Travel in India

महाशिवरात्र – महाराष्ट्रातील कोणती आहेत खास प्राचीन शिवाची मंदिरे

Dipali Naphade  |  Feb 28, 2019
महाशिवरात्र – महाराष्ट्रातील कोणती आहेत खास प्राचीन शिवाची मंदिरे

संस्कृत, पुराण अशा साहित्यांपैकी अग्नी पुराण, शिव पुराण यांसारख्या ग्रंथामध्ये महाशिवरात्रीचे वर्णन करण्यात आलं आहे. या दिवशी बेलाची पानं वाहून शिवाची अर्थात शंकराची पूजा करावी असं व्रत सांगण्यात येतं. शिवाय या दिवशी शंकराने तांडवनृत्य केले होते अशी आख्यायिका प्रसिद्ध आहे. महाशिवरात्र हा दिवस माघ महिन्यातील माघ कृष्ण चतुर्दशीला साजरा करण्यात येतो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे या दिवशी बऱ्याच भाविकांचा उपवासही असतो आणि अनेक शंकरांच्या मंदिरामध्ये भाविकांचा उत्साह दिसून येतो. महाशिवरात्रीच्या निमित्ताने भारतभरात विविध तीर्थक्षेत्र तसंच मुख्यत्वे बारा ज्योतिर्लिंगांच्या ठिकाणी विशेष यात्रा आयोजित केल्या जातात आणि अनेक शिवममंदिरांच्या ठिकाणी जत्राही भरतात. महाराष्ट्रातही अशी अनेक प्राचीन शिवाची मंदिरं आहेत. आपण आज त्याच मंदिरांविषयी महाशिवरात्रीच्या निमित्ताने जाणून घेणार आहोत.

1) बाबुलनाथ मंदिर, मुंबई

केवळ मुंबईतीलच नाही तर भारतातील प्राचीन मंदिरांपैकी बाबुलनाथ मंदीर हे एक आहे. गिरगाव चौपाटजवळ असणाऱ्या एका लहानशा टेकडीवर हे मंदिर प्रस्थापित करण्यात आलेलं आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी या मंदिरामध्ये लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात. जेव्हा हे मंदिर प्राचीन काळी होतं तेव्हा आजूबाजूला जंगल होतं असं सांगण्यात येतं. लोक चढून शंकराच्या दर्शनासाठी या मंदिरामध्ये जात होते आणि अजूनही या मंदिरामध्ये जाण्यासाठी शिड्या चढूनच जावं लागतं. हे मंदिर साधारण दोनशे वर्ष जुनं असल्याचं म्हटलं जातं. त्यावेळी इथल्या जमिनीवर आपली गुरं चारण्यासाठी लोक घेऊन यायचे असंही सांगितलं जातं. त्यापैकीच एकाला स्वप्नात साक्षात्कार होऊन इथे शिवलिंग असल्याचं समजलं आणि आपल्या मित्राला सांगून दोघांनी खणलं असता त्यांना शिवलिंग सापडलं आणि मग या मंदिराची स्थापना झाल्याची आख्यायिका आहे. हे मंदिर खूप वर्षांपूर्वी जमिनीमध्ये गेलं होतं पण नंतर पुन्हा एकदा त्याचा जीर्णोद्धार करण्यात आला असंही सांगण्यात येतं. इथे दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या वयस्कर माणसांसाठी लिफ्टचीदेखील सोय करण्यात आली आहे. अजूनही बाबुलनाथ मंदिर माहीत नाही अशी व्यक्ती मुंबईमध्ये सापडणर नाही.

वाचा – कोकणातील पर्यटन स्थळे आहेत फिरायला जाण्यासाठी उत्तम पर्याय

कसं जायचं – चर्नी रोड स्टेशनवरून बस अथवा टॅक्सी

2) अंबरनाथ 

संपूर्ण जगाचा सांस्कृतिक वारसा म्हणून युनेस्कोने जाहीर केलेल्या 218 कलासंपन्न वास्तुंपैकी अंबरनाथ हे एक प्राचीन शिवकालीन मंदिर आहे. हे प्राचीन मंदिर शिलाहार छित्तराज याने इ. स. 1020 मध्ये बांधण्यासाठी सुरुवात केली आणि त्यानंतर या मंदिराची रचना त्याचा मुलगा मृण्मणिराजाच्या काळात पूर्ण झाली ती 1060 मध्ये. ही सगळी नोंद इतिहासात आढळते. हे मंदिर बांधण्यासाठी पूर्ण 40 वर्षे लागली. काही पौराणिक कथांमध्ये हे मंदिर पांडवकालीन असून पांडवांनी बांधल्याचं म्हटलं जातं. काही मंदिरं काळाच्या पडद्याआड गेली असली तरीही अंबरनाथमधील हे मंदिर आजही त्याचं अस्तित्व टिकवून आहे. या मंदिरावरूनच या शहराला अंबरनाथ नाव ठेवल्याचंही सांगितलं जातं. या मंदिराबाहेरील शिल्पं ही अनेक हिंदू देवदेवतांच्या दगडी शिल्पाचं कोरीवकाम आहे. या शिल्पांमध्ये गरूडासन विष्णू, शिव, विवाहापूर्वीची पार्वती, शिव-पार्वती विवाह सोहळा, नृत्यांगना, नटराज, कालीमाता, महिषासूर मर्दिनी या सर्व मूर्ती अत्यंत कुशलतेने दगडातून साकारलेल्या आहेत. आजही अनेक भाविक आणि पर्यटक या मंदिराला खास भेट द्यायला अंबरनाथमध्ये येतात.

