महाशिवरात्री म्हणजे शिवभक्तांसाठी पर्वणीच कारण या दिवशी मोठ्या भक्तिभावाने भगवान शंकराची पूजा अर्चा केली जाते. यंदा मंगळवारी 1 मार्च 2022ला महाशिवरात्री (Mahashivratri 2022) आहे. महाशिवरात्र साजरी करण्यासाठी शिवभक्तांना द्या महाशिवरात्रीच्या महापर्वासाठी खास शुभेच्छा (Mahashivratri Wishes In Marathi) वास्तविक हिंदू कालदर्शिकेनुसार वर्षभरात प्रत्येक महिन्यात एक याप्रमाणे बारा महिन्यांच्या बारा शिवरात्री असतात. मात्र या सर्व शिवरात्री आणि महाशिवरात्री यामध्ये खूप फरक आहे. यासाठीच जाणून घ्या महाशिवरात्री का साजरी केली जाते आणि इतर शिवरात्री आणि महाशिवरात्री यामध्ये नेमका काय फरक आहे.
महाशिवरात्री का साजरी केली जाते
महाशिवरात्री साजरी करण्यामागे अनेक कथा पुराणात सांगितल्या जातात. जाणून घ्या महाशिवरात्रीची माहिती (Mahashivratri Information In Marathi). हिंदू धर्मामध्ये महाशिवरात्रीला विशेष महत्त्व दिले जाते. असं म्हणतात की याच दिवशी सृष्टीची निर्मिती झाली होती. महाशिवरात्री साजरी करण्यामागे आणखी काही कारणे पुराणात सांगण्यात आलेली आहेत.
- सर्वात महत्त्वाचे कारण असे की या दिवशी सृष्टीची निर्मिती झाली असं मानलं जातं. त्याचप्रमाणे एका कथेनुसार समुद्रमंथनात निघालेले विष प्राथन करून भगवान शंकराने सृष्टीला नष्ट होण्यापासून वाचवले होते. याच कारणामुळे भगवान शंकराला निलकंठ असेही म्हटले जाते.
- भगवान शंकर आणि माता पार्वती यांचा विवाह फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षाच्या चतुर्दशीला झाला होता. ज्यामुळे शिवशक्तीच्या महामिलनाची रात्र म्हणून महाशिवरात्री साजरी केली जाते. त्यामुळे असा एक समज आहे की या दिवशी जो भगवान शंकराची मनोभावे पूजा अर्चा करेल त्याचा विवाह योग्य वेळी आणि योग्य व्यक्तीसोबत होईल.
- काही कथांनुसार भगवान शंकर या दिवशी पृथ्वीवर शिवलिंग स्वरूपात प्रगट झाले होते. त्यापूर्वी फक्त भगवान विष्णू आणि भगवान ब्रम्हाचीच पूजा पृथ्वीवर केली जात असे. म्हणूनच महाशिवरात्रीला भगवान शंकराची शिवलिंग पूजा केली जाते.
शिवरात्री आणि महाशिवरात्रीमधील मुख्य फरक
हिंदु कालदर्शिकेनुसार प्रत्येक महिन्यात कृष्ण पक्षात येणाऱ्या चतुर्दशीला शिवरात्री असं म्हटलं जातं. वर्षभरात बारा महिन्याच्या बारा शिवरात्री असतात. यातील फक्त फाल्गुन महिन्यात येणारी शिवरात्री ही महाशिवरात्री म्हणून साजरी केली जाते. कारण पौराणिक कथांनुसार या दिवशी भगवान शंकर रूद्र रुपात पृथ्वीवर प्रगट होतात. या दिवशी मनोभावे शिवशंकराची पूजा केल्यास भक्ताच्या इच्छा पूर्ण होतात अशी देखील मान्यता आहे. म्हणूनच वर्षातील या महिन्यातील शिवरात्रीच महाशिवरात्री म्हणून मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. या दिवशी भारतातील सर्व भगवान शंकराच्या मंदिरांमध्ये मोठ्या प्रमाणावर पूजा अर्चा, अभिषेक केले जातात. महाशिवरात्रीची पूजा करण्यासाठी यंदा 1 मार्च 2022 सकाळी 3:16 पासून ते 2 मार्च रात्री 10:00 पर्यंत शुभमुहूर्त आहे. यासोबतच जाणून घ्या 12 ज्योतिर्लिंगाची नावे आणि माहिती (12 Jyotirling Names In Marathi)