कोरड्या आणि शुष्क झालेल्या केसांना मऊ मुलायम करायचं आहे का, तुम्ही तुमच्या केसांना तुमच्या त्वचेप्रमाणेच मॉईस्चराईझ करू शकता. बाजारातील शॅम्पू आणि कंडिशनरमुळे केस मॉईस्चराईझ करता येत असलं तरी नैसर्गिक उपाय नेहमीच फायद्याचे ठरतात. यामुळे केस मऊ आणि मुलायम तर होतातच शिवाय केसांचे गळणेही कमी होते. केस मुलायम करण्यासाठी यासोबत योग्य आहारही घ्यायला हवा. शिवाय स्ट्रेटनिंग आणि कर्लिंगसारखे हिट देणारी उपकरणं केसांवर कमी वापरायला हवीत. उन्हातून फिरताना केस टोपी अथवा स्कार्फने कव्हर करावेत. यासोबत हे नैसर्गिक उपाय नियमित करावेत ज्यामुळे तुमचे केस मऊ आणि मुलायम होतील.
नारळाचे तेल –
नारळाचे तेल केसांसाठी वरदान आहे. कारण केसांच्या कोणत्याही समस्या असू दे तुम्ही बिनधास्त नारळाच्या तेलाचा वापर केसांवर करू शकता. नियमित नारळाच्या तेलाने मालिश केल्यामुळे केस मऊ आणि मुलायम तर होतातच. शिवाय केसांना योग्य पोषण मिळाल्यामुळे ते मॉईस्चराईझही होतात. नारळाच्या तेलातील प्रोटिन्स केस आणि स्काल्पला निरोगी ठेवते. यासाठी आठवड्यातून कमीत कमी दोनदा केसांना नारळाच्या तेलाने मालिश करा.
shutterstock
भोपळ्याच्या बियांचे तेल
केस मॉईस्चराईझ करण्यासाठी भोपळ्याच्या बियांचे तेलही केसांवर उपयुक्त ठरते. जर तुमचे केस खूप गळत असतील केस कोरडे झाल्याने तुटत असतील तर अशा केसांना भोपळ्याच्या बियांचे तेल लावायला हवे. तुम्ही यासाठी भोपळ्याच्या बियांचे तेल मधात मिसळून केसांना लावू शकता. केस धुतल्यानंतर कंडिशनरप्रमाणे हे मिश्रण केसांना लावा. पंधरा ते वीस मिनिटांनी केस थंड पाण्याने धुवून टाका. आठवड्याभरात एक ते दोन वेळा हा उपाय करा.
अंडे आणि ऑलिव्ह ऑईल
अंड्यातील प्रोटिन्स केसांसाठी नक्कीच फायद्याचे ठरतात. त्यामुळे जर तुमचे केस कोरडे असतील तर केसांवर अंड्याचा वापर केल्यामुळे चांगला परिणाम जाणवू शकेल. यासाठी अंड्याचा गर आणि ऑलिव्ह ऑईल एकत्र करा आणि केसांच्या मुळांना लावा. वीस ते तीस मिनिटांनी केस शॅम्पू करा. आठवड्यातून एकदा तरी हा उपाय जरूर करा.
शीया बटर –
शीया बटर त्वचा आणि केसांसाठी खूप उपयुक्त ठरते. कारण यामध्ये सर्वात जास्त मॉईस्चराईझ करण्याची क्षमता असते. जर तुमचे केस राठ झाले असतील आणि त्यांना सतत मॉईस्चराईझ करण्याची गरज असेल तर एक ते दोन चमचे शीया बटर तुमच्या केसांच्या मुळांना लावा. एक तास केस बांधून ठेवा. ज्यामुळे ते तुमच्या केसांच्या मुळांमध्ये चांगले मुरेल. त्यानंतर कोमट पाण्याने केस धुवून टाका. आठवड्यातून दोनदा हा उपाय करा ज्यामुळे तुमचे केस मऊ होतील.
पिकलेलं केळं आणि ऑलिव्ह ऑईल –
केसांवर पिकलेलं केळं लावल्यास तुमच्या केसांना चांगलं मॉईस्चराईझ मिळू शकतं. कारण केळ्यामुळे केस हायड्रेट राहतात आणि त्यांना योग्य पोषण मिळतं. यासाठी पिकलेलं केळं स्मॅश करून त्यात ऑलिव्ह ऑईल मिसळा आणि तुमच्या केसांच्या मुळांवर लावा. वीस ते तीस मिनिटांनी केस धुवून टाका. केसांवर याचा चांगला परिणाम दिसू लागेल.
shutterstock
फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम
अधिक वाचा –
जास्वंदीच्या फुलाने घरीच करा केस असे चमकदार