खाणंपिण आणि नाइटलाईफ

वर्षभराचा मसाला करण्याआधी लक्षात घ्या महत्त्वपूर्ण गोष्टी

Aaditi Datar  |  Apr 22, 2020
वर्षभराचा मसाला करण्याआधी लक्षात घ्या महत्त्वपूर्ण गोष्टी

उन्हाळा म्हटलं की, आपल्याकडे घरातल्या गृहिणींची वर्षभराचे वाळवण आणि मसाले साठवण्याकरिता धावपळ सुरू होते. मसाला करताना त्यातील घटकांची निवड आणि मसाल्याची साठवण याबाबतच्या उपयोगी टिप्स POPxoMarathi च्या वाचकांना दिल्या आहेत स्नेहा चौधरी-इंदूलकर यांनी.

Canva

आपल्या भारतातील मसाले स्वाद, रंग, सुगंध आणि गुणधर्मामुळे जगभर प्रसिद्ध आहेत. अनेक प्रकारच्या मिरच्या, हळदी, मोहरी, जीरे, धणे, काळेमिरे, हिंग, दालचिनी, लवंग या नेहमीच्या वापरातील अखंड मसाल्यांबरोबरच वेलदोडा, मसाला वेलची, तमालपत्र, शहाजीरे, जायवंत्री, रामपत्री, बडीशेप, दगडफुल, त्रिफळा, खसखस, नाकेशर, कबाबचिनी, बादियान, मराठी मोग्गू असे शाही मसाले आणि अनेकही इतर मसाल्याचे पदार्थ वापरून निरनिराळे तयार मसाले घरोघरी वापरले जातात. बरीच विविधता खाण्याच्या पध्दतीमधे आणि चवीढवीमधे आहेच, त्यामुळे मसाल्याचे प्रकारही अनेक. प्रत्येक प्रांतानुसार, समाजानुसार आणि प्रत्येकाच्या घराण्यांनुसार वेगवेगळ्या चवीढवीचे मसाले अनेक घरी आजही बनवले जातात. आजकाल सगळ्याच गोष्टी आणि जिन्नस 12 ही महिने दुकानांमध्ये आणि माॅल्समधे सहज उपलब्ध असतात. त्यामुळे कमी प्रमाणात सहजपणे ताजा मसाला आपल्यापुरता आपण बनवू शकतो. तरीही आपल्याकडे ढोबळमानाने वर्षभराचे मोठ्या प्रमाणातील मसाले, पापड, लोणची, वाळवणं बनवण्याचा जानेवारी ते मे हा उत्तम काळ असतो. कारण आपल्याकडे या काळात चांगले कडकडीत ऊन असते. ज्यामुळे मसाल्यासाठी मुख्यत: लागणारे मिरच्यांचे प्रकार, हळकुंड आणि इतर जिन्नस, अख्खे शाही मसाले, उन्हात चांगले कडकडीत सुकवले जातात आणि त्यामुळे हा मसाला जास्त काळ टिकतो. तसंच हा मसाले बनवण्याचा हंगाम असल्याने मसाल्यासाठी लागणा-या जिन्नसांचे अनेक दर्जेदार पर्याय बाजारात उपलब्ध असतात. मसाले, हळद यांच्या चक्क्या, डंख किंवा कांडप यंत्र हे चालू असतात.तुम्हीही जर वर्षभराचा मसाला बनवणार असाल तर त्याआधी खालील गोष्टींची काळजी नक्की घ्या.

Canva

• वर्षभर भरण्यासाठीच्या मसाल्यासाठी उत्तम हंगाम जानेवारी ते मे महिना, कारण ऊन छान असते आणि वाणेही उत्तम उपलब्ध असतात.

