सारेगामापा म्युजिक रिअॅलिटी शोचे अनेक चाहते आहेत. ज्यामुळे या शोचा प्रत्येक सीझन प्रेक्षक आवर्जून पाहतात. रविवारी रात्री या शोचा यंदाचा सीझन संपला. नीलांजना रे या शोची विजेती ठरली. आता या शोच्या पुढील सीझनची प्रेक्षक आतूरतेने वाट पाहत आहेत. मात्र त्याआधीच या शोचा सूत्रसंचालक आदित्य नारायणने एक महत्त्वाची घोषणा केली आहे. आता सारेगामापा शोच्या या नंतरच्या कोणत्याही सीझनसाठी आदित्य सूत्रसंचालन करणार नाही. आदित्यने या सीझनसोबतच ‘सारेगामापा’ शोला रामराम ठोकला आहे. जाणून घ्या काय आहे नेमकं कारण
आदित्यने सारेगामापा शोला केलं बायबाय
आदित्य नारायण इन्स्टाग्रामवर अॅक्टिव्ह आहे. सारेगामापाचा यंदाचा सीझन संपताच त्याने इन्स्टावर एक भावूक पोस्ट शेअर केली आहे. त्याने या शोमधला एक फोटो शेअर करत लिहिलं आहे की, ” अत्यंत जड अंतःकरणाने मी हे सांगत आहे की त्या शोला अलविदा म्हणत आहे. ज्याने मला माझ्या ऐन तरूणपणात स्वतःचं अस्तित्त्व निर्माण करण्याची संधी दिली, तो शो आहे सारेगामापा. अठरा वर्षाचा टीनएजर असल्यापासून मी इथे आहे, आता मी एक तरूण माणूस आहे, मला एक सुंदर पत्नी आहे आणि आता तर गोंडस लेकपण आमच्यासोबत आहे. पंधरा वर्षे, नऊ सीझन आणि जवळजवळ 350 एपिसोड मी या शोसोबत केले आहेत. खरंच वेळ कसा भूरकन निघून जातो. माझ्या भावासमान नीरज शर्माचा मी यासाठी कृतज्ञ आहे.” आदित्यची ही पोस्ट पाहून चाहते खूप निराश झाले आहेत. ज्यामुळे फक्त चाहतेच नाही तर त्याचे इतर सहकलाकारही याबाबत व्यक्त झाले आहेत. या शोचा परिक्षक विशाल ददलानी याने कंमेट केली आहे की, “मी काय बोलू, तुझा पहिला सारेगामापा माझापण पहिलाच शो होता. पण तरिपण मला अशी आशा आहे की तुझा विचार बदलशील, जा आदी जी ले अपनी जिंदगी, लव्ह यू मॅन” अशा शब्दात तो व्यक्त झाला आहे. आदिती सिंह शर्माने तुझ्यासारखा दुसरा कोणताच चांगला होस्ट नाही अशी कंमेट केली आहे.
पंधरा वर्षांचा प्रवास संपला
आदित्य नारायणने सारेगामापा शोला बाय बाय म्हणत अनेक सहकलाकारांची कृतज्ञता व्यक्त केली आहे. त्याने यासाठी शोचे डायरेक्टर, लेखक, क्रिएटिव्ह, संगीतकार, प्रोग्रॅम हेड यांच्यासह नेहा कक्कड, सोनू निगम, अलका याग्निक, बप्पी लहिरी, हिमेश रेशमिया, विशाल ददलानी, शान, साजिद वाजिद, प्रीतम, मीका सिंह अशा अनेक गायकांना टॅग केलं आहे. आदित्य एक चांगला सूत्रसंचालक आहे. त्याच्याकडे लोकांना कार्यक्रमात गुंतून ठेवण्याची उत्तम कला आहे. त्याच्या विनोदी शैलीत तो सतत लोकांचे मनोरंजन करत असतो. आजवर त्याने सारेगामापा आणि इंडियन आयडल असे अनेक म्युजिक शो होस्ट केले आहेत. मात्र त्याने आता अचानक सारेगामापा शोला अलविदा केल्यामुळे चाहत्यांमध्ये निराशा निर्माण झाली आहे. मागे एका मुलाखतीत तो लवकरच टेलीव्हिजन माध्यम सोडणार असं म्हणाला होता. कारण त्याला आता एक मोठं प्रोजेक्ट सुरू करायचं आहे.
‘विशू’मध्ये फुलणार गश्मीर आणि मृण्मयीची प्रेमकहाणी