आरोग्य

एकाच महिन्यात दोनदा मासिक पाळी येण्याची कारणे

Trupti Paradkar  |  Aug 25, 2020
एकाच महिन्यात दोनदा मासिक पाळी येण्याची कारणे

महिलांना मासिक पाळीमध्ये अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. वास्तविक महिन्यातून एकदा  येणं ही एक नैसर्गिक गोष्ट आहे. मासिक पाळीचे चक्र 21 ते 35 दिवसांचे असणं हे सामान्य आहे. मात्र जेव्हा मासिक पाळी महिन्यातून एकदा न येता दोन वेळा येते तेव्हा ही एक चिंताजनक नक्कीच गोष्ट आहे. म्हणूनच जर तुम्हालाही अशी समस्या जाणवत असेल तर याची कारणं जरूर जाणून घ्या. कारण एका महिन्यात दोनदा पाळी येण्याची कारणं अनेक असू शकतात. 

ताणतणाव –

आजकालची बदलेली जीवनशैली आणि करिअर, वैयक्तिक आयुष्यात असलेला ताणतणाव मासिक पाळी महिन्यातून दोनदा येण्याचं एक कारण असू शकतात. कारण चिंता, काळजी अती प्रमाणात केल्याने तुमच्या शरीरात स्ट्रेस हॉर्मोन्स अती प्रमाणात निर्माण होतात. ज्यामुळे तुमच्या मासिक पाळीचे चक्र बिघडते. 

Shutterstock

अती लठ्ठपणा –

अती वजन अथवा लठ्ठपणामुळेही तुम्हाला  महिन्यातून दोनदा मासिक पाळी येऊ शकते. एवढंच नाही तर तुम्ही जर वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करत असाल तर जलद गतीने वजन कमी केल्यामुळेही तुम्हाला महिन्यातून दोनदा मासिक पाळी येण्याची शक्यता आहे. 

Shutterstock

थायरॉईड चे असंतुलन –

थायरॉईड ग्रंथीचे असंतुलन ही आजकाल अनेक महिलांना जाणवणारी एक सामान्य समस्या आहे. मात्र या समस्येवर वेळीच उपचार करणं गरजेचं आहे. असं न केल्यास या ग्रंथीचे कार्य बिघडून तुम्हाला  महिन्यातून दोनदा मासिक पाळी येऊ शकते.  हायपोथायरॉईड अथवा हायपर थायरॉईड अशा दोन्ही समस्या असलेल्या महिलांना  हा त्रास जाणवू शकतो. 

मॅनोपॉज –

मॅनोपॉज अथवा रजोनिवृत्ती हा महिलांच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. या काळात एक ते दोन वर्षात महिलांना पाळी येणं हळू हळू बंद होतं आणि नंतर मासिक पाळी कायमस्वरूपी येत नाही. मात्र मासिक पाळी येणं कायमस्वरूपी बंद होण्यापूर्वी महिलांना मॅनोपॉजला सामोरं जावं लागतं. रजोनिवृत्तीचा काळ जवळ येऊ लागला की महिलांमध्ये अनेक शारीरिक आणि मानसिक बदल होतात. यामध्ये एका महिन्यात दोनदा पाळी येण्यापासून सहा महिने एक वर्षातून एकदाच पाळी येणं अशा अनेक गोष्टी असू शकतात.

Shutterstock

किशोर वयीन मुली –

मुली जेव्हा किशोर वयात पदार्पण करतात तेव्हा मासिक पाळीला सुरूवात होते. कधी कधी या काळातही सुरूवातीचे काही महिने तरूणमुलींना महिन्यातून दोनदा मासिक पाळी येऊ शकते. कारण त्यांच्या शरीरात नव्याने होणारा हा बदल अथवा हॉर्मोन्सची निर्मिती यासाठी कारण असू शकते. मात्र हा काळ तात्पुरता असून काही महिन्यांमध्ये मासिक पाळीचे चक्र सुरळीत सुरू होते. त्यामुळे या काळात जर तरूण मुलींना महिन्यातून दोनदा पाळी आली तर ही कोणताही गंभीर समस्या नक्कीच नाही. 

गर्भनिरोधक औषधांचा अती वापर केल्यामुळे –

ज्या महिला गर्भधारणा होऊ नये यासाठी गर्भनिरोधक औषधे घेतात त्यांना महिन्यातून दोनदा पाळी येण्याची समस्या जाणवू शकते. कारण अती  प्रमाणात गर्भनिरोधक गोळ्या अथवा औषधे घेतल्यामुळे त्यांचे गर्भाशय कमजोर होते आणि त्यांना हा त्रास जाणवतो. यासाठीच जर तुम्ही गर्भनिरोधक घेत असाल आणि तुम्हाला महिन्यातून दोनदा पाळी येत असेल तर तज्ञ्जांचा सल्ला अवश्य घ्या.

Shutterstock

पीसीओडी अथवा फायब्रॉईडची समस्या असणे –

पीसीओडी, पीसीओएस, फायब्राईड या मासिक पाळीला असंतुलित करणाऱ्या आरोग्य समस्या आहेत. जर तुम्ही या आरोग्य समस्यांमुळे त्रस्त असाल तर यामुळे तुमचे मासिक पाळीचे चक्र बिघडून तुम्हाला महिन्यातून दोनदा मासिक पाळी येण्याचा त्रास जाणवू शकतो. 

मासिक पाळीचे चक्र सुधारण्यासाठी आणि मासिक पाळी महिन्यातून एकदाच येणं पुन्हा सुरळीत होण्यासाठी जीवनशैलीत बदल करा, योग्य आहार घ्या, आनंदी राहा आणि वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या. 

फोटोसौजन्य – शटरस्टॉक

अधिक वाचा –

मासिक पाळीच्या काळात आनंदी राहण्यासाठी फॉलो करा या सोप्या टिप्स

मासिक पाळी लवकर येण्यासाठी सोपे उपाय

मासिक पाळी पुढे ढकलण्यासाठी नैसर्गिक घरगुती उपाय

Read More From आरोग्य