चला नाही नाही म्हणता आता दिवाळीदेखील आली. दिवाळी म्हटली की, फराळ आला. पण शंकरपाळे, लाडू असं तेच तेच खावूनही फार कंटाळा येतो. अशावेळी जीभेवर काहीतरी मस्त तरळावे असे वाटते. या दिवसांत गोड खाण्याचा मोह कोणालाही आवरत नसला तरी गोडाचा पदार्थ हटके असावा असे वाटते. म्हणूनच गोडाची सोपी आणि स्पेशल अशी शाही तुकडा रेसिपी आज आपण पाहुया. करायला फारच सोपी आणि कमीत कमी साहित्यात बनवणारी ही शाही डिश तुम्हाला आणि तुमच्या पाहुण्यांना नक्कीच खूश करेल. चला करुया सुरुवात
शाही तुकडा म्हणून असतो शाही
प्रत्येक रेसिपीचा काहीना काही इतिहास असतो.शाही तुकडा रेसिपीच्या बाबतीतही अगदी तसेच आहे. शाही तुकडा ही मुघल काळातील एक प्रसिद्ध डिश आहे.क्रिस्पी, क्रंची आणि तरीही तोंडात टाकल्यावर विरघळणारी ही रेसिपी ब्रेडपासून बनवली जाते. यामागे एक कथा सांगितली जाते ती अशी की, मुघलांचा एक राजा शिपायासोबत नदी किनाऱ्यावर गेला होता. त्यावेळी त्यांना खूप भूक लागली. पण सोबत काहीही न आणल्यामुळे गावात जाऊन शिपायाने आचाऱ्याला शोधण्यास सुरुवात केली. तो आचारी राजाकडे आला आणि राजाने त्याला आपल्यासाठी जेवण करायला सांगितले. गरीब आचाऱ्याकडे जवळपास काहीच सामान नव्हते. त्याने शिळ्या ब्रेडच्या तुकड्यांना तळून त्यावर दूध आटवून केलेली रबडी टाकली. राजाला ही डिश फारच आवडली. राज घराण्यासाठी ही डिश केली म्हणून याला ‘शाही तुकडा’ असे नाव ठेवण्यात आले. हैदराबादमध्ये आजही अनेक ठिकाणी ही रेसिपी आवर्जून खाल्ली जाते.
दिवाळीसाठी बनवा झटपट मावा अनारसा, वेगळी रेसिपी करा ट्राय
असा करा शाही तुकडा
साहित्य: तुमच्या आवडीचा ब्राऊन किंवा व्हाईट ब्रेड, तूप, दूध, साखर, ड्रायफ्रुट्स (आवडीनुसार)
कृती :
- सगळ्यात आधी तुम्हाला हव्या असलेल्या ब्रेडच्या स्लाईस घेऊन त्याच्या कडा काढून घ्या. त्याचे दोन त्रिकोणी भाग करुन घ्या. सगळ्या ब्रेडचे अशा पद्धतीने तुकडे करा.
- दुसरीकडे गॅसवर साखरेचा पाक करुन घ्या. हा साखरेचा पाक फार घट्ट किेंवा जाड करायची काहीच गरज नाही.फक्त पावाचे तुकडे पाकात भिजवायचे असल्यामुळे तसा आणि तेवढाच पाक तयार करा.
- एका भांड्यात तूप गरम करुन तुपात छान सोनेरी रंग येईपर्यंत पाव तळून घ्या.
- दुसरीकडे दूध गरम करायला ठेवा. त्याच्यापासून आपल्याला छान रबडी तयार करायची आहे. रबडीसाठी तुम्हाला दूध फारवेळ उकळावे लागते. ते जितकं आटेल तितका त्यामध्ये गोडवा वाढत राहतो. त्यामुळे बेतानेच साखर घाला. दूध जितकं आटेल आणि घट्ट होईल तितकं ते चांगलं लागतं. ही रबडी घट्ट होण्यासाठी तुम्ही फुल फॅट दूधाचा उपयोग केल्यास फारच उत्तम
- दूध चांगले आटले की, त्यामध्ये काजू-बदाम-पिस्ता छान पातळ चिरुन घाला. एका प्लेटमध्ये ब्रेड स्लाईस घेऊन त्यावर ही रबडी ओता. याची चव थंड केल्यास अधिक चांगली लागते. त्यामुळे तुम्ही थोडा वेळ थंड करुन मगच त्याचा आस्वाद घ्या.
रात्रीच्या जेवणानंतर बनवा झटपट ‘मीठा पान’, सोपी रेसिपी
टाळा या चुका
ही डिश संपूर्णपणे पावावर अवलंबून असते. पाव कुरकुरीत असेल तर याला एक छान चव येते. त्यामुळे ही डिश सर्व्ह करुन ठेवू नका. कारण पावाचा तो कुरकुरीतपणा पूर्णपणे निघून जातो. आणि पाव वातड लागायला लागतो.
आता घरीच बनवा शाही तुकडा आणि साजरा करा दिवाळीचा आनंद!