घर आणि बगीचा

घराला कसं बनवावं ‘स्मार्ट होम’, काय आहे ‘स्मार्ट होम’

Dipali Naphade  |  Feb 7, 2019
घराला कसं बनवावं ‘स्मार्ट होम’, काय आहे ‘स्मार्ट होम’

स्वतःचं घर हे प्रत्येक माणसांचं स्वप्नं असतं आणि ते प्रत्यक्षात उतरवण्यासाठी प्रत्येक माणूस झटत असतो. पण आपलं घर कसं असावं याची प्रत्येक माणसाची कल्पना वेगळी असते. ती कल्पना प्रत्यक्षात उरवण्यासाठी बऱ्याच गोष्टींमधून पुढे यावं लागतं. हे जरी खरं असलं तरी आता जमाना आहे तो म्हणजे सर्व स्मार्ट गोष्टींचा. मग घराच्या बाबतीत मागे राहून कसं चालेल. आपलं नवं घर किंवा अगदी जुनं घर रिनोव्हेट करत असताना ते कसं स्मार्ट बनेल याची खरं तर माहिती घ्यायला हवी. बऱ्याचदा पालक आपल्या मुलांना घरी ठेऊन ऑफिसला जातात, तेव्हा त्यांची चिंता वेगळी असते. घरातल्या गॅसच्या बर्नरशी आपलं बाळ खेळेल किंवा पाण्याचा नळ चालू राहिला तर, अगदी झोपण्यापूर्वी घरातले दिवे आणि पंखे चालू ठेवतील की काय एक ना अनेक शंका असतात. पण या सगळ्या चिंता करत बसण्यापेक्षा पालकांनी स्मार्ट घर बनवायचं ठरवलं तर. आता हे कसं होणार? हा प्रश्न नक्कीच तुमच्या मनात डोकावला ना? तर तुम्ही तुमचं घर स्मार्ट बनवू शकता. पालकांना आपल्यासोबत असलेल्या स्मार्टफोनमधूनच घरातील सर्व गोष्टी तपासता येतील. हे नक्की कसं करायचं तर घरामध्ये कोणतीही समस्या असल्यास, सेन्सर्स ती समस्या शोधून काढतात आणि त्यानंतर लगेच तुमच्या स्मार्टफोनवर मेसेज येतात. त्यानुसार तुम्ही घराची काळजी घेऊ शकता. उदा. जर सिक्युरिटी डोअर उघडे राहिले असेल वा टीव्ही चालू राहिला असेल तर तुम्हाला मेसेज येतो. या सगळ्याबाबत बोनीटो डिझाईन्सचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, समीर ए एम. यांच्याशी ‘POPxo Marathi’ ने बातचीत केली असता त्यांनी स्मार्ट घराच्या कल्पना सांगितल्या.

वाचा – उशांमुळे घराला आणा वेगळा ‘लुक’

ऑटोमेशन उपकरणात बदल

होम ऑटोमेशन उपकरणे ही आपले दैनंदिन जीवन सुकर आणि अधिक चांगले करण्यासाठी तयार करण्यात आली होती. सुरक्षा, मनोरंजन, कनेक्टिव्हिटी, टिकाऊपणा आणि संरक्षण यांसारख्या उपभोक्त्यांच्या बदलत्या गरजांना अनुरूप होण्यासाठी ह्या ऑटोमेशन उपकरणांत वेळोवेळी बदल होत गेले. अर्थात हे बदल होणं महत्त्वाचं असतं. प्रगत टेक्नॉलॉजीकल वैशिष्ट्ये असलेल्या अनेक इनोव्हेटिव्ह साधनांनी आपल्याला तणावमुक्त केलं आहे, उदा. कॅमेरा, स्मार्ट डोअर लॉकिंग सिस्टिम, फायर डिटेक्शन सिस्टिम, इलेक्ट्रॉनिक लायटिंग सिस्टम, इ. सध्या असलेल्या प्रणालीतच काही ऑटोमेटेड नियंत्रणयुक्त स्मार्ट उपकरणं जोडून स्मार्ट घर बनवता येणे आता सहज शक्य झालं आहे. शिवाय या स्मार्टप्रणालीमुळे तुमची मुलंही व्यवस्थित सुरक्षित राहतात आणि तुम्हाला ऑफिसमध्ये असताना घरची चिंता करण्याची गरज भासत नाही. तुम्ही अगदी कुठेही असलात तरीही तुमचं तुमच्या मुलांकडे व्यवस्थित लक्ष राहतं अर्थात त्यांच्या सुरक्षेची योग्य तऱ्हेने काळजी घेता येते. शिवाय तुमच्या घरातील म्हातारी माणसं जर गॅस बंद करायला विसरली असतील किंवा त्यांच्याकडून अशा बऱ्याच गोष्टी विस्मरणामुळे होत असतात.  त्यामुळे त्यांची काळजी घेण्यासाठीदेखील तुम्हाला ही ऑटोमेशन उपकरणं उपयोगी पडतात. 

