DIY फॅशन
मुंबईतील नवरात्रीसाठी खरेदी करण्याची प्रसिद्ध ठिकाणं ( Best Navratri shopping Destinations in Mumbai)
गणेशोत्सव संपत आला की, धूम सुरु होते ती नवरात्रीची. फक्त नवरात्री उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा नाहीतर नवरात्रीमध्ये गरबा आणि दांडिया खेळणं हे सर्वांसाठीच आनंदाचं आणि मजेचं असतं. खास यासाठी मुंबई असो इतर शहरं असो वेगवेगळ्या प्रकारची खरेदी करण्यात येते. नवरात्रीसाठी खास ड्रेस, दागिने या सगळ्या वस्तूंनी अनेक बाजार फुलून गेलेले दिसतात. जितकं महत्त्व यामध्ये मुलींच्या नटण्याला आहे तितकंच मुलांनाही नवरात्रीमध्ये सजायला आवडतं. नऊ दिवस साजरा होणारा हा सण म्हणजे गुजरात गरबा आणि पश्चिम बंगालची दुर्गापूजा याचा सुरेख आणि अप्रतिम मेळ आहे. या दोन समाजापुरता हा सण मर्यादित न राहता सगळीकडे व्यापला आहे. आता नवरात्रीचे नऊ दिवस जागवायचे म्हटलं की, गरबा आणि दांडियांशिवाय दुसरा पर्यायही नाही. तर दुसरीकडे दुर्गापूजेच्या निमित्तानेही अनेक मंडळं सजलेली दिसून येतात. नवरात्री म्हणजे तरूणाईसाठी तरत जल्लोष आणि उत्साह आहे. गणेशोत्सवाचा हा उत्साह नवरात्रौत्सवापर्यंत अगदी ओसंडून वाहात राहातो. त्यामुळे गणपती झाल्यानंतर नवरात्रीसाठी नक्की कोणत्या ठिकाणी शॉपिंग करायला हवं हे आम्ही तुम्हाला सांगणार आहे. मुंबईत खरेदी करण्यासाठी अनेक ठिकाणं आहेत. पण नवरात्रोत्सवाचं शॉपिंग करण्यासाठी ही काही खास 10 ठिकाणं आहेत. जिथे तुम्हाला सर्व गोष्टी एकाच मार्केटमध्ये सापडतात. त्यामुळे तुम्ही या मार्केट्सना नक्की भेट द्या. मुंबईमध्ये असं तर बऱ्याच ठिकाणी खरेदी करण्यासाठी बाजार आहेत. पण नवरात्रीसाठी खास शॉपिंग कुठे करता येईल हे आम्ही तुम्हाला सांगणार आहेत. जाणून घेऊया कुठे करता येईल नवरात्रीसाठी खरेदी.
Table of Contents
- 1. भुलेश्वर (Bhuleshwar)
- 2. दादर (Dadar)
- 3. घाटकोपर (Ghatkopar)
- 4. महालक्ष्मी (Mahalaxmi)
- 5. बोरीवली (Borivali)
- 6. मंगळदास मार्केट (Mangaldas Market)
- 7. नटराज मार्केट, मालाड (Natraj Market, Malad)
- 8. मुलुंड पश्चिम (Mulund West)
- 9. इर्ला मार्केट, विलेपार्ले (Irla Maraket, Parle)
- 10. गांधी मार्केट (Gandhi Market)
1. भुलेश्वर (Bhuleshwar)
नवरात्र म्हटलं की, सर्वात पहिले खरेदी करायची असते ती घागरा चोली आणि दागिन्यांची. मुंबईतील अगदी कमी भावात आणि चांगल्या वस्तू मिळण्याचं हमखास ठिकाण म्हणजे भुलेश्वर. चर्नीरोडमध्ये असलेलं भुलेश्वर मार्केट हे नवरात्रीसाठी लागणाऱ्या प्रत्येक वस्तूसाठी प्रसिद्ध आहे. तरूणींसाठी खास पेहराव म्हणजे घागरा चोली. याची व्हरायटी तुम्हाला भुलेश्वर मार्केटमध्ये पाहायला मिळते. या घागरा चोलीवर बांधणी स्ट्रिप्स, अबला वर्क, कशिदा वर्क हे भरगच्च काम केलेलं असतं. त्यामुळे तुमच्या सौंदर्यात अधिक भर पडते. आजकाल बॅकलेस चोलीची फॅशन आहे. त्यामुळे बॅकलेस चोलीमध्ये घागऱ्यांच्या नाड्या खूप मस्त सजवलेल्या असतात. तुमची पाठ यामुळे अधिक खुलून दिसते. ज्यांना बॅकलेसचा पर्याय नको त्यांच्यासाठी या बाजारामध्ये स्लिव्हलेस आणि डीप यू नेक त्यावर केलेलं वर्क असा पर्यायही उपलब्ध आहे. तसंच नवरात्रीसाठी लागणारे विशिष्ट दागिने तुम्हाला इथे जास्त प्रमाणात मिळतात.
