DIY सौंदर्य
अंडरआय बॅग किंवा डोळ्याखालील सूज कमी करण्याचे घरगुती उपाय| How To Reduce Under Eye Bags In Marathi
आपल्या डोळ्यांनी केवळ हे सुंदर जगच पाहता येतं असं नाही, तर आपल्या चेहऱ्याची सौंदर्यता वाढवण्याचं कामही आपले डोळे करत असतात. त्यामुळे डोळ्यांची निगा राखणं अतिशय गरजेचं आहे. मात्र, रोजचा थकवा आणि ताणामुळे बऱ्याचदा डोळ्याची पापणी फडफडते, आपल्या डोळ्यांखाली सूज येते ज्याला अंडरआय बॅग म्हटलं जातं. थकवा आणि चिंतेशिवाय असं घडण्यासाठी अनेक कारणं असतात, जसं अंगामध्ये कमी पोषण, मानसिक ताण, अनुवंशिकता, पाण्याची कमतरता, वाढतं वय, अॅलर्जी, धुम्रपान आणि झोप पूर्ण न होणं. कारण काहीही असो, मात्र चेहऱ्यावर अंडरआय बॅग अजिबात चांगले वाटत नाहीत. त्यासाठी आम्ही तुम्हाला अंडरआय बॅगपासून वाचण्यासाठी किंवा हे काढून टाकण्यासाठी काही उपाय सांगणार आहोत. डोळे सुंदर दिसण्यासाठी काय करावे, डोळे सुंदर दिसण्यासाठी काय खावे, डोळे सुंदर आणि निरोगी ठेवण्यासाठी व्यायाम आणि योग करावेत, डोळ्यांची काळजी कशी घ्यावी याची संपूर्ण माहिती आम्ही तुम्हाला या लेखाद्वारे देत आहोत.
Table of Contents
- डोळ्याखालील सूज / अंडरआय बॅग होण्याची कारणे | Causes Of Eye Bags In Marathi
- अंडरआय बॅग किंवा डोळ्याखालील सूज कमी करण्याचे घरगुती उपाय | Home Remedies To Get Rid Of Under Eye Bags In Marathi
- डोळे सुंदर आणि निरोगी ठेवण्यासाठी आहार | Diet To Keep Eyes Beautiful And Healthy In Marathi
- डोळे सुंदर आणि निरोगी ठेवण्यासाठी व्यायाम आणि योग
- अंडरआय बॅग न होण्यासाठी घ्यायची काळजी | Prevention Tips For Eye Bags In Marathi
- प्रश्नोत्तरे – अंडरआय बॅग्ज्सवर किंवा डोळ्याखालील सूज कमी करण्याचे घरगुती उपाय
डोळ्याखालील सूज / अंडरआय बॅग होण्याची कारणे | Causes Of Eye Bags In Marathi
डोळ्यांच्या खाली सूज वेगवेगळ्या कारणामुळे येते, डोळ्याखाली सूज येण्याची कारणे नक्की काय आहेत ते आपण जाणून घेऊया –
मिठाचे अधिक सेवनः आहारामध्ये अधिक मीठ हे शरीरासाठी योग्य समजण्यात येत नाही. वास्तविक मिठातील सोडियम शरीरातील पाणी टिकवून ठेवतं आणि शरीरात अधिक पाणी साठून राहिल्यावर चेहऱ्याला सूज येते. डोळ्यांची आसपासची त्वचा ही अत्यंत पातळ असते, त्यामुळे इथे जास्त सूज येते
अधिक रडण्यामुळेः अधिक रडल्यामुळे डोळ्यांच्या आजूबाजूला तरल पदार्थ जमा होतात आणि त्यामुळे सूज येण्याची समस्या निर्माण होते. अर्थात रडल्यानंतर त्वरीत अंडरआय बॅग दिसून येतात. काही वेळातच हे कमी होते. मात्र हे त्याचे कारण ठरते
अपूर्ण झोपः एका अभ्यासात सांगण्यात आल्याप्रमाणे अपूर्ण झोप होत असेल तर अंडरआय बॅग समस्या निर्माण होते. डोळ्यांची खाली सूज येऊ लागते. तसंच सतत पापण्या जड होणे, डोळे लाल होणे आणि डोळ्यांच्या खाली काळी वर्तुळं जमा होणे अशा समस्यांही यामुळे होतात.