बाजारात अनेक स्मार्ट किट उपलब्ध

बाजारात अनेक स्मार्ट होम किट उपलब्ध आहेत, ज्यांच्यात अनेक उपकरणे असतात आणि ती तुमच्या घराला एक वेगळंच स्वरुप मिळवून देतात. तुमचं घर अशा स्मार्ट किट्समुळे उजळवून निघतं. अर्थात, घर स्मार्ट करणे हे केवळ ऑटोमेशन आणि स्वयंस्फूर्त उपकरणांपुरतेच मर्यादित असू नये, तर या उपकरणांनी विजेचा खपही कमी केला पाहिजे. अशा अनेक स्मार्ट टेक्नॉलॉजी बाजारामध्ये आहेत. या उपकरणांमुळे वीज कमी प्रमाणात वापरली जाते शिवाय ती तुमच्यासाठी फायदेशीर ठरते. ऑटोमेटिक टायमर आणि मोशन डिटेक्टरच्या मदतीने विनाकारण सुरू असलेले दिवे आणि पंखे बंद करून त्या तुमचे विजेचे बिल कमी करण्यात हातभार लावतात. ऊर्जा बचतीसाठी लाइट डिमरदेखील वापरता येतात, ज्यांची तीव्रता प्रसंगानुरूप आधीच नक्की करून ठेवता येते. या सगळ्याची माहती बऱ्याच लोकांना नसते. पण जेव्हा तुम्ही घर रिनोव्हेट करायला घेता तेव्हा किंवा नवं घर घेता वा बांधता तेव्हा या सगळ्याची माहिती तुम्हाला डिझाईनर्सकडून अथवा अगदी गुगलवर सर्च करूनदेखील मिळवता येते. त्याचा वापर करून घ्यायला हवा.

वाचा – घराच्या सौदर्यांत भर टाकणाऱ्या ‘कॉटन आणि हँडलूम’ पडद्यांच्या टेंडविषयी बरंच काही…

होते ऊर्जा बचत आणि पैसे वाचतात

होम ऑटोमेशन सिस्टिम या स्वतंत्रपणे फक्त ऑटोमेशन सिस्टम असू शकतात किंवा संपूर्ण इन्टिग्रेटेड असू शकतात, ज्यात एका साध्याशा यूझर इंटरफेसवरून तुम्ही लायटिंग, ऑडिओ,हीटिंग, अॅक्सेस आणि थिएटर यांना सहज नियंत्रित करू शकता. ही स्वतंत्र साधने ऊर्जा बचतीचा उद्देश साध्य करतातच शिवाय त्यांच्यासाठी कमी मनुष्यबळाची आवश्यकता असते आणि ती पैशाची बचतही करतात. उदा. आयरोबोट इंडियाची रूम्बा व्हॅक्यूम क्लीनर्स. हे रोबो क्लीनर्स घरातील पाय-या आणि वाटेतले सर्व अडथळे टाळून फर्निचरच्या खाली सहजपणे जाऊ शकतात. अशातली बरीचशी उपकरणे अॅमेझॉन अलेक्साच्या मदतीने, स्मार्टफोन अॅपचा उपयोग करून दुसऱ्या ठिकाणाहून नियंत्रित करता येतात तसेच त्यात ऑटोमेटेड कामांसाठी आयएफटीटीटी (एक वेब आधारित सेवा) इन्टिग्रेट करता येऊ शकते. हे बऱ्याचदा कसे होते याची कल्पना बऱ्याच जणांना नसते. पण ही सिस्टिम एकदा समजून घेतली की, वापरणं सोपं होतं. इतकंच नाही तर तुमच्या घरी तुमच्या मुलांना सांभाळणाऱ्या नॅनीलादेखील ही सिस्टिम हाताळणं अगदी सहजसोपं आहे. आता बऱ्याच अंशी टेक्नॉलॉजी खूपच सोपी झाली आहे. त्याहीपेक्षा कोणत्याही माणसाला ही उपकरणं हाताळणं जास्त चांगलं आणि सहजसोपं होईल अशा प्रकारेच स्मार्ट उपकरणं बनवण्यात येत आहेत. त्यामुळे त्याचा उपयोग घरामध्ये करणं सहजशक्य होतं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही उपकरणं तुम्हाला वाटतात तितकी महागही नसतात. घर घेत असाल तर या सगळ्या गोष्टीदेखील लक्षात ठेवायला हव्यात. 