कसं जायचं – चर्नीरोड स्टेशनवरून शेअर टॅक्सी आहे. तुम्हाला पाच मिनिट्समध्ये भुलेश्वरमध्ये पोहचता येतं.
खाण्याचं ठिकाण – शॉपिंग करून थकल्यानंतर तुम्हाला भुलेश्वरमधील खाऊ गल्ली हा एक अप्रतिम पर्याय आहे. पावभाजी, दाबेली, चाट, साऊथ इंडियन अशा अनेक व्हरायटी तुम्हाला इथे गाड्यांवर मिळतात. तसंच खिचिया पापड हा एक अप्रतिम प्रकार तुम्हाला इथे खायला मिळतो. हा एक विशिष्ट प्रकारचा पापड असून यावर काकडी, टॉमेटो, कांदा, चटणी असं मिश्रण असतं.
Chaitra Navratri Wishes in Hindi
2. दादर (Dadar)
कोणताही सण म्हटला की, दादर मार्केट हा पर्याय सर्वांनाच माहीत असतो. अगदी कोणत्याही सणासाठी लागणारं सर्व साहित्य इथे तुम्हाला मिळतं. मुख्यत्वे नवरात्रीमध्ये लागणारी ताजी फुलं ही इथे खूपच चांगली मिळतात. दादर पूर्व असो वा दादर पश्चिम असो तुम्हाला या दोन्ही ठिकाणी नवरात्रोत्सवासाठी लागणारं सामान हमखास मिळतं. घागऱ्यांना कवड्या, कच्छी वर्क, आरसे, मोती असं सजवण्यात येतं. त्यामुळे रात्रीच्य गरब्याच्या मैदानात चमकणारे घागरे तुम्हाला इथे चांगल्या दर्जाचे मिळतात. 400 ते 3000 किमतीपर्यंत घागरा तुम्हाला इथे मिळू शकतो. त्यावरच्या किमतीचे घागरे असतात. तुम्हाला इथे जाऊन व्यवस्थित घासाघीस करून खरेदी करता येते.
कसं जायचं – दादर स्टेशनला उतरलं की, दोन्ही बाजूला तुम्हाला स्टेशनच्या जवळच अनेक दुकानं दिसतात. चालत जाणं हा एकच पर्याय इथे आहे.
खाण्याचं ठिकाण – शॉपिंग करून थकल्यानंतर इथे अनेक मराठी पदार्थांसाठी प्रसिद्ध असणारी हॉटेल्स आहेत. दादर पश्चिमेला स्टेशनबाहेर असणारं मामा काणे, शगुन, पुढे गेल्यानंतर प्रकाश, पणशीकर, विसावा या ठिकाणी तुम्ही हमखास खायला जाऊ शकता.
लग्नाच्या साड्यांसाठी ठाण्यामधील ‘या’ ठिकाणांना नक्की भेट द्या
3. घाटकोपर (Ghatkopar)
घाटकोपर हा तसा तर गुजराती लोकांनी भरलेला भाग म्हणून ओळखला जातो. त्यामुळे इथे नवरात्रीसाठी लागणाऱ्या गोष्टींची खरेदी जास्त प्रमाणात होते. जास्तीत जास्त स्टायलिश दिसता यावं यासाठी इथे वेगवेगळे दागिने आणि कपड्यांची आरास केलेली दिसून येते. मेटलचे आणि हिऱ्यांचे दागिनेही छान दिसतात. पण सध्या सिल्व्हर दागिन्यांची फॅशन आहे. भरलेल्या घागऱ्यावर सिल्व्हर दागिन्यातील हार, लाल आणि पांढऱ्या बांगड्या, राजस्थानी कडे, मोठे कानातले आणि जाड पैंजण ही इथल्या मार्केटची खासियत आहे. तुम्हाला अशा प्रकारचे दागिने इथे जास्त प्रमाणात दिसतील. तसंच घागरा चोलीला शोभेल असा सगळा सेट तुम्हाला इथे खरेदी करता येऊ शकतो. इथे या सगळ्याची जास्त खरेदी होत असल्याने तुम्हाला दरवर्षी नव्या नव्या प्रकारचे सेट्स दिसून येतात.
