सुंदर आणि निरोगी केसांचं स्वप्नं तर प्रत्येकाचं असतं. मग ते केस सरळ असोत वा कुरळे. जास्तीत जास्त लोकांना सरळ आणि मुलायम केस खूप आवडतात. पण कुरळ्या केसांचा लुकही अप्रतिम दिसतो. ज्या मुलींचे नैसर्गिकरित्या केस सरळ असतात, त्यांनाही आपले केस कुरळे असावेत असं वाटत असतं. त्या मुलींना केस कुरळे करून घेण्यासाठी वेगवेगळ्या मशीन्सची मदत घ्यावी लागते. काही मुली पर्मिंग करून घेतात. पण नैसर्गिक कुरळ्या केसांची मजा त्यामध्ये नक्कीच नाही. बॉलीवूड आणि टीव्ही जगतातल्या अशा अनेक हिरॉईन्स आहेत ज्यांचे कुरळे केस हा नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. यामध्ये सर्वात वर नाव आहे ते अभिनेत्री कंगना राणौत, सान्या मल्होत्रा, तापसी पन्नू, द्रष्टी धामी यांचं. या सगळ्याच अभिनेत्री आपल्या कुरळ्या केसांमध्ये खूपच सुंदर दिसतात. पण हे कुरळे केस जितके दिसायला सुंदर दिसतात तितकीच त्यांची काळजी घेणं कठीण आहे असं वाटतं आणि काही अंशी तसं असतंही. पण आता कुरळ्या केसांची काळजी घेणं तितकंसं कठीण राहीलं नाही. आम्ही तुम्हाला या लेखाद्वारे कुरळ्या केसांसाठी काही खास टिप्स देणार आहोत.
कुरळ्या केसांची काळजी घेणं अजिबातच सोपं नाही. मुख्यत्वे तेव्हा जेव्हा तुम्हाला केस धुवायचे असतात तर सर्वात जास्त त्रास हा कुरळे केस धुतल्यानंतर विंचरताना होतो. तसंच कुरळ्या केसांमध्ये कोरडेपणाची समस्या ही अगदीच कॉमन आहे. असे केस जर जास्त धुतले तर त्यातील नैसर्गिक तेल निघून जातं. त्यामुळे आठवड्यातून साधारण 2 ते 3 वेळाच तुम्ही कुरळे केस धुवू शकता. कुरळे केस धुताना महत्त्वाची बाब लक्षात ठेवा आणि ती म्हणजे केस धुण्याआधी तुमच्या कुरळ्या केसांना व्यवस्थित तेलाने मालिश करा. त्यामुळे तुमच्या केसांमधील कोरडेपणा निघून जाईल.
कुरळ्या केसांसाठी तुम्ही आठवड्यातून किमान एकदा तरी तेल गरम करून त्याने मालिश करायला हवं. यासाठी तुम्ही बदाम तेल अथवा नारळाचं तेल गरम करून तुमच्या केसांना लावा. कुरळ्या केसांवर संध्याकाळी तेल लावून रात्रभर ते मुरायला ठेवा आणि सकाळी डोक्यावरून शँपू लावून आंघोळ करा असा सल्ला देण्यात येतो. हॉट ऑईल मसाज या उपचाराने कुरळ्या केसांना नीट ठेवणं सोपं होऊन जातं.
कुरळे केस विंचरणं हा एक सर्वात मोठा टास्क असतो असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. कुरळे केस विंचरताना सर्वात जास्त त्रास होतो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे कुरळ्या केसांमध्ये खूपच गुंता होतो. त्यामुळे तुम्ही हे केस विंचरताना ब्रश केसांमधून ओढू नका. कारण असं केल्यास, तुमचे केस तुटतात. कुरळ्या केसांमध्ये नेहमी कंगवा हलक्या हाताने घालावा जेणेकरून तुमच्या केसांचा गुंता सोडवण्यास मदत होते. तुम्हाला हवं तर कुरळे केस मऊ आणि मुलायम बनवण्यासाठी हातावर लिव-इन कंडिशनर घेऊन केसांना लावा. यामुळे तुमचे केस केवळ मुलायम होणार नाहीत तर अगदी सोप्या रितीने गुंता सुटेल आणि तुटणार पण नाहीत.
तसंच ओले केस ब्रश करू नका. केसांना थोडं सुकू द्या. त्यानंतर हळूहळू केसांवर ब्रश करा. लक्षात ठेवा की, तुमचे ओले केस कधीही बांधण्याचा प्रयत्न करू नका. कारण असं केल्यास, तुमचे केस तुटून गळायला लागतात. याशिवाय कुरळे केस सतत विंचरू नका. तसंच तुम्ही जर कोरडे आणि सुके कुरळे केस विंचरायचा प्रयत्न करत असाल तर त्यावर थोडासा पाण्याचा मारा करा. त्यामुळे तुमच्या कुरळ्या केसांचा गुंता सोडवणं सोपं होऊन जाईल.
