भारतातील लग्नातील मजेशीर आणि महत्त्वाच्या प्रथा-परंपरा In Marathi | POPxo

भारतीय लग्नातील अजबगजब प्रथा-परंपरा

भारतीय लग्नातील अजबगजब प्रथा-परंपरा

आपल्या भारतात विविध राज्य आणि त्यांच्या विविध संस्कृती पाहायला मिळतात. मग याला अपवाद लग्नविधी तरी कसे असतील नाही का? अशा विविध संस्कृतींमधील लग्न पाहण्यातही वेगळीच मजा असते. कारण प्रत्येकाच्या वेगळ्या आणि अजबगजब परंपरा अनुभवणं हे काही औरच असतं. आपण भाग्यशाली आहोत म्हणून आपल्याला हे अनुभवायला मिळतं. चला तर मग पाहूया विविध राज्यातल्या लग्नातील मजेशीर आणि अजबगजब परंपरा.

Canva
Canva

  • बंगाली लग्नात आईला नसतो प्रवेश 

महाराष्ट्रीयन लग्नात जसं आईबाबांना मुलीच्या मंगलाष्टकांच्या वेळी परवानगी नसते. तसंच बंगाली समाजाच्या पारंपारिक पद्धतीनुसार आपल्या मुलाच्या लग्नाला आईला येण्याची परवानगी नसते. POPxoBangla च्या स्वरलिपी भट्टाचार्य यांनी यामागील जुनी प्रथाही सांगितली की, पूर्वी जेव्हा मुलाची वरात मुलीकडे जात असे तेव्हा मुलाचं लग्न लागेपर्यंत आई दह्याच्या हंड्यात हात घालून बसे. एकदा लग्न लागलं की, आईला हात काढण्याची परवानगी मिळे. आजकाल मात्र ही प्रथा एवढी पाळली जात नाही.  

  • उत्तरप्रदेशमध्ये वरातीचं स्वागत केलं जातं टोमॅटोने

वरातीचं स्वागत ढोलताशाच्या गजरात, फटाक्यांच्या आतिषबाजीने, आरतीच्या ताटाने किंवा फुल उधळून केलं जातं. हे तुम्ही पाहिलं असेल पण उत्तरप्रदेशातील काही आदिवासी भाग जसं सरसौलमध्ये वर आणि वरातीचं स्वागत आरतीच्या ताटाने नाहीतर टोमॅटोच्या वर्षावाने केलं जातं.

  • महाराष्ट्रीयन लग्नात कान पिरगळण्याची प्रथा

महाराष्ट्रीयन लग्नातील अनेक प्रथांपैकी मजेशीर असलेली ही प्रथा आहे. ज्यामध्ये वधूचा भाऊ वराचा कान पिरगळतो. या मागील अर्थ असा की, तू माझ्या बहिणीची नीट देखभाल केली नाहीस किंवा तिला त्रास दिलास तर मी आहे हे लक्षात ठेव. 

  • मणिपुरी लग्न आणि माश्यांची जोडी 

पारंपारिक मणिपुरी लग्नातील एका परंपरेनुसार नवरा मुलगा आणि नवरी मुलगी जवळच्या तलावात माश्यांची जोडी सोडतात. असं करणं आवश्यक मानलं जातं. माश्यांचं पाण्यात जोडीने पोहणं हे वैवाहिक जीवनातील आनंदाचं प्रतीक मानलं जातं. 

  • मातीची भांडी डोक्यावर ठेवून घ्यावा लागतो आशिर्वाद

बिहारमध्ये नववधूला हे कर्तब करावं लागतं तेही लग्नानंतर नव्या घरात प्रवेश करताना. हो...वाचून विचित्र वाटलं असेल ना. बिहारी लग्नांमध्ये ही परंपरा पाळली जाते. ज्यामध्ये नववदू घरात प्रवेश करताना आपल्या डोक्यावर मातीची भांडी ठेवून संतुलन करते. ही भांडी डोक्यावर सांभाळत तिला मोठ्यांचा आशिर्वाद घ्यावा लागतो.

Canva
Canva

  • सप्तपदी नाही फक्त 3 फेरे

हिंदू पद्धतीनुसार वधूवर हे सप्तपदी किंवा सात फेरे घेतात. पण मल्याळम लग्नात मात्र वराच्या पुढे वधू फक्त 3 चं फेरे घेते आणि त्यांचं लग्न संपन्न होतं. 

  • हार घातलं की लग्न झालं

आसामी लग्नातली ही परंपरा तर अगदीच अजबगजब आहे. आसाममध्ये होणाऱ्या लग्नात वधूवर हे एकमेकांना हार घालतात आणि लग्न झालं असं जाहीर केलं जातं. यानंतर जे लग्न जेवण घातलं जातं त्यात नववधू वर हे सर्व पाहुण्यांना जेवण वाढतात. 

  • दिवा आणि तेलाची परंपरा

आसामी लग्नातली अजून परंपरा म्हणजे तेल दिव्याची. लग्नासाठीचे कपडे सासरच्यांकडून घेण्याआधी हा विधी असतो. ज्यामध्ये तेल दिवा दाखवला जातो आणि सासू नववधूच्या केसावर एक अंगठी आणि तुळशीपान ठेवते आणि केसांना तीन वेळा तेल लावते. 

  • नाक ओढण्याची प्रथा

गुजराती विवाहातील हा आजही प्रचलित असलेला मजेशीर प्रकार आहे. ज्यामध्ये वरात घेऊन आल्यावर वराला वधूच्या आईकडून ओवाळलं जातं आणि ओवाळल्यानंतर वधूची आई त्याचं नाव हळूवारपणे खेचते. 

  • पंजाबी लग्नातली सुंदर परंपरा

पंजाबी लग्नामध्ये नववधू आणि वराची आई आणि वहिनी हे गुरूद्वाऱ्यातील पाण्याने भरलेल्या भांड्यासाठी चालत तिथे जातात. पूर्ण रस्त्याभर लग्नाची गाणी गात जाण्याची ही छान परंपरा आहे. हे पाणी पवित्र मानलं जातं. तसंच लग्नासाठीचे कपडे घालण्याआधी वधूवराला या पाण्याने आंघोळ घातली जाते. 

अशा भारतातील राज्यातील विविध धर्मांमध्ये अजूनही अजबगजब परंपरा असतील. तुम्हालाही यापैकी काही प्रथा-परंपरा माहीत असतील आम्हाला कळवा. आम्ही त्या लेखात नक्की सांगू. पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे या प्रत्येक प्रथे-परंपरे मागे आहे प्रेम आणि एक सुंदर विचार. हे आपण विसरता कामा नये.

2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे 20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला भेट द्या.