खाणंपिण आणि नाइटलाईफ

घाटकोपरच्या खाऊ गल्लीत काय आहे चविष्ट पदार्थ, टाकूया एक नजर (Ghatkopar Khau Galli)

Dipali Naphade  |  Jan 20, 2020
घाटकोपरच्या खाऊ गल्लीत काय आहे चविष्ट पदार्थ, टाकूया एक नजर (Ghatkopar Khau Galli)

मुंबई आणि खाण्यापिण्याची चंगळ हे एक समीकरणच आहे. मुंबईत आलेला माणूस हा कधीच उपाशी राहात नाही असं नेहमीच म्हटलं जातं. तर ही मुंबापुरी प्रत्येकाला चविष्ट खाणं पुरवत असते. त्यातही मुंबईत अनेक ठिकाणी असणाऱ्या खाऊ गल्ली हे इथलं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. भुलेश्वर असो, अंधेरी असो, बांद्रा असो, मुलुंड असो वा घाटकोपर असो इथे प्रत्येक ठिकाणी विशिष्ट पदार्थांच्या खाऊ गल्ली आहेत. इथे गेल्यानंतर आपल्याला काय पदार्थ खायला मिळतील आणि त्याची चव काय असेल याचा नेहमीच प्रत्येकाला एक अंदाज असतो. पण तरीही या खाऊ गल्लीमध्ये आपल्या ग्रुपबरोबर जाऊन खाण्याची मजा काही औरच. 

आम्ही तुम्हाला इथे घाटकोपरच्या खाऊ गल्लीची (Ghatkopar Khau Galli) सफर करवून आणणार आहोत. घाटकोपरची खाऊ गल्ली प्रसिद्ध आहे. त्यामुळे इथे मिळणारे पदार्थही प्रसिद्ध आहेत. विशेषतः घाटकोपरच्या खाऊ  गल्लीमध्ये मिळणारे विविध चवीचे डोसे हे अधिक प्रसिद्ध आहेत. घाटकोपरची खाऊ गल्ली तुम्ही नक्की फिरला असणार, पण गेला नसलात तर तुम्ही या घाटकोपची खाऊ गल्लीला नक्कीच भेट द्यायला हवी. काय आहे इथली खासियत जाणून घेऊया या लेखातून. घाटकोपरची खाऊ गल्ली (Ghatkopar Khau Galli) म्हटलं की अनेक पदार्थ आपल्या डोळ्यासमोर येतात. त्यापैकी कोणत्या पदार्थांची चव तुम्ही चाखलीच पाहिजे आणि  तुम्ही कुठे जायला हवं हे आम्ही तुम्हाला या लेखातून सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया –  

पाव भाजी (Pav Bhaji)

Instagram

तुम्ही जर शाकाहारी असाल आणि तुम्हाला वेगवेगळे फास्ट फूड खायची आवड असेल तर तुम्ही घाटकोपरच्या खाऊ गल्लीमध्ये जाऊन पावभाजी नक्कीच ट्राय करायला हवी. इथे तुम्हाला रस्त्यावर वेगवेगळे स्टॉल्स तर दिसतीलच पण तुम्हाला जर शॉपिंग केल्यानंतर उभं राहून खायचं नसेल तर तुम्ही बसूनही वेगवेगळ्या रेस्टॉरंट्समध्ये खाऊ शकता. त्यासाठी तुम्हाला जास्त शोधाशोधही करावी लागत नाही. घाटकोपरची खाऊ गल्ली ही एम. जी. रोड पूर्वेला आहे. इथे पश्चिमेलादेखील खाऊ गल्ली आहे. पण पूर्व घाटकोपरची खाऊ गल्ली ही अधिक प्रसिद्ध आहे. तुम्ही इथे गेल्यानंतर तुम्हाला खाण्याचा इतका सुगंध येत असतो की, नक्की कुठे जाऊन खाऊ अशी आपली सगळ्यांचीच अवस्था होते. इथला प्रत्येक पदार्थ हा प्रसिद्धच आहे. पावभाजीचेदेखील अनेक स्टॉल्स आहेत. तुम्ही कोणत्याही स्टॉलवर जाऊन पावभाजी चव इथे चाखू शकता.

पावभाजी खाण्यासाठी प्रसिद्ध ठिकाण – 

अजिचा व्हेज रेस्टॉरंट (घाटकोपर पूर्व)

एम. जी. रोडवरील पावभाजी स्टॉल्स 

किंमत – साधारण 100 पासून सुरू

मुंबईत पावभाजीचा घ्यायचाय आस्वाद तर नक्की द्या ‘या’ ठिकाणांना भेट

डोसा (Dosa)

घाटकोपरची खाऊ गल्ली ही खवय्यांसाठी खरं तर पर्वणी. त्यातही तुम्ही जर डोसा लव्हर असाल तर मग काही विचारून सोयच नाही. इथे अनेक व्हरायटीचे डोसे मिळतात. अगदी तुम्ही कधी नावंही ऐकली नसतील असे डोसा या खाऊ गल्लीमध्ये तुम्हाला खायला मिळतील. चीज बर्स्ट डोसा, जिनी डोसा, थाऊजंड आयर्लंड डोसा, क्रिम डोसा, चॉकलेट डोसा असे अनेक नाव पण न घेतलेले डोसे इथे खायला मिळतात. एक डोसा खाऊनच पोटही भरतं आणि मनही. इथे डोशाचे अनेक स्टॉल्स आहेत. पण त्यातही काही स्टॉल्स अगदी प्रसिद्ध आहेत. त्यातही सर्वात जास्त प्रसिद्ध आहे तो म्हणजे जिनी डोसा. त्याशिवाय आपल्याला जर वाटत असेल की, रस्त्यावर कसं खायचं तर इथली स्वच्छता ही वाखाणण्याजोगी आहे. चवीला चटपटीत असणारे हे डोसे अगदी पॉकेट फ्रेंडली आहेत. म्हणजे इथल्या प्रसिद्धीनुसार हे महाग असतील असं वाटतं पण तसं अजिबात नाही. तसंच इथे राजकोट डोसा मिळतो जो अप्रतिम असून हा एक डोसा एका वेळी खाणं जरा अशक्यच आहे. 

डोसा खाण्यासाठी प्रसिद्ध ठिकाण – 

फूड ट्रंक 

साई स्वाद डोसा 

हॉट स्पॉट 

किंमत – साधारण 150 रूपयांपासून सुरू

मिसळ पाव (Misal Pav)

मिसळ पाव हा तर सगळ्यांचाच आवडीचा खाद्यपदार्थ. पण मिसळ म्हटली तिखट आणि झणझणीत असा त्याचा बाज असायला हवा. ही मिसळ इथे तुम्हाला बऱ्याच ठिकाणी मिळते. पण खाऊ गल्लीतील रेस्टॉरंट्समध्ये जाऊन तुम्हाला याचा स्वाद घ्यायला लागतो.  मिसळ खरं तर अनेक तऱ्हेने बनवली जाते. पण इथे मूग, वाटाणे, चिवडा याचं मिश्रण करून अनोखा स्वाद मिसळीला देण्यात येतो. पोटाबरोबर मनही या स्वादाने भरतं. त्यामुळे या ठिकाणी बरीच गर्दीही असते. खाऊ गल्ली साधारण दुपारी 2 वाजल्यापासून चालू होते ती रात्री 10 वाजेपर्यंत सुरूच असते. तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे येऊन पदार्थ खाऊ शकता. मिसळीबरोबर पावाची पण चव भारीच लागते. त्यामुळे हे बेस्ट कॉम्बिनेशनही तुम्ही इथे खाऊ शकता. 

मिसळ पाव खाण्यासाठी प्रसिद्ध ठिकाण – आस्वाद 

किंमत – 90 रूपयांपासून पुढे 

मुंबईची शान असलेला वडापाव खायचाय, तर ‘या’ ठिकाणांना नक्की भेट द्या

काळी पाव भाजी (Black Pav Bhaji)

Instagram

आपण नेहमीच लाल तिखट घातलेली पाव भाजी खातो. पण इथे घाटकोपरच्या खाऊ गल्लीमध्ये काळी पावभाजी हा वेगळा प्रकारही आपल्याला खायला मिळतो. ज्यांना तिखट खायची आवड आहे त्यांच्यासाही ही खास काळी पावभाजी बनवण्यात येते. काळी पावभाजी हा एक वेगळा प्रकार असून सध्या हा खाद्यपदार्थ लोकांना आवडत आहे. वेगवेगळ्या मसाल्यांमुळे याचा काळेपणा दिसून येतो आणि ही पावभाजी काळी होते. त्याशिवाय यामध्ये टॉमेटो आणि लाल मसाल्याचा उपयोग करण्यात येत नाही. याची चव नेहमीच्या पावभाजीपेक्षा वेगळी असते. शिवाय ही स्पाईसी आणि लज्जतदार लागते. ज्यांना मसालेदार आवडत नाही अथवा ज्यांना काळा रंग पदार्थांमध्ये  आवडत नाही त्यांनीदेखील ही एकदा नक्की ट्राय करून बघायला हवी. 

