DIY लाईफ हॅक्स

मेनोपॉज ची लक्षणे, कारणे आणि घरगुती उपाय (Menopause Symptoms In Marathi)

Dipali Naphade  |  Jan 26, 2020
Menopause Symptoms In Marathi

महिलांना सर्वात जास्त त्रास होतो तो मासिक पाळींच्या दिवसांमध्ये. पण मासिक पाळी संपत असताना अर्थात रजोनिवृत्ती काळ चालू झाल्यावरही महिलांना अधिक त्रास होत असतो. खरं तर प्रत्येक महिलेसाठी हा काळ वेगळा असतो. काही महिलांना चाळीशी सुरू झाल्यावर रजोनिवृत्ती काळ सुरू होतो तर काही जणींना पन्नाशीच्या टप्प्यात होतो. प्रकृतीनुसार महिलांना या रजोनिवृत्तीमधून जावं लागतं. पण बऱ्याच जणींना मेनोपॉज म्हणजे काय, रजोनिवृत्तीची किंवा मेनोपॉज ची लक्षणे (Menopause Symptoms In Marathi) कोणती, रजोनिवृत्ती काळ कसा असतो अथवा त्यावर घरगुती उपचार नक्की काय करायचे याची कल्पनाही नसते. हे नैसर्गिक आहे असं म्हणून काही महिला याकडे दुर्लक्ष करतात. पण असं केल्याने त्याचा अधिक त्रास शरीराला सोसावा लागतो. त्यामुळे यासंबंधित सर्व माहिती या लेखातून आम्ही देण्याचा प्रयत्न करत आहोत. पण त्याआधी प्रत्येक महिलेला मेनोपॉज म्हणजे काय याची माहिती असायला हवी. त्याशिवाय याची कारणे नक्की काय आहेत हेदेखील माहीत असायला हवं. आपण आधी पाहूया नक्की काय आहे मेनोपॉज. 

मेनोपॉज म्हणजे काय? (What Is Menopause In Marathi)

रजोनिवृत्ती काळ आला की वाढता चिडचिडेपणा हा आपल्या आजूबाजूचे लोक समजून घेतीलच असं नाहीये. त्यामुळे अशावेळी तुमचं वय झालं आहे, अथवा तू सतत चिडचिडच करत असतेस असे बरेच टोमणे प्रत्येक स्त्री ला या काळामध्ये ऐकायला येत असतात. पण मेनोपॉज म्हणजे काय हे प्रत्येकाने समजून घ्यायला हवे. खरं तर या विषयावर जास्त चर्चा होत नाही आणि म्हणून अनेक जणांना हा एक आजार वाटतो. पण आजार नाही. मेनोपॉज या शब्दाचा नेमका अर्थ काय तर महिलांची शेवटची मासिक पाळी. हा एक ग्रीक शब्द असून मेन म्हणजे मन्थ आणि पॉसिस म्हणजे सिझेशन असा त्याचा अर्थ होतो. कोणती मासिक पाळी ही शेवटची असेल हे कोणालाच सांगता येत नाही. त्यामुळे शेवटच्या मासिक पाळीनंतर जेव्हा एक वर्ष उलटून जातं तेव्हा ‘मेनोपॉज आला’ असं मानलं जातं. रजोनिवृत्ती ही अतिशय नैसर्गिक गोष्ट आहे त्यामुळे हे समजून घेणं जास्त गरजेचं आहे. पण त्याआधी जाणून घेऊया रजोनिवृत्तीची कारणे काय आहेत. 

रजोनिवृत्तीची कारणे (Reasons Of Menopause)

रजोनिवृत्तीसाठी अनेक कारणे जबाबदार असतात. आजकाल तर प्री – मॅच्युअर रजोनिवृत्तीची समस्यादेखील उद्भवली आहे. आजकालच्या लाईफस्टाईलमुळे या समस्येला सामोरं जावं लागतं. नेहमी धुम्रपान करणे, कोणत्याही स्वरूपाच्या तंबाखूचे नियमित सेवन, कोणत्याही कारणामुळे जर ओव्हरीजची शस्त्रक्रिया करावी लागली तर, कुटुंबनियोजनच्या शस्त्रक्रियेदरम्यान होणारा त्रास या सगळ्या गोष्टी कारणीभूत ठरतात. काही जणींना तर वयाच्या 55 व्या वर्षीही रजोनिवृत्ती काळ येतो. याला विलंबित रजोनिवृत्ती असं म्हटलं जातं. खरं तर याची कारणं ही शरीराच्या त्रासानुसार निगडीत असतात. प्रत्येकाच्या शरीरानुसार त्याची कारणं आणि त्रास बदलत असतात. साधारण 45 वर्षाच्या नंतर रजोनिवृत्ती येणं हे नैसर्गिक मानलं जातं. तर त्याआधी येणारी रजोनिवृत्ती ही अनैसर्गिक मानली जाते. त्यासाठी वरील कारणं जबाबदार असतात. पण कधीतरी शारीरिक त्रास अधिक सोसल्यानेही ही रजोनिवृत्ती वयाच्या आधी येऊ शकते. 

