Travel in India
महाराष्ट्रातील प्रसिद्ध ऐतिहासिक स्थळे (Historical Tourist Places In Maharashtra In Marathi)
महाराष्ट्र राज्याची ओळख इथला इतिहास, संस्कृती, भाषाशैली आहे. ज्यामुळे या राज्याला आजही समृद्ध ऐतिहासिक आणि सांस्कृतिक ठिकाणांचा वारसा लाभलेला आहे. महाराष्ट्रातील ऐतिहासिक स्थळे पाहून तुम्ही मराष्ट्राचा इतिहास जाणून घेऊ शकता. ही महाराष्ट्रातील ऐतिहासिक स्थळे तुम्हाला हा इतिहास आजही सांगू शकतात. या ठिकाणी असलेल्या ऐतिहासिक खुणा अनेक वर्षांपूर्वीच्या आठवणींचा नकळत मागोवा घेऊ लागतात. वास्तूशास्र आणि स्थापत्यशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी ही पर्यटन स्थळे नक्कीच परफेक्ट आहेत. यासाठीच आम्ही तुमच्यासोबत महाराष्ट्रातील काही महत्त्वाच्या ऐतिहासिक स्थळांची माहिती शेअर करत आहोत. ज्यामुळे येणाऱ्या पुढच्या पिढीला महाराष्ट्रातील ऐतिहासिक स्थळांची नावे नक्कीच माहीत होतील.
Table of Contents
- रायगड किल्ला (Raigad Fort, Raigad)
- शनिवार वाडा (Shaniwar Wada, Pune)
- विजयदुर्ग किल्ला (Vijaydurg Fort)
- सिंधुदुर्ग किल्ला (Sindhudurg Fort)
- गेट वे ऑफ इंडीया (Gateway Of India)
- प्रतापगड (Pratapgad Fort, Satara)
- छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय (Chhatrapati Shivaji Maheraj Museum)
- देवगिरी किल्ला (दौलताबाद) Devgiri, Daulatabad
- लाल महल (Lal Mahal, Pune)
- आगा खान पॅलेस (Agakhan Palace, Pune)
- अजिंठा अलोरा लेणी (Ajanta Ellora Caves, Aurangabad)
- बिबी का मकबरा (Bibi-Ka-Maqbara, Aurangabad)
- न्यू पॅलेस (New Palace, Kolhapur)
- अंबरनाथ शिवमंदिर (Ambernath Shivalaya)
- शिवनेरी किल्ला (Shivneri)
महाराष्ट्र राज्यात दरवर्षी देशविदेशातून लाखो पर्यटक येत असतात. या पर्यटकांना नेहमीच महाराष्ट्रातील ऐतिहासिक स्थळे भुरळ घालतात. कारण या स्थळांना भेट दिल्यामुळे त्यांना महाराष्ट्रात कधी काळी घडून गेलेला इतिहास पुन्हा नव्याने अनुभवता येऊ शकतो. जर तुम्हालाही ही ऐतिहासिक स्थळे पाहायची असतील तर खालील माहीती जरूर वाचा.
रायगड किल्ला (Raigad Fort, Raigad)
महाराष्ट्राच्या इतिहासात रायगड किल्ल्याला एक विशेष ओळख आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या स्वराज्याची राजधानी म्हणजे किल्ले रायगड. रायगड जिल्ह्यातील सह्याद्रीच्या पर्वत रांगांमध्ये 2700 उंचीवर हा गड आहे. अतिशय दुर्गम आणि अजिंक्य अशा या किल्याचे नाव पूर्वी रायरी असं होतं. स्वराज्याची राजधानी म्हणून जाहीर केल्यावर महाराजांनी या किल्ल्याची आणखी बक्कम बांधणी करून घेतली आणि त्याला रायगड असं नाव दिलं. शिवराज्याभिषेक आणि स्वराज्यातील अनेक मंगल प्रसंगांचा हा किल्ला साक्षीदार आहे. स्वराज्याचा हा इतिहास अनुभवण्यासाठी वर्षभरात अनेक पर्यटक या किल्ल्याला भेट देतात. गडावर खुबलढा बुरूज, नाना दरवाजा, मदारमोर्चा, महादरवाजा, चोरदिंडी, हत्ती तलाव, गंगासागर तलाव, स्तंभ, पालखी दरवाजा, मेणा दरवाजा, राजभवन, राजसभा, नगारखाना, बाजारपेठ, शिरकाई देवीचे मंदिर, जगदिश्वर मंदिर, महाराजांची समाधी, कुशावर्त तलाव, वाघदरवाजा, टकमक टोक, हिरकणी टोक अशी अनेक ऐतिहासिक स्थळं आहेत.
