अॅक्शन सुपरस्टार विद्युत जामवाल त्याच्या प्रेमळ व दिलदार स्वभावासाठी ओळखला जातो. त्याचा मनमोकळा व उदार स्वभाव त्याच्या सर्वच सहकलाकारांना माहित आहे. नुकत्याच घडलेल्या एका किस्स्याची सध्या सगळीकडे चर्चा आहे. विद्युतच्या दिलदार व उदार स्वभावाचे पुन्हा एकदा त्याच्या सहकलाकारांना दर्शन घडले. विद्युत सध्या ‘इंडियाज अल्टीमेट वॉरियर’ या कार्यक्रमाचा सूत्रसंचालक म्हणून जबाबदारी सांभाळतो आहे. याच सेटवर हा किस्सा घडला.विद्युतचे औदार्य बघून इंडियाज अल्टीमेट वॉरियर’ च्या संपूर्ण क्रूने विद्युतला स्टँडिंग ओव्हेशन देऊन सन्मानित केले. विद्युतने या कार्यक्रमात एक अशी गोष्ट केली की त्यामुळे त्याने या कार्यक्रमासाठी झटणाऱ्या संपूर्ण टीमचे मन जिंकले.
शोद्वारे भारतातील सर्वोत्तम योद्ध्याचा शोध
इंडियाज अल्टिमेट वॉरियर हा कार्यक्रम डिस्कव्हरी प्लस या ऍपवर दाखवला जातो. या कार्यक्रमाद्वारे भारतातील उत्तमोत्तम योद्ध्यांचा शोध घेतला जातोय. या कार्यक्रमात सहभागी होणारे स्पर्धक अनेक खडतर आव्हानांचा सामना करतात. ही आव्हाने पार केल्यानंतर सर्वोत्कृष्ट योध्दयाला ‘ग्रँड वॉरियर’ चा ‘किताब देऊन गौरवले जाणार आहे. हा शो यशस्वीरीत्या पूर्ण होण्यासाठी जवळजवळ 140 लोकांची टीम झटते आहे. अलीकडेच या कार्यक्रमाचे चित्रीकरण पूर्ण झाले आहे. भारतातील अनेक उत्तमोत्तम योद्ध्यांमधून एक सर्वोत्तम ग्रँड वॉरियर शोधण्याच्या या आव्हानात्मक व कठीण प्रवासाची सांगता झाली आहे. हा प्रवास संपन्न होताना विद्युतने या कार्यक्रमासाठी झटणाऱ्या क्रूसाठी एक खास गोष्ट करून त्यांचे मन जिंकले आहे.
विद्युतने सहकाऱ्यांसाठी केली एक खास गोष्ट
विद्युतने त्याच्या सहकाऱ्यांच्या मेहनतीची दखल घेऊन त्यांचे मनापासून कौतुक केले. या कार्यक्रमासाठी मेहनत घेणाऱ्या संपूर्ण 140 लोकांच्या टीममधील प्रत्येकाला विद्युतने स्वतः लिहिलेल्या नोट्स दिल्या व त्यांचे मनापासून कौतुक केले. तसेच हा कार्यक्रम ज्यांच्या मेहनतीमुळे शक्य होऊ शकला त्या संपूर्ण क्रूचे त्याने या हस्तलिखीत नोट्समधून आभार मानले. विद्युत या कार्यक्रमात सहभागी झालेल्या स्पर्धकांचे टॅलेंट व समर्पण बघून तर प्रभावित झालाच, परंतु हा एक आगळावेगळा व जोखीम असलेला शो अडचणी न येत पूर्ण झाला तो इंडियाज अल्टिमेट वॉरियरच्या क्रूमुळेच! त्यामुळे विद्युत त्यांची मेहनत व कार्यक्रमाबद्दलचे समर्पण बघूनही खूप प्रभावित झाला. म्हणून त्याने भारावून जाऊन प्रत्येकाचेच एक खास हस्तलिखित देऊन कौतुक केले.
टीमनेही विद्युतचा केला सन्मान
विद्युतच्या या मनापासून प्रकट झालेल्या भावना बघून त्याच्या औदार्याबद्दल संपूर्ण क्रूनेही त्याच्या भावनांचा आदर करत त्याला स्टँडिंग ओव्हेशन देऊन सन्मानित केले. या शो प्रति असलेल्या भावना व्यक्त करताना विद्युत म्हणाला की, “’इंडियाज अल्टीमेट वॉरियर’ हा एक योद्ध्यांचा संघ होता. या कार्यक्रमातून आम्ही भारतातील सर्वोत्तम योद्ध्यांचा शोध घेत होतो.. हा शो कायमच माझ्यासाठी खास राहील. या कार्यक्रमाची प्राथमिक थीम मार्शल आर्ट्स आहे केवळ म्हणून तो माझ्यासाठी खास नाही तर या शोमध्ये आमचे जे एकमेकांशी आयुष्यभरासाठी बंध जुळले त्यामुळे हा कार्यक्रम व त्याच्याशी निगडीत आठवणी कायम माझ्या हृदयात व मनात राहतील.या कार्यक्रमात सहभागी झालेल्या सर्वांचीच पार्श्वभूमी वेगवेगळी असूनही, आम्हा सर्वांमध्ये एक गोष्ट समान होती, ती म्हणजे अत्यंत समर्पण आणि अकल्पनीय गोष्ट करण्याची आवड.”
तो पुढे म्हणाला की, “हा शो पारंपरिक रिऍलिटी शो नव्हता. वास्तविक आव्हाने आणि कार्ये अत्यंत कठीण परिस्थितीत पार पाडल्यामुळे, स्पर्धकांना दुखापत होण्याची आणि त्यांचा भावनिक उद्रेक होण्याची अधिक शक्यता होती. परंतु सर्वांनीच स्वतःमधील स्पिरीटचे दर्शन घडवत संकटाच्या क्षणी एकमेकांना कसे सावरले हे पाहणे आनंददायक होते. केवळ स्पर्धकांमध्येच नाही, तर संपूर्ण टीममध्येही हाच उत्साह होता. मला खात्री आहे की माझ्यासह या मालिकेचा भाग असलेली प्रत्येक व्यक्ती घरी परतली तेव्हा त्यांच्यात एक सकारात्मक बदल घडलेला आहे.”
‘इंडियाज अल्टीमेट वॉरियर’ हे विद्युत जामवालचे डिजिटल पदार्पण आहे. या शोमध्ये अक्षय कुमारला तिसऱ्या स्पेशल एपिसोडमध्ये मानद डोजो मास्टर म्हणून दाखवण्यात आले आहे.
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक