मनोरंजन

‘या’ कारणांसाठी आहारात लसूण जरूर वापरा

Trupti Paradkar  |  Jun 10, 2019
garlic

भारतीय खाद्यसंस्कृतील असे अनेक पदार्थ आहेत जे हे लसणाच्या फोडणीशिवाय पूर्णच होऊ शकत नाहीत. डाळी आणि भाज्यांमध्ये लसूण टाकल्यामुळे त्यांना विशिष्ट स्वाद येतो. पांढऱ्या आणि लालसर रंगाच्या लसणाचा वास जरी उग्र असला तरी स्वयंपाकाला मात्र त्यामुळे छान चव येते. स्वाद वाढविण्यासोबत लसणामध्ये अनेक गुणकारी आणि आरोग्यदायी घटक असतात. ज्यामुळे आरोग्यासाठी लसूण फारच फायदेशीर ठरते. लसणामध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी 6, फायबर, सेलेनियम, कॅल्शियम, लोह, मॅंगनीज, पोटॅशियम, फॉस्फरस भरपूर प्रमाणात असते ज्यामुळे तुम्ही आजारपणापासून नक्कीच दूर राहू शकता. आरोग्य शास्त्रात लसणाला वंडर फूड म्हटले जाते. दररोज एक लसणाची पाकळी चावून खाण्याने तुमचे आजारपणापासून रक्षण होऊ शकते.  यासाठी लसणाचे हे आरोग्यदायी फायदे जरूर वाचा.

कोलेस्ट्रॉल कमी होते

रक्तवाहिन्यांमधील बॅड कोलेस्ट्रॉल वाढले की ह्रदयावर ताण येऊ लागतो. ज्यामुळे पुढे ह्रदयरोग आणि ह्रदयविकाराचा झटका येण्याची शक्यता वाढत जाते. मात्र जर तुम्ही आहारात नियमित लसणाचा वापर करत असाल तर तुम्हाला ह्रदयविकार होण्याचा धोका कमी होतो. कारण लसूण खाण्याने बॅड कोलेस्ट्रॉल कमी होते आणि गुड कोलेस्ट्रॉल वाढत जाते. रक्तातील बॅड कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यासाठी दररोज कमीत कमी दोन ते चार लसूण पाकळ्या चावून खाव्या. लसणाचा वास उग्र असल्यामुळे तुम्हाला लसूण चावून खाण्यास शक्य नसेल कर लसणाच्या पाकळीची रस कोमट पाण्यासोबत घ्या.

रक्तदाब नियंत्रित राहतो

उच्च रक्तदाबामुळे ह्रदयविकार, स्ट्रोक, किडनीच्या समस्या निर्माण होऊ शकतात. यासाठी रक्तदाब नियंत्रित असणे गरजेचे आहे. उच्च रक्तदाब असलेल्या लोकांनी आहारात नियमित लसणाचा वापर केल्या तर त्यांना चांगला फायदा होऊ शकतो. कारण लसणातील पोषक घटकांमुळे तुमचा रक्तदाब नियंत्रित राहू शकतो.

मधुमेहींसाठी फायदेशीर

रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्यामुळे इन्सुलिनच्या निर्मितीमध्ये अडथळा येतो. जर मधुमेहींनी दररोज दोन ते चार लसणाच्या पाकळ्या चावून खाल्या अथवा लसूणाचा वापर केलेला आहार घेतला तर त्यांच्या रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहण्यास मदत होते.

रोग प्रतिकार शक्ती सुधारते

लसणामुळे शरीरातील रोग प्रतिकार शक्ती वाढते. यासाठी हवामानात बदल झाल्यामुळे सर्दी, खोकल्यासारखे आजार लसणाचा काढा अथवा कच्चा लसूण खाण्याने दूर राहू शकतात. पूर्वीच्या काळी लहान मुलांना सर्दी झाली तर त्यांच्या गळ्यात लसणाच्या पाकळ्यांची माळ घालण्यात येत असे. ज्यामुळे मुलांचे इनफेक्शनपासून रक्षण होत असे.

हिमोग्लोबिन वाढते

लसणामध्ये  भरपूर प्रमाणात लोह असते. ज्यामुळे तुमच्या रक्तातील हिमोग्लोबिन नियंत्रित राहते. रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी झाल्यास अशक्तपणा आणि रक्ताची कमतरता  जाणवते. जर तुम्हाला देखील हिमोग्लोबिन वाढवण्याची गरज असेल तर नियमित लसूण जरूर खा.

दातदुखीपासून सुटका

लसणामध्ये अॅंटी बॅक्टेरिअल गुणधर्म असतात. दात किडल्यामुळे जर दातातून वेदना जाणवत असतील तर लसणामुळे तुम्हाला नक्कीच आराम  मिळू शकतो. दुखणाऱ्या दातावर लसूणाची पाकळी ठेवा. कारण यामुळे तुमच्या दातातून जाणवणाऱ्या वेदना कमी होऊ शकतात.

वजन कमी होते

जर तुम्हाला तुमचे वजन नियंत्रणात ठेवायचे असेल तर लसूण तुमच्यासाठी वरदानच ठरू शकेल. कारण लसणामुळे तुमच्या शरीरातील फॅट कमी होण्यास मदत होते.

कोथिंबीरमध्ये असतात औषधीय गुण

जाणून घ्या पोट कमी करण्यासाठी अकुंरित धान्य (Sprouts) कसे आहेत फायदेशीर

सौंदर्य खुलविण्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठी नियमित खा ‘पपई’

फोटोसौजन्य –  इन्स्टाग्राम आणि शटरस्टॉक

Read More From मनोरंजन