पालकत्व

बाळाला दात येत असतील तर अशी घ्या त्याची काळजी

Trupti Paradkar  |  Jan 29, 2021
बाळाला दात येत असतील तर अशी घ्या त्याची काळजी

तान्हा बाळाला नेहमीच काळजी आणि अधिक सुरक्षेची गरज असते. जेव्हा तुमच्या तान्हुल्याला पहिल्यांदा दात येतात तेव्हा वेदनेमुळे त्याची चिडचिड होते. साधारणपणे सहा महिने ते दोन वर्षापर्यंत बाळाला दात येतात. या काळात हिरड्यांमध्ये वेदना होत असल्यामुळे बाळाला सतत काहीतरी चावावं असं वाटतं. प्रत्येक बाळाची दात येण्याची लक्षणं वेगवेगळी असू शकतात. काही मुलं चिडचिड करतात, काहींना सतत चावावसं वाटतं, काहींना जुलाब होतात. या लक्षणांमुळे ती नीट खात नाहीत अथवा झोपतही नाहीत. दात येताना मुलं अस्वस्थ होणं हे स्वाभाविक आहे. त्यामुळे फार चिंता करू नका मात्र यावर काही घरगुती उपाय जरूर करा. 

बाळाला दात येत असतील तर करा हे घरगुती उपाय –

बाळाला दात येताना त्याला आराम मिळावा यासाठी घरातील अनुभवी मंडळी अनेक घरगुती उपाय सूचवतात. ज्यामुळे बाळाची चिडचिड कमी होऊ शकते.

बाळाला थंड आणि स्वच्छ कापड चावण्यास द्या –

दात येताना बाळाच्या हिरड्या वेदनेमुळे शिवशिवू लागतात. त्यामुळे बाळाला हातात मिळेल ती गोष्ट चावावी असं वाटतं. यासाठी हा उपाय अनेक आईवडील करतात. यासाठी एखादं स्वच्छ आणि मऊ कापड घ्या त्याची गुंडाळी करून ते भिजवून फ्रीजमध्ये ठेवा. अर्धा तासाने थंड कापडाची गुंडाळी बाळाला चावण्यासाठी द्या. थंड आणि कडक झालेलं हे कापड चावल्यामुळे बाळाच्या हिरड्यांना चांगला आराम मिळतो. फक्त असं करताना ते कापड स्वच्छ असेल आणि बाळ ते गिळणार नाही याची काळजी घ्या.

बाळाला तीथिंग रिंग चघळण्यास द्या –

दात येण्याच्या प्रक्रियेमध्ये बाळाला तीथिंग रिंग चघळण्यास देण्याचा सल्ला दिला जातो. ज्यामुळे तुमच्या बाळाच्या हिरड्यांना आराम मिळू शकतो. खरंतर या काळात बाळ हातात मिळेल ती गोष्ट चावू लागतं. यासाठीच त्याच्या हातात हे तीथिंग रिंग द्या. ज्यामुळे  ते इतर गोष्टी चावणार नाही. तीथिंग रिंग या सिलकॉनपासून तयार केलेल्या असतात. ज्यामुळे तुमच्या बाळाच्या हिरड्यांना यामुळे दुखापत होत नाही. शिवाय त्या चावताना हिरड्यांवर योग्य तो दाब पडतो आणि बाळाला त्रास होत नाही. मात्र लक्षात ठेवा तीथिंग रिंग स्वच्छ करून मगच बाळाच्या हातात द्या. शिवाय त्या चावताना त्या बाळाच्या तोंडात अडकणार नाहीत याची काळजी घ्या. 

बाळाच्या दातांना बोटाने मसाज द्या –

बाळाच्या हिरड्यांवर आईने बोटाने मसाज केल्यामुळेही त्याला नक्कीच चांगला आराम मिळू शकतो. असं केल्यामुळे बाळाच्या हिरड्यांची शिवशिव कमी होते. बाळ असं करताना तुमचं बोट चावू शकतं. त्यामुळे सावधपणे त्याला कितपत दात आलेले आहेत त्यानुसार त्याच्या हिरड्यांना मसाज द्या. शिवाय बाळाच्या तोंडात बोट घालण्यापूर्वी तुमचा हात, बोटं आणि नखं स्वच्छ आहेत याची काळजी घ्या. बाळाला त्रास होणार नाही इतका दाब देत हळूवारपणे बाळाच्या हिरड्यांवर बोट फिरवा.

स्तनपान आणि प्रेम –

दात येताना बाळ खूप चिडचिड करते ज्यामुळे ते काही खात नाही अथवा सतत रडत राहते. अशा वेळी बाळाला शांत करण्याचा आणि त्याला प्रेम देण्याचा सोपा मार्ग म्हणजे स्तनपान देणे. बाळाला दात येत असल्यामुळे दातांना होणारी शिवशिव यामुळे कमी होऊ शकते. आईच्या  जवळ असल्यामुळे बाळाला सुरक्षित वाटतं आणि त्याचा त्रास कमी होतो. मात्र या काळात बाळ तुमचे स्तन चावू शकते. त्यामुळे एक आई या नात्याने तुम्हाला त्याचा थोडा त्रास सहन करावा लागू शकतो. 

फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम

अधिक वाचा –

बाळाला पहिल्यांदा अंघोळ घालताना या गोष्टी ठेवा लक्षात

दूध पिताना बाळ सतत उलटी करत असेल तर त्यामागे असू शकतं हे कारण

यासाठी बाळाला सतत जवळ घेणं असतं गरजेचं, आईवडीलांचा स्पर्श आहे वरदान

Read More From पालकत्व