लग्न म्हटलं की, सर्वात पहिल्यांदा खरेदी करायची असते ती नवरीच्या साड्यांची आणि तिच्या साड्यांबरोबरच घरातील अन्य महिलांच्या साड्यांचीही खरेदी तितकीच महत्त्वाची असते. महाराष्ट्रीय लग्न म्हटलं की, काही ठराविक साड्यांशिवाय लग्न पूर्ण होतंच नाही. लग्न म्हटलं की, या साड्या नेसायला मिळायालाच हव्यात असं साधारण एक गणित असतं. हल्ली पुन्हा एकदा महाराष्ट्रीयन लग्नामध्ये नऊवारी साड्यांचा ट्रेंड पाहायला मिळत आहे. पण हा झाला साडी नेसण्याचा प्रकार. पण या नऊवारी साड्या असोत अथवा अगदी लग्नाच्या वेळची मामाने दिलेली पिवळी साडी असो. अशा नवरीच्या साड्या विशिष्ट हव्यात हे नक्की. त्यासाठी अगदी नवरीपासून सगळेच वेगवेगळी दुकानं पालथी घालतात. लग्नामध्ये नवरीवरून कोणाचंही लक्ष हटता कामा नये असं प्रत्येकालाच वाटत असतं आणि त्यामुळे लग्नामध्ये नक्की काय वेगळेपणा आपण आणू शकतो आणि आपली परंपरा जपत साड्यांचे नक्की कोणकोणते वेगवेगळे प्रकार आपण वापरू शकतो हे आपण पाहणार आहोत. महाराष्ट्रीयन लग्न म्हटलं की, पैठणीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. पण त्याव्यतिरिक्तही लग्नामध्ये अनेक साड्या नेसल्या जातात. त्याबद्दल आपण जाणून घेऊया.
लग्न म्हटलं की, साडीशिवाय दुसरा कोणताही पर्याय सुचत नाही. अगदी महाराष्ट्रीयनच नाही बऱ्याच लग्नांमध्ये साडी हा उत्कृष्ट पर्याय लग्नासाठी निवडला जातो. हल्ली लेहंगा हा पर्यायदेखील निवडला जातो. पण तरीही महाराष्ट्रीयन लग्न म्हटलं की, साडी हा पर्याय आपल्याला सर्वात जास्त ठिकाणी दिसून येतो. तसं म्हटलं तर महाराष्ट्रीयन लोकांच्या लग्नामध्ये साडीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. काळ कितीही पुढे गेला असला तरीही प्रत्येक तरूणीची आपल्या लग्नामध्ये आपण कसं सजायचं याची स्वप्नं पाहिलेली असतात. सध्या फक्त सोहळा साजरा करण्याच्या पद्धती बदलल्या आहेत. लग्नातील साडी ही कोणत्याही काळात स्त्री साठी अतिशय महत्त्वाची बाब असते. त्यामुळे आपण लग्नात काय नेसणार याची आधीच तयारी करण्यात आलेली असते. अगदी मुलीकडूनच नाही तर तिच्या आई - वडिलांकडूनही याची तयारी आधीच झालेली असते. महाराष्ट्रीयन लग्नामध्ये काही विशिष्ट प्रकारच्या साड्यांना जास्त मागणी असते. ती मागणी नक्की कोणत्या साड्यांना असते ते जाणून घेऊया -
महाराष्ट्रायीन लग्नामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या नेसल्या जातात. अगदी कांजीवरम, बनारसी शालू या साड्यांनादेखील या लग्नामध्ये प्राधान्य देण्यात येतं. पण त्याहीपेक्षा महाराष्ट्रीयन अशा खास साड्या असतात. ज्याची माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. यामध्ये पहिला क्रमांक लागतो तो म्हणजे पैठणीचा.