Also Read Different Between Hait Smoothening & Straightening In Marathi
कुरळ्या केसांची काळजी कशी घ्यायची याच्यादेखील पद्धती आहेत. या पद्धती तुम्ही नियमित केल्यात तर कुरळ्या केसांसाठी नक्कीच फायदेशीर ठरतं.
1. कुरळे केस धुतल्यानंतर टॉवेलने घट्ट बांधून ठेऊ नका आणि तसंच केस रगडून टॉवेलने पुसण्याचा प्रयत्नही करकू नका. असं केल्यामुळे केसांमध्ये गुंता वाढतो आणि केस तुटण्याची शक्यताही वाढते. त्यामुळे अतिशय तलम असा टॉवेल तुम्ही कुरळे केस पुसण्यासाठी वापरा. कुरळे केस हळूवार पुसा.
2. कुरळ्या केसांना शँपूने धुतल्यानंतर त्यावर कंडिशनर लावणं गरेजचं आहे. कंडिशनर लावल्यामुळे केस अतिशय मऊ आणि मुलायम होतात आणि त्यातील गुंता सोडवणंही सोपं होतं.
3. कुरळे केस सुकवण्यासाठी सहसा ड्रायरचा उपयोग करू नका. कुरळ्या केसांमध्ये मुळातच ड्रायनेसची समस्या असते. अशावेळी तुम्ही ड्रायरचा वापर केल्यास केस अधिक कोरडे होतात. त्यामुळे ड्रायरचा वापर करणं टाळा.
4. केसांचा गुंता सोडवताना नेहमी वरून खाली गुंता सोडवण्याचा प्रयत्न करू नका. गोष्टीची नेहमी काळजी घ्या. असं केल्यामुळे तुमचे केस अधिक प्रमाणात तुटतात. त्यामुळे तुम्ही तुमच्या केसांचा गुंता हा खाली सोडवण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर हळूहळू वरच्या बाजूचा गुंता सोडवण्याचा प्रयत्न करा.
5. कुरळ्या केसांना वेळोवेळी हेअरमास्क लावून त्यांना पोषण देणं आवश्यक आहे. असं केल्याने कुरळ्या केसांमध्ये जीव राहतो आणि केस कोरडेही होत नाहीत.
कुरळ्या केसांची काळजी घेण्यासाठी तुम्हाला अनेक घरगुती उपाय करता येतात. आम्ही तुम्हाला त्यापैकी काही उपाय अर्थात टिप्स इथे देत आहोत
सर्वात पहिले तुम्ही 1 केळं मिक्सरमधून वाटून घ्या हे मिश्रण एका बाऊलमध्ये काढा. आता यामध्ये बदामाचं तेल दोन चमचे मिसळून त्याची पेस्ट बनवा. ही पेस्ट साधारण 30 मिनिट्स आपल्या केसांना लावून ठेवा. त्यानंतर तुमचे केस शँपूने धुवा. आता अगदी हलकासा टॉवेल केसांना बांधून सुकवून घ्या. यामुळे तुमच्या गुंतलेल्या केसांची समस्या कमी होईल. थोड्या वेळानंतर तुम्ही कंगव्याने ओल्या केसातून विंचरून घ्या.
एका कपामध्ये दोन चमचे अंड्याचा सफेद भाग घ्या. त्यामध्ये दोन चमचे दही मिसळून पेस्ट तयार करून घ्या. ही पेस्ट तुम्ही तुमच्या ब्रशच्या सहाय्याने केसांना लावा. साधारण अर्धा तास हे केसांवर तसंच राहू द्या. त्यानंतर थंड पाण्याने केस धुवा. हे केस जेव्हा सुकतील तेव्हा पुन्हा शँपू लावून केस धुवा. यामुळे तुमचे कुरळे केस मुलायम आणि चमकदार होतील.
दोन चमचे नारळाच्या तेलामध्ये 4 चमचे कोरफड जेल आणि 3 चमचे दही मिसळून त्याची पेस्ट बनवून घ्या. आता ही पेस्ट तुम्ही तुमच्या केसांवर लावून साधारण अर्ध्या तासासाठी केस तसेच ठेवा. त्यानंतर केस थंड पाण्याने धुवा. काही दिवसातच तुम्हाला याचा परिणाम दिसून येईल. तुमचे केस पहिल्यापेक्षा जास्त मऊ आणि मुलायम तर दिसतीलच. याशिवाय यामध्ये एक वेगळी चमकही येईल.