काळी पावभाजी खाण्यासाठी प्रसिद्ध ठिकाण – तृप्ती स्नॅक्स कॉर्नर (गरोडिया नगर)

किंमत – 90 रूपयांपासून पुढे 

फ्राईज (Fries)

Instagram

लहान मुलांचं आऊटिंग हे फ्राईज खाल्ल्याशिवाय पूर्ण होतच नाही. त्यांच्याबरोबर मोठ्यांनाही फ्राईज तितकंच आवडतं. आजकाल फ्राईज सगळीकडेच मिळतात. पण त्यातही वेगवेगळ्या चवी असतात. घाटकोपरच्या खाऊ गल्लीमध्येही तुम्हाला याचा आस्वाद घेता येतो. यामध्येदेखील आजकाल खूप व्हरायटी आल्या आहेत. फ्राईज सध्या वेगवेगळ्या सॉस आणि क्रिम्ससहदेखील मिळतं. मुलांना आणि मोठ्यांना नक्कीच फ्राईज आवडतात. घाटकोपरच्या खाऊ गल्लीतही फ्राईज खूपच चांगले मिळतात. 

फ्राईज खाण्यासाठी प्रसिद्ध ठिकाण – हॅप्पीनेस कॅफे (रेमंड शॉपजवळ) 

किंमत – 80 रूपयांपासून पुढे 

मुंबईतील या ठिकाणी तुम्हाला चाखता येतील ‘झक्कास’ Street Food

मॅगी (Maggie)

मॅगी आपण घरामध्ये करतोच. पण आता बाहेरही वेगवेगळ्या चवीची मॅगी मिळू लागली आहे. यामध्ये बटर मॅगी, व्हेजिटेबल मॅगी, पिरी पिरी मॅगी, शेजवाज मॅगी, एग मॅगी असे अनेक प्रकार आता खायला मिळतात. त्याशिवाय या मॅगीची चवही वेगळी लागते. मॅगी म्हटल्यानंतर केवळ नूडल्स खाण्यापेक्षा त्यामध्ये काहीतरी वेगळेपणा देऊन ते खाण्यात अधिक मजा असते. घाटकोपरच्या खाऊ गल्लीमध्ये (Ghatkopar Khau Galli) तुम्हाला अनेक ठिकाणी मॅगी नूडल्सच्या वेगवेगळ्या व्हरायटी दिसतील. तसेच फास्ट फूडमध्ये सध्या मॅगी नूडल्सची जास्त चलती आहे. अगदी लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत सर्वांनाच हा पदार्थ आवडतो. त्यामुळे मॅगी नूडल्सची चव तुम्हाला घ्यायची असेल तर तुम्ही नक्की इथे भेट देऊ शकता. 

मॅगी नूडल्स खाण्यासाठी प्रसिद्ध ठिकाण – हॅप्पीनेस कॅफे 

किंमत – 40 रूपयांपासून पुढे 

सिझलर्स (Sizzlers)

Instagram

फिरून फिरून दमल्यावर सिझलर्स खाण्यात नक्कीच मजा असते. वेगवेगळ्या चवीचे पदार्थ एकत्र करून गरमागरम आणलेले सिझलर्स हे चवीला अप्रतिम लागतात. यामध्येही बरीच व्हरायटी असते. घाटकोपरच्या खाऊ गल्लीत असो अथवा घाटकोपर पश्चिमेला असो सगळीकडे खाण्याचे पदार्थ हे अप्रतिम चवीचे मिळतात. ग्रील्ड,  बार्बेक्यू पोटॅटो पॅटी, गाजर, लेट्यूस, फ्राईज असे सर्व एकत्र मिळणारे सिझलर्समधील पदार्थ तोंडाला अक्षरशः पाणी आणतात. त्याची चवही जिभेवर रेंगाळत राहाते. सिझलर्स हे कॉलेजमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये अधिक लोकप्रिय आहे. इथे घाटकोपरच्या खाऊ गल्लीत तुम्हाला वेगवेगळे सिझलर्स आणि त्याचे चाहतेही बघायला मिळतील. 

