भारतासारख्या देशात त्वचेसंदर्भात अनेक तक्रारी आढळतात. खरुज, नायटा, गजकर्ण हे काही त्वचा विकार शरीरासाठी फारच त्रासदायक असतात. पण थोडीशी काळजी घेतली आणि योग्य औषधोपचार केले की, त्वचा रोग बरा होण्यास मदत मिळते. त्वचा रोगासंदर्भात तुम्हाला काही माहिती नसेल तर आज आपण त्वचेसंदर्भातील अशाच त्वचा रोगांची माहिती घेऊया. ही महत्वपूर्ण माहिती वाचून तुम्हाला त्वचेसदंर्भातील समस्यांवर योग्य निर्णय घेता येईल. जाणून घेऊया त्वचा रोगाचे प्रकार आणि त्वचा रोग घरगुती उपायासंदर्भात अत्यंत महत्वाची माहिती
Table of Contents
त्वचा रोगाचे प्रकार आणि त्वचा रोग घरगुती उपाय – Skin Problems Solution In Marathi
त्वचा रोगाचे वेगवेगळे प्रकार आहेत. त्यांची लक्षणे आणि त्यांचा त्रासही तितकाच वेगळा आहे. त्यामुळे यांच्याबद्दल जाणून घेत त्यांच्यावरील सोपे आणि परिणामकारक अशा घरगुती उपायांची माहिती घेणेही गरजेचे आहे. चला जाणून घेऊया हे त्वचा विकार
त्वचा फुटणे (Cold Sore)
थंडीत त्वचा फुटण्याचा त्रास हा सगळ्यांनाच होतो. पण हा त्रास जर तुम्हाला वर्षभर होत असेल तर तुम्हाला काळजी करण्याची गरज आहे. कारण जर तुमची त्वचा फुटत असेल तर तुमच्या त्वचेला काही अंतर्गत त्रास असण्याची दाट शक्यता आहे. त्वचा फुटण्याचा हा त्रास अधिक त्रासदायक त्यावेळी वाटतो. ज्यावेळी त्वचा फुटते आणि तिथे जखमा होऊ लागतात. त्वचेच्या खपल्या पडू लागतात. त्वचा फुटण्याचा हा त्रास वेळीच निस्तरायचा असेल तर तुम्ही त्वचेची काळजी योग्यवेळी घेणे फारच गरजेचे आहे. अगदी साध्या सोप्या उपायांनी तुम्हाला तुमच्या त्वचेची काळजी घेता येऊ शकते.
घरगुती उपाय (Solution):
- त्वचा फुटल्यामुळे जर ती सतत जळजळत असेल तर तुम्ही त्याला पेट्रोलिअम जेली लावा. कारण पेट्रोलिअम जेली त्वचेला थंडावा देत त्वचा दुरुस्त करण्याचे काम करते.
- खोबरेल तेल किंवा बदामाचे तेलही त्वचेसाठी फारच चांगले असते. त्यामुळेही तुम्हाला थोडासा आराम मिळतो.
वाचा – Kadulimba Che Fayde In Marathi
पिंपल्स (Acne)
पिंपल्स आले नसतील अशी एकही व्यक्ती पृथ्वीतलावर नसेल. पिंपल्सचा त्रास हा सगळ्यांनाच असतो. पण पिंपल्स सतत येत असतील आणि ते त्वचेवरुन जाण्याचे नावच घेत नसतील तर हा एक गंभीर त्रास असू शकतो. कारण पिंपल्स नुसते चेहऱ्यावर येत नाहीत. तर तुमच्या संपूर्ण शरीरावर येऊ शकतात. पिंपल्सकडे दुर्लक्ष केले की, त्यामध्ये पू साचण्याची शक्यता असते. असे पिंपल्स फोडले की, त्वचेवर खड्डे पडतात आणि त्यामुळे सौंदर्य बिघडते. पिंपल्सचा त्रास हा साधारण 15 वर्षांपासून सुरु होतो किंवा शरीरात हार्मोन्स बदलू लागले की, हा त्रास अधिक जाणवून लागतो. तेलकट त्वचा असेल तर हा त्रास अधिक तापदायक होऊ लागतो. पिंपल्सवर आतून आणि बाहेरुन असे दोन्ही उपाय होणे गरजेचे असते.
घरगुती उपाय (Solution):
- चेहरा दिवसातून दोन वेळा स्वच्छ धुवून त्यावर टी ट्री ऑईल किंवा तुमच्या त्वचेला चालू शकेल असे इसेन्शिअल ऑईल लावा. त्यामुळे छिद्रात अडकलेली घाण निघण्यास आणि पोअर्सना आवश्यक घटक मिळण्यास मदत मिळेल.