रजोनिवृत्तीची किंवा मेनोपॉज ची लक्षणे (Menopause Symptopms In Marathi)

रजोनिवृत्तीची अनेक लक्षणे आहेत. पण बऱ्याचदा ती लक्षणे आपल्या लक्षात येत नाही. शिवाय आपली चिडचिड या काळात इतकी वाढलेली असते की इतर कोणत्याही गोष्टीकडे लक्ष जात नाही किंवा याबाबत विचारही मनात येत नाही. इथे नक्की रजोनिवृत्तीची लक्षणे काय असतात याबाबत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 

निराशा

रजोनिवृत्ती काळ सुरू होतो तेव्हा सर्वात जास्त परिणाम होतो तो आपल्या मनावर. कोणत्याही गोष्टीमध्ये निराशा येऊ लागते. त्याची नक्की कारणे काय आहेत याचाही विचार आपल्याला करता येत नाही. त्याशिवाय मन सतत उदास राहते आणि तणावग्रस्त असल्यासारखे वाटू लागते. 

अति घाम येणे

रजोनिवृत्ती काळ जवळ आला की, काही महिने आधीपासून महिलांना रात्री झोपेत अचानक घाम येतो आणि जीव घाबरा होतो. शिवाय इतका घाम येतो की, त्यामुळे घातलेले कपडे, टॉवेल हे पूर्ण घामाने भिजतात. या अनुभवामुळे घाबरून जायला होतं. तसंच रात्री झोपेत अचानक जाग आल्यामुळे झोपही पूर्ण होत नाही. या सगळ्यामुळे स्वभावातील चिडचिड वाढू लागते आणि तणावही वाढतो. असं जाणवू लागल्यास, त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे. 

तणाव आणि अस्वस्थता

या काळात सतत तणावग्रस्त आणि अस्वस्थता जाणवत राहाते. भावनिक अस्थैर्य हे सर्वात महत्त्वाचे लक्षण आहे. बऱ्याच वेळा महिलांना आपल्याला नक्की काय वाटतं आहे किंवा काय जाणवतं आहे हेच कळत नाही. त्याचं चित्त अजिबात स्थिर नसते. एका क्षणात आनंदी तर दुसऱ्या क्षणी चिडचिड असे भावनिक बदल तिच्या आयुष्यात घडत असतात. तिच्या अशा वागण्यामुळे तिला सांभाळणंही इतरांना कठीण होतं. पण त्यावेळी आपल्याबरोबर कोणीच नाही अशी भावना महिलांच्या मनात निर्माण होऊन ती अधिक तणावात जातात

हार्मोन बदल

या काळात हार्मोनमध्ये अनेक बदल होत असतात. त्यामुळेही चिडचिड वाढू लागते. अशावेळी भरपूर अशक्तपणाही जाणवू लागतो. खूप थकवा जाणवतो. बऱ्याच वेळा हा थकवा इतका तीव्र असतो की नियमित काम करणंही महिलांना शक्य होत नाही. पूर्णतः गळून गेल्यासारखं वाटतं. पण तिची ही अवस्था कोणालाही कळत नसते. सततच्या या त्रासामुळे बऱ्याच महिलांची चिडचिड वाढते आणि हार्मोनल बदलामुळे कोणतंही काम करू नये असं वाटू लागतं. 