सिझलर्स खाण्यासाठी प्रसिद्ध ठिकाण – मी फेव्हरेटो, विक्रांत सर्कलजवळ

किंमत – 150 रूपयांपासून पुढे  

पाणी पुरी (Pani puri)

Instagram

या जगात असा एकही माणूस सापडणार नाही ज्याला पाणीपुरी आवडत नाही. पाणीपुरी ही कधीही आणि कोणत्याही वेळी जाऊन खरं तर खाण्याचा पदार्थ आहे. घाटकोपरच्या खाऊ गल्लीमध्ये असे अनेक चाट कॉर्नर आहेत जिथे तुम्हाला उत्तम चविष्ट आणि चटकदार पाणीपुरी मिळते. घाटकोपरची खाऊ गल्ली पाहिल्यानंतर तुम्हाला इथे प्रत्येक थोड्या पावलानंतर पाणीपुरीचे ठेले लावलेले दिसतात. आश्चर्य म्हणजे या सर्व स्टॉल्सवर गर्दी असते. पाणीपुरीची चव जिभेवर तरळत राहाते. इथे अनेक ठिकाणी तुम्हाला चटकदार आणि चवदार पाणीपुरी मिळते. 

पाणीपुरी खाण्यासाठी प्रसिद्ध ठिकाण –

जय श्री पाणी पुरी 

सूर्यवंशी पाणी पुरी सेंटर 

किंमत – 25 रूपयांपासून पुढे 

मोमोज (Momos)

Instagram

आता मुंबईच्या रस्त्यावर तिबेटीयन स्ट्रीट फूड खूपच खाल्ले जाते.  मोमोज हे सध्याचं ट्रेंडिंग फास्ट फूड आहे. अगदी बऱ्याच ठिकाणी मोमोजचे स्टॉल्स असतात.  खाऊ गल्लीमध्येही असे अनेक मोमोज तुम्हाला मिळतात. इथे तुम्ही जाऊन गरमागरम व्हेज आणि नॉन-व्हेज अशा दोन्ही मोमोजची चव घेऊ शकता.  सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे मोमोज तुम्हाला ताजे बनवून देण्यात येतात. तळलेले अथवा उकडलेले अशा दोन्ही स्वरूपाचे मोमोज इथे तुम्हाला मिळतात. मोमोजमध्ये व्हरायटी नसली तरीही बऱ्याच लोकांना हे उकडलेले मोमोज खूपच आवडतात. 

मोमोज खाण्यासाठी प्रसिद्ध ठिकाण –

मोमोज मॅजिक 

मोमो स्टेशन 

फाईव्ह फॅट माँक्स

किंमत – 80 रूपयांपासून पुढे 

कुल्हड चहा (Kulhad Chai)

Instagram

आपल्याकडे चहा म्हटलं की फक्त हे एक पेय नाही तर त्यात अनेक भावना दडल्या असल्याचंही म्हटलं जातं. चहावेडे लोक तर आपण नेहमीच पाहतो. आता चहाच्या पण अनेक व्हरायटी असतात. पण त्यातही सर्वात जास्त प्रसिद्ध आहे तो कुल्हड चहा. अर्थात मातीच्या कुल्हडमध्ये दिलेल्या या चहाची चव अप्रतिम असते. त्यामध्ये माती आणि चहाचा स्वाद अप्रतिम मिक्स झालेला असतो.  ज्यामुळे एक वेगळीच तरतरी मिळते. घाटकोपरच्या खाऊ गल्लीमध्ये हा कुल्हड चहा आपल्याला मिळतो. तुम्हीही चहावेडे असाल तर इथे येऊन एकदा मस्त गरमागरम चहाची चव घ्यायलाच हवी. वेलची चहा, कुल्हड चहा आणि मसाला चहा हे तीनही प्रकारचे चहा तुम्हाला घाटकोपरच्या खाऊ गल्लीत जागोजागी मिळतात. 

