एकता कपूर हे नाव टीव्ही इंडस्ट्री आणि बॉलीवूड या दोन्ही क्षेत्रांसाठी नवं नाही. एकताने अनेक कलाकारांना टीव्ही मालिकांमधून लाँच केलं आणि त्यांना नावही मिळवून दिलं. यापैकी काही कलाकारांनी आपलं नशीब बॉलीवूडमध्येही आजमावलं. या कलाकारांनी बॉलीवूडमध्येही आपलं एक स्थान पक्कं केलं आहे. इतकंच नाही तर या कलाकारांनी बॉलीवूडही गाजवलं. एकताने त्यांना दिलेल्या संधीचं सोनं करत त्यांनी पुढे आपलं नशीब बॉलीवूडमध्ये आजमावलं आणि नाव कमावलं. असं असलं तरीही आजही हे कलाकार एकता कपूरला खूपच मानतात. अशीच काही कलाकारांची नावं आहेत जी आज आपण जाणून घेणार आहोत.
विद्या बालन
विद्या बालनने आपल्या करिअरची सुरुवात केली ती एकता कपूरच्या ‘हम पाँच’ या कॉमेडी मालिकेतून. ही मालिका खूपच गाजली. यातली प्रत्येक व्यक्तिरेखा आणि कलाकार आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. पण त्यातही या मालिकेत विद्या बालनने साकारलेली राधिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. विद्या बालनने ‘परिणिता’मधून बॉलीवूडमध्ये धमाकेदार प्रवेश केला आणि आतापर्यंत ती बॉलीवूड गाजवत आहे. याच महिन्यात तिचा ‘मिशन मंगल’ हा अक्षयकुमारबरोबरील चित्रपट प्रदर्शित होणार आहे. विद्या आणि एकता या दोघीही चांगल्या मैत्रिणी आहेत. तसंच एकता कपूरने निर्मिती केलेला ‘डर्टी पिक्चर’ या चित्रपटातील कामासाठी विद्या बालनला अनेक पुरस्कारही मिळाले. विद्या अनेकदा अनेक कारणांसाठी ट्रोल झाली पण तिने तिच्या अभिनयाने सर्वांचीच तोंडं बंद केली आणि एकता कपूरची निवड योग्य असल्याचं दाखवून दिलं.
सुशांत सिंह राजपूत
सुशांत सिंह राजपूतला पहिला ब्रेक मिळाला तो एकता कपूरच्या ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेतून. या मालिकेतील मानव ही व्यक्तिरेखा सुशांतला वैयक्तिक आयुष्यातही बरंच काही देऊन गेली. या मालिकेतून सुशांत आणि अंकिता लोखंडे ही जोडी खूपच गाजली. इतकंच नाही तर दोघेही बरेच वर्ष नात्यात होते. एकताने अशा अनेक जोड्याही बनवल्या. त्यापैकी काहींची लग्न झाली तर काही जोड्या वेगळ्या झाल्या. सुशांतने ‘काय पो छे’ या चित्रपटाद्वारे बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं आणि त्याने कधीही मागे वळून पाहिलं नाही. आजही सुशांत सिंह राजपूतकडे अनेक चित्रपट आहेत. सुशांतदेखील बॉलीवूडमध्ये स्टार ठरला. त्याने अनेक वेगवेगळे चित्रपट केले. त्याच्या अभिनयाने त्याने प्रेक्षकांचं मन जिंकलं. त्याचे अनेक अभिनेत्रींसह नावही जोडलं गेलं. पण त्यामुळे त्याला कधीच काही फरक पडला नाही. एकता कपूरची निवड त्यानेही सिद्ध करून दाखवली.