कसे जाल – पुण्यावरून तुम्ही खाजगी वाहनाने गडावर जाऊ शकता. गडावर जाण्यासाठी पायी अथवा रोपवे ने जाण्याची सोय आहे. शिवाय गडावर राहण्यासाठी आणि जेवणाची उत्तम सोय केली जाते.
वाचा – प्राचीन मंदिर जिथे भक्त येतात आणि पूजा करून निघून जातात
शनिवार वाडा (Shaniwar Wada, Pune)
शनिवार वाडा म्हणजे पुण्यातील प्राचीन आणि ऐतिहासिक वास्तू. शनिवार वाडा ही एक पेशवेकालीन वास्तू आहे. या ठिकाणी पेशव्यांचे निवासस्थान होते. पहिले बाजीराव पेशवा यांनी सन 1736 साली हा राजवाडा बांधला होता. त्या काळी या वाडा पुण्याच्या वैभवशाली संस्कृतीचे प्रतिक मानले जायचा. मात्र इंग्रजांनी या वाड्यावर कब्जा केला आणि हा वाडा जाळून टाकला. आता या वास्तूंमधील सर्व अवशेष नष्ट झाले आहेत. वाड्याचा पाया आणि तटबंदीचा भाग आजूनही कायम आहे. हा वाडा पाहताना हे महाराष्ट्रातील ऐतिहासिक स्थळे पाहण्याचा आनंद तुम्हाला नक्कीच मिळू शकतो.
कसे जाल – पुणे शहरात गेल्यावर कोणत्याही खाजगी अथवा सार्वजनिक वाहतुकीने तुम्ही शनिवार वाड्यावर जाऊ शकता.
जाणून घ्या ही नाशिक पर्यटन स्थळे
विजयदुर्ग किल्ला (Vijaydurg Fort)
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विजयदुर्ग हा एक महत्त्वाचा जलदुर्ग आहे. हा जलदुर्ग शिलाहार राजा भोजने बांधल्याचे तपशील आहेत. हा किल्ला अंजिक्य असल्याने याला पूर्वेकडील जिब्राल्टर असंही म्हटलं जात असे.एकुण सतरा एकर भागात हा किल्ला बांधण्यात आलेला आहे. या किल्ल्याला तीन तटबंदी असून त्या तिन्ही बाजूने पाण्याने घेरलेल्या आहेत. या किल्ल्यात दोन भुयारी मार्गदेखील आहेत. या किल्ल्यावरील इतिहास जाणून घेण्यासाठी पर्यटक या ठिकाणी सतत भेट देत असतात. या किल्ल्याला महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आलेले आहे.
कसे जाल – सिंधुदुर्ग जिल्हातील देवगडवरून या किल्यावर खाजगी वाहनाने जाता येते.
वाचा – केरळला जाणार असाल तर जाणून घ्या केरळ पर्यटन स्थळे
सिंधुदुर्ग किल्ला (Sindhudurg Fort)
सिंधुदुर्ग हा किल्ला शिवाजी महाराजांच्या आरमारी दलातील एक अभेद्य आणि अजिंक्य किल्ला होता. मालवणमधील कुरुटे बेटावर बेटावर बांधण्यात आलेल्या या किल्ल्यावर गोड्या पाण्याच्या विहीरी आहेत. चारी बाजूने समुद्र असूनही या बेटावरील या गोड्या पाण्याच्या विहीरी हा निसर्गाचा एक अद्भूत चमत्कारच आहे. किल्ला 48 एकरावर बांधण्यात आलेल्या असून त्यात आजही अनेक गोष्टी पर्यटकांना आकर्षित करतात. किल्ल्यावर शिवाजी महाराजांचे मंदिर, मारूतीचे मंदिर, जरीमरीचे मंदिर आहे, या किल्ल्यावर जाण्यासाठी किनाऱ्यावरून प्रवासी बोटींची सोय केली जाते. हे ऐतिहासिक स्थळ पाहण्यासाठी दररोज अनेक पर्यटकांची गर्दी होते. सिंधुदुर्ग किल्ल्याव्यतिरिक्त महाराष्ट्रात प्रसिद्ध हायकिंग स्पॉट आहेत.