- हळद ही अँटीसेप्टीक आहे. तिच्या वापरामुळेही पिंपल्स कमी होण्यास मदत मिळेल.
- मुलतानी माती, बेसन यांचा मास्क लावल्याने त्वचेवरील अतिरिक्त तेल कमी होते आणि पिंपल्स कमी होतात.
वाचा – सुरमा त्वचा रोग माहिती आणि उपाय
त्वचेवरील लालिमा (Rosacea)
गाल लालबुंद दिसावे असे अनेकांना वाटते. काश्मीर किंवा पहाडी मुलींचे लाल गाल पाहिल्यानंतर आपल्यालाही तसेच गाल असावे असे वाटते. पण तुम्हाला माहीत आहे का? त्वचेवरील लालिमा हा देखील एक त्वचा रोग आहे. चेहऱ्यावर येणारी ही लालिमा अनेक कारणांमुळे येऊ शकते. सूर्यप्रकाशात जास्त काळासाठी राहणे किंवा रोझेशिआ नावाच्या त्रासामुळेही त्वचेवर अशा प्रकारे लाली येऊ शकते. या त्रासामध्ये त्वचेमध्ये असणाऱ्या रक्तवाहिन्या पातळ होतात. त्यामुळेच रक्ताचा लालसरपणा हा त्वचेवर अगदी सहज दिसू लागतो. यावर योग्य उपचार होणे फारच गरजेचे असते. असे झाले नाही. तर त्वचा ही दिवसेंदिवस अधिक लाल होत जाते. त्वचेची ही अशी स्थिती सुधारण्यासाठी खूप कालावधीही लागतो.
घरगुती उपाय (Solution):
- काकडीचा रस करुन लालिमेवर लावल्यास आराम मिळतो.काकडीच्या रसात असलेले पोषक घटक त्वचेवरील लालिमामुळे होणारी जळजळ कमी करतात.
- ताजा कोरफडीचा गर काढून तो गर लालिमेवर लावा. यामधील जळजळ कमी करणारे घटक तुमच्या त्वचेवरील लालिमा कमी करण्यास मदत करतात.
- ग्रीन टी ही देखील लालिमा कमी करण्यासाठी फारच फायदेशीर आहे. ग्रीन टी घेऊन ती एका पाण्यात चांगली उकळा. पाणी थंड झाल्यावर त्यात कपडा बुडवून तो लालिमेवर लावा नक्की फायदा होईल.
वाचा – उन्हाळ्यात येणाऱ्या घामोळ्यांवर घरगुती उपाय
सेल्युलाईटिस (Cellulitis)
सेल्युलाईटिस हा त्वचेसंदर्भातील गंभीर आजार आहे. हा आजार पायांच्या त्वचेला होतो. जर याचा त्रास अधिक वाढला तर हा त्रास चेहरा आणि हात या भागांनाही होण्याची दाट शक्यता असते. सेल्युलाईटिस हा एक संसर्गजन्य आजार असून हा आजार शरीरात पसरण्याची जास्त शक्यता असते. यामध्ये सेल्युलाईटिस झालेली त्वचा ही लालसर, सुजलेली दिसू लागते. त्वचेची एखादी जखम, प्राण्यांचा चावा, अल्सर, दुखापत या सगळ्या कारणांमुळे सेल्युलाईटिस होण्याची शक्यता असते. या रोगाकडे दुर्लक्ष करुन मुळीच चालत नाही. कारण यामध्ये तुम्हाला तापही येऊ शकतो. ज्यामुळे तुमची प्रतिकारशक्ती कमी होऊ शकते.
घरगुती उपाय (Solution):
- सेल्युलाईटिसवर एखादे मलम किंवा क्रीम लावले तर दाह कमी तर होतो. पण हे त्यावरील खात्रीदायक उपाय ठरु शकत नाही. त्यामुळे फक्त दाह कमी होण्यास मदत मिळेल.
- डॉक्टरांच्या सल्ल्याने काही तोंडी औषधं घेऊन त्याचे सेवन केल्यामुळे ही समस्या नियंत्रणात आणण्यास मदत मिळेल.
