खाणंपिण आणि नाइटलाईफ

आहारात मीठाचा वापर कमी करण्यासाठी सोप्या टिप्स

Trupti Paradkar  |  Nov 18, 2020
आहारात मीठाचा वापर कमी करण्यासाठी सोप्या टिप्स

मीठाने जेवणाला एक छान चव येते. मात्र मीठ नेहमी चवीपुरतंच वापरावं कारण अती मीठ अन्नातून सेवन केल्याने शरीरावर दुष्परिणाम होऊ शकतात. अती मीठ खाण्यामुळे तुम्हाला रक्तदाबाचा त्रास होऊ शकतो. एवढंच नाही तर यामुळे किडनीच्या समस्यादेखील निर्माण होऊ शकतात. अती मीठामुळे तुमची प्रतिकार शक्ती कमी होते यासाठीच जेवणात मीठ वापरताना या गोष्टींचा जरूर विचार करा. मीठ शरीरासाठी अपायकारक की फायदेशीर याबाबत आतापर्यंत अनेक संशोधने करण्यात आली आहेत. त्यापैकी सर्वच संशोधनात असं आढळून आलं आहे की अती प्रमाणात मीठ खाण्यामुळे आरोग्यावर घातक परिणाम होतात. 

अती मीठामुळे शरीरावर होणारे दुष्परिणाम –

माणसाच्या शरीराला सोडियमची गरज असते आणि मीठातून ही सोडीयमची गरज भागवली जात असते. मात्र जर हे प्रमाणात अती झालं तर त्याचा शरीरावर दुष्परिणाम होऊ लागतो. यासाठीच डॉक्टर नेहमी मीठाचे पदार्थ कमी खाण्याचा सल्ला देतात. सोडियमचे प्रमाण शरीरात वाढल्यामुळे रक्तप्रवाह वाढतो. अती रक्तप्रवाहाचा तुमच्या ह्रदय आणि रक्तवाहिन्यांवर दाब येऊन तुम्हाला हायपरटेंशन अथवा अती रक्तदाबाचा त्रास जाणवू लागतो. अती रक्तदाबामुळे पुढे ह्रदयविकाराचा झटका येण्याची शक्यता असते. सोडियमचा अतीसाठा शरिरात झाल्यामुळे तुमच्या किडनीमध्ये स्टोन निर्माण होतात. मूतखडा आणि किडनीच्या समस्या या अती मीठ खाण्यामुळे निर्माण होत असतात. अती मीठामुळे तुमचे वजन वाढू लागते. ज्यामुळे तुम्ही अती लठ्ठ दिसू लागता. 

Shutterstock

मीठाचा वापर करताना कोणत्या गोष्टी ठेवाव्या लक्षात –

स्वयंपाक करताना मीठाचा वापर फक्त चवीपुरताच करावा. जर तुम्हाला खाद्यपदार्थांवर वरून मीठ घालून खाण्याची सवय असेल तर ती त्वरीत थांबवा. याचप्रमाणे फूड सेफ्टी अॅंड स्टॅंडर्ड ऑथोरिटी ऑफ इंडिया अर्थात एफएसएसएआय ( FSSAI) ने अन्नपदार्थांमध्ये मीठ घालुन खाण्याबाबत काही महत्त्वाचे उपाय सांगितले आहेत. हे उपाय अथवा टिप्स फॉलो करूनदेखील तुम्ही आजारपणापासून दूर राहू शकता.

जर तुम्हाला अन्नपदार्थांमध्ये वरून मीठ टाकून खावेसे वाटत असेल तर मीठाला चांगले पर्याय शोधा, जसे की, आमचूर पावडर, लेमन पावडर, काळीमिरी पावडर, ओवा, ऑरर्गेनो अशा गोष्टी वापरा. ज्यामुळे तुम्हाला मीठ खाण्याची इच्छा कमी होईल आणि  तुमचा खाद्यपदार्थही चविष्ट होईल.

स्वयंपाक करताना सतत थोडे थोडे  मीठ टाकून पदार्थ करू नका. त्याऐवजी सर्वात शेवटी अन्नात मीठ घाला. ज्यामुळे तुमचा मीठाचा वापर नक्कीच कमी होऊ शकतो.

जेवताना पापड, लोणचे, चटणी, सॉस, साठवलेले पदार्थ कमी खा. कारण अशा पदार्थांमध्ये ते साठवून ठेवण्यासाठी अती प्रमाणात मीठ वापरलेलं असतं. जेवताना असे पदार्थ नियमित खाण्यामुळे तुमच्या शरीरात मीठाचे प्रमाण वाढतं. 

पोळी, भाकरी, भात, डोसा, पुरी अशा पदार्थांमध्ये मीठाचा वापर करणं पू्र्णपणे कमी करा. कारण त्यासोबत खाल्या जाणाऱ्या भाजी, डाळ. चटणीमध्ये मीठ असतंच. सर्वच पदार्थ मीठाचे असतील तर तुमच्या अन्नातील मीठाचे प्रमाण वाढणं सहाजिक आहे. यासाठी काही पदार्थांमध्ये जाणिवपू्र्वक मीठ घालणं बंद करा. 

फोटोसौजन्य – 

अधिक वाचा –

हिवाळ्यात ही हंगामी फळं खाण्यामुळे पडणार नाही आजारी, जाणून घ्या फायदे

दिवाळीत मिठाई खाऊन वजन वाढले असेल तर आता असे ठेवा डाएट

भाताने वाढणार नाही वजन,जाणून घ्या शिजवण्याची योग्य पद्धत

Read More From खाणंपिण आणि नाइटलाईफ