मसाल्यांसाठी आपल्याकडे उपलब्ध असणारे मिरच्यांचे प्रकार खालीलप्रमाणे:

1. पटणा/ पांडी (गुंटूर) मिरची: तिखटपणासाठी

2. संकेश्वरी मिरची: तिखटपणासाठी

3. बेडगी/ ब्याडगी मिरची: मध्यम तिखट व लाल रंगासाठी

4. काश्मिरी मिरची: सुरेख गडद लाल रंग व कमी तिखटपणासाठी

5. रेशमपट्टा मिरची: तिखट व जाडसर व पावडर ही लोणच्यासाठी उत्तम (ही चविष्ट असली तरी जाडसर असल्याने टिकण्यास थोडी कमी कसते. म्हणून वर्षभराच्या मसाल्यात न वापरलेली चांगली) याव्यतिरिक्त जहाल तिखट गावठी आणि लवंगी मिरची देखील असते. कोल्हापूर पट्टयात तिखट जवारी मिरचीदेखील वापरतात.

• मिरच्यांची देठ पुर्ण काढू नये. तसेच मिरच्या पुर्ण सुकलेल्या असाव्यात. बाजारातून सुक्या मिरच्या आणल्या तरी मिरच्यांना एक दोन ऊन्हे दिलेली उत्तम.

• मसाले बनवण्यासाठी मिरची व सामानावर एकदा नजर फिरवून ते साफ आहेत याची खात्री करावी. कचरा, कागदाचे कस्पट, सुतळीचा धागा, लहान दगड वैगरे असण्याची शक्यता असते.

• मसाला बनवताना, मसाल्याचे पदार्थ एक एक करत हलकेच भाजून घ्यावे म्हणजे मसाला अधिक काळापर्यंत व्यवस्थित टिकतो आणि भाजल्यामुळे स्वादही अजून खुलतात. आवडत असल्यास तेलाचा हलका हात लावूनही भाजू शकता.

• मसाल्याचा तिखटपणा वाढवायचा असल्यास शक्यतो मिरची, काळेमिरी किंवा दालचिनीचे प्रमाण वाढवून करावा, लवंगाचा झटका तीव्र आणि त्रासदायक वाटू शकतो.

• खसखस, तीळ, चणा यांच्या वापराने मसाल्याचा रस्सा जाडसर होतो.

• मसाले बनवताना जिन्नस वाळवण्याचे कापड, हात व चमचे स्वच्छ व कोरडे असावेत. तसेच तयार मसाला वर्षभरासाठी साठवण्यासाठी भरताना काचेची बरणी, डब्बा, चिनीमातीचे भांडे किंवा टप्परवेअरचे डब्बे हे अगदी कोरडे आणि स्वच्छ असावे. ठेवण्याची जागाही वर्षभर कोरडी राहील अशी असावी.

आठवडा किंवा दोन आठवडे पुरेल एवढा मसाला वेगळ्या लहान बरणीत ठेवावा. म्हणजे मुख्य बरणीला सतत उघडायला नको. लहान बरणीतला मसाला संपत आला की, अलगद कोरड्या हाताने आणि चमच्याने मसाला लहान बरणीत काढत जावा.

• मसाल्यांमधे मोहरी अख्खी न टाकता, भाजून पावडर करून टाकणे उत्तम.

• मसाले बरणीत भरल्यावर तो जास्त टिकावा आणि पाखरू लागू नये म्हणून हिंगाचे खडे वरती टाकून ठेवावेत.

• तयार मसाला दळून आणल्यावर, भरून ठेवण्याआधी एक दोनदा जेवणात वापरून पहा. काही कमी जास्त वाटल्यास त्याप्रमाणे वरून पावडर करून घालून मिक्स करता येऊ शकते.

Kitchen Tips : पावसाळ्यात मसाले खराब होऊ नये म्हणून घ्या ही काळजी

मग पुढच्या वेळी वर्षभराचा मसाला करताना या टिप्स नक्की फॉलो करा. तुम्हाला कशा वाटल्या, या टिप्स आम्हाला नक्की सांगा. तुम्हाला POPxoMarathi वर अजून कोणत्या विषयांवर वाचायला आवडेल, हेही आम्हाला सांगा. 

हेही वाचा –

रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी आहारात करा या मसाल्यांचा वापर

विविध राज्यातील खास चटकदार चटण्या

घरी तयार केलेलं लोणचं ‘या’साठी असायला हवं तुमच्या आहारात

Read More From खाणंपिण आणि नाइटलाईफ