ऑटोमेशन सहज करता येतं

तुमच्या घरातील बहुतेक सर्व इलेक्ट्रिकल उपकरणं आणि सिस्टम्स यांचे ऑटोमेशन सहजपणे होऊ शकतं आणि एका स्मार्ट डिव्हाईसद्वारे त्यांचे व्यवस्थापन होऊ शकतं. तसेच त्यांचे स्वतंत्र नियंत्रणदेखील आपल्या हातात असतं. होम ऑटोमेशनच्या सुरुवातीच्या काळात अनेक सिस्टिम अशा रीतीने डिझाइन केलेल्या असत की, घर बांधताना किंवा घराची डागडुजी करताना सुरुवातीच्या टप्प्यात त्या सिस्टम्स बसवाव्या लागत. परंतु, आता टेक्नॉलॉजी खूप प्रगत झाली आहे. आता बरेच नवीन आणि प्रगत पर्याय आहेत, ज्यांच्यामुळे आताच्या घरांमध्येदेखील या स्मार्ट सिस्टिम्स बसवता येतात. आपल्या घरांमध्ये या स्मार्ट टेक्नॉलॉजी आणण्यासाठी ग्राहकाला सर्वात पहिला प्रश्न येतो तो म्हणजे पैशाचा. कारण कोणत्याही उपकरणांमसाठी अथवा स्मार्ट घर बनवण्यासाठी पैसा महत्त्वाचा असतो. पण योग्य बचत करून आणि मांडणी करून ऊर्जा बचत कशी करावी याची आखणी करून आरामशीर आयुष्य आपल्याला या स्मार्ट घरामध्ये जगता येऊ शकते. वास्तविक एकदाच विचारपूर्वक पैसा खर्च करून त्यानंतर कायमस्वरूपी वीज बचत आणि पैशाची बचत करता येऊ शकते. यातील काही उपकरणे महागडी असू शकतात पण ती इतर खर्च उदा. विजेचा खर्च कमी करणारी असू शकतात तसेच मनुष्यबळाची गरजही कमी करणारी असतात. एकदाच खर्च करून विकत घेतलेल्या या उपकरणांमुळे नंतर दीर्घ काळापर्यंत त्याचे मूल्य मिळतं आणि घरातील अबालवृद्धांच्या सुरक्षेची काळजी घेतली जाते. इंटरनेटचा प्रसार आणि सुरक्षेबाबतची वाढती दक्षता यामुळे आज समजूतदार घर-खरेदीदार स्मार्ट होम संकल्पनेकडे वळत आहेत. हा एक चांगला पर्याय आहे.

वाचा – कुटुंबाच्या आरोग्याची काळजी कशी घ्यायला हवी – टीप्स

काळानुसार अर्थातच बदलायला हवं. पण त्याहीपेक्षा आपल्या कुटुंबाची सुरक्षा जास्त महत्त्वाची असते. आता पुरुषांच्या बरोबरीने स्त्रियादेखील नोकरी करतात. त्यामुळे घरात आपल्या मुलांची काळजी घेणं त्यांच्यासाठी महत्त्वाचं असतं. त्यावेळी आपलं घर स्मार्ट करणं आपल्याला जास्त उपयोगी पडतं. हे घर स्मार्टनेसनेच सजवावं. पण त्यामध्ये उगीच उधळपट्टी नक्कीच कामाची नाही. तर योग्य तपासणी करून कोणती वस्तू किंवा कोणतं उपकरणं आपल्याला अधिक उपयोगी आहे, त्याचा कुठे आणि कसा उपयोग करायला हवा याचा योग्य विचार करून आपलं घर स्मार्ट बनवण्यातच खरा स्मार्टपणा आहे. 

फोटो सौजन्य – Instgram 

 

Read More From घर आणि बगीचा