कमी झोप

रजोनिवृत्ती काळ असताना बऱ्याच महिलांना रात्री नीट झोप येत नाही. इतर अनेक लक्षणांमुळे झोप बिघडते. तसंच या काळात शरीरावर होत असलेल्या परिणामांमुळे झोप बिघडत असते. सतत या कुशीवरून त्या कुशीवर बऱ्याच महिला वळत राहातात. रात्री झोप येत नाही त्यामुळे दिवसभर अस्वस्थ वाटत राहाते. त्याशिवाय त्यांचा या काळात रक्तदाबही या गोष्टीमुळे वाढू लागतो. झोप पूर्ण न झाल्यामुळे इतर आजारही जडले जातात. नेहमीच्या कामातही या कारणामुळे चुका होऊन चिडचिड वाढू लागते. हार्मोन्स बदलामुळे झोपेवर जास्त परिणाम होतो. त्यामुळे या काळात झोपेचे नियोजन करणे महत्त्वाचे असते. 

पोट फुगणे

हेदेखील या काळात महत्त्वाचे लक्षण महिलांना दिसून येते. या दरम्यान पोट फुगल्यासारखे सतत वाटत राहाते आणि त्यामुळे अस्वस्थपणा येतो. पोटात सतत दुखत राहाते. गॅस अथवा अॅसिडिटीसारखे आजार उद्भवतात. पोट फुगणे हा एक आजार झाल्यासारखं महिलांना वाटत राहातं. त्यासाठी स्वतःच्या मनाने अथवा दुसऱ्याने सांगितलेले घरगुती उपचार महिला करतात. पण हे खरं तर रजोनिवृत्तीचे लक्षण असल्याचं त्याच्या लक्षात येत नाही. 

डोकेदुखी

या काळात झोप अपूर्ण राहिल्याने आणि इतर शारीरिक त्रास झाल्याने सतत डोकेदुखी होत राहाते. ही अगदी कॉमन समस्या या काळामध्ये महिलांना दिसून येते. त्याशिवाय डोक्याभोवतीचे स्नायू अगदी आवळले गेले आहेत असंही बऱ्याच महिलांना वाटतं. डोकेदुखी वा मायग्रेन पाळी यायच्या आधी पूर्वीपासून होत असली तरीही रजोनिवृत्ती काळात हे डोकेदुखी तुम्हाला जास्त प्रमाणात जाणवते. तसंच दुसरी महत्त्वाची समस्या म्हणजे सांधेदुखी. मान, खांदा, पाठी आणि इतर स्नायूंमध्येही त्रास होतो. 

छातीत दुखणे

छातीत दुखणे हेदेखील एक महत्त्वाचे लक्षण या काळात आपल्याला दिसून येते. पोटात सतत गॅस निर्माण होऊन छातीत दुखण्याचा त्रास या काळात जास्त जाणवतो. छातीत अशा वेळी महिलांना सतत कळा येत राहातात.

मेनोपॉज वर उपाय (Home Remedies For Menopause In Marathi)

 

जेव्हा कोणत्याही गोष्टीची उपचार करण्याची वेळ येते तेव्हा सर्वप्रथम आपण घरगुती काही उपचार आहेत का याचा विचार करत असतो. रजोनिवृत्तीदरम्यान घरच्या घरी काय उपचार करता येतात त्याची माहिती जाणून घेऊया –

सोय (Soy)

 

काही अभ्यासातून मेनोपॉजची लक्षणे जाणवू लागल्यानंतर सोय हे उपयुक्त आहे असं सिद्ध झाले आहे. तर काही अभ्यासातून याचा काही फायदा नाही असं म्हटलं जातं. पण टोफू, दूध अशा स्वरूपाचे सोय हे मेनोपॉज अर्थात रजोनिवृत्तीसाठी उपायकारक ठरतात. परंतु कोणत्याही प्रकारची गोळी अथवा पावडर स्वरूपात याचं सेवन करणं योग्य नाही असं सांगण्यात येतं. 

ब्लॅक कोहोष (Black Cohosh)

 

ब्लॅक कोहोषच्या वापरामुळे रजोनिवृत्ती काळात व्यवस्थित झोप लागण्यास मदत होते. साधारण 20 ते 40 एमजी इतक्या प्रमाणात याचा वापर करण्यात येऊ शकतो. तुम्हाला रजोनिवृत्तीची लक्षणे दिसायला लागल्यानंतर तुम्ही घरच्या घरी याचा वापर करू शकता. पण त्याचा वापर करण्यापूर्वी तुम्ही डॉक्टरांचा सल्लाही घेणं आवश्यक आहे. 

