदत करेल.
3. आयुर्वेदीक काढा
सामुग्री- शुध्द शिलाजीत, मेथी, दारुहळद, करंजी, आवळा, गुळवेल, कुटकी, बेहडा, हळद, बाभळी, काळे जिरे, मंजीष्ठ, चिरायत, द्रोणपुष्पी, पंवार, भुंई आमला, हरड, गूगुल, बाभळीचा डिंक, बाकुची.(ही सामुग्री तुम्हाला आयुर्वेद औषधींच्या दुकानात मिळेल.)
कृती- 2 महिन्याचा काढा तयार करण्यासाठी वरील सर्व सामुग्री 60-60 ग्रॅम या प्रमाणात एकत्र करून बारीक दळून घ्या. सकाळ-संध्याकाळ रिकाम्या पोटी अर्धा चमचा चूर्ण 2 ग्लास पाण्यात आटवा. पाणी अर्ध झाल्यावर ते गार करा आणि गाळून प्या.
विशेष सूचनाः डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय हा काढा घेऊ नका. तुमच्यावर उपचार सुरु असतील तर विशेष काळजी घ्या.
4. रोज झोपण्या आधी एक ग्लास पाण्यात एक चमचा जिरेपूड आणि थोडं काळं मीठ टाकून मिश्रण प्या.
5. ताज्या पुदिन्याच्या पानांची चटणी करुन पोळीसोबत खा. पुदिन्याचा चहा प्यायल्यास वजन नियंत्रित राहतं.
6. जेवणापूर्वी गाजर खा. जेवणापूर्वी गाजर खाल्यास भूक कमी लागते.
7. एका कप उकळत्या पाण्यात, अर्धा चमचा बडिशेप टाका. 10 मिनिटं त्याला झाकून ठेवा. थंड झाल्यानंतर ते पाणी प्या. तीन महिने केल्यास वजन कमी होते.
8. हिरडा आणि बेहडाचं चूर्ण बनवा. एक चमचा चूर्ण 50 ग्रॅम पडवळीच्या रसासोबत नेहमी घ्या, वजन कमी होण्यास सुरुवात होईल.
9. कारल्याची भाजी नियमित खाल्ल्यास वजन कमी होण्यास मदत होते. तसेच शेवग्याचा नियमित वापर केल्यास वजन नियंत्रित राहतं.
10. सुंठ, दालचिनीच्या साली आणि काळी मिरी (3-3 ग्रॅम) बारीक करुन चूर्ण बनवावं. सकाळी रिकाम्या पोटी आणि रात्री झोपण्यापूर्वी हे चूर्ण खावं.
11. आवळा आणि हळद समप्रमाणात घेऊन त्याचे बारीक चूर्ण करावं. हे चूर्ण ताकासोबत घेतल्यास कंबर एकदम सुबक होते.
12. लेंडी पिंपळी बारीक करुन कपड्यावर गाळून घ्यावी. हे चूर्ण तीन ग्रॅम या प्रमाणात नेहमी ताकासोबत घ्या. त्यानं बाहेर आलेलं पोट आत जातं.
एक चमचा पुदीन्याच्या रसामध्ये 2 चमचे मध मिसळून प्यायलास लठ्ठपणा कमी होतो.
वजन कमी करण्यासाठी डॉक्टरांचा योग्य सल्ला
वाढतं वजन म्हणजे अनेक रोगांना आमंत्रण देतं. त्यामुळे वेळीच वजनावर नियंत्रण ठेवता आलं तर ते कधीही चांगलं आहे. वजन आटोक्यात ठेवण्यासाठी आणि निरोगी आरोग्य लाभावं यासाठी डॉक्टर नेहमी योग्य आहार, झेपेल इतकाच व्यायाम आणि पुरेशी झोप ही महत्त्वाची त्रिसुत्री सांगतात. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक न करता व्यसनापासून दूर राहा, आणि आनंदात जगा. त्याचबरोबर आपण जे घरगुती उपाय करतो ते उपाय वैद्यकीय औषधांना पर्याय असू शकत नाही. त्यामुळे जे उपाय कराल ते करण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला जरूर घ्या. डॉक्टरही वजन आटोक्यात रहावं म्हणून काही सल्ला देतात तो असा…
आज काल प्रत्येकाकडे आपलं स्वतःचं वाहन अथवा वाहतूकीची साधनं उपलब्ध झाली. त्यामुळे आपण चालणं विसरलो आहोत. वजन कमी करण्यासाठी दररोज नियमित चाला. जमलंच तर सकाळी 45 मिनिटं आणि संध्याकाळी 45 मिनिटं चाला. यामुळे तुम्ही अगदी फीट रहाल. काहीच नाही तर लिफ्टऐवजी जिन्याचा वापर करा किंवा सायकल वापरा.
