मराठीतील गोड गळ्याची गायिका सावनी रविंद्र ही नेहमीच संगीतातील काहीतरी वेगळं आणि चांगलं रसिक श्रोत्यांना देण्याच्या प्रयत्नात असते. मग जागतिक संगीत दिन हा तर संगीताशी निगडीत प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात एखाद्या सणासारखा असतो. यंदाच्या संगीत दिनाचं औचित्य साधून सुमधूर गळ्याची गायिका सावनी रविंद्रने सोशल मीडियावर नवी म्युझिकल सीरिज लाँच केली.
जागतिक संगीत दिनाविषयी सावनी रविंद्र सांगते की, “संगीत हा ज्यांचा श्वास आहे आणि संपूर्ण आयुष्य ज्यांनी संगीताला वाहिले आहे, त्या आमच्यासारख्या संगीत क्षेत्रातल्या सर्वांसाठी खरं तर रोजच संगीत दिन असतो.”
आपल्या नवीन म्युझिकल सीरिजबद्दल विचारलं असता ती म्हणाली की, “आम्ही सकाळपासून रात्रीपर्यंत संगीतच जगतो. पण जे संगीत क्षेत्रात नाहीत, त्यांच्याही आयुष्यात संगीताला अनन्यसाधारण महत्व आहे. म्हणूनच त्यांचा संगीत दिन खास व्हावा यासाठी मला असं वाटतं की, गायिका म्हणून माझं हे कर्तव्य आहे. मी त्यांना अशी स्वरमयी भेट द्यावी. त्यामुळे जागतिक संगीत दिनानिमित्ताने त्यांचा संपूर्ण आठवडाच संगीतमयी करावा, असं मला वाटलं. याच विचारातून मी ही नवी सीरिज सुरू केली. सध्या रोज एक व्हिडीओ मी सोशल मीडियावर अपलोड करते आहे.”
सावनीच्या या नव्या सीरिजमध्ये जुन्या नव्या मराठी-हिंदी गाण्यांचा संगम आहे. याबाबत सांगताना सावनी म्हणाली की, “अभंग, रोमँटिक, पावसावरची गाणी अशा वेगवेगळ्या मूड्सच्या गाण्यांचा यामध्ये समावेश आहे. आजकाल लोकांना लाईव्ह आणि रॉ म्युझिक ऐकायला आवडतं. त्यामुळेच याचं वैशिष्ठ्य आहे की, या गाण्याच्या चित्रीकरणावेळी आम्ही कुठेही ब्रेक किंवा रिटेक न घेता ही गाणी रेकॉर्ड केली आहेत. यासाठी ‘वन टेक जॅमिंग सेशन’ असा हॅशटॅगही मी वापरलाय. ही गाणी लोकांना आवडतायत. हे सोशल मीडियावरून सीरिजला मिळत असलेल्या रसिकांच्या रिस्पॉन्सवरून समजतंय. त्यामूळ खूप आनंद होतोय.”
या आधीही सावनीने गानसरस्वती लता मंगेशकर आणि स्वरसम्राज्ञी आशा भोसले यांच्या सदाबहार गाण्यांची मैफल म्हणजे लताशा हा कार्यक्रम सादर केला होता. गेली पाच वर्ष ती हा कार्यक्रम सादर करत आहे. अविट गोडीची मराठी गीतं या कार्यक्रमातून कानसेनांना ऐकायला मिळतात. पाच यशस्वी वर्षांनंतर तिने लोकाग्रहास्तव हे कॉन्सर्ट यंदा हिंदीमध्ये सादर केलं. 20 वादकांच्या संचासह हा कार्यक्रम सादर केला जातो. या कार्यक्रमात दीदी आणि ताईंनी भक्तीगीतांपासून अगदी कॅब्रेपर्यंत गायलेली गाणी आणि त्यांचे किस्सेसुद्धा श्रोत्यांना ऐकायला मिळतात.”
तर मग सावनीचा अजून एक नवा प्रयत्न असलेली ही सूरमयी भेट म्हणजेच म्युझिकल सीरिज तुम्हीही नक्की ऐकून पाहा.
हेही वाचा –
SaReGaMaPa Little Champs 2019: नागपूरच्या सुगंधा दातेने मारली बाजी
सैराटची गायिका चिन्मयी श्रीपदाने न्यूड फोटोची मागणी करण्याऱ्याला दिलं असं उत्तर