कसं जायचं – घाटकोपर स्टेशनला उतरल्यानंतर पश्चिम बाजूला मार्केट आहे.
खाण्याचं ठिकाण – खाण्यासाठी तुम्हाला घाटकोपरच्या प्रसिद्ध खाऊ गल्लीमध्ये जाता येईल. इथे साऊथ इंडियन, चायनीज असे सगळ्याच प्रकारचे पदार्थ अप्रतिम मिळतात.
4. महालक्ष्मी (Mahalaxmi)
महालक्ष्मी स्टेशनवरून खाली सातरस्त्याला चालत गेल्यानंतर तुम्हाला नवरात्रीसाठी अनेक गोष्टींची खरेदी करता येते. इथलं मार्केट हे सोन्याचांदीच्या गोष्टींसाठी जास्त प्रसिद्ध आहे. नवरात्रीच्या दिवसात लागणारी चांदीची भांडी इथल्या ज्वेलर्सकडे चांगली मिळतात. तसंच या ठिकाणी किंमतही वाजवी असते. तसंच चपलांचं मार्केटही इथे चांगलं आहे. नवरात्रीच्या वेळी चपलांची निवड करताना त्यात बॉर्डर, एम्ब्रॉयडरी, राजस्थानी अशा चपलांची निवड केली जाते. तुम्हाला अशा चप्पल इथे मिळतील.
कसं जायचं – महालक्ष्मी स्टेशनला उतरल्यानंतर जिना चढून वर आल्यानंतर तुमच्या डाव्या बाजूला असलेल्या रस्त्याने खाली उतरल्यावर मार्केट लागतं.
खाण्याचं ठिकाण – खाण्यासाठी तुम्हाला इथे जास्त व्हरायटी मिळणार नाही. पण काही हॉटेल्स आहेत जिथे तुम्ही जाऊन जेवू शकता.
5. बोरीवली (Borivali)
बोरीवली हे असं ठिकाण आहे जिथे जास्त प्रमाणात गरबा खेळण्यासाठी लोक येतात. इथे विविध गरब्यांचे कार्यक्रम आखले जातात. या ठिकाणीदेखील गुजराती वस्ती जास्त असल्याने तुम्हाला नवरात्रीसाठी लागणाऱ्या विविध वस्तूंमध्ये अधिक व्हरायटी मिळते. बोरीवली पश्चिमेला पूर्ण मार्केटमध्ये तुम्हाला नवरात्रीच्या दिवसात रंगबेरंगी घागरा चोली, चप्पल, दागिने याने सजलेलं दिसेल. नवरात्रीत केवळ मुलीच नाही तर मुलंही जास्त प्रमाणात सजतात. त्यांच्यासाठी लागणारे कपडे आणि दागिने इथे तुम्हाला मिळतात. केडीयू टू पीस, थ्री पिस अथवा फोर पिस मध्येही मिळतात. तसंच कुडत्यांच्या आत घालण्यासाठी लागणारी विविध जॅकेट्स, वर्क केलेली टोपी, रेडिमेड धोतर याचीही व्हरायटी तुम्हाला इथे मिळते.
कसं जायचं – बोरीवली स्टेशनला उतरल्यानंतर चालतच तुम्हाला पश्चिम बाजूला जायचं आहे.
खाण्याचं ठिकाण – खाण्यासाठी तुम्हाला इथे अनेक स्टोअर्स दिसतील. फाफडा, जिलेबी, समोसे, ढोकळा अशा पदार्थांची रेलचेल असणारी बरीच दुकानं तुम्हाला बोरीवली पश्चिमेला स्टेशनजवळच मिळतात.
प्लस साईज कपड्यांची खरेदी करताना लक्षात ठेवा 11 Tips!!!