अलर्जीः अलर्जीदेखील डोळ्याखाली सूज येण्याचे कारण ठरू शकते. अलर्जीमुळे सायनस आणि डोळ्याजवळील त्वचेजवळ तरल पदार्थ जमा होतात. यामुळे सूज येते. तसंच डोळे लाल होणे, डोळ्यात खाज येणे आणि सतत डोळ्यातून पाणी या समस्यादेखील उद्भवतात. डोळ्यांमध्ये जाणारी धूळ, धूर, प्रदूषण, कोंडा, प्राण्यांचे केस या कोणत्याही गोष्टींपासून अलर्जी असू शकते.
अश्रू नलिकेची समस्याः अश्रू नलिकेचे मुख्य काम डोळ्यातून पाणी आणणे आहे. पण जर तसं होत नसेल तर मात्र डोळ्यांच्या खाली सूज येऊ लागते. डोळ्यातून अश्रू व्यवस्थित येत नसतील तर अंडरआय बॅगची समस्या होते.
अंडरआय बॅग किंवा डोळ्याखालील सूज कमी करण्याचे घरगुती उपाय | Home Remedies To Get Rid Of Under Eye Bags In Marathi
अंडरआय बॅगसाठी तुम्ही घरगुती काय उपाय करू शकता यासाठी आम्ही काही सोप्या टिप्स आणल्या आहेत. तुम्ही याचा वापर करून सूज कमी करू शकता. याचा वापर कसा करायचा ते जाणून घ्या.
टी बॅग आहे डोळ्याखाली करण्यासाठी प्रभावी
साहित्यः
2 टी बॅग्ज
वापरण्याची पद्धतः
- सर्वात पहिल्यंदा टी बॅग्ज 10 मिनिट्स फ्रिजमध्ये ठेवा,
- त्यानंतर टी बॅग थंड झाल्यावर फ्रिजमधून काढा आणि डोळे बंद करून त्यावर ठेवा,
- साधारण 10 – 15 मिनिट्स तसंच राहू द्या,
- डोळ्यांच्या खालील सूज काढण्यासाठी तुम्ही हा उपाय दिवसातून 2-3 वेळा करू शकता.
कसे आहे फायदेशीरः
डोळ्यांच्या खालची सूज कमी करण्यासाठी टिप्स वापरताना टी बॅगचा उपयोग करण्याचा सल्ला देण्यात येतो. वास्तविक टी बॅग लावल्यामुळे डोळ्यांची सूज पटकन कमी होते. या टी बॅगमध्ये असणारे कॅफीन, अँटिइन्फ्लेमेटरी डोळ्यावरील सूज कमी करण्यासाठी फायदेशीर ठरते. यातील थंडाव्यामुळे पटकन सूज उतरण्यास मदत मिळते.
इसेन्शियल ऑईल अंडरआय बॅग / डोळ्याखालील सूज कमी कमी करू शकतात
साहित्यः
- 1 थेंब लव्हेंडर तेल
- 1 थेंब लिंबाचे तेल (लेमन एसेन्शियल ऑईल)
- 1 थेंब कॅमोमाईल तेल
- 1 चमचा पाणी
- एक लहान वाटी
वापरण्याची पद्धतः
- एका वाटीत सर्वात पहिले सर्व तेल मिक्स करून घ्या
- त्यानंतर त्यात पाणी घालून व्यवस्थित मिक्स करा
- रात्री झोपण्यापूर्वी हे मिश्रण डोळ्यांच्या खाली लावा
- त्यानंतर हाताच्या बोटांनी हलकासा मसाज करा आणि रात्रभर असंच ठेवा
- याचा चांगला परिणाम होण्यासाठी नियमित स्वरूपात रात्री झोपण्यापूर्वी याचा वापर करा
कसे आहे फायदेशीरः
अंडरआय बॅग म्हणजेच डोळ्यांच्या खाली येणारी सूज घालविण्यासाठी तुम्ही इसेन्शियल ऑईलचा वापर करू शकता. खरं तर लिंबाच्या तेलामध्ये अँटिइन्फ्लेमेटरी गुण असतात, जे सूज कमी करण्यासाठी उपयुक्त ठरतात. याशिवाय कॅमोमाईल तेलामध्येदेखील अँटिइन्फ्लेमेटरी प्रभाव अधिक दिसून येतो. हे गुण डोळ्याच्या खाली आलेली सूज कमी करण्यासाठी उपयुक्त ठरतात. हेच जर तुम्हाला लवेंडर तेलाबाबत सांगायचे झाले तर लवेंडर तेल त्वचेसह नसांनादेखील आरामदायी ठरते. त्यामुळे एसेन्शियल तेलांचे मिश्रण डोळ्यांची सूज कमी करण्यासाठी एकंदरीतच फायदेशीर ठरते.
