लग्नासाठी डेस्टिनेशन वेडिंग करण्याचा सध्या ट्रेंड आहे. छान निसर्गाच्या सानिध्यात राहून लग्न करण्याचा आनंद वेगळाच असतो. एखादा बंगला किंवा रिसॉर्ट घेऊन हे डेस्टिनेशन वेडिंग केले जाते. अनेकदा डेस्टिनेशन वेडिंग किंवा थीम वेडिंग ऐकूनच अनेकांच्या तोंडाला फेस येतो. कारण डेस्टिनेशन वेडिंगचे कोणाचे फोटो पाहिले की, हा विवाहसोहळा फारच महागात पडेल असे वाटते? पण तुम्ही लग्नाआधी फिरुन तुमच्या बजेटमध्ये बसणारे डेस्टिनेशन वेडिंगचे योग्य ठिकाण निवडले की, तुम्हाला तुमच्या आवडीचे डेस्टिनेश वेडिंग अगदी सहज करता येईल. डेस्टिनेशन वेडिंग करायचे ठरवले असेल तर तुम्ही या काही आयडियाज नक्की वापरु शकता. त्यामुळे तुम्हाला डेस्टिनेशन वेडिंग अगदी आरामात आणि बजेटमध्ये घेता येईल.
जागेची निवड
जागेची निवड ही सगळ्यात जास्त महत्वाची आहे. शहरापासून दूर असलेली ठिकाणं ही थोडी परवडण्यासारखी असतात. त्यातही जर एखादे ठिकाण फार प्रसिद्ध आणि 4 स्टार किंवा 5 स्टारशी निगडीत असेल तर अशी ठिकाणं फार महाग पडतात. त्यामुळे तुम्ही एखादे ठिकाणं आलिशान दिसते म्हणून तुम्ही त्याची पटकन निवड करु नका. मुंबईपासून जवळ असलेल्या येऊर, खोपोली, कर्जत, लोणावळा, खंडाळा अशा ठिकाणी अनेक फार्म हाऊस आहेत. अगदी पावलापावलावर तुम्हाला अशी फार्महाऊस दिसतील. तुम्ही थोडा वेळ घेऊन आणि तुम्हाला प्रवासासाठी फायदेशीर ठरेल असे ठिकाण निवडा आणि त्याचे बजेट काढा. तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे बजेट मिळेल. शिवाय एखाद्या प्रसिद्ध ठिकाणापेक्षाही तुम्हाला पाहिलेली वेगळी ठिकाणं नक्कीच आवडतील. त्यामुळे असाही विचार करा.
डेकोरेशन करताना
आता डेस्टिनेशन वेडिंग करायचे म्हणजे डेकोरेशन आलेच. कारण वेडिंग हॉलपेक्षा फार्म किंवा बंगला अशी ठिकाणं यामध्ये येत असल्यामुळे अशा ठिकाणी डेकोरेशनला फार वाव असतो. तुम्हाला काय आवडते त्यानुसार डेकोरेशन करताना एक बजेट ठरवा. कारण अनेकदा वेन्यूच्या भाड्यापेक्षाही डेकोरेशनचे भाडे तिप्पट असते. त्यामुळे डेकोरेशन करताना तुम्ही खूप विचार करा. कारण अति डेकोरेशन तुमच्या लग्नाच्या बजेटचे कंबरडे मोडायला वेळ लागत नाही. त्यामुळे डेकोरेशन करताना ते कमीत कमी आणि जेवढे आवश्यक तेवढेच करा. डेस्टिनेशन वेडिंग करताना तुम्ही कायमच डेकोरेशनचा खर्च कमीत कमी करा.
जेवणाचा मेन्यू
डेकोरेशनपेक्षाही सगळ्यात महत्वाचे असते ते म्हणजे जेवण कारण पोट खुश तर सगळं खुश त्यामुळे तुम्ही जेवणाचे बजेटही पाहून घ्या. डेस्टिनेशन वेडिंगमध्ये दोन वेळचा नाश्ता- जेवण- स्नॅक्स- ज्युस असे काही पदार्थ येतातच. पाहुण्यांची संख्या आणि सगळे पदार्थ यानुसार बजेट ठरवा. पदार्थाची चव ते किती देणार त्याची क्वालिटी काय? ते सगळे तुम्ही जाणून घ्या. म्हणजे तुमची यामध्ये फसवणूक होणार नाही. अनेक ठिकाणी वेगवेगळ्या कॅटरर्सची मोनोपॉली असते. त्यामुळे ती मोनोपॉली आहे की नाही ते देखील पाहून घ्या.
डेस्टिनेशन वेडिंगचा प्लॅन करण्याआधी लक्षात ठेवा या गोष्टी
प्रवासाचा आणि राहण्याचा खर्च
डेस्टिनेशन वेडिंगसाठी तुम्ही जे ठिकांण निवडलं आहे. त्या ठिकाणी तुमच्या पाहुण्यांना घेऊन जाण्याचा खर्च आणि राहण्याचा खर्च हा देखील जाणून घ्या. कारण खूप वेळा दूर ठिकाणं निवडल्यानंतर तिथे पाहुण्यांना घेऊन जाण्याचा खर्च हा देखील त्रासदायक ठरु शकतो. त्यामुळे हा खर्च याचे बजेटही काढून घ्या. राहण्याचा खर्च करताना किती रुम्स लागतील हे जाणून घ्या. बस की प्रायव्हेट गाड्या बऱ्या पडणार आहेत हे देखील जाणून घ्या.
आता या काही गोष्टी लक्षात ठेवून तुम्ही डेस्टिनेशन वेडिंगचे प्लॅनिंग करा म्हणजे तुमचे बजेट कोलमडणार नाही.