तुमचे केस कुरळे असून पातळही असतील तर अशा केसांची काळजी घेण्यासाठी तुम्हाला खूपच सतर्क राहावं लागतं. यासाठी काही मास्क बनवून तुम्ही केसांची योग्य काळजी घेऊ शकता. हा मास्क तयार करण्यासाठी तुम्हाला दोन पिकलेली केळी, दोन अंड्याचा पिवळा बलक, तीन चमचे मध आणि ऑलिव्ह ऑईल या गोष्टींची आवश्यकता आहे. या वरील सर्व गोष्टी मिसळून तुम्ही पेस्ट तयार करा आणि ही पेस्ट केसांच्या मुळापासून डोक्याला लावा आणि साधारण एक तासासाठी हे तसंच ठेऊन द्या. त्यानंतर थंड पाण्याने केस धुवा. काही दिवसातच तुम्हाला चांगला परिणाम तुमच्या कुरळ्या केसांवर दिसून येईल.
आपल्या केसांच्या लांबीप्रमाणे नारळ तेल आणि ऑलिव्ह ऑईल मिसळून घ्या. आता हे मिश्रण तुम्ही केसांच्या मुळापासून लावा. तेल लावाल्यानंतर टॉवेल अथवा कॉटनच्या कपड्याच्या मदतीने केसांना झाकून ठेवा. एक तासानंतर केसांना शँपू आणि कंडिशनर लावून धुऊन घ्या. यामुळे केवळ केसांना पोषणच मिळणार नाही तर केस मुलायम आणि चमकदारदेखील होतील.
तुमचे केस कुरळे आहेत आणि जर तुम्हाला समजत नसेल की, आपल्या केसांची नक्की कोणती स्टाईल करायची तर तुम्ही तुमच्या केसांची एकदा पाईनॅप्पल बन बनवून बघा. ही दिसायला खूप सुंदर तर दिसतेच पण त्याहीपेक्षा बनवायला सोपी. त्यासाठी तुम्हाला जास्त काही करावं लागत नाही. तुम्ही तुमचे सगळे केस वरच्या बाजूला घेऊन बन करून घ्या आणि मग बॉबी पिनच्या मदतीने बन सेट करा. तुम्हाला ही बन पूर्ण दिवस ठेवायची असल्यास, त्यावर हेअर स्प्रे मारण्याचा सल्ला आम्ही तुम्हाला देऊ. अभिनेत्री सान्या मल्होत्राने आपल्या कुरळ्या केसांवर अशीच पाईनॅप्पल बन बनवली आहे.
अशा तऱ्हेची हेअरस्टाईल तुम्हाला एथनिक वेअरवर जास्त चांगली दिसते. जर तुमचे केस नैसर्गिकरित्या कुरळे असतील तर तुम्ही तुमच्या केसांना थोडंसं मागे घेऊन ट्विस्ट करा आणि त्याची लो बन बनवा. बन व्यवस्थित सेट करण्यासाठी बॉबी पिनचा वापर करा. तुम्हाला जर समजत नसेल तर तुम्ही सान्या मल्होत्राची ही हेअरस्टाईल बघू शकता.
अभिनेत्री तापसी पन्नू बॉलीवूडमध्ये आपल्या कुरळ्या केसांसाठी प्रसिद्ध आहे. तापसी नेहमी आपल्या कुरळ्या केसांच्या या हेअरस्टाईल्स इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करत असते. त्यापैकी या एका फोटोमध्ये आपल्या कुरळ्या केसांची स्टाईल खूपच सुंदर केली आहे. तापसीसारखी ही हेअरस्टाईल बनवण्यासाठी सर्वात पहिले तुमच्या केसांना कर्ल क्रिम लावून घ्या. हे क्रिम लावून झाल्यावर साधारण 5 ते 10 मिनिट्स तसंच ठेवा. जेणेकरून हे क्रिम व्यवस्थित केसात मुरेल. आता टूथब्रशच्या मदतीने केसांमध्ये साईड पार्टिशन करून घ्या. मग केसांना पुढच्या बाजून क्राऊन एरियाच्या बाजूने मागे न्या आणि पिन अप करा. आता खालच्या बाजूने कर्ल्स पुढच्या बाजूला घेऊन तुमची स्टाईल पूर्ण करा.
ही स्टाईल करणं अतिशय सोपं आहे. काही मुलींना लांब केस सांभाळता येत नाहीत. पण त्यांना केस बॉयकट करण्याचीही लाज वाटत असते. पण खरं सांगायचं तर कुरळ्या केसांची बॉयकट हेअर स्टाईल खूपच चांगली दिसते. तसंच ही स्टाईल तुम्हाला एक एलिट लुक मिळवून देते. तुम्ही जर जास्त वेस्टर्न कपडे घालत असाल तर, ही हेअर स्टाईल तुमच्यावर शोभून दिसेल.