कसे जाल – सिंधुदुर्ग जिल्हातील मालवणमधून या किल्लावर जाता येते. खाजगी वाहनाने या ठिकाणी जाता येते. किनाऱ्यावरून सवलतीच्या दरात या किल्ल्यावर बोटीने जाता येते.
वाचा – शिवाजी महाराजांची उत्तम घोषवाक्ये (Shivaji Maharaj Slogan In Marathi)
गेट वे ऑफ इंडीया (Gateway Of India)
गेट वे ऑफ इंडिया हे ब्रिटीशांच्या काळात बांधलेलं भारताचं प्रवेशद्वार आहे. बेसॉल्ट दगडाचे बांधकाम केलेली ही गेट वे ऑफ इंडियाची भिंत जवळजवळ 85 फूट उंच आहे. मुंबई दर्शन करण्यासाठी या ठिकाणी जरूर जा. मुंबईचा अथांग समुद्रकिनारा आणि गेट वे ऑफ इंडियाची ऐतिहासिक भिंत पाहण्यासाठी देशभरातून पर्यटक येतात.
कसे जाल – मुंबईच्या सीएसटी रेल्वे स्थानकावरून तुम्ही या ठिकाणी जाऊ शकता.
वाचा – महाराष्ट्रात फिरता येणारे अप्रतिम समुद्रकिनारे
प्रतापगड (Pratapgad Fort, Satara)
प्रतापगड हा महाराष्ट्राचा ऐतिहासिक वारसा जपणारा महत्त्वाचा किल्ला आहे. कारण या गडावर आजही अनेक ऐतिहासिक वस्तूंचे जतन करून ठेवण्यात आलेले आहे. छत्रपती शिवाजी महाराजाच्यांच्या नित्य पुजेतील स्फटिकाचे शिवलिंग, सरसेनापती हंबीरराव मोहित्यांची तलवार अशा अनेक गोष्टी तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. हा किल्ला कोयनेच्या घनदाट खोऱ्यात वसलेला असल्याने स्वराज्यात या किल्ल्याला एक विशेष महत्त्व होते.
कसे जाल – प्रतापगडला सातारा, महाबळेश्वर या ठिकाणांहून खाजगी वाहनाने जाता येते.
वाचा – रत्नागिरी जिल्हा पाहाण्यासारखी ठिकाणे
छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय (Chhatrapati Shivaji Maheraj Museum)
मुंबई शहरातील हे एक सर्वात महत्त्वाचं आणि प्राचीन वस्तू संग्रहालय आहे. हे म्युझियम छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानकावर आहे. हे संग्रहालय 20 व्या शतकातील असून आजही या संग्रहालयाची वास्तू भक्कम आहे. या वास्तूच्या आतील आणि आजूबाजूच्या परिसराचा आराखडा ब्रिटीश वास्तू विशारद जॉर्ज विटेट यांनी तयार केला होता. या वास्तूच्या रचनेत इस्लामी, राजपूत आणि हिंदू मंदिरांच्या वास्तू तंत्राचा वापर केलेला आहे. या संग्रहालयात अभ्सास करण्यासाठी आणि पाहण्यासाठी अनेक प्राचीन गोष्टीं आणि दुर्मिळ चित्रं, हस्तलिखीते जतन करून ठेवलेल्या आहेत. या संग्रहालयातील विविध दालने फिरण्यासाठी कमीत कमी दोन ते तीन तास लागतात.
कसे जाल – छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयात जाण्यासाठी तुम्ही मध्य रेल्वेच्या सीएसएसटी, पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट रेल्वेस्थानकावरून या ठिकाणी जावू शकता.