कुल्हड चहा पिण्यासाठी प्रसिद्ध ठिकाण –

घाटकोपर खाऊ गल्लीच्या अनेक कॉर्नरवर

डॉ बबल्स चाय स्पेशालिस्ट्स 

किंमत – 60 रूपयांपासून पुढे 

सँडविच (Bombay Sandwich)

Instagram

सँडविच हे घाटकोपरची खाऊ गल्ली तुम्ही प्रवेश करता तिथपासून तुम्हाला प्रत्येक दोन स्टॉलनंतर दिसेल. इथे सर्व सँडविचच्या व्हरायटी तुम्हाला मिळतात. पण स्ट्रीटवर तुम्हाला केवळ व्हेज सँडविचच्या व्हरायटी तुम्हाला दिसतील. तुम्ही जर शाकाहारी असाल तर तुम्हाला उत्तम स्वादाचे सँडविच इथे मिळतील. पनीर, चीज, शेव पुरी, समोसा, चॉकलेट अशा विविध सँडविचच्या व्हरायटी तुम्हाला या स्टॉल्सवर खायला मिळतील. त्यातही रोस्टेड, ग्रील असेही विविध प्रकार तुम्हाला इथे खायला मिळतात. घाटकोपरची खाऊ गल्ली ही सर्व प्रकारच्या फास्ट फूडने अक्षरशः भरलेली तुम्हाला दिसून येते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे इथले पदार्थांचे भाव हे खिशाला परवडणारे असतात आणि चवही अप्रतिम असते. त्यामुळे इथे प्रचंड प्रमाणात गर्दी दिसून येते. 

सँडविच खाण्यासाठी प्रसिद्ध ठिकाण –

धर्मा सँडविच

मामाजी सँडविच

सँडविच किंग 

किंमत – 30 रूपयांपासून पुढे 

दाबेली (Dabeli)

Instagram

दाबेली हा एक कच्छी पदार्थ आहे.  पण त्याची चव इतकी अप्रतिम असते. त्याशिवाय एक दाबेली खाल्ल्यानंतर तुमचं पोट भरतं. दाबेलीचा सुगंध इतका मस्त असतो की, त्याचा सुगंध आल्यानंतर आपोआप भूक चाळवली जाते. दाबेली म्हणजे  पाव, बटर, शेव, डाळिंबाचे दाणे, शेंगदाणे आणि बटाट्याच्या गोडसर भाजीचे एक सुरेख मिश्रण. घाटकोपरच्या खाऊ गल्लीमध्ये अशी तोंडाला पाणी सुटणारी दाबेली बऱ्याच ठिकाणी तुम्हाला खायला मिळते. 

दाबेली खाण्यासाठी प्रसिद्ध ठिकाण –

घाटकोपर खाऊ गल्ली, एम. जी. रोड

सोमेय्या कॉलेजजवळ 

किंमत – 20 रूपयांपासून पुढे 

प्रश्नोत्तरं (FAQs)

1. घाटकोपरच्या खाऊ गल्लीमध्ये कोणत्या वेळेत जावे?

साधारण दुपारी 2 वाजल्यानंतर घाटकोपरची खाऊ गल्ली सुरू होते. रात्री 10 वाजेपर्यंत ही खाऊ गल्ली आणि तिथली रेस्टॉरंट्स उघडी असतात. तुम्ही यावेळेत कधीही जाऊन फास्ट फूडवर ताव मारू शकता. 

2. घाटकोपरच्या खाऊ गल्लीतील काय वैशिष्ट्य आहे?

घाटकोपरच्या खाऊ गल्लीमध्ये मिळणारा डोसा आणि पावभाजी हे दोन्ही वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी आहेत. त्याशिवाय इथे मिळणारी दाबेलीदेखील तुम्हाला पुन्हा पुन्हा या खाऊ गल्लीमध्ये जाण्यासाठी भाग पाडते. 

3. सगळ्यात उत्कृष्ट पदार्थ कोणता मिळतो?

घाटकोपरची खाऊ गल्ली ही सर्व पदार्थांसाठी प्रसिद्ध आहे. पण सर्वात उत्कृष्ट आणि प्रसिद्ध असणारा पदार्थ म्हणजे डोसा. त्यातही जिनी डोसा जास्त प्रसिद्ध आहे.  

#POPxoLucky2020 ने आम्ही देत आहोत या दशकाला निरोप, प्रत्येक दिवशी असेल एक नवीन सरप्राईज, मग नक्की बघा नवीन POPxo Zodiac Collection ज्यामध्ये आहे नोटबुक्स, फोन कव्हर्स आणि मॅजिक मग्ज्स जे आहेत मजेशीर आणि अगदी 100% तुमच्यासारखे. एवढंच नाहीतर यावर आहे 20% डिस्काऊंट, मग लगेच क्लिक करा POPxo.com/shopzodiac आणि शॉप करा.

Read More From खाणंपिण आणि नाइटलाईफ