MeToo मध्ये अडकलेल्या राजकुमार हिरानीच्या मदतीला सोनम कपूर

MeToo मध्ये अडकलेल्या राजकुमार हिरानीच्या मदतीला सोनम कपूर

तनुश्री दत्ताने सुरु केलेल्या नाना पाटेकरवरील आरोपापासून MeToo चळवळ सुरु झाली. यामध्ये अनेक लहानमोठ्या लोकांची नावं घेण्यात आली. पण कोणतीही शहानिशा नीट झाली नाही. यामध्ये बॉलीवूडमधील काही अशा लोकांचीही नावं घेण्यात आली ज्यांच्याकडून कधीही अशा गोष्टीची अपेक्षाही केली जाणार नाही. यामध्ये एक नाव घेतलं गेलं ते दिग्दर्शक राजकुमार हिरानीचं. सध्या सोनम कपूर आहुजा आपल्या ‘एक लडकी को देखा तो ऐसा लगा’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटाच्या निर्मात्यांमधील एक राजकुमार हिरानीदेखील आहे आणि त्यामुळे या सर्व प्रकरणासंदर्भात सोनमला विचारलेल्या प्रश्नावर सोनमने राजकुमार हिरानी यांना पाठिंबा दर्शवला आहे. सोनमने राजकुमार हिरानी यांना बऱ्याच वर्षांपासून ओळखत असल्याचं सांगितलं. त्यामुळेच त्यांच्यावर लावण्यात आलेल्या या गंभीर आरोपांची पूर्ण व्यवस्थित तपासणी व्हायला हवी असंही तिने म्हटलं आहे. हे सर्व आरोप जर चुकीचे असतील तर मग पुढे काय? असा प्रश्नही तिने यावेळी उपस्थित केला.


ek ladki ko


सोनम कपूर आहुजाने मांडलं आपलं मत
मीडियाशी यासंदर्भात बोलताना सोनमने म्हटलं की,, “मी नेहमीच महिलांचा आदर केला आहे आणि  त्यांचं म्हणणं ऐकलं आहे, ज्या महिला MeToo चळवळीदरम्यान पुढे आल्या. पण राजकुमार हिरानीच्या बाबतीत मत राखून ठेवायला हवं असं मला वाटतं. सर्वात महत्त्वाच्या दोन गोष्टी आहेत, एक तर चित्रपट महत्त्वाचा आहे, तो प्रदर्शित व्हायला हवा आणि दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे मी राजकुमार हिरानी यांना बऱ्याच वर्षांपासून ओळखत आहे आणि निर्माता आणि दिग्दर्शक म्हणून मी त्यांचा मान ठेवते. पण जर त्यांच्यावरील आरोप सिद्ध नाही झाले तर मग मी या सर्व चळवळीवर प्रश्न निर्माण करेन.” सोनमने नेहमीच आपलं मत स्पष्टपणे मांडलं आहे आणि यावेळीदेखील तिने तिच्या मनाला जे योग्य वाटेल तेच सांगितलं.


rajkumar hirani


सोनमने हिरानीबरोबर संजू मध्ये केलं काम
सोनमने राजकुमार हिरानी यांच्यासोबत संजू या चित्रपटात काम केलं आहे. राजकुमार हिरानीवर आरोप लावणारी महिला ही संजूची सहाय्यक दिग्दर्शक होती. या महिलेच्या आरोपानुसार, हिरानी यांनी सहा महिन्यात बऱ्याच वेळा विनयभंग केला. हे सर्व काही फिल्मच्या पोस्ट प्रॉडक्शनदरम्यान झाल्याचा आरोप महिलेने केला आहे. दरम्यान सोनम कपूर आहुजा सध्या एक लडकी को देखा तो ऐसा लगा या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असून तिच्याबरोबर या चित्रपटामध्ये अनिल कपूर, राजकुमार राव, जुही चावला यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. तर विधु विनोद चोप्रा यांची बहीण शेली चोप्राने हा चित्रपट दिग्दर्शित केला असून तिचा हा पहिलाच चित्रपट आहे.


sonam


सोनम पहिल्यांदाच वडील अनिलबरोबर


सोनम कपूरला बॉलीवूडमध्ये येऊन दहा वर्षापेक्षा अधिक कालावधी लोटला आहे. मात्र तिच्या वडिलांबरोबर तिने एकही चित्रपटात काम केलं नाही. पहिल्यांदाच एक लडकी को देखा तो ऐसा लगा या चित्रपटातून ही मुलगी आणि वडिलांची जोडी प्रेक्षकांसमोर येत आहे. या चित्रपटाची कथा वेगळी असून एलजीबीटीबद्दल भाष्य करण्यात आले आहे. शिवाय पुन्हा एकदा राजकुमार आणि सोनमची केमिस्ट्री प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. 


फोटो सौजन्य - Instagram


हेदेखील वाचा - 


सीरियल क्वीन एकता कपूरकडे आला नवा पाहुणा


‘भारत’मध्ये होळी-दिवाळीच्या गाण्यावर दिसणार सलमान-कतरिनाची रोमँटिक केमिस्ट्री


गुंजन सक्सेनासाठी जान्हवी कपूर वाढवतेय वजन