आळशी (Flax)

 

प्रत्येकाच्या स्वयंपाकघरात आळशी हा पदार्थ असतोच. याचा रजोनिवृत्तीची लक्षणे दिसू लागल्यानंतर चांगला उपयोग करून घेता येतो. यावेळी पोट फुगण्यासारखी लक्षणे दिसू लागतात. अशावेळी आळशीचे दाणे भाजून खाल्ले अथवा नुसती आळशी खाल्ली तरीही पोटदुखी आणि पोट फुगणे कमी होते आणि तुम्हाला आराम मिळतो. तुम्हाला हा त्रास सतत होत असेल तर तुम्ही दिवसातून दोन वेळा अर्धा अर्धा चमचा आळशी खावी. हवं तर आळशी तुम्ही भाजून ठेवल्यास, तुम्हाला त्याचा अधिक फायदा मिळतो

रताळं (Wild Yam)

 

रताळं हे अशावेळी उपयोगी ठरतं. रजोनिवृत्तीच्या काळात बऱ्याचदा पायातून अथवा कमरेतून गोळा येत असतो. त्यावेळी रताळं खाल्ल्याने हे गोळे थांबण्यास मदत मिळते. रताळ्यामुळे शरीरातील एस्ट्रोजनची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत मिळते. रताळं हे बाजारात कुठेही उपलब्ध होते. त्यामुळे आपण आपल्या जेवणामध्ये याचा समावेश करून घेतल्यास, रजोनिवृत्तीची लक्षणे कमी होण्यास मदत होते. 

लेमन बाम (Lemon Balm)

 

मेनोपॉजच्या काळात लेमन बामचा चांगला उपयोग होतो. या काळात सर्वात जास्त त्रास होतो तो झोपेचा. मग हा त्रास जर महिलांना कमी करायचा असेल आणि या काळात व्यवस्थित झोप घ्यायची असेल तर त्यावेळी लेमन बामचा उपयोग करता येतो. या बाममुळे व्यवस्थित झोप लागायला मदत मिळते. त्याशिवाय याचा काही दुष्परिणामही शरीरावर होत नाही. त्यामुळे या काळात महिलांना या लेमन बामचा उपयोग घरगुती उपायामध्ये करायला काहीच हरकत नाही. 

ओट्स (Oats)

 

रजोनिवृत्तीचा त्रास होत असेल तर ओट्स हादेखील चांगला पर्याय आहे. ओट्समुळे वजन नियंत्रणात राहणयास मदत मिळते. त्यामुळे रजोनिवृत्तीच्या काळात चिडचिडही कमी होते. ओट्समुळे सतत भूक लागत नाही आणि वजन नियंत्रणात राहाते. 

वाचा – मासिक पाळीच्या स्वच्छतेचे महत्त्व माहीत आहे का तुम्हाला

धुम्रपान वर्ज्य (Don’t Smoke)

 

सर्वात महत्त्वाचं म्हणजे या काळात धुम्रपान वर्ज्य करायला हवं. तुम्हाला जर धुम्रपानाची सवय असेल तर ती वेळीच कमी करा म्हणजे तुम्हाला त्रास होणार नाही. या सवयीमुळे मेनोपॉजच्या काळात अधिक त्रास सहन करावा लागतो. त्यापेक्षी ही सवय सोडलेली अधिक चांगली. 

नियमित व्यायाम (Regular Exercise)

 

या काळात महिलांचं वजन हार्मोन्स बदलामुळे खूपच वाढतं. पण वजन कमी करणं शक्य नाही होत. त्यामुळे अशावेळी तुम्ही नियमित व्यायाम करून वजन नियंत्रणात ठेवणं गरजेचं आहे. त्यामुळे हा घरगुती उपाय यावर नक्कीच उपायकारक आहे. त्याशिवाय या काळात बऱ्याच प्रमाणात उत्साह आणि ऊर्जाही कमी होते. ती टिकवण्यासाठीही तुम्ही नियमित व्यायाम करणं आवश्यक आहे. 

कॅल्शियम जास्त घेणे (Calcium Intake)

 

रजोनिवृत्तीच्या काळात महिलांच्या शरीरातील कॅल्शियम कमी होत असते. त्यासाठी जेवणातून अथवा इतरही पदार्थांतून कॅल्शियम शरीरात घेणं गरजेचं असतं. हा उत्तम घरगुती उपाय आहे. तुम्ही जितकं कॅल्शियम जास्त शरीरात घेणार तितका त्याचा अधिक फायदा रजोनिवृत्तीची लक्षणे कमी होण्यात तुम्हाला फायदा मिळतो. 

