‘गरे घ्या गरे पोटाला बरे’ फणसाबद्दल बोलली जाणारी ही ओळ सगळ्यांनाच माहीत असेल. रसाळ आणि कापा असे फणसाचे गरे चवीला जितके चांगले लागतात. तितक्याच त्याच्या बिया म्हणजे आठल्या या देखील उकडून किंवा भाजून खाल्ल्या जातात. या शिवाय डाळीत किंवा भाजीतही याचा उपयोग केला जातो. पण एखादे सिझनल फळ खाताना त्याचे नक्कीच काही वेगळे फायदे असतात. फणसांच्या बियांबाबतीतही अगदी तसेच आहे. त्यामुळे फणसांच्या बियांचे फायदे जाणून घेणे गरजेचे आहे. फणसांच्या बियाचे हे फायदे वाचाल तर तुम्हाला नक्कीच आहारात याचा समावेश करण्याची इच्छा होईल. आरोग्यासाठी फणसाचे फायदे देखील होतात.
गरोदरपणात होणाऱ्या बद्धकोष्ठता घरगुती उपाय – Constipation During Pregnancy
इन्स्टंट एनर्जी
फणसाच्या बिया खाल्ल्यामुळे शरीराला इन्स्टंट एनर्जी मिळते. फणसाच्या बिया उकडून किंवा भाजून खाल्या तर त्या शरीराला लगेचच आधार देतात. शरीरामध्ये प्रोटीनची कमतरता असेल तर ही कमतरता देखील फणसांच्या आठल्यांमुळे भरुन निघते. त्यामुळे प्रोटीनचा योग्य साठा म्हणून तुम्ही फणसांच्या बिया नक्कीच खा.
शारीरिक वाढीसाठी चांगले
लहान मुलांना फणसांच्या बिया खायला दिल्यामुळे त्यांच्या शरीराची वाढ चांगली होते. शिवाय त्यांची मानसिक वाढही चांगली होण्यास मदत मिळते. लहान मुलांना फणसांच्या बिया उकडून किंवा डाळीतूनही देऊ शकता. त्यामुळे त्याच्या शरीराची वाढ होतेच पण त्यामध्ये असलेल्या अन्य घटकांमुळे मेंदूची वाढ होण्यासही मदत मिळते.
पचनशक्ती करते चांगली
पचनक्रिया सुरळीत आणि चांगली करण्यासाठी फणसांच्या बिया या फारच फायदेशीर असतात. जर तुम्ही त्याचे सेवन केले तर तुमचे पोटाचे आरोग्य चांगले राहते. फणसांच्या बियांमध्ये डाएटरी फायबर असते. हे डाएटरी फायबर पोटाचे कार्य चांगले करते आणि बद्धकोष्ठतेसारख्या पोटांच्या त्रासापासून तुम्हाला दूर ठेवते.
हाडांना मिळते बळकटी
फणसांच्या बियांमध्ये मॅग्नीज, मॅग्नेशिअमसारखे घटक असतात. जे हाडांच्या बळकटीसाठी फारच चांगले असतात. जर हाडांना मजबुती मिळावी असे तुम्हाला वाटत असेल आणि शरीरात कॅल्शिअम वाढवण्यासाठी तुम्ही आहारात नॉन व्हेज खात नसाल तर तुम्हाला यामधूनही कॅल्शिअम मिळू शकते.
हे खाद्यपदार्थ एकत्र खाण्यामुळे कमी होऊ शकते प्रतिकारशक्ती, वेळीच व्हा सावध
आठवल्यांची रेसिपी
जर तु्म्हाला फणसांच्या बिया किंवा आठल्या उकडून खायच्या नसतील तर तुम्ही भाजी किंवा डाळीतही ती घालू शकता. जर तुम्ही सुकट खात असाल तर त्यामध्ये फणसाची बी खूपच चविष्ट लागते.
साहित्य: १ कप सुका जवळा, १ कांदा, १ टोमॅटो, लाल तिखट, हळद, आलं-लसूण पेस्ट, मीठ, गरम मसाला, तेल, कडिपत्ता
कृती:
- जवळा तव्यावर छान खरपूस भाजून घ्या, फणसाच्या बिया उकडून त्याची साल काढून घ्या.
- कढईत तेल गरम करुन कडिपत्त्याची फोडणी द्या. त्यामध्ये आलं-लसूण पेस्ट आणि कांदा घालून परतून घ्या.
- कांदा चांगला परतला की, त्यामध्ये हळद, तिखट घालून टोमॅटो घाला. त्याला चांगले तेल सुटले की, त्यामध्ये फणसांच्या बिया ठेचून किंवा बारीक करुन घाला. त्यामध्ये सुका जवळा घालून छान एकजीव करा. तुमची मस्त चटपटीत आणि झणझणीत रेसिपी तयार
आता आहारात नक्की वेगवेगळ्या पद्धतीने फणसांच्या बियांचा समावेश करा.