वाचा – त्वचा रोग आणि आयुर्वेदिक उपाय
गोवर (Measles)
गोवर हा लहान मुलांमध्ये आढळून येणारा गंभीर असा त्वचा रोग आहे. हा केवळ त्वचा रोग नाही तर हा वेगळ्या कारणामुळे होतो आणि यामध्ये तापही येते. पण गोवर आल्याचे तुमच्या त्वचेवर पुरळ आल्यानंतर लक्षात येते. गोवरमुळे आतापर्यंत अनेक लहान बाळांचे मृत्यू झाले आहेत. गोवरवर योग्य अशी लस उपलब्ध असून लहान मुलांना ती पहिल्या वाढदिवाच्या आधीच दिली जाते. लहान मुलांच्या लसीकरणामध्ये याचा समावेश असतो. गोवरप्रमाणेच असणारा आणखी एक त्रास असतो नागीण. नागीण या आजाराची माहिती ही तुम्ही घेणे गरजेचे आहे.
घरगुती उपाय (Solution):
- ताप हे यामध्ये सगळ्यात त्रासदायक असते. त्यामुळे तुम्ही तापावर नियंत्रण मिळवणे गरजेचे आहे. ताप कमी झाला की, तुमचे शरीर गोवर विरुद्ध लढण्यास सक्रिय होते.
- त्वचेवर येणाऱ्या पुरळांचा त्रास होऊ नये म्हणून या कालावधीत पातळ आणि सुती कपड्यांचा वापर करावा. त्यामुळे जळजळ होत नाही तर आराम मिळतो.
- डोळ्यांजवळ पुळ्या आल्या असतील तर डोळ्यांची स्वच्छता ही देखील फारच महत्वाची असते.
त्वचा क्षय (Lupus)
लुपस हा असा त्वचा रोग असून या त्वचा रोगामुळे अन्य अवयवांवरही परिणाम होण्याची दाट शक्यता असते. या ऑटोइम्यून अशा आजारामुळे मेंदू, ह्रदय, मूत्रपिंड, फुफ्फुसे अशा अवयवांनाही हानी पोहोचण्याची शक्यता असते.लुपसचा त्रास सुरु झाला की, त्वचेवर वेगवेगळी लक्षणे दिसू लागतात. डोळ्याखाली सूज येऊ लागते. त्वचेवरील काही भाग लाल दिसू लागतो. हातापायाची बोटं निस्तेज आणि जांभळी दिसू लागतात. चेहऱ्यावर ‘बटरफ्लाय रॅशेश’ दिसू लागतात.
घरगुती उपाय (Solution):
- लुपसवर परिणामकारक असे घरगुती उपाय नाहीत. तुम्हाला या आजारातून बरे होण्यासाठी डॉक्टरांची मदत घ्यावी लागते.
- लुपसचा त्रास कमी करण्यासाठी तुम्ही प्रतिकारशक्ती वाढवा. प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी तुम्ही चांगला पौष्टिक आहार ठेवा.
पांढरे कोड (Vitiligo)
पांढरे कोड हा त्वचा रोग त्वचेतील रंगद्रव्यामुळे होते. आपले शरीर मेलनिन अर्थात रंगद्रव्याची निर्मिती करत असते. ही निर्मिती थांबली की, त्वचेवर पांढरे चट्टे यायला सुरुवात होते. हे चट्टे सुरुवातीला वेगवेगळ्या ठिकाणी दिसत राहतात. जर यावर योग्य उपाय केला नाही तर हा त्रास वाढतो आणि संपूर्ण शरीरावर चट्टे येत राहतात. दिसायला कोडं भयंकर दिसत असले तरी त्याचा फारसा त्रास होत नाही.उन्हात गेल्यानंतर हा भाग लाल होतो आणि त्वचा जळू लागते.
घरगुती उपाय (Solution):
- त्वचेवरील कोड झाकण्यासाठी हा त्वचारोपण केले जाते. कोड झालेल्या जागी सोरॅलीन नावाचे औषध लावले जाते.
- सूर्यप्रकाश हा जरी यासाठी हानिकारक वाटत असला तरी सूर्यप्रकाशात उभे राहून किंवा कृत्रिम अतिनील प्रकाश पाडून त्वचा पूर्ववत केली जाऊ शकते.
नायटा (Ringworm)
अपुऱ्या स्वच्छतेमुळे होणारा आणखी एक आजार म्हणजे ‘नायटा’ नायटा हा वेगवेगळ्या प्रकाराचे असतात. नायटा हा पसरत जाणारा आजार आहे. यामध्ये त्वचेला खूप खाज सुटते. हा आजार बुरशीमुळे होतो. अपुरी स्वच्छता, ओले कपडे, एकमेकांचे कपडे घालणे या सगळ्यामुळे हा आजार अधिक बळावण्याची शक्यता असते. खरुज, नायटा, गजकर्ण हे एकाच प्रकारातील असून हा त्रास गुप्तांगाकडे जास्त जाणवतो. यामध्ये सतत खाज येत राहणे, त्वचेचा दाह होणे, खरपुड्या पडणे, त्वचा सुकणे असा त्रास होऊ लागतो.
