कोकणात या दिवसात काजू काढले जातात. काजूची फळं वेगळी करुन काजूच्या हिरव्या बिया काढल्या जातात. या बिया भाजल्यानंतर त्यातून काजूचे गर काढले जातात. पण या काजूच्या बिया न भाजता त्या त्यातून कच्च्या काजूचे गर काढले जातात. त्याला ओले काजू असे म्हटले जाते. भाजलेल्या आणि खाण्यासाठी पूर्णपणे तयार असलेल्या काजूची चव आणि ओल्या काजूची चव ही फारच वेगळी लागते. आता तुम्हाला ओले काजू मिळाले नाहीत. तर तुम्ही तुमच्याकडे असलेले काजू भिजवूनही या रेसिपी करु शकता.पण तुम्हाला ओले काजू मिळाले तर या रेसिपी अगदी हमखास करुन पाहा.
मी घरी बनवल्या बाजारापेक्षाही चांगल्या पाणीपुरीच्या पुऱ्या, जाणून घ्या
कोकणी पद्धतीची ओल्या काजूची उसळ
कोकणात काजू काढल्यानंतर अगदी हमखास काजूची उसळ केली जाते. कोकणात कांदा- खोबऱ्याचे वाटप वापरुन ही भाजी करतात.
साहित्य: 1 वाटी स्वच्छ केलेले ओले काजूगर, 1 वाटी खवलेले ओले खोबरे, 1 कांदा, एक मोठा चमचा आलं-लसूण पेस्ट, 1चमचा गरम मसाला, 1 चमचा लाल तिखट किंवा घरी रोजच्या वापरातील मालवणी मसाला, चवीपुरतं मीठ, फोडणीसाठी कडीपत्ता, अर्धा बारीक चिरलेला कांदा
कृती:
- तव्यावर तेल गरम करुन त्यात उभा चिरलेला कांदा, खोबरं, भाजून घ्यावे.
- भाजलेल्या कांद्याखोबऱ्याचे बारीक वाटप करुन घ्यावे. (या वाटपामध्ये तुम्ही लाल तिखट घातले तरी चालेल)
- एका कढईत तेल गरम करुन त्यामध्ये कडीपत्ता, कांदा, आलं-लसूण पेस्ट छान परतून घ्यावी. त्यात वाटलेले कांदा खोबऱ्याचे वाटप घालावे. ते छान तेलावर परतून त्यात पाणी घालावे.
- काजूचे गर घालून परतावे. त्यात गरम मसाला, मीठ घालून उकळी येऊ द्यावी.
- ओल्या काजूचे गर शिजायला फार फार 10 मिनिटे लागतात.आता तुम्हाला ग्रेव्ही कशी हवी त्यानुसार त्यातील पाणी आटू द्यावे.
- तयार काजूच्या उसळीवर मस्त कोथिंबीर भुरभुरावी.
चैत्र महिन्यात एकदा तरी करा चटकदार आंबे डाळ/ कैरी डाळ
ढाबा स्टाईल काजूची भाजी
आता जर तुम्हाला थोडी वेगळ्या पद्धतीची काजूनची भाजी करायची असेल तर तुम्ही थोड्या वेगळ्या पद्धतीने काजूची भाजी करु शकता. याची एक बेस्ट रेसिपी पाहुया.
साहित्य: 1 वाटी काजू, 3 टोमॅटो, ½ इंच दालचिनीचा तुकडा, 4 ते 5 लवंग, 2 ते 3 सुक्या लाल मिरच्या, तेल, ½ चमचा जीरं, 1 बारीक चिरलेला कांदा, 1 चमचा लाल तिखट, 1 मोठा चमचा धणे-जीरे पूड, 1 चमचा गरम मसाला, कसुरी मेथी, आलं-लसूण पेस्ट, मीठ, 1 मोठा चमचा बटर, 1 मोठा चमचा क्रिम
कृती:
- सगळ्यात आधी एका मिक्सरच्या भांड्यात 3 चिरलेले टोमॅटो, काही काजूचे तुकडे, दालचिनी, लवंग, सुक्या लाल मिरच्या घेऊन त्याची छान पेस्ट करुन घ्या. ही पेस्ट आपण ग्रेव्हीसाठी वापरणार आहोत.
- एका कढईत तेल गरम करुन त्यामध्ये जीरं छान तडतडू द्या. त्यात बारीक चिरलेला कांदा घालून परतून घ्या.