पैठणी ही अशी साडी आहे ज्याशिवाय महाराष्ट्रीयन लग्न सोहळा अपूर्ण आहे. पैठणी म्हटली की, अगदी येवला या ठिकाणी जाऊन पैठणी खरेदी करून आणण्यापासून लग्नघराची तयारी असते. येवला इथे पैठणीचा बाजार आहे. याठिकाणी तुम्हाला हव्या तशा आणि तुम्हाला आवडतील त्या रंगाच्या पैठणी मिळतात. लग्नासाठी खास येवल्याला जाऊन पैठणी घेणारे तुम्हाला अनेक भेटतील. पैठणीचेही अनेक प्रकार आहेत. जरतारी असणारी पैठणी, बालगंधर्व पैठणी, पेशवाई पैठणी, महाराणी पैठणी. तसंच हल्ली नवनवीन प्रकार आले असून काही पैठणीवर तुम्हाला हवी तशी वेगवेगळी कलाकुसरही करून घेता येते.
पैठणी ही कापसाचा धागा आणि रेशीम यापासून हातमागावर विणलेली एक विशिष्ट प्रकारची साडी आहे. या साडीच्या पदरावर मोराचं जरीकाम करण्यात येतं. पूर्वी केवळ मोरपंखी रंगातच मिळत असे पण आता अनेक रंगांमध्ये पैठणी पाहायला मिळते. एक उभा धागा आणि आडवा धागा वेगळ्या रंगाचा असं वापरून धूपछाव प्रकारचा परिणाम या साडीला देण्यात येतो. पदरावर मोर, तोता, मैना, पोपट, कलश, मुथाडा, बारवा अशा विविध नक्षी नसून ही सर्वात महागडी साडी असं म्हटलं जातं. पैठणीचे काही प्रकार आपण पाहू -
बालगंधर्व पैठणी ही सर्वात सुंदर पैठणी म्हणून ओळखली जाते. वेगवेगळं जरीचं काम असलेली ही साडी लग्नासाठी अप्रतिम आहे. प्रत्येक नवरीला हवीहवीशी वाटणारी ही साडी लग्नात नवरीचीही शोभा वाढवते
नक्षीकाम असणारी पेशवाई पैठणी तुम्हाला एक रॉयल लुक देते. लग्नामध्ये तुम्हाला सर्वांचं लक्ष वेधून घेण्यासाठी पेशवाई पैठणी आणि त्यावर शोभेसे दागिने इतकं घातलं की, तुमचं काम झालं.
महाराणी पैठणी ही सर्वात महाग पैठणी आहे. ही पैठणी तुम्हाला एक वेगळाच लुक आणून देते. ही पैठणी खास बनवून घेता येते.
महिला अनेक साड्यांचे प्रकार वापरतात. पण महाराष्ट्रीयन लग्नामध्ये नारायण पेठ हा साडीचा प्रकार सर्रास पाहायला मिळतो. नेसायला सोपी आणि अतिशय हलकी पण दिसायला अगदी रॉयल अशी ही साडी असते. या साडीच्या रचनेवरून आणि काठावरून ओळखता येते. नारायण पेठ या साडीचा काठ सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. ही साडी पाचवार, सहावार आणि नऊवार या तिन्ही प्रकारात मिळते. सहसा नवरी या साडीचा वापर करत नसली तरीही लग्नामध्ये इतर महिला ही साडी अगदी आवर्जून नेसतात. कारण धावपळ करायला लागली तर ही साडी अतिशय हलकी असल्यामुळे जास्त सांभाळावी लागत नाही. तसंच या साडीमध्ये जास्त गरमही होत नाही. त्यामुळे मुंबईसारख्या धावपळीच्या ठिकाणी अशी साडी लग्नामध्ये नेसून जायला प्राधान्य देण्यात येतं.