व्हिटामिन वाढवणे (Vitamin Intake)

 

व्हिटामिन आणि कॅल्शियम या दोन्ही गोष्टी शरीरामध्ये या काळात वाढवण्याची गरज आहे. त्यामुळे रोजच्या जेवणामध्ये आपल्या शरीराला आवश्यक असणारे व्हिटामिन्स वाढवणारे पदार्थ वाढवण्याची गरज आहे. तुम्ही जितके व्हिटामिन्स अधिक पदार्थांमध्ये समाविष्ट करून घ्याल तितका तुम्हाला त्याचा फायदा होईल. तुमच्या शरीरातील ऊर्जा वाढेल आणि चिडचिड कमी होईल. तसंच तुम्ही उत्साही राहाल. 

वाचा – मासिक पाळीमुळे पोटात दुखतंय, मग करा हे सोपे उपाय

अधिक विश्रांंती (More Rest)

 

या काळात सतत त्रास होत असतो. त्यामुळे तुम्हाला अधिक विश्रांती घेण्याची गरज आहे. तुम्ही जितकी जास्त विश्रांती घ्याल तितका तुम्हाला जास्त आराम मिळेल. कारण या काळात डोकेदुखी, सांधेदुखी यासारख्या समस्यांनाही सामोरं जावं लागतं. अधिक विश्रांती घेतल्याने तुम्हाला यातून आराम मिळू शकतो आणि चिडचिडही कमी होते. 

अॅक्युपंक्चर (Acupuncture)

 

हा अतिशय नैसर्गिक उपाय आहे. ज्याने तुम्हाला लगेच आराम मिळतो. तसाच यामुळे तुमचा तणाव, निराशा या गोष्टींंना बगल देण्यासही मदत होते. अॅक्युपंक्चरने तुमचं शरीर हलकं होतं. त्यामुळे रजोनिवृत्तीच्या लक्षणांवरील हा अतिशय सोपा आणि परिणामकारक उपाय समजण्यात येतो. याचा तुम्हाला कोणताही दुष्परिणाम शरीरावर होत नाही हे महत्त्वाचे आहे. तसंच यामुळे तुम्हाला चांगली झोप मिळून तुम्ही दिवसभर ताजेतवाने राहता आणि योग्य विचार करण्याची क्षमता रजोनिवृत्तीच्या काळातही राहाते. चिडचिड होण्यापासून दूर राहाता

 

 

रजोनिवृत्ती दरम्यान होणारी गुंतागुंत (Complications)

 

रजोनिवृत्तीच्या काळात काही महिलांच्या शरीरात गुंतागुंतही निर्माण होत असते. नक्की कोणत्या प्रकारची ही गुंतागुंंत असते जाणून घेऊया – 

कार्डिओव्हॅस्क्युलर – जेव्हा महिलांच्या शरीरातील एस्ट्रोजनची पातळी कमी होऊ लागते तेव्हा कार्डिओव्हॅस्क्युलर रोगाचं प्रमाण वाढू लागतं. यामुळे हृदयावर दाब येऊन हार्ट अटॅकचं प्रमाणही वाढतं. त्यामुळे अशावेळी योग्य व्यायाम आणि डाएट करणं गरजेचं असतं. त्याशिवाय अशावेळी वजन वाढण्याचं प्रमाणही वाढत असतं पण ते नियंंत्रणात ठेवण्याची काळजी घ्यावी लागते. 

ऑस्टेपोरोसिस – सांधेदुखीचं प्रमाण या काळात वाढतं. तसंच रजोनिवृत्ती काळात पहिल्या काही महिन्यात हे प्रमाण वाढल्याने ऑस्टेपोरोसिसची गुंतागुंत वाढते. ज्यामुळे सांध्यात आणि हाडांमध्ये  त्रास निर्माण होऊन फ्रॅक्चर होण्याचीही शक्यता असते.

युरिनची गुंतागुंत – या काळात तुमच्या व्हजायना आणि युरेथ्रामध्ये त्रास निर्माण होऊन तुम्हाला सतत लघ्वीचा त्रासही निर्माण होतो. यामुळे तुम्हाला अधिक तणाव आणि कफ यासारखे आजारही होतात. तसंच यामुळे तुम्हाला व्हजायनाजवळ इन्फेक्शनचा त्रासही निर्माण होऊ शकतो. याची गुंतागुंत वाढल्याने तुम्हाला या काळात अधिक त्रास होण्याचीही शक्यता असते. 