कांदा थोडा नरम झाला की, त्यामध्ये आलं लसूण परतून घ्या. - कांदा आणि आलं-लसूण छान परतल्यानंतर त्यात धणे- जीरे पूड, कसुरी मेथी, गरम मसाला घालून छान एकजीव करा.
- मसाले छान शिजल्यानंतर त्यामध्ये तयार केलेली टोमॅटो पेस्ट घाला.
- दुसरीकडे तव्यावर तेल गरम करुन त्यात काजू छान तळून घ्या. ( तुमच्याकडे ओले काजू नसतील तर साधे काजू घेऊन तुम्ही त्यांना भिजवा. नंतर त्याला छान कमी तेलात तळून घ्या.)
- मसाल्याला तेल सुटल्यानंतर त्यात काजू घाला. त्यात आवश्यकतेनुसार पाणी घालून एक- दोन उकळ्या काढून घ्या.
सगळ्यात शेवटी एक मोठा चमचा बटर आणि क्रिम घालून एकत्र करा. - वरुन छान कोथिंबीर भुरभूरा. काजूची भाजी तयार
ओल्या काजूची आमटी
साहित्य: 1 वाटी ओले काजू, 1 वाटी खोबरं, 1 बारीक चिरलेला कांदा, उकडलेला बटाटा, धणे-जीरे पावडर, बारीक चिरलेला टोमॅटो, खसखस, बेडगी मिरची, बडीशेप, काळीमिरी, स्टारफूल, तमालपत्र, लवंग, हळद, मीठ, हिरव्या मिरच्या
कृती:
- एका पॅनमध्ये तेल गरम करुन त्यात सगळा खडा मसाला परतून घ्यावा.
- त्यात धणे -जीरे पूड, अर्धा वाटी कांदा, अर्धा वाटी टोमॅटो, एक वाटी ओलं खोबरं, मिरची आवश्यक असल्यास सगळं परतून घ्यायचं आहे.
- तयार मसाला काढून तो थंड करुन याचे छान वाटप करुन घ्या.
- कढईत तेल गरम करुन शिल्लक राहिलेला कांदा, टोमॅटो फोडणीत घाला. तयार वाटप यात घालून चांगले एकजीव करा.
- आता यामध्ये आपण काजू घालून हळद, लाल तिखट, मीठ घालून हे सगळं छान उकळ येईपर्यंत ठेवा.
- जर तुम्हाला आंबटपणा हवा असेल तर त्यात लिंबाचा रस घाला. सगळ्यात शेवटी उकडलेला बटाटा त्यात घाला.
शेवटी कोथिंबीर घालून सर्व्ह करा.
तुम्ही बनवलेले कांदे पोहे होतील परफेक्ट तेही दोन मिनिटात, वाचा कसे
ओल्या काजूचे मोवला
साहित्य: 1 वाटी काजू, ½ कप खवलेला नारळ, गूळ (चवीनुसार), वेलची पूड
कृती:
- खोबरं आणि गूळ एकत्र करुन कढईमध्ये शिजवायला घ्या.
- या रेसिपीसाठी तुम्हाला तेल किंवा तूप घालायची काहीच गरज नाही.
- गूळ वितळायला लागले की, त्यामध्ये ओल्या काजूचे गर घाला.
- थोडासा पाण्याचा हबका देऊन खोबरे छान शिजवून घ्या. त्यात वेलची पूड घाला.
- तुमचे मस्त गोडं काजूचे मोवला तयार
ओल्या काजूचे काप /चिक्की
साहित्य: ओले काजू, गूळ किंवा साखर, ओलं खोबरं एक वाटी, तूप
कृती:
- काजू छान स्वच्छ करुन शिजवून घ्या.
- एका भांड्यात तूप गरम करुन त्यात गूळ आणि खोबरं शिजवायला ठेवा ( खोबऱ्याचे काप करण्यासाठी आपण ज्या पद्धतीने ते शिजवतो अगदी तसेच)
- त्यात काजू घालून ते छान एकजीव करुन घ्या. चवीला वेलची पूड घाला.
- एका ताटाला तूपाचा हात लावून हे मिश्रण छान थापून घ्या. आणि याचे काप करा.
मग नक्की करुन पाहा काजूच्या या काही रेसिपीज आणि आम्हालाही कळवा त्या नक्की कशा झाल्यात