इरकल ही सोलापूर ठिकाणची स्पेशालिटी आहे. इरकल हीदेखील अशी साडी आहे जी नेसायला सोपी आणि सावरायलाही सोपी आहे. मुळात या साडीमध्ये सर्वच गडद रंग असतात जे तुमचा लुक अतिशय सुंदर करतात. या साडीवर लहान लहान जरीचे बुट्टे असतात. शिवाय नेहमीच्या साड्यांच्या रंगांपेक्षा या साड्यांचे रंग थोडे वेगळे असल्यामुळे लग्नामध्ये नेसण्यासाठी महिलांना जास्त आवडतात. या साडीला इल्कल असंही म्हटलं जातं. ही साडी मूळची ‘इल्केकल्लू’ नावाच्या विजापूरजवळच्या गावातील आहे. एकदम तलम आणि मऊ मुलायम असणारी ही साडी गर्भरेशमी असते. मूळची कर्नाटकातील असूनही आता मात्र ही साडी संपूर्णतः महाराष्ट्राची झाली आहे. घराघरातील आजीकडे अशी साडी पूर्वी असे. पण आता महाराष्ट्रीयन लग्नामध्येही या साडीला महत्त्व प्राप्त झालं आहे. ही साडी यंत्रमाग आणि हातमाग अशी दोन्ही स्वरूपातील असून हातमागावर विणलेल्या साडीची किंमत जास्त असते. या साडीवरील कशिदादेखील खूपच प्रसिद्ध आहे. यावरून मराठीमध्ये ‘रेशमाच्या रेघांनी, लाल काळ्या धाग्यांनी, कर्नाटकी कशिदा मी काढीला’ हे गाणंदेखील लिहिण्यात आलं होतं.
चंदेरी ही मूळची ग्वाल्हेरजवळील चंदेरी या गावातील साडी. पण महाराष्ट्रातही ही साडी तयार होते. या साडीला आता लग्नामध्ये खूपच मागणी आहे. साडीचा किनारा आणि बुट्ट्यांमध्येच त्याचं वैशिष्ट्य दडलेलं असतं. यावरील बुट्टेही दोन प्रकराचे असतात. याच्या किनाऱ्यामध्ये हिरवी पानं विणलेली असतात. तर किनारीचा एक पट्टा रुंद आणि दुसरा अरूंद असतो. ही साडी अतिशय तलम असल्यामुळे उन्हाळ्यात नेसायला अतिशय सोपी आणि सुंदर साडी आहे. त्यामुळे लग्नात या साडीला जास्त मागणी असते. या साडीमध्ये चक्र, पानं या डिझाईन्स असून सर्व काही विणकाम केलेलं असतं. तसंच दिसायलादेखील ही साडी आकर्षक असते.
इंदूरी साडीदेखील हल्ली महाराष्ट्रीयन लग्नामध्ये जास्त पाहायला मिळत आहेत. चंदेरीप्रमाणेच या साड्यादेखील अतिशय हलक्या असतात. शिवाय दिसायला आकर्षक असल्यामुळे या नेसणं सोपं आहे. इतकंच नाही तर इंदूरी साड्यांची किंमतही इतर साड्यांच्या तुलनेत कमी असल्यामुळे या साड्या विकत घेणंदेखील परवडतं. या साड्यांची जास्त काळजी घ्यावी लागत नाही. तुम्ही या साड्या बऱ्याचदा नेसू शकता. त्यामुळे हल्ली लग्नामध्ये इंदूरी साड्या नेसण्याला जास्त प्राधान्य देण्यात येत असलेलं दिसून येत आहे. धावपळीच्या जीवनात पटकन ही हलकी साडी नेसून कुठेही बाहेर फंक्शनला जाणं सहजसोपं असल्यामुळे हल्ली महाराष्ट्रीयन लग्नांमध्ये या साड्यांचा वापरही जास्त प्रमाणात होत आहे.
जिजामाता सिल्क या साडीचं वैशिष्ट्य म्हणजे त्याची बॉर्डर अर्थात साडीचा काठ. पारंपरिक रंग या साड्यांमध्ये उपलब्ध असतात. लग्नाला जाताना साधारणतः चिंतामणी, लाल असे रंग वापरले जातात. या साड्यांमध्ये हे रंग उपलब्ध असतात. बऱ्याच जणांना लग्नाला जाताना जड साड्या वापरता येत नाहीत. त्यावेळी या साड्या तुम्ही वापरू शकता. महाराष्ट्रीयन लग्नामध्ये विधी बराच वेळ चालू असतात. अशावेळी ही साडी दिवसभर सांभाळायला सोपी जाते. कारण ही साडी अजिबातच जड नसते.