अंकिता लोखंडे
अंकिता लोखंडे खरं तर एका रियालिटी शो मधून पुढे आली. पण तिलादेखील ब्रेक दिला तो एकता कपूरने. ‘पवित्र रिश्ता’ मधील अंकिताने साकारलेली अर्चना आजही प्रेक्षकांच्या मनातून गेलेली नाही. इतकंच नाही तर बरेच प्रेक्षक आजही अंकिताला अर्चना याच नावाने ओळखतात. अंकितानेही आता बॉलीवूडमध्ये आपला जम बसवला आहे. अंकिताने सुशांतबरोबर ब्रेकअप झाल्यानंतर आपल्या करिअरकडे जास्त लक्ष केंद्रीत केलं. आता अंकिता आयुष्यात पुढे निघून गेली असून लवकरच उद्योगपती विकी जैनबरोबर ती लग्न करणार असल्याचीही चर्चा आहे. अंकिता नेहमीच एकताबरोबर दिसते.
मौनी रॉय
मौनी रॉय हे सध्या हॉट नाव झालं आहे. मौनीला दहा वर्षांपूर्वी एकताने ‘क्योंकी सास भी कभी बहू थी’ या मालिकेतून ब्रेक दिला. त्यानंतर मौनीने अनेक मालिकांमध्ये काम केलं. पण तिला खरी ओळख मिळवून दिली ती एकता कपूरच्याच ‘नागिन’ या मालिकेने. त्यानंतर तिला ‘गोल्ड’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये ब्रेक मिळाला. आता मौनीसुद्धा बॉलीवूडमधील एक प्रसिद्ध नाव आहे. असं असलं तरीही मौनी नेहमीच एकता कपूरबरोबर तिच्या प्रत्येक कार्यक्रमादरम्यान सोबत असते. मौनी ही एकताची चांगली मैत्रीण आहे आणि एकता तिला नेहमीच साथ देते असंही दिसून आलं आहे.
मृणाल ठाकूर
एकता कपूरच्या ‘कुमकुम भाग्य’ या मालिकेतून ओळख मिळालेला चेहरा म्हणजे मृणाल ठाकूर. मृणाल ठाकूरने अनेक मालिकांमधून काम केल्यानंतर ‘लव्ह सोनिया’ या चित्रपटातून तिने बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं. नुकताच हृतिक रोशनबरोबरचा ‘सुपर 30’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. मृणालनेही आता बॉलीवूडमध्ये जम बसवायला सुरूवात केली आहे. एकताच्या मालिकेतून मृणालने एक्झिट घेतल्यानंतर तिला काही भविष्य आहे की नाही अशीच चर्चा होती. पण आपल्या अभिनयाच्या जोरावर मृणालही आता बॉलीवूडमध्ये स्थिरावू लागली आहे.
पुलकित सम्राट
पुलकित सम्राट हे नावदेखील नवं नाही. पण बऱ्याच जणांना याची कल्पना नसेल की, एकता कपूरच्या मालिकेतून पुलकितने आपल्या करिअरला सुरुवात केली. एकताने त्याला ब्रेक दिला होता. त्यानंतर पुलकितने आपलं नशीब बॉलीवूडमध्ये आजमावलं आणि त्याला चांगलं यश मिळालं. पुलकितने आपल्या अभिनयाने अनेकांचं मन जिंकून घेतलं आहे.
प्राची देसाई
प्राची देसाईने ‘कसम से’ या एकता कपूरच्या मालिकेतून टीव्ही इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केलं. प्राची त्यावेळी बरीच लहान होती. पण एकता कपूरवर विश्वास ठेवून तिने हा निर्णय घेतला आणि तिला एक वेगळा मार्ग मिळाला. प्राचीने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचं मन जिंकून घेतलं असलं तरी तिला हा विश्वास एकता कपूरनेच दिला. त्यानंतर तिने ‘रॉक ऑन’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं आणि नंतर बऱ्याच चित्रपटातून काम करत बॉलीवूडमध्येही आपल्या अभिनयाची छाप सोडली.
हेदेखील वाचा
‘रब’ने नाही तर एकताने बनवली जोडी, आता करत आहेत सुखाचा संसार
राणी मुखर्जीच्या ‘हिचकी’ चित्रपटाला इटलीतील ग्रॅफन पुरस्कार
सुश्मिता सेननंतर तिच्या भावाच्या नात्यात दुरावा,प्रसिद्धीसाठीचा हा दिखावा