नारळाचे तेल वापरून डोळ्याखालील सूज / अंडरआय बॅग घालवा
साहित्यः
- 1 चमचा नारळाचे तेल
- एक वाटी
वापरण्याची पद्धतः
- सर्वात पहिल्यांदा एक लहान वाटीमध्ये नारळाचे तेल काढून घ्या
- त्यात बोटं बुडवून घ्या आणि मग डोळ्यांखाली खालून उजव्या बाजूला काही वेळ हलक्या हाताने मसाज करा
- रात्रभर हे तेल असंच राहू द्या
- रोज रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही हा उपाय करा
कसे आहे फायदेशीरः
त्वचेसाठी नारळाच्या तेलाचे खूपच फायदे आहेत. याचा वापर डोळ्यांच्या खालील सूज काढण्यासाठी करता येतो. नारळाच्या तेलामध्ये इन्फ्लेमेटरी गुण असतात. सूज कमी करण्यासाठी हे फायदेशीर आहे. याशिवाय नारळाचे तेल हे त्वचेवर अन्य समस्यांवरही गुणकारी ठरते. अंडरआय बॅग कमी करण्यासाठी नारळाचे तेल चा खूपच चांगला फायदा होतो.
कॉफी बी वापरून अंडरआय बॅग त्वरित कमी होऊ शकते
साहित्यः
- अर्धा चमचा वाटून घेतलेली कॉफी बिन्स (कॉफी बी)
- 1 लहान चमचा नारळाचे तेल
- कापूस अथवा फेस वाईप्स
वापरण्याची पद्धतः
- कॉफी बिन्स आणि नारळाचे तेल एकत्र व्यवस्थित मिक्स करून घ्या.
- आता हे मिश्रण डोळ्यांच्या खाली अत्यंत काळजीपूर्वक हलक्या हाताने लावा आणि साधारण 10 मिनिट्स तसंच राहू द्या.
- त्यानंतर कापूस भिजवा आणि अथवा फेस वाईप्सने हे स्वच्छ करा.
- हा प्रयोग तुम्ही आठवड्यातून 2-3 वेळा करून पाहा.
कसे आहे फायदेशीरः
आरोग्यासाठी कॉफीचे अनेक फायदे मिळतात. पण याशिवाय डोळ्यांच्या खालील सूज घालविण्यासाठी कॉफीचा वापर करता येऊ शकतो. कॉफीमध्ये असणारे फेरूलिक असिड हे इन्फ्लेमेटरी प्रभाव दर्शविते. याच्या गुणामुळे सूज कमी होते आणि नारळ तेलामुळेदेखील सूज कमी होण्यास मदत मिळते. तसंच नारळाच्या तेलाचा एक उत्तम मसाज तेल म्हणूनही उपयोग करण्यात येतो. कोरडी त्वचा असो अथवा कोणत्याही स्वरूपाची त्वचा असो नारळाचे तेल उत्तम मॉईस्चराईजर म्हणून उपयोगी ठरते. त्यामुळे नारळ तेल आणि कॉफी हे मिश्रण ही समस्या दूर करण्यासाठी उपयुक्त ठरते.
थंड चमचा डोळ्याखालील सूज त्वरित कमी करेल
साहित्य
4-5 स्टीलचे चमचे
वापरण्याची पद्धतः
- सगळे स्टीलचे चमचे अर्ध्या तासासाठी फ्रिजमध्ये थंड करायला ठेवा
- थंड झाल्यावर एक एक चमचा घेऊन डोळ्यांच्या खाली ठेवा
- साधारण 15-20 मिनिट्सने हे चमचे काढा
- दिवसातून कमीत कमी दोन वेळा हा उपाय करा
कसे आहे फायदेशीरः
डोळ्यांखाली येणारी सूज कमी करण्यासाठी थंड चमच्यांचा उपयोग करण्यात येतो. स्टीलच्या थंडाव्यामुळे डोळ्यांखालील उष्णता पटकन शोषून घेतली जाते आणि डोळ्यांखालील सूज कमी होण्यास मदत मिळते. तसंच हा अत्यंत सोपा आणि पटकन करता येणारा उपाय आहे.