राजमाता सिल्क ही अतिशय नाजूक साडी असते. ही सांभाळायला लागते. या साडीचं वैशिष्ट्यही याचे काठ आहेत. पण जिजामात सिल्कपेक्षा या साडीचे काठ हे कमी असतात. पण जिजामाता सिल्कप्रमाणेच हीसाडीदेखील अतिशय हलकी असल्यामुळे महाराष्ट्रीयन लग्नामध्ये नेसली जाते.
‘बदल हा नेहमीच होत असतो’ हे आपल्या प्रत्येकाच्या जीवनशैलीमध्ये अगदी फिट होतं. साडी हा तसं पाहायला गेलं तर प्रत्येक महिलेच्या जिव्हाळ्याचा विषय. साडी आवडत नाही असं म्हणणाऱ्यादेखील कधी ना कधीतरी साडी नेसतातच. अर्थात ही साडी काळानुरूप बदलत गेली आहे. साडी हा खरंतर स्त्री चं सौंदर्य वाढवणारा असा कपड्याचा प्रकार आहे. भारतामध्ये कांजीवरम, बनारसी, पैठणी अशा कितीतरी प्रकारच्या साड्या आहेत. शिवाय साडी नेसण्याचं एक वेगळं टेक्निक आहे. तुम्ही कशी साडी नेसता त्यानुसार तुम्ही कसे इतरांमध्येही शोभून दिसता हे अवलंबून असतं. साडी नेसण्याच्या विविध पद्धती असतात. काळानुसार अर्थात आता साडी नेसण्याच्या पद्धतीही बदलल्या आहेत. शिवाय प्रत्येक जण साडी वेगवेगळ्या पद्धतीने नेसत असतं. अजूनही आपण सणा समारंभाला पारंपरिक पद्धतीच्या साड्याच नेसतो. पण इतर वेळा मात्र साडीमध्ये आपल्याला वेगवेगळे ट्रेंड दिसून येत आहे. वेगवेगळ्या प्रकारे साडी नेसता येते. सध्या तुम्हाला वेगवेगळे लुक करता येतील अशा पद्धती बघूया -
स्कार्फ/नेक रॅप साडी हा प्रकार थोडा स्टायलिश आहे. तर तुम्ही साधारण थंडीच्या दिवसात कुठे लग्नाला जात असाल तर तुम्ही ही स्टाईल फॉलो करू शकता.
नेसायची पद्धत :
नेहमीच्या पद्धतीने तुम्ही तुमच्या साडीचा पदर न घेता हा पदर स्कार्फ पद्धतीने घ्या. तुम्ही हा पदर गळ्याभोवती घेऊन पुढच्या बाजूने गुंडाळा. स्कार्फप्रमाणेच हा पदर तुम्हाला तुमच्या मानेभोवती गुंडाळायचा आहे. शिवाय काही फंकी दागिने घालून तुम्ही तुमच्या साडीचा लुक अजून ग्लॅमरस करू शकता.
सध्या अशा प्रकारची साडी हा ट्रेंड आहे. हा थोडासा पारंपरिक पण त्याचबरोबर अत्याधुनिक प्रकार आहे. तुम्हाला या साडीमध्ये अनेक डिझाईन्स पाहायला मिळतील.
नेसायची पद्धत :
साडी नेसायची ही जॅझ पद्धत आहे. तुम्ही साडी नेसल्यावर त्यावर मॅचिंग क्रेप घालायचा असतो. यामध्ये डिझाईनर साडीचा जास्त वापर करण्यात येतो. या साडीची शोभा वाढवण्यासाठी तुमच्या ब्लाऊज अथवा साडीच्या रंगाचा क्रेप तुम्ही यावर घालू शकता.
नवरीची साडी अथवा कंबरपट्टा यावरून ही स्टाईल सुचली असण्याची शक्यता आहे. तुम्ही साडी नेसल्यानंतर एखादा बारीक अथवा तुमच्या साडीच्या वा ब्लाऊजच्या कपड्याचा बेल्ट तुम्ही साडीला कमरेला लावू शकता. तुम्ही जर बारीक असाल तर तुम्हाला ही साडी खूपच सुंदर आणि आकर्षक दिसेल.
