Periods

रजोनिवृत्तीनंतरच्या काळात स्त्रियांमध्ये ऑस्टिओपोरोसिसचे प्रमाण अधिक

Dipali Naphade  |  Oct 19, 2020
रजोनिवृत्तीनंतरच्या काळात स्त्रियांमध्ये ऑस्टिओपोरोसिसचे प्रमाण अधिक

ऑस्टिओपोरोसिस हा हाडे दुर्बल करणारा आजार आहे. ऑस्टिओपोरोसिस याचा शब्दशः अर्थ ‘सच्छिद्र हाडे’ असा होतो. हा आजार सुरुवातीच्या काळात लक्षात येत नाही. त्यामुळे त्याला ‘मूक आजार’ असेही म्हणतात. या आजाराने हाडांची गुणवत्ता व त्यांचे प्रमाण कमी होत जाते. ती ठिसूळ होतात आणि मोडू लागतात. ऑस्टिओपोरोसिस दिवसाच्या निमित्ताने जाणूून घ्या कारणे आणि उपाय. यासंदर्भात ‘POPxo मराठी’ने डॉ. सुनीलकुमार सिंग, कन्सल्टंट, हृमॅटॉलॉजी, कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल यांच्याशी चर्चा केली आणि त्यांच्याकडून याविषयी अधिक माहिती जाणून घेतली. 

ऑस्टिओपोरोसिसची कारणे

हार्मोनल बदलांमुळे रजोनिवृत्तीनंतरच्या काळात स्त्रियांमध्ये ऑस्टिओपोरोसिस अधिक दिसून येतो. तसेच, आपल्या शरीरातील हाडे सतत स्वत:चे नूतनीकरण करत असतात, जुन्या हाडांच्या जागी नवीन हाडे येत असतात, या प्रक्रियेत कोणत्याही प्रकारे असंतुलन आल्यास ऑस्टिओपोरोसिस होतो. कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी च्या कमतरतेमुळेदेखील ऑस्टिओपोरोसिस होऊ शकतो. थायरॉईडची समस्या, वैद्यकीय औषधांमध्ये ‘स्टिरॉइड्स’ची उच्च मात्रा यांसारखी वैद्यकीय स्थितीदेखील या आजारास कारणीभूत ठरू शकते.  

लक्षणे

Shutterstock

आधी सांगितल्याप्रमाणे, ऑस्टिओपोरोसिस हा एक मूक रोग असल्याचे म्हटले जाते. फ्रॅक्चर होईपर्यंत सामान्यत: त्याची लक्षणे दिसून येत नाहीत; तथापि, कधीकधी पाठीतील हाडांमध्ये तीव्र वेदना आणि उंची कमी होणे ही ‘ऑस्टिओपोरोसिस’ची लक्षणे असू शकतात.

मासिक पाळी पुढे ढकलण्यासाठी नैसर्गिक घरगुती उपाय

जोखीम घटक आणि प्रतिबंध

जोखीम घटक जाणून घेतल्यास एखाद्याला हा आजार होण्याची शक्यता कमी करता येते. धूम्रपान, मद्यपान, व्यायामाचा अभाव, कॅल्शियमयुक्त आहार कमी प्रमाणात असणे, तसेच अंगावर सूर्यप्रकाश न घेणे, यांसारख्या जीवनशैलीविषयक गोष्टी ‘ऑस्टिओपोरोसिस’साठी धोकादायक बनतात.  

धोका कोणाला?

रजोनिवृत्तीनंतरच्या काळात स्त्रियांमध्ये सामान्यत: ऑस्टिओपोरोसिस दिसून येत असला, तरी 65 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या वृद्ध पुरुषांनाही हा आजार होतो. तरुण स्त्रिया आणि मुलांमध्ये ऑस्टिओपोरोसिस फारच कमी आढळतो; परंतु जेव्हा तो त्यांनाही होतो, तेव्हा त्याची कारणे अनुवांशिक किंवा काही विशिष्ट वैद्यकीय आजार किंवा आजारावर उपचार करण्यासाठी वापरली जाणारी औषधेही असतात. 

मासिक पाळी लवकर येण्यासाठी सोपे उपाय

उपचारांचे पर्याय

‘ऑस्टिओपोरोसिस’वर उपचारासाठी दोन प्रकारची औषधे दिली जातात. त्यातील एक, हाडांच्या पुढील नुकसानीस प्रतिबंध करते आणि दुसरे, हाडांची निर्मिती सुधारते. ‘ऑस्टिओपोरोसिस’ची तीव्रता निश्चित करण्यासाठी हाडांची घनता तपासली जाते. फ्रॅक्चर होण्याआधीच या आजारावर उपचार सुरू करणे महत्वाचे आहे.

रजोनिवृत्तीची कारणे, लक्षणे आणि घरगुती उपाय (Home Remedies For Menopause In Marathi)

आहाराची शिफारस

Shutterstock

कॅल्शियमयुक्त आहार मिळण्यासाठी, डेअरी उत्पादने, नाचणी, बदाम, तीळ आणि मेथी दाणे यांचा लहानपणापासूनच आहारात समावेश करण्यात यावा. ऑस्टिओपोरोसिसचा धोका असलेल्यांसाठी कॅल्शियम पूरक आहार आवश्यकच आहे.

व्यायाम

Shutterstock

चालणे, धावणे यांसारख्या व्यायामांमध्ये हाडांवर शरीराचे वजन येते. हे व्यायाम प्रकार ‘ऑस्टिओपोरोसिस’साठी चांगले आहेत. पोहण्यासारख्या व्यायामामुळे ऑस्टिओपोरोसिस रोखण्यास मदत होत नाही, मात्र पोहणे हे पाठीच्या स्नायूंसाठी चांगले असते. पाठ आणि नितंबाचा भाग येथील स्नायूंना बळकटी आणणाऱ्या व्यायामामुळे खाली पडणे व फ्रॅक्चर होणे यांचा धोका कमी होतो. 

योग्य जीवनशैलीचा अवलंब केला व त्यांची जाणीव ठेवली, तर ‘ऑस्टिओपोरोसिस’च्या उपचारात मोठ्या प्रमाणात मदत होते. ‘ऑस्टिओपोरोसिस’च्या क्षेत्रात सतत संशोधन चालू आहे. नवीन अस्थी तयार करणाऱ्या आणि हाडांची हानी रोखणाऱ्या प्रभावी औषधांचा शोध लावण्यात येत आहे. ‘ऑस्टिओपोरोसिस’चे निदान लवकर आणि अधिक तंतोतंत करण्यासाठी नवीन चाचण्यांचाही शोध घेतला जात आहे.

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

Read More From Periods