देवगिरी किल्ला (दौलताबाद) Devgiri, Daulatabad
महाराष्ट्रातील आणखी एक महत्त्वाचा आणि ऐतिहासिक वारसा जपणारा किल्ला म्हणजे देवगिरी किल्ला. औरंगाबादजवळ दौलताबादमध्ये असलेल् या किल्ल्याला सुरगिरी किल्ला असंही म्हटलं जात असे. या किल्लाचे काही अवशेष आणि तटबंदी आजही चांगल्या अवस्थेत आहे. बाराव्या शतकात यादववंशीय राजपूत्र भिल्लम याने हा किल्ला बांधला होता. देवगिरीच्या भौगोलिक परिस्थितीमुळे या किल्ल्याला मुगल दरबारी विशेष महत्त्व होतं. आजही या ठिकाणी ऐतिहासिक खुणा पाहता येतात. हा किल्ला पाहण्यासाठी या ऐतिहासिक स्थळाला अवश्य भेट द्या.
कसे जाल – औरंगाबादवरून या ठिकाणी तुम्ही खाजगी वाहनाने जाऊ शकता.
लाल महल (Lal Mahal, Pune)
पुणे शहराच्या मध्यभागी असलेला लाल महल पुण्यातील एक ऐतिहासिक वास्तू आहे. लाल महलमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे वास्तव्य होते. पुण्यात आल्यावर शिवाजी महाराजांचे बालपण याच वास्तूत गेले. याच वास्तूत त्यांनी स्वराज्याचे धडे गिरवले. त्यानंतर स्वराज्यावर कब्जा करणाऱ्या शाहिस्तेखानाची बोटेदेखील शिवाजी महाराजांनी याच महलात कापली होती. आता पुणे महानगरपालिकेने लाल महलची पुर्नबांधणी केली आहे. त्यामुळे आताची वास्तू एक पर्यटन स्थळ म्हणून नक्कीच पाहण्यासारखी आहे.
कसे जाल – लाल महलला तुम्ही पुणे शहरातून खाजगी अथवा सार्वजनिक वाहनाने जाऊ शकता.
आगा खान पॅलेस (Agakhan Palace, Pune)
गांधी मेमोरिअल सोसायटीचा हा आगा खान पॅलेस इटालियन बनावटीचा आहे. ब्रिटीश राजवटीमध्ये या पॅलेसचा उपयोग भारत छोडो आंदोलनात महात्मा गांधी, कस्तूरबा गांधी,महादेव भाई यांच्यासाठी तुरूंगासाठी करण्यात आला होता. असं म्हणतात की महादेव भाई आणि कस्तूरबा गांधी यांनी याच पॅलेसमध्ये अखेरचा श्वास घेतला होता. या पॅलेसमध्ये त्यांचे स्मारकदेखील आहे.
कसे जाल – पुण्याहुन खाजगी अथवा सार्वजनिक वाहतुकीने तुम्ही या ठिकाणी जाऊ शकता.
अजिंठा अलोरा लेणी (Ajanta Ellora Caves, Aurangabad)
औरंगाबाद शहरातील अंजिठा, वेरूळा ही प्राचीन बौद्ध लेणी फारच प्रसिद्ध आहेत. ऐतिहासिक खुणा जपणाऱ्या या लेण्यांना पाहण्यासाठी आणि त्यांचा अभ्यास करण्यासाठी देशभरातून पर्यटक या ठिकाणी येतात. या लेणी घनदाट जंगलात असून त्यांना भारतातील पहिल्या जागतिक वारसा स्थळाचा मान मिळालेला आहे. अजिंठा लेण्यांमध्ये गौतम बुद्धांच्या विविध भावमुद्रा आणि शिल्प कोरण्यात आलेली आहेत.
कसे जाल – औरंगाबाद शहरातून खाजगी अथवा सार्वजनिक वाहतुकीच्या मदतीने तुम्ही या ठिकाणी जाऊ शकता.
