‘डॉन 3’ मधून शाहरूख खानचा पत्ता कट, ‘गली बॉय’ची होणार एन्ट्री

‘डॉन 3’ मधून शाहरूख खानचा पत्ता कट, ‘गली बॉय’ची होणार एन्ट्री

गेल्या काही दिवसांपर्यंत शाहरूख खान (Shahrukh Khan) लवकरच ‘डॉन 3’ (Don 3) या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात करणार अशी चर्चा होती. इतकंच काय तर शाहरूखच्या या चित्रपटाचं शेड्युलदेखील ठरवण्यात आल्याचं सांगण्यात येत होतं. पण आता अचानक या चर्चेला ब्रेक लागला असून ‘डॉन 3’ मधून शाहरूख खानचा पत्ता कट झाल्याचं अर्थात शाहरूख काम करणार नसल्याचं समोर येत आहे. इतकंच नाही तर एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या बातमीप्रमाणे शाहरूखची जागा आता ‘गली बॉय’ (Gully Boy) रणवीर सिंग (Ranveer Singh) घेणार असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे आता 11 मुल्को की पुलिस शाहरूखला नाही तर रणवीर सिंगला शोधणार आहे.


shahrukh


रणवीरकडून कोणताही रिप्लाय नाही


शाहरूख खानने हा चित्रपट काही व्यक्तिगत कामानिमित्त सोडला आणि त्यानंतर ‘डॉन 3’ च्या चित्रपटांच्या निर्मात्यांना नक्की काय करायचं हे समजत नव्हतं. त्यामुळे त्यांनी रणवीरच्या नावाचा विचार केल्याचं सध्या समोर येत आहे. पण रणवीरकडून अजून कोणताही रिप्लाय मिळाला नसल्याचंही या इंग्रजी वृत्तपत्रानं सांगितलं आहे. याशिवाय रणवीरबरोबर अभिनेत्री म्हणून या चित्रपटामध्ये कतरिना कैफची वर्णी लागण्याचीही शक्यता असल्याची सध्या बातमी आहे. तर दुसरीकडे असंही म्हटलं जात आहे की, अभिनेत्री म्हणून कदाचित दीपिकाच्या नावाचाही या चित्रपटासाठी विचार होऊ शकतो. अजूनही यापैकी काही निश्चित झालं नाहीये. पण जर असं झालं तर शाहरूखला खूपच मोठा झटका बसणार आहे. गेल्या तीन वर्षापासून शाहरूख खानने एकही हिट चित्रपट दिलेला नाही. ‘रईस’ चित्रपटापासून शाहरूखला एकदाही प्रेक्षकांच्या मनावर आपली जादू पुन्हा चालवता आलेली नाही. तर सध्या रणवीर सिंगची सगळीकडेच चलती आहे.


gully boy Fb


‘डॉन 3’ वर काम चालू


काही दिवसांपूर्वीच ‘डॉन 3’ चा निर्माता रितेश सिधवानीने या चित्रपटाच्या कथेवर आणि बाकी गोष्टींवर काम चालू असल्याचं सांगितलं होतं. शिवाय या चित्रपटाचं शेड्युल नक्की कधी सुरु करणार हेदेखील लवकरच सांगण्यात येईल असंही रितेशने एका मुलाखतीमध्ये स्पष्ट केलं होतं. दरम्यान याच वर्षाच्या सुरुवातीला निर्माता रितेश सिधवानीचा ‘गली बॉय’ हा रणवीर सिंगने अभिनये केलेला चित्रपट प्रदर्शित झाला आणि प्रेक्षकांनी अक्षरशः हा चित्रपट डोक्यावर घेतला होता. त्यामुळे ‘डॉन 3’ या चित्रपटातही रणवीरची वर्णी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.शाहरूखने थोड्याच दिवसांपूर्वी ‘सारे जहाँ से अच्छा’ हा चित्रपटदेखील सोडला. त्यामुळे शाहरूखला नक्की काय झालंय असा प्रश्न त्याच्या चाहत्यांना नक्कीच सतावत आहे. तर दुसऱ्या बाजूला रणवीर सिंग सध्या कपिल देव आणि भारतीय टीमने जिंकलेल्या वर्ल्ड कपबद्दल ‘83’ या चित्रपटात काम करत असून याचं धरमशालामध्ये प्रशिक्षण घेत आहे. पण जर रणवीरने ‘डॉन 3’ हा चित्रपटदेखील साईन केला तर रणवीरच्या आयुष्यातील हा अजून एक वेगळा चित्रपट नक्कीच ठरेल. रणवीरने आपल्या करिअरच्या सुरुवातीपासूनच नेहमी वेगळे चित्रपट केले आहेत. रणवीरची एनर्जी आणि त्याच्या अभिनयाचा वाढता ग्राफ पाहता ‘डॉन 3’ मध्ये त्याने काम केल्यास, ही भूमिका तो नक्कीच चांगली करू शकेल असा विश्वास त्याच्या चाहत्यांना वाटत आहे. त्यामुळे आता यापैकी नक्की काय समोर येत आहे याची उत्सुकता सर्वांनाच लागून राहिली आहे.


फोटो सौजन्य - Instagram


हेदेखील वाचा -


डॉन 3 च्या चित्रीकरणाला होणार लवकरच सुरुवात


आगामी '83' मध्ये रणवीर सिंगचा नवा रेकॉर्ड


रणवीर सिंगने चित्रपटाचे मानधन घेण्यासाठी का दिला नकार