6. मंगळदास मार्केट (Mangaldas Market)
मंगळदास मार्केट हे कपड्यांसाठी गेल्या कित्येक वर्षांपासून प्रसिद्ध आहे. नवरात्रीसाठीही तुम्ही या ठिकाणाहून कपडे खरेदी करू शकता. इथे नाही आवडले तर काही प्रमाणात तुम्हा क्रॉफर्ड मार्केटमधूनही खरेदी करता येऊ शकते. बोरीवलीप्रमाणेच तुम्हाला इथे तरूण मुलांसाठी खूपच चांगले कपडे मिळतात. तरूणांसाठी काठेवाडी, लॉकेट, टोपा असे पेहराव इथे उपलब्ध आहेत. त्याव्यतिरिक्त धोती आणि त्यावर आखूड अथवा बिनबाह्याची बंडी, गुजराती स्टाईल पेटा असे पारंपरिक कपडेही तुम्हाला मिळतील. ज्यांना टिपीकल पारंपरिक पोशाख आवडत नसतील त्यांच्यासाठी जीन्सवर घालण्यासाठी कुरतेही इथे उपलब्ध आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे याची किंमत अवाजवी नाही.
कसं जायचं – सीएसटी स्टेशनला उतरल्यानंतर शेअर टॅक्सी अथवा टॅक्सी करून तुम्ही जाऊ शकता
खाण्याचं ठिकाण – खाण्यासाठी इथे तुम्हाला खाऊ गल्ली तसंच अनेक हॉटेल्सही उपलब्ध आहेत.
7. नटराज मार्केट, मालाड (Natraj Market, Malad)
मालाडचं नटराज मार्केट हे खास नवरात्रीच्या खरेदीसाठी प्रसिद्ध आहे. अगदी तुम्हाला आवडणाऱ्या साध्या पेहरावापासून ते एखाद्याला आवडणाऱ्या भडक पोशाखांपर्यंत सर्व काही या एकाच मार्केटमध्ये तुम्हाला मिळून जातं. अगदी लहान मुलांसाठीही इथे अनेक कपड्यांच्या व्हरायटी मिळतात. त्याशिवाय या मार्केटमध्ये जास्त उलाढाल असल्यामुळे इथे नवरात्रीसाठी नेहमीच ताजा आणि वेगळ्या प्रकारचा ग्राहकांना उपलब्ध करून दिला जातो असं अभिमानाने इथले दुकानदार सांगतात. शिवाय इथे कोणत्याही गोष्टीसाठी तुम्ही गेलात तर तुम्हाला नकार मिळत नाही. अगदी रात्रीपर्यंत हे मार्केट उघडं असतं.
कसं जायचं – मालाड स्टेशनला उतरल्यानंतर चालत तुम्ही या मार्केटमध्ये जाऊ शकता. केवळ पाच मिनिट्सचा हा रस्ता आहे.
खाण्याचं ठिकाण – खाण्यासाठी इथे तुम्हाला खाऊ गल्ली तसंच अनेक हॉटेल्सही उपलब्ध आहेत. त्यामुळे कितीही शॉपिंग करून दमलात तर इथे तुम्हाला अनेक पर्याय मिळतील.
8. मुलुंड पश्चिम (Mulund West)
मुलुंडला जितकी मराठी वस्ती आहे तितकीच गुजराती वस्ती आहे. त्यामुळे इथेही नवरात्रीसाठी खरेदी करण्यासाठी चांगलं मार्केट उपलब्ध आहे. महागाईमुळे सध्या गरब्याच्या पोशाखांचे भावही वाढले आहेत. एकाच वेळासाठी कशाला पेहराव विकत घ्यायचा असंही बऱ्याच जणांना वाटतं. त्यामुळे बरेच जण भाड्यानेही हा पोशाख घेतात. अशी अनेक भाड्याने कपडे देणारी दुकानंही इथे आहेत. त्यामुळे तुमचा ड्रेस वर्षभर तसाच पडून राहात नाही आणि तुम्हालाही कपडे घालून गरबा खेळायला गेल्याचा आनंद मिळतो.
कसं जायचं – मुलुंड स्टेशनला उतरल्यानंतर पश्चिम बाजूला उतरल्यावर बाहेरच मार्केट सुरु होतं.
खाण्याचं ठिकाण – खाण्यासाठी इथे तुम्हाला अनेक पर्याय आहेत अगदी मॅकडोनाल्डपासून ते हॉटेल्सपर्यंत विविध व्हरायटी तुम्हाला इथे मिळते.