नेसायची पद्धत :
तुम्ही नेहमीप्रमाणेच पाचवारी साडी नेसा आणि तुमच्या कमरेच्या ठिकाणी बेल्ट लावा. तुम्हाला अधिक पारंपरिक वेष हवा असल्यास, तुम्ही त्या ठिकाणी कंबरपट्टादेखील बांधू शकता. तुमच्या साडीची शोभा अधिक वाढवायची असल्यास, तुम्ही तुमचा ब्लाऊज ऑफशोल्डर वापरावा.
तुम्ही एखाद्या लग्नाला जाणार असाल तर तुम्ही नक्कीच ही नवी आणि ट्रेंडिग स्टाईल करून पाहा. धोती स्टाईल साडी नेसणं हे पँट स्टाईल साडीप्रमाणेच आहे. पारंपरिक आणि आधुनिक या दोन्हींचं मिश्रण यामध्ये सामावलेलं आहे. समांथा, शिल्पा शेट्टी आणि सोनम कपूर या सुंदर अभिनेत्रींमुळे सध्या ही स्टाईल पुन्हा एकदा ट्रेंड झाली आहे.
नेसायची पद्धत :
पेटीकोटऐवजी तुम्ही ही साडी नेसताना लेगिंगचा वापर करा. ही साडी नेसणं अतिशय सोपं आहे. तुम्ही तुमच्या लेगिंगमध्ये ही साडी अडकवून नेहमीप्रमाणे नेसा. तुमचा पदर तुम्ही साधारण 2-3 इंच काढून ब्लाऊजला पिनअप करा. त्यानंतर तुम्ही पदराचा लोअर पार्ट तुमच्या हिप्सजवळ आणा आणि तिथे पदर काढून पुन्हा पिन लावा. नंतर उरलेल्या प्लेट्स काढून धोतीच्या आकाराप्रमाणे नेसा. पण ही साडी नेसताना बॉर्डर व्यवस्थित दिसत आहे की नाही याकडे नीट लक्ष द्या. ही साडी थोडी वेगळी असली तरीही दिसायला खूपच आकर्षक दिसते.
मुमताझ साडी अथवा लेहंगा साडी याप्रमाणेच ही मरमेड साडीदेखील असते. फक्त याच्या पदरामध्ये एक ट्विस्ट असतो.
नेसायची पद्धत :
साडी नेसायच्या वेळी याचा पदर असा काढायचा की, मरमेडप्रमाणे याची शेपटी दिसायला हवी. कदाचित यावर खूप काम करावं लागेल असं वाटतं. पण काही एक्स्ट्रा टक्स आणि प्लेट्सची गरज असते. त्यामुळे अशी साडी नेसायची असल्यास, बॉर्डरवाल्या साडीचीच निवड करा. शिवाय तुमचा पदर नेहमीपेक्षा थोडा मोठा काढा.
साडी हा आपला जीव की प्राण असतो. पण या साड्यांची नक्की काळजी कशी घ्यावी हे बऱ्याचदा कळत नाही. त्यामुळे आम्ही तुम्हाला या साड्यांची काळजी कशी घ्यावी हेदेखील सांगणार आहोत -
1. साडी दोन वेळा वापरून झाल्यावर ड्रायक्लीनला द्यावी
2. नक्षीकाम असलेल्या आणि पैठणी साड्यांना विशेष जपावं लागतं. अशा साड्या घरात धुऊ नयेत. असं केल्याने त्यावरील कोंदण निघून जातं. त्यामुळे नेहमी या साड्या ड्रायक्लीनलाच द्याव्यात. कपाटात ठेवाताना या साड्या एका फडक्यात गुंडाळून ठेवाव्यात
3. साड्या उन्हात नाहीत तर सावलीमध्ये सुकवाव्यात. त्यामुळे त्यांची चमक टिकून राहाते
4. वॉशिंग मशीनमध्ये या साड्या धुऊ नयेत
5. बॅगेमध्ये अथवा कपाटात साड्या ठेवण्याआधी तपकिरी रंगाच्या कागदात गुंडाळून ठेवाव्यात. यामुळे हवेतील दमटपणा कागद शोषून घेतो आणि साडी सुरक्षित राहते. तसंच काही महिन्यांच्या अंतराने साडीची घडी बदलत राहावी अन्यथा साडी घडी केलेल्या रेषेवर फाटते.