घरगुती उपाय (Solution):
- स्वच्छ आंघोळ हा यावर एक उत्तम इलाज आहे. गरम पाण्याने नायटा झाला आहे त्या ठिकाणी स्वच्छ अंग धुवून घ्या.
- त्वचेचा दाह कमी होण्यासाठी एखादे मलम किंवा थंडावा मिळेल असे मलम लावा.
वांग (Melasma)
त्वचेवरील पिग्मेंटेशेन जास्त झाले की, त्वचा वेगळीच दिसू लागते. त्वचा काळवंडल्यासारखी आणि वयस्क दिसू लागते. वांगचा त्रास हा महिलांना अगदी कोणत्याही वयात होऊ शकतो. हा त्रास प्रामुख्याने चेहऱ्यावर होतो. त्यामुळेच त्वचा ही वेगळी दिसू लागते.आपल्या त्वचेत रंगद्रव्य निर्माण करणाऱ्या पेशींमुळे आपल्याला रंग प्राप्त होत असतो. ज्याला मेलानोसाईट्स असं म्हटलं जातं. मेलानोसाईट्स मेलनिनचं उत्पादन करतात. ज्यामुळे त्वचेला रंग मिळतो. जेव्हा मेलानोसाईट्स प्रभावित होतात तेव्हा त्वचेतील काही भाग जास्त प्रमाणात मेलनिन निर्माण होतं. ज्यामुळे त्वचेच्या काही भागाचा रंग हा इतर भागाच्या तुलनेत जास्त गडद दिसू लागतो
घरगुती उपाय (Solution):
- लिंबाचा रस,मध आणि पाणी एकत्र करुन तो वांगवर लावा. त्यामुळे वांगचे डाग जाण्यास मदत मिळेल.
- कोरफडमध्ये नैसर्गिक पीएच असते. ज्यामुळे त्वचा एकसारखी होण्यास मदत मिळते. वांगचा त्रास कमी करण्यासाठी चेहऱ्यावर कोरफड जेल लावायला मुळीच विसरु नका.
- तुम्ही वांगसाठी क्रीम चा वापर ही करू शकता.
मस्सा (Wart)
त्वचेसंदर्भातील हा त्रास फारसा त्रासदायक वाटत नसला तरी देखील तुमच्या सौंदर्यात बाधा आणण्याचे काम मस्सा करते. असे म्हणतात की, तुमच्या त्वचेवर एखादी जखम झाली असेल त्या ठिकाणी तुमची त्वचा उघडी झाली असेल तर काही ठराविक जंतू संसर्गामुळे तुम्हाला मस्सा येण्याची शक्यता असते. मस्सा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पसरु शकतो. मस्साचे वेगवेगळे प्रकार असतात. मस्सा हा त्वचेच्या कोणत्याही भागावर होऊ शकतो. हात, हाताचा तळवा, पाय- पायाचा तळवा असा कुठेही मस्सा येऊ शकतो. मस्सा हा एखाद्या तीळाप्रमाणे दिसू शकतो. पण नंतर तो वाढत जातो. कधी तो चॉकलेटी दिसतो तर कधी तो लालही दिसतो. शरीरावरील मस्सा वाढण्याआधीच तुम्ही त्याची योग्य काळजी घ्यायला हवी.
घरगुती उपाय (Solution):
- लसणीचा रस मस्सावर फारच फायदेशीर असतो. हा रस घेऊन तुम्ही मस्सावर लावा. ती जागा कपडयाने रात्रभर बांधून ठेवा. कालांतराने तो कमी कमी होत जाईल.
- कांद्याचा रस मस्सावर लावूनही तुम्ही मस्सा कमी करु शकता. याच्या वापरामुळे तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल.
पपईचा गर त्वचेला लावल्यामुळेही मस्साची समस्या कमी होण्यास मदत मिळते. - अॅपल सायडर व्हिनेगरचा वापरही मस्सावर केला जाऊ शकतो. त्यामुळेही मस्सा निघण्यास मदत होते.