सेक्शुअल फंक्शन – यावेळी योनीशुष्कता निर्माण होते आणि त्यामुळे अधिक जळजळ होण्याची गुंतागुंत वाढते. पण त्यासाठी हल्ली ओलावा निर्माण करण्यासाठी मॉईस्चराईजर अथवा ल्युब्रिकेंट्स क्रिम बाजारात उपलब्ध आहेत. याचा वापर करून ही गुंतागुंत तुम्हाला सोडवता येते. पण प्रत्येक महिलेच्या बाबतीत हा उपचार लागू पडेलच असं नाही. 

वजनवाढ – रजोनिवृत्ती काळ असताना बऱ्याच महिलांना वजनवाढ या समस्येला सामोरं जावं लागते. हार्मोन्स बदल होत असल्याने ही समस्या अधिक वाढते. त्यामुळे या काळात वजनावर नियंत्रण ठेवण्यासाठी आपल्या खाण्यावर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. पण त्यासाठी तुम्हाला हा काळ जाणून घेण्याचीही गरज भासते.

 

 

रजोनिवृत्तीवरील उपचार (Menopause Treatment In Marathi)

रजोनिवृत्तीची किंवा मेनोपॉज ची लक्षणे (menopause chi lakshane in marathi) खूपच तीव्र असतील तर एचआरटी थेरपी (Hormone replacement therapy) या उपचाराचा वापर करण्यात येतो. याबद्दल फारच कमी लोकांना माहिती आहे. या उपचारात प्रयोगशाळेत तयार करण्यात आलेल्या गोळ्या, इंजेक्शन याचा वापर केला जातो. मात्र याचे अधिक दुष्परिणाम असल्यामुळे कमीत कमी डोस आणि कोर्स डॉक्टरांकडून देण्यात येतो. पण या उपचारादरम्यान रक्ताची गुठळी होणे, वजनामध्ये वाढ, काही प्रकारचे कर्करोग होण्याची शक्यताही सांगण्यात येते. तसंच या उपचारादरम्यान हृदय आणि आपल्या शरीरातील धमन्यांवरही परिणाम होण्याची शक्यता असते. तसंच ज्या महिलांचे गर्भाशय काढून टाकण्यात येते त्यांना इस्ट्रोजेनयुक्त औषधं या उपचारादरम्यान दिली जातात. पण या सगळ्या दरम्यान कोलेस्ट्रॉल वाढणे अथवा चेहऱ्यावर केस येणे यासारख्या गोष्टी उपचारादरम्यान उद्भवतात.

वाचा – मासिक पाळी लवकर येण्यासाठी सोपे उपाय

प्रश्नोत्तरे (FAQ’s)

1. रजोनिवृत्तीदरम्यान नेमके काय घडते?

रजोनिवृत्ती म्हणजे मासिक पाळी बंद होण्याचा काळ. चाळीशीपासून ते पन्नाशीच्या कालावधीत कधीही हा काळ येऊ शकतो. शेवटची मासिक पाळी म्हणजे रजोनिवृत्ती होय. ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. पण याचा शरीराबरोबरच मनावरही परिणाम  होत असतो. 

2. रजोनिवृत्ती झाली आहे हे कसे समजावे?

तुम्हाला मासिक पाळी साधारण वर्षभर आलीच नाही तर समजावे की हा रजोनिवृत्तीचा काळ आहे. पण याची लक्षणे साधारणतः दोन ते चार वर्ष दिसत राहातात हेदेखील तुम्हाला समजून घेणे आवश्यक आहे. अगदी रजोनिवृत्ती होण्याआधीपासून ते झाल्यावरही ही लक्षणे तशीच राहातात. 

3. रजोनिवृत्तीचा नेमका कालावधी काय आहे?

कोणत्याही महिलेच्या चाळीस वयापासून ते साधारण पन्नास वयापर्यंतचा कालावधी हा रजोनिवृत्तीचा कालावधी असू शकतो. पण काही महिलांंच्या बाबतीत हा कालवधी 55 वर्षांपर्यंतही असू शकतो. त्याला विलंबित रजोनिवृत्ती असंही म्हणतात.

Read More From DIY लाईफ हॅक्स