नुसत्या डाएटने किंवा घरगुती उपायांनी भागत नाही त्यासाठी पुरेसा व्यायाम करणं देखील तितकंच गरजेचं आहे. असं असलं तरी प्रत्येकाने आपली तब्येत सांभाळून व्यायाम करावा. व्यायामात देखील वेळोवेळी बदल करा. जसं की दररोज कार्डिओ करण्याऐवजी दोन दिवस कार्डिओ, दोन दिवस योगासने, एक दिवस पोहणे, एखाद्या दिवशी फक्त जॉगिंग अथवा चालणं असं रुटीन ठेवा.
बाहेरचे तेलकट तुपकट पदार्थ खाणे टाळा. जंक फुडकडे शक्यतो ढूंकुनही पाहू नका. तसेच जास्त दिवस प्रिझर्व्ह केलेले, शिळे, फ्रिजमधल्या अन्नपदार्थांच सेवन करणे टाळा
सर्वात महत्वाचं म्हणजे रात्रीचं जेवण सात-साडेसात ते आठ पर्यंत करा. जेवणानंतर कमीतकमी चार तासांनी झोपा म्हणजे तुमच्या अन्नाचं पूर्ण पचन झालं असेल. तुम्ही तुमचं जेवण संध्याकाळी सातपर्यंत आटोपलं व त्यानंतर चार तासानंतर तुम्ही झोपायला गेला तर तुम्हाला सकाळी निश्चितच लवकर भूक लागेल. यामुळे तुमचा सकाळचा नाश्ताही वेळेवरच होईल. या सवयीमुळे तुमचं तुमचं दुपारचं जेवण देखील वेळेवर होऊ शकेल.असं केल्याने हळू हळू तुमची फुड हॅबिट सुधारु लागेल.
शरीरात पाण्याचे प्रमाण योग्य राहील याची काळजी घ्या. डिहायड्रेट झालेले शरीर वजन घटवू शकत नाही त्यामुळे दररोज किमान ३ लिटर पाणी दररोज प्यायलंच पाहिजे.
आजकाल प्लॅस्टिकचा जमाना असल्याने धातूंच्या भांड्यांचा वापर फार कमी होतो. मात्र हे आरोग्यासाठी घातक आहे. दररोज तांब्याच्या भांड्यामध्ये 8 तास ठेवलेलं पाणी प्या. यामुळे शरीरातील एक्स्ट्रा फॅट कमी होते. शरीरामध्ये कोणत्याही प्रकारची कमतरता किंवा अशक्तपणा राहत नाही.
जेवणामध्ये दही खाल्ल्यास चरबी कमी होते. ताक ही दिवसभरात दोन-तीन वेळा प्या.
दिवसभर उपाशी राहण्यापेक्षा दर 2 ते 3 तासांनी खाणे कधीही योग्य. त्यामुळे अधिकाधिक कॅलरीज् जाळण्यास मदत होते.
मासे – मटणपेक्षा चरबीचे प्रमाण कमी असलेले प्रोटिनयुक्त चिकन खाणे नेहमीच योग्य असते. शाकाहारींसाठी मलई नसलेले (स्किम्ड) दुग्धजन्य पदार्थ, दही आणि पनीर खाणे कधीही फायद्याचंच ठरेल.
शरीरातील चरबी वेगाने घटवण्यासाठी ओमेगा ३ फॅट्सचा आहारात समावेश करा. अक्रोड, बदाम आणि फ्लेक्स सीड्सचा अंतर्भाव तुमच्या जेवणात करा.
बदलती जीनवशैली आणि बैठ्या कामांमुळे लठ्ठपणाचे प्रमाण वाढत आहे. हे पाहूनच अनेक कंपन्यांनी वजन कमी करणारी औषधे बाजारात उपलब्ध केली आहेत. परंतू अशा औषधांच्या वापरामुळे लाभापेक्षा नुकसानच अधिक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अशा औषधांचा वापर करुच नका अगदी वाटलंच तर डॉक्टरांचा सल्ला घ्या.
केवळ आहार नियंत्रणाने किंवा अशा प्रकारच्या औषधांनी काही काळापूरतच वजनावर नियंत्रण मिळवता येतं. कायम नियंत्रणासाठी शरीराच्या स्नायुंमध्ये बळकटी वाढवणं आवश्यक आहे. स्नायुंमध्ये बळकटी आली की शरीरातली भट्टी जोमाने फॅट्सला जाळते व शरीरातील फॅट लवकर कमी होतात. स्नायू वाढवण्यासाठी व्यायाम आवश्यकच आहे.
आरोग्याची त्रिसुत्री पाळली आणि वेळेवर सर्व काही केलं तर तुम्हाला अगदी काही दिवसातच फरक जाणवेल. मात्र इतकं सगळं नियमित करुनही तुमचं वजन आटोक्यात येत नसेल, तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या.
फोटोसौजन्य – Pexels
You Might Like These:
Weight Loss Diet Plan In Marathi