बेकिंग सोडा अंडर आय बॅग घालवण्यास उत्तम उपाय आहे
साहित्यः
- 1 चमचा बेकिंग सोडा
- 1 कप गरम पाणी
- कॉटन पॅड
वापरण्याची पद्धतः
- बेकिंग सोडा पाण्यामध्ये व्यवस्थित मिसळून घ्या
- त्यामध्ये कॉटन पॅड भिजवा आणि पिळून घेऊन मग डोळ्यांच्या खाली ठेवा
- साधारण 10-15 मिनिट्सनंतर हा कापूस काढा आणि थंड पाण्याने चेहरा धुवा
- दिवसातून असे एक ते दोन वेळा करा तुम्हाला चांगला परिणाम दिसून येईल
कसे आहे फायदेशीरः
बेकिंग सोड्याचे अनेक फायदे आहेत. एनसीबीआयच्या संकेतस्थळावर प्रकाशित झाल्याप्रमाणे बेकिंग सोड्यात अँटिइन्फ्लेमेटरी गुण असून यामुळे सूज कमी होण्यास मदत मिळते. तसेच हा उपाय करणे सोपे आहे.
काकडी अंडर आय बॅग घालवण्यास प्रभावी घरगुती उपाय आहे
साहित्यः
4-5 काकडीचे गोल केलेले तुकडे
वापरण्याची पद्धतः
- सर्वात पहिल्यांदा काकडीचे स्लाईस 10-15 मिनिट्स फ्रिजमध्ये ठेवा
- त्यानंतर डोळे बंद करून डोळ्यांवर हे थंड स्लाईस ठेवा
- 10-15 मिनिट्स तसंच ठेवा आणि मग काढा आणि थंड पाण्याने चेहरा धुवा
- दिवसातून तुम्ही तीन ते चार वेळा हा प्रयोग करू शकता
कसे आहे फायदेशीरः
डोळ्यांच्या खाली येणारी सूज घालविण्यासाठी काकडी हा उत्तम उपाय आहे. काकडीचे त्वचेसाठी खूपच फायदे होतात. डोळ्यांची काळी वर्तुळे घालविण्यासह अंडरआय बॅगसाठीही याचा उपयोग होतो. काकडीतील एस्कॉर्बिक असिड आणि कॅफिक असिड हे पाण्याचा जमाव थांबवते. यामुळे सूज कमी होऊन डोळे अधिक सुंदर आणि आकर्षक दिसण्यास मदत मिळते.
अंड्याचा पांढरा मास्क लावून डोळ्याखालची सूज घालवा
साहित्यः
- एका अंड्याचा पांढरा भाग
- एक नरम ब्रश
वापरण्याची पद्धतः
- एका वाटीत अंड्याचा पांढरा भाग व्यवस्थित फेटून घ्या
- त्यानंतर नरम ब्रशच्या सहाय्याने डोळ्यांच्या खाली लावा आणि सुकू द्या
- साधारण 15 मिनिट्सनंतर चेहरा कोमट पाण्याने धुऊन घ्या
- दिवसातून एकदा हा प्रयोग करावा
कसे आहे फायदेशीरः
अंड्याचा उपयोग फेसपॅकच्या स्वरूपात केल्यास अनेक समस्यांपासून सुटका मिळते. डोळ्याच्या खालील सूज निघून जातेच याशिवाय अंड्यामध्ये अँटीइन्फ्लेमेटरी गुण असल्यामुळे त्वचेसाठीही हे उपयोगी ठरते. घरगुती उपाय करताना तुम्ही याचा बिनधास्तपणे वापर करू शकता.