बिबी का मकबरा (Bibi-Ka-Maqbara, Aurangabad)
औरंगाबादचा इतिहास सांगणारे हे आणखी एक ऐतिहासिक स्थळ आहे. मोगल साम्राज्यात औरंगजेबचा मुलगा आजम शहा याने त्याच्या आईच्या स्मरणार्थ या वास्तूची निर्मिती केली होती. या ठिकाणी एका भव्य महालात औरंगजेबची पत्नी राबिया दुर्रानीची कबर आहे.या मकबऱ्यासाठी संगमरवरी ,लाल आणि काळ्या मिनारीचे दगड यांचा वापर केलेला आहे. बीबी का मकबरा या स्थळाला दख्खनचा ताजमहाल असंही म्हटलं जातं.
कसे जाल – औरंगाबाद शहरातून या ठिकाणी खाजगी अथवा सार्वजनिक वाहतुकीने जाता येतं.
न्यू पॅलेस (New Palace, Kolhapur)
कोल्हापूरात कसबा बावडा मार्गावर हे ऐतिहासिक स्थळ आहे. काळ्या आणि सपाट दगडावर ही इमारत बांधण्यात आलेली आहे. या इमारतीला लागून एक सुंदर बाग आहे. अष्टकोनी आकाराची ही इमारत पर्यटकांचे मन नक्कीच वेधून घेते. श्रीमंत शाहु महाराजांचे ते निवासस्थान असून या वास्तूत अनेक ऐतिहासिक गोष्टींचे जतन करून ठेवण्यात आलेले आहे.आजही या ठिकाणी राजघराण्याचे वास्तव्य आहे. सामाजिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा लाभलेल्या कोल्हापूरात या वास्तूप्रमाणेच अनेक ऐतिहासिक स्थळे आहेत. मात्र कोल्हापूरच्या ऐश्वर्याचं दर्शन घडवतो तो हा समृद्ध न्यू पॅलेस . या वास्तूच्या आजूबाजूला तलाव, राखीव जंगल आणि वन्यप्राणी आहेत.
कसे जाल – कोल्हापूरातून तुम्ही या ठिकाणी खाजगी अथवा सार्वजनिक वाहनाने प्रवास करू शकता.
अंबरनाथ शिवमंदिर (Ambernath Shivalaya)
अंबरनाथ शहर हे मुंबईतील एक उपनगर आहे. या शहराला अंबरनाथ हे नाव पडलं ते याच शिवमंदिरामुळे. या ठिकाणी जागृत शिवशंकराचे स्थान आहे. अंबरनाथचं मंदिर हेमाडपंथी शैलीचे असून आत स्वयंभू शिवलिंग आहे. या मंदिराशेजारी या ऐतिहासिक स्थळाची माहिती सांगणारे अनेक शिलालेख आणि शिल्पे आढळतात. काळाच्या ओघात आता या मंदिराची पडझड झाली असली तरी त्याची बांधणी आजही प्राचीन काळातील इतिहासाचे पुरावे सांगत आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी या ठिकाणी मोठी जत्रा भरते.
कसे जाल – अंबरनाथ रेल्वे स्थानकावरून खाजगी अथवा सार्वजनिक वाहतुकीने या ठिकाणी जाता येतं.
शिवनेरी किल्ला (Shivneri)
पुण्यातील जुन्नर गावात शिवनेरी किल्ला आहे. शिवनेरी किल्ल्यावर शिवाजी महाराजांचा जन्म झाला होता. शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असल्याने या किल्ल्याला एक अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. गडावर आजही शिवाजी महाराजांच्या जन्माच्या काही खुणा तुम्हाला दिसू शकतात. ज्यांना महाराष्ट्राचा इतिहास आणि शिवाजी महाराजांविषयी अधिक जाणून घ्यायचे असेल त्यांनी महाराष्ट्रातील या ऐतिहासिक स्थळाला अवश्य भेट द्यावी.
कसे जाल – खाजगी अथवा सार्वजनिक वाहनाने पुण्याहून जुन्नरमध्ये जाऊन तुम्ही या ठिकाणी जाऊ शकता.
तुम्हाला आम्ही सांगितलेली महाराष्टातील ऐतिहासिक स्थळे माहिती कशी वाटली हे आम्हाला जरूर कळवा.
फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम
अधिक वाचा –
कमी बजेटमध्ये परदेशी जायचं आहे, मग ही डेस्टिनेशन आहेत परफेक्ट