सोरायसिस (Psoriasis)
त्वचा रोगासंदर्भातील हा आणखी एक आजार आहे. हा आजार अनुवंशिक किंवा कोणत्याही जंतू संसर्गामुळे होत नाही. सोरायसिसमध्ये त्वचेवर पांढऱ्या रंगाचे चट्टे येतात, त्वचेचा भुसा पडू लागतो ही काही सोरायसिसची लक्षणे आहेत. त्वचेवर एखादी जखम झाली आणि त्याकडे दुर्लक्ष केले गेले की, ती वाढण्याची शक्यता असते. सोरायसिसची सुरुवात नेमकी कशी होते ते कळत नाही. ते अद्याप कोणालाही कळलेले नाही. त्वचेची ही जखम अचानक वाढू लागते. हे चट्टे खूप वाढू लागतात. त्वचेवरुन साल निघाल्याप्रमाणे त्वचा सोलू लागते. मृत त्वचा निघणे असे पहिले लक्षण सोरायसिसमध्ये दिसू लागते.
घरगुती उपाय (Solution):
- कोरफडीचा गर आणि खसखर वाटून सोरायसिस झालेल्या भागी लावा थोडा आराम मिळतो. खाजेपासून थोडी सुटका होते
- महावज्रक तेल हे आयुर्वेदिक तेल या जखमेवर काम करते.
- हळदीची गोळी अर्थात कुंकर्मा आणि मधुपर्णी तेलाच्या सेवनामुळेही बराच फरक पडतो.
इसब (Eczema)
‘इसब’ हा त्वचा रोग असून यामध्ये त्वचेला खूप खाज येते. ही खाज इतकी असह्य असते की, त्वचा सतत खाजवल्यामुळे त्वचेला खूप जखमा होतात. या जखमा इतक्या खोलवर होत जातात की, त्वचा नाजूक होऊन जाते आणि त्वचेतून कधी कधी रक्तही येऊ लागते. इसब हा त्वचेचा त्रास अनेक कारणामुळे होतो. अस्वच्छता हे त्यामागील सगळ्यात पहिले कारण आहे. त्वचा रोगाच्या या प्रकारामध्ये त्वचेवर लाल चट्टे उठणे, त्वचेवर खरपुड्या येणे आणि त्वचेवर कोरडे पॅच तयार होणे असे काही त्रास होऊ लागतात. तुम्हाला जर असा त्रास होऊ लागला असेल तर तुम्ही घरातच राहून याची काळजी घ्या. इसबची संपूर्ण माहिती जाणून घेणेही तितकेच गरजेचे आहे.
घरगुती उपाय (Solution):
- कोरफड जेल घेऊन तुमच्या इसब झालेल्या भागाला लावा. तुम्हाला थोडा थंडावा मिळेल.
- नारळाचे तेलही यावर फारच औषधी आहे. तुम्ही इसब झालेल्या भागावर आणि जखम झाली असल्यास त्यावर नारळाचे तेल लावा तुम्हाला त्यामुळे आराम मिळेल.
- पोषक आणि पौष्टिक असा आहार देखील इसबवर उत्तम काम करतो.
तुम्हाला पडलेत का प्रश्न (FAQ’s)
वातावरण बदलानुसार त्वचेच्या अनेक सर्वसाधारण तक्रारी असतात. त्वचा फुटणे, मुरुमं येणे, पुळ्या पुटकुळ्यांनी चेहरा भरणे असा त्रास आहारात आणि वातावरणात बदल झाला की, अगदी साहजिकपणे होतो. पण त्वचेसंदर्भातील या त्रासाचे योग्यवेळी निवारणही करता येते. घरगुती उपाय आणि त्वचा रोग तज्ज्ञांच्या मदतीने हे त्रास कमी करता येतात.
मुरुमं, त्वचा फुटणे, पुटकुळ्या, त्वचेवरील लालिमा यांना घरच्या घरी कमी करता येऊ शकते. काही सोपे आणि साधे घरगुती उपाय हे यासाठी फारच फायदेशीर असतात. ज्यांचा उपयोग तुम्ही करु शकता. या शिवायही त्वचेच्या अन्य काही समस्या केवळ काळजी घेत सोडवता येतात.
प्रत्येकाची शरीरप्रवृत्ती ही वेगळी असते. त्यानुसार होणारा त्वचा रोग तुम्हाला त्रासदायक ठरत असतो.काहींची सहनशक्ती आणि प्रतिकारशक्ती फारच चांगली असते. त्यामुळेच त्यांना त्वचेच्या इतर समस्यांचा फारसा परिणाम होत नाही. तर काहींना अगदी साध्या त्वचा रोगानेही त्रास होऊ लागतो. त्यामुळे सगळेच त्वचा रोग हे थोडयाफार फरकाने परिणामकारकच असतात.
त्वचा रोगाचे प्रकार आणि घरगुती उपाय जाणून घेतल्यानंतर ही माहिती पुढेही पाठवायला विसरु नका.