कोरफड चा वापर डोळ्याखालची सूज घालवू शकेल
साहित्यः
एक चमचा ताजी कोरफड जेल
वापरण्याची पद्धतः
- कोरफड जेल डोळ्यांच्या खाली बोटाच्या मदतीने लावा
- त्यानंतर हलक्या हाताने 2 मिनिट्स मसाज करा
- 10 मिनिट्सनंतर थंड पाण्याने चेहरा धुवा
- डोळ्याच्या खालील सूज कमी करण्यासाठी दिवसातून दोन वेळा कोरफड जेलचा वापर तुम्ही करू शकता
कसे आहे फायदेशीरः
डोळ्यांखालील सूज कमी करण्यासाठी कोरफड जेल हे औषधाप्रमाणे काम करते. यामध्ये अँटिइन्फ्लेमेटरी गुण असल्यामुळे सूज कमी करण्यास मदत करतात. याशिवाय अलर्जीवरही गुणकारी आहे. त्वचेसाठी एक उत्तम औषध म्हणून कोरफडचा नेहमी वापर करण्यात येतो. त्यामुळेच अनेक सौंदर्य उत्पादनांमध्येही याचा वापर करण्यात येतो.
बटाटा वापरून अंडर आय बॅग घालवण्यास प्रभावी घरगुती उपाय आहे
साहित्यः
- किसलेला एक लहान बटाटा
- सुती कपडा
वापरण्याची पद्धतः
- किसलेला बटाटा सुती कपड्यात बांधा
- आता ही पोटली 10-15 मिनिट्स डोळ्यांवर ठेवा
- तुम्हाला हवं असेल तर तुम्ही बटाट्याच्या चकत्या करूनही डोळ्यांवर ठेऊ शकता
- दिवसातून 2-3 वेळा हा उपाय करा
कसे आहे फायदेशीरः
डोळ्यांच्या खाली सूज येत असेल तर तुम्ही बटाट्याचा उपयोग घरगुती उपायांमध्ये करावा. यामधील गुण हे सूज कमी करण्यासाठी उपयुक्त ठरतात. अंडरआय बॅगसाठी याचा वापर करणे अधिक सोपे आणि सोयीस्कर आहे.
डोळे सुंदर आणि निरोगी ठेवण्यासाठी आहार | Diet To Keep Eyes Beautiful And Healthy In Marathi
आपले डोळे सुंदर आणि निरोगी राहावे असं कोणाला वाटत नाही? यासाठी आपला आहारही उत्तम आणि हेल्दी असणे गरजेचे आहे. डोळे सुंदर आणि निरोगी ठेवण्यासाठी नक्की कसा आहार असायला हवा हेदेखील जाणून घ्यायला हवे. यासाठी समाविष्ट करून घ्या असे काही पदार्थ ज्याचा होईल उपयोग –
गाजर – गाजर डोळ्यांसाठी खूपच फायदेशीर ठरते हे जगजाहीर आहे. तुमची दृष्टी वाढविण्यासाठी नियमित गाजराचा ज्युस अथवा गाजराची कोशिंबीर याचा समावेश तुमच्या आहारात करून घ्यावा. गाजरामध्ये असणारे विटामिन ए आणि बिटाकोरीन हे डोळ्यांना निरोगी ठेवण्यास मदत करते.
आवळा – आवळा हेदेखील आरोग्यासाठी फायदेशीर आहे. विटामिन सी हे डोळ्यांसाठी खूपच लाभदायक असून रिकाम्या पोटी अथवा लोणचं, मुरंबा स्वरूपात याचा वापर तुम्ही करू शकता. केवळ डोळेच नाही तर त्वचा आणि केसासाठीही याचा उपयोग होतो.
मासे – डोळ्यांची निगा चांगली राखण्यासाठी जेवणामध्ये साल्मन, ट्यूना, ट्राऊट, मॅकरेल अशा माशांचा समावेश करून घ्यावा. मासे हे डीएचएचा नैसर्गिक स्रोत असून डोळ्यांसाठी चांगला आहार ठरतो.
हिरव्या पालेभाज्या – हिरव्या पालेभाज्यांमध्ये भरपूर प्रमाणात लोह असते, जे डोळ्यांसाठी फायदेशीर ठरते. तसंच यामध्ये अधिक प्रमाणात रोगप्रतिकारशक्ती असून दृष्टी चांगली करण्यास याची मदत मिळते.
बदाम – बदामाने बुद्धी तल्लख होते हे सर्वांनाच माहीत आहे. पण त्याशिवाय हे सुपरफूड असून यातील विटामिन ई हे आपली दृष्टी वाढविण्यास मदत करते आणि डोळ्यांना अधिक फायदा मिळवून देते.