मुंबईत आवर्जून भेट द्यायला हवी अशा फॅशन स्ट्रीट्स
9. इर्ला मार्केट, विलेपार्ले (Irla Maraket, Parle)
विलेपार्ले पश्चिमेला असणारं इर्ला मार्केट हे प्रसिद्ध आहे. तुम्ही दिवसभरात कधीही या मार्केटमध्ये गेलात तर तुम्हाला इथे गर्दीच सापडते. इर्ला मार्केटमध्येही नवरात्रीसाठी लागणाऱ्या सगळ्या वस्तू मिळतात. यामध्ये विविध व्हरायटी असते. फक्त इथे एकच गोष्ट महत्त्वाची आहे ती म्हणजे इथे असणाऱ्या वस्तूंचा भाव. इथल्या वस्तूंचा दर्जा नक्कीच चांगला असतो पण वस्तूंचे भाव थोडे महाग असतात. पण वस्तू चांगल्या असल्यामुळे लोकं इथे खरेदी करायला जास्त प्रमाणात येतात. नवरात्रीचे नऊही दिवस इथे तुम्हाला गर्दी दिसतेच. या ठिकाणी बरीच खरेदी केली जाते. तसंच वर्षभर तुम्हाला इथे कोणत्याही सणासाठी लागणारं सामान मिळतं. त्यामुळे केवळ सणाच्या वेळीच इथे जायला हवं असं नाही. वर्षभरात कधीही येऊन तुम्ही इथे शॉपिंग करू शकता.
कसं जायचं – विलेपार्ले स्टेशनला उतरल्यानंतर इर्ला मार्केटसाठी तुम्हाला रिक्षा मिळते. हे मार्केट पश्चिमेला आहे.
खाण्याचं ठिकाण – विलेपार्ले स्टेशनजवळ अनेक खाण्यासाठी तुम्हाला पर्याय उपलब्ध आहेत. अगदी पावभाजी, चाटपासून ते पिझ्झा पाणीपुरीपर्यंत सगळे पर्याय तुम्हाला इथे उपलब्ध आहेत.
10. गांधी मार्केट (Gandhi Market)
स्वस्त आणि मस्त कपडे मिळण्यासाठी गांधी मार्केट प्रसिद्ध आहे. इथेही तुम्हाला चांगल्या प्रतीचे नवरात्रीसाठी कपडे आणि दागिने स्वस्तात मिळतात. इथे तुम्हाला दुकानदारांशी भावही करता येतो. त्यामुळे कपडे जास्त महाग मिळत नाहीत. सकाळी अकरा नंतर चालू होणारं हे मार्केट साधारण रात्री 9.30 पर्यंत चालू असतं. नवरात्रीच्या दिवसात तर इथे तुफान गर्दी असते. लहान मुलांमुलींचे कपडेही इथे तुम्हाला स्वस्तात मिळतात. ज्यांना टिपिकल पोशाख आवडत नाहीत त्यांच्यासाठी विविध कुरते आणि विविध प्रकारचे कपडे नवरात्रीसाठी इथे मिळतात. दागिने इथे जास्त प्रमाणात मिळत नसले तरीही अगदीच मिळत नाहीत असं नाही. पण तुम्हाला व्हरायटी हवी असेल तर मात्र इथे जास्त प्रमाणात मिळत नाही.
कसं जायचं – हार्बरच्या किंग्ज सर्कल स्टेशनवरून खाली उतरलं की गांधी मार्केट सुरु होतं
खाण्याचं ठिकाण – खाण्यासाठी तुम्हाला इथून जवळ सेंट्रल माटुंगा आहे. या ठिकाणी अनेक साऊथ इंडियन हॉटेल्स खाण्यासाठी पर्याय आहेत.
तुम्हाला आता नवरात्रीचे वेध लागलेच असतील. त्यामुळे लवकरच नवरात्रीच्या खरेदीच्या तयारीला लागा. वाट कसली बघताय. यापैकी कोणत्याही मार्केटमध्ये तुम्हाला तुमच्या आवडीचे कपडे आणि दागिने मिळतील. त्यामुळे मनसोक्त शॉपिंग करायला तयार व्हा.
देखील वाचा –
काय आहेत नवरात्रीचे नऊ रंग, नवरात्रीच्या 9 रंगाचे महत्त्व (Importance Of Navratri Colors)
‘भोंडला’ महाराष्ट्राची संस्कृती जपणारा एक पारंपरिक खेळ (Bhondla In Marathi)