तुम्हाला अभिनेत्री द्रष्टी धामी तर माहीत असेलच. तिच्या केसांचे कर्ल खूपच सुंदर दिसतात. असे लांब, कुरळे आणि सुंदर केस खूप कमी जणींच्या नशीबात असतात. त्यामुळे तुमचेही केस असे असतील तर तुम्ही बिनधास्त हे केस मोकळे सोडा. मोकळ्या केसांनाच तुमची स्टाईल बनवा. असे केस मिळणं म्हणजे भाग्य लागतं.
बॉलीवूडची क्वीन कंगना रणौतचे कुरळे केस सर्वांनाच माहीत आहेत. तिला ते दिसतातही सुंदर. शिवाय ती आपले केस खूपच सुंदररित्या कॅरी करते. बऱ्याचदा कंगना आपले केस मोकळेच सोडते. पण तिला काही वेळा वेगवेगळ्या हेअरस्टाईल्समध्येही पाहण्यात आलं आहे. आपल्या कुरळ्या केसांसाठी प्रसिद्ध असणारी कंगना या वेगळ्या हेअरस्टाईल्समध्येही सुंदर दिसते. तिने बांधलेली ही पोनीटेल तुम्हीदेखील ट्राय करून पाहू शकता.
पाईनॅप्पल आणि लो बन बनवून तुम्हाला कंटाळा आला असेल तर तुम्ही मेसी बन ट्राय करून पाहा. या तऱ्हेच्या बनमध्ये पुढच्या बाजूने केसांचा लुक थोडा मेसी असतो. मागच्या बाजूला आंबाडा अगदी करकचून बांधलेला नसतो. मणिकर्णिका सिनेमाच्या प्रमोशनवेळी अभिनेत्री अंकिता लोखंडेने अशी हेअर स्टाईल केली होती. तिचेही केस कुरळे असल्यामुळे तिला ही स्टाईल खूपच छान दिसत होती. तुम्हीदेखील कोणत्याही कार्यक्रमाला अशी हेअर स्टाईल करून वेगळा लुक मिळवू शकता.
कुरळ्या केसांमध्ये एका बाजूला छोटीशी वेणी घालून दुसऱ्या बाजूला मोकळे केस सोडल्यास चांगले दिसतात. तुमचे केस लांब असोत वा लहान अशा तऱ्हेची स्टाईल तुम्हाला नक्कीच एक वेगळा लुक मिळवून देते. कोणत्याही वेस्टर्न कपड्यांवर हा लुक शोभून दिसतो.
कुरळ्या केसांच्या स्टाईल करणं तसं तर कठीण आहे असं बऱ्याचदा वाटतं. कारण कोणतीही स्टाईल केली तर केसांमध्ये गुंता होईल की काय अशी भीतीही असते. पण आपल्याला आहे स्टाईलही करायची असते. अशावेळी तुम्ही एका बाजूने पिन अप करण्याची स्टाईल करू शकता.
वेणी ही सर्वात सोपी आणि सुंदर स्टाईल आहे. कुरळ्या केसांची वेणी घातल्याने त्यामध्ये जास्त गुंताही होत नाही आणि ही स्टाईल दिसायलादेखील सुंदर आणि आकर्षक दिसते. तुम्ही पारंपरिक कपडे अथवा अगदी मॉडर्न कपड्यांमध्येही वेणी घालू शकता.
कुरळ्या केसांची काळजी घेणं तसं कठीण असतं. हार्श शँपू कुरळ्या केसांसाठी वापरणं योग्य नाही. त्यामुळे तुमचे केस जर कुरळे असतील तर तुमच्या केसांना तो शँपू अधिक कोरडं करत नाही ना हे तपासून पाहा. त्यानंतरच तुम्ही एखादा शँपू वापरा. कोणताही शँपू कुरळ्या केसांसाठी वापरता येत नाही.
कुरळ्या केसांमध्येही अनेक प्रकार असतात. वेव्ही म्हणजे जे केस स्ट्रेटही नसतात आणि पूर्ण कुरळेही नसतात. अशा केसांना वेव्ही केस म्हटलं जातं. म्हणजे यामध्ये जास्त गुंता होत नाही. दिसायला ते स्ट्रेट नसले तरीही असे केस मुलायम असतात.
कुरळ्या केसांमध्ये जास्त गुंता होतो त्यामुळे केस विंचरण्यासाठी कंगव्यापेक्षा तुम्हाला ब्रश जास्त योग्य आहे. ब्रशचे दात तुमच्या कुरळ्या केसांसाठी योग्य असतात.