कसं जायचं – अंबरनाथ स्टेशनवरून ऑटो

3) धुतपापेश्वर मंदिर, राजापूर 

कोकणातील राजापूर हे निसर्गाने नटलेलं गाव. याच राजापूर बसस्थानकापासून साधारणतः 3-4 किमी अंतरावर घनदाट वनराईमध्ये मृडानी नदीच्या लहानमोठ्या धबधब्यांमध्ये वसलेलं धुतपापेश्वर मंदिर. शेकडो वर्ष जुने वृक्ष, डोंगरातून खळखळत वाहणारं पाणी, शंकराच्या जटा धारण केल्यासारख्या वटवृक्षांच्या पारंब्या आणि अतिशय शांत अशा वातावरणाने भारलेलं हे मंदीर कोणत्याही भाविकाला आवडणारं आहे. मंदिरातील शंकराच्या मोठ्या पिंडीवर नेहमीच सुंदर फुलांची आरास असते. महाशिवरात्रीला या ठिकाणी प्रचंड गर्दी असते त्याचं कारण म्हणजे इथे भरणारी मोठी यात्रा. हे मंदिर हजारो वर्ष पुरातन असल्याचं सांगितलं जातं. शिवाय हे मंदिर म्हणजे कोकणातील अगदी टिपीकल बांधकाम असणारं मंदिर असलं तरीही इथे गेल्यानंतर लाभणारी शांतता ही अवर्णनीय आहे.

कसं जायचं – राजापूर बसस्थानकावरून बस, एस. टी.

4) कोपेश्वर मंदिर, खिद्रापूर 

कृष्णा नदीच्या काठावर वसलेले महाराष्ट्राच्या कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील खिद्रापूर गावामधील हे मंदीर आहे. प्राचीन शिलाहार शिल्पस्थापत्यशैलीचं असं हे मंदीर आहे. या महादेवाचं नाव कोपेश्वर असून दक्ष कन्या सतीच्या जाण्याने तिच्या विरहामुळे कोपलेला हा महादेव होय. या मंदिराच्या गर्भगृहामध्ये दोन शाळुंका आहेत. एक कोपेश्वर आणि त्याहून थोडा उंच हा धोपेश्वर. सर्वात महत्त्वाचं म्हणजे या मंदिरात इतर मंदिरांप्रमाणे नंदी नाही. नंदी नसलेले हे दुर्मिळ मंदिर आहे. साधरणतः सतराव्या शतकाच्या आसपास चालुक्य राजवटीमध्ये या मंदिराच्या उभारणीची सुरुवात झाली असून अकराव्या वा बाराव्या शकतामध्ये शिलाहार राजवटीत हे काम पूर्णत्वास गेल्याची नोंद आहे. याची स्थापत्यशैली ही दक्षिणेकडील बेलूर, हळेबिडशी साधर्म्य दाखवते असं म्हटलं जातं. इतकंच नाही तर भारत सरकारच्या पुरातत्त्व विभागाने या मंदिराला 2 जानेवारी 1954 रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलं आहे. शिल्पकलेना उत्कृष्ट नमुना म्हणूनदेखील या मंदिराची ख्याती आहे.

कसं जायचं – कोल्हापूरवरून एस. टी.

5) तिळसेश्वर, वाडा 

तिळसे हे वैतरणा नदीवरील एक छोटंसं गाव आहे. त्र्यंबकेश्वरातील ब्रम्हगिरीतून उगम पावलेल्या गोदावरी या नदीची ही उपनदी आहे. इथेच हे तिळसेश्वराचे नदीत खडकाच्या उंच चबुतऱ्यावर बांधलेले पांडवकालीन शिवमंदिर आहे. दरवर्षी महाशिवरात्रीला इथे मोठी जत्रा भरत असून लाखो भाविक या ठिकाणी दर्शन घ्यायला येतात. वैतरणा नदीतील खोल कुंडात असलेल्या माशांबाबतही आख्यायिका सांगितल्या जातात. या ठिकाणी महाशिवरात्रीच्या दिवशी सोनेरी मासे बघायला प्रचंड गर्दी जमते. हे मासे केवळ महाशिवरात्रीच्या दिवशीच दिसतात असं सांगितलं जातं. पण आता नव्या बांधकामामुळे इथे या माशांची जागा नव्या माशांनी घेतली आहे असंही म्हटलं जातं.  वाडा हा पालघर जिल्ह्यातील मध्यवर्ती तालुका असून तिळसेश्वर देवस्थान हे वाड्यापासून साधारणतः आठ किलोमीटर अंतरावर असणाऱ्या तिळसे गावात आहे. या ठिकाणी बस अथवा खासगी वाहनाने जाता येतं. पण हे मंदिरही प्राचीन काळातील असल्यामुळे या ठिकाणी बरीच गर्दी महाशिवरात्रीच्या दिवशी असते.

कसं जायचं – वाड्यावरून बस वा खासगी वाहन

महाराष्ट्रातील या प्राचीन शिवमंदिरांची माहिती तुम्हीही वाचा आणि महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने शुभेच्छा सोबत शेअर करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवू शकता. 

फोटो सौजन्य – Instagram 

हेदेखील वाचा 

मोठ्या सुट्टीत फिरायला जायचंय तर मग जाणून घ्या भारतातील ‘अप्रतिम’ 5 ठिकाणं

Valentines Day: रोमँटिक व्हॅलेंटाईन साजरा करा ‘रोमँटिक’ ठिकाणी

फिरायला जाणार असाल तर तुमच्या बॅगमध्ये ‘या’ गोष्टी असायलाच हव्यात

Read More From Travel in India