डोळे सुंदर आणि निरोगी ठेवण्यासाठी व्यायाम आणि योग
डोळे सुंदर आणि निरोगी ठेवण्यासाठी व्यायाम आणि योगही तितकाच महत्त्वाचा आहे. यासाठी तुम्हाला अगदी बसल्या बसल्या योग आणि व्यायम करता येतो. असेच काही सोपे व्यायाम घ्या जाणून –
तळहाताने डोळे झाकणे (Palming) – बऱ्याचदा काम करून करून डोळ्यांना खूपच थकवा येतो. मग अशावेळी दृष्टी चांगली राहण्यासाठी आणि डोळ्याखाली सूज येऊ नये म्हणून मधूनमधून डोळे दोन्ही तळहाताने झाकून घ्या. दोन्ही डोळे बंद करा. दीर्घ श्वास घ्या. साधारण 5-15 मिनिट्स हा व्यायाम करा. डोळ्यांसह मनालाही बरं वाटतं.
डोळे फिरवणे (Eye Rolling) – हे थोडेसे तुम्हाला विचित्र वाटेल. पण डोळे फिरवल्यानेही तुम्हाला आराम मिळतो. डोळ्यांखाली सूज येत नाही. काम करून झाल्यावर काही वेळाने डोळे घड्याळाप्रमाणे 10-10 वेळा गोल गोल फिरवा. यामुळे डोळ्याला आराम मिळतो.
अंतरावर टक लाऊन पाहणे (Distance Gazing) – साधारण एका अंतरावर काही वेळानंतर टक लाऊन पाहण्यानेही तुम्हाला डोळ्यांना आराम देता येतो. दूरच्या एखाद्या गोष्टीकडे एकटक मन लाऊन पाहा. असे केल्याने मनाला आणि डोळ्याला शांतता मिळते. तसंच आपल्या भावना स्थिर होतात. एक दीर्घ श्वास घ्या आणि नंतर आपले लक्ष असलेल्या गोष्टीकडे लक्ष केंद्रीत करा. यामुळे डोळ्याखाली सूज येणे कमी होईल.
अंडरआय बॅग न होण्यासाठी घ्यायची काळजी | Prevention Tips For Eye Bags In Marathi
अंडरआय बॅग न होण्यासाठी काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. तुम्हीही या टिप्स लक्षात ठेवा –
- डोळ्यांच्या खाली सूज येण्यापासून वाचण्यासाठी तुम्ही मीठाचे सेवन कमी करा
- जास्तीत जास्त झोप पूर्ण करण्याकडे लक्ष द्या. योग्यवेळी आराम करा. यामुळे डोळ्यांवर सूज राहणार नाही
- रात्री झोपण्यापूर्वी नेहमी मेकअप काढूनच झोपा
- डोळ्यांखाली सूज येऊ नये म्हणून तुम्ही दारूचे सेवन करू नये आणि धुम्रपानही टाळावे
- घराबाहेर जाताना नेहमी डोळ्यांवर गॉगल लावावा. डोळ्यांवर येणारे हानिकारक किरण डोळ्यांना त्रासदायक ठरतात. त्याशिवाय धुळीमुळेही डोळ्याखाली सूज येते
- डोळे सतत चोळू नका आणि दिवसातून दोन वेळा स्वच्छ पाण्याने डोळे धुवा
प्रश्नोत्तरे – अंडरआय बॅग्ज्सवर किंवा डोळ्याखालील सूज कमी करण्याचे घरगुती उपाय
प्रश्न 1 – साधारण कोणत्या वर्षी डोळ्यांखाली सूज दिसते?
उत्तर – डोळ्यांच्या खाली सूज ही कोणत्याही वयात येऊ शकते. पण साधारण वाढत्या वयात ही समस्या अधिक उद्भवताना दिसते. त्यामुळे याची अधिक काळजी घ्यावी.
प्रश्न 2 – डोळ्यांखालील सूज कायम राहाते का?
उत्तर – नाही. ही सूज कायम राहात नाही. वर सांगितलेल्या घरगुती उपायांनी ही सूज तुम्ही घालवू शकता. तसंच तुम्ही काही नियम पाळल्यास अंडरआय बॅग होत नाही.
प्रश्न 3 – वजन कमी केल्यावर अंडरआय बॅग्ज कमी होतात का?
उत्तर – नाही. असं अजिबात नाही. वजन कमी केल्याने चरबी कमी होते. याचा अंडरआय बॅगवर किती प्रभाव पडू शकतो, याबाबत सध्या शोध घेतला जात आहे.