हिवाळा सुरू झाल्यावर अनेक वेळा आपल्या कानावर नाव येते ते म्हणजे ‘पोपटी’. अनेकांकडून गावाकडे होणाऱ्या पोपटी पार्ट्यांविषयीदेखील ऐकले जाते. काही जणांना याबाबत माहीत आहे तर काही जणांना याची अजिबातच कल्पना नाही. पण पोपटी पार्टीची मजाच काही वेगळी आहे. विशेषतः कोकणातील लोकांना आणि त्यातही रायगड जिल्ह्यातील लोकांना याबाबत अधिक माहिती आहे. पोपटी म्हणजे काय आणि पोपटी रेसिपी (Popti Recipe In Marathi) काय असते अर्थात पोपटी कशी बनवायची याबाबत आपण जाणून घेऊया.
पोपटी म्हणजे काय? (रायगडच्या संस्कृतीतील एक आद्य प्रकार)
पोपटी म्हणजे काय नक्की? असा प्रश्न अनेकांना पडतो. रायगड जिल्हाच्या संस्कृतीतील आद्य प्रकार म्हणजे पोपटी. वालाच्या शेंगा या भांबुर्डीच्या पाल्यात एका विशिष्ट मडक्यामध्ये चुलीवर विशिष्ट पद्धतीने शिजविण्यात येतात. त्यामध्ये शाकाहारी आणि मांसाहारी पोपटी असे दोन्ही प्रकार असतात. पण सहसा मांसाहारी पोपटी अधिक प्रमाणात खाल्ली जाते. भाजीपाल्यासह यामध्ये अंडी, चिकन घालून या पोपटीचा स्वाद अधिक वाढविण्यात येतो. हिरव्यागार भाज्यांमुळे याला पोपटी रंग येतो आणि म्हणूनच याला पोपटी असे म्हटले जाते. विदर्भ आणि खानदेशामध्ये ज्वारी आणि बाजरीची कणसे भाजून हुर्डा तयार करण्यात येतो. थंडीच्या दिवसात इथे हुर्डा पार्ट्या चालतात. त्याचप्रमाणे कोकणात गावठी वालाच्या शेंगांची पोपटी ही अत्यंत प्रसिद्ध आहे.
शेतात अथवा शेताबाहेर पोपटी पार्टी करण्यात येते. आपल्या जवळच्या व्यक्तींच्या सहवासात गप्पा गोष्टींमध्ये या पार्टी करण्यात येतात. पोपटी पार्टीमध्ये धमाल आणि रंगत असते. शिवाय या पोपटीची चव अत्यंत चविष्ट असून अनेकांना याचा स्वाद कायम लक्षात राहातो. पोपटी बनविण्याची एक विशिष्ट पद्धत आहे (Popati Recipe In Marathi). सर्वात महत्त्वाचं म्हणजे या पोपटीमधील वालाच्या शेंगा तुम्हीही कितीही खाल्ल्यात तरीही त्या तुमच्या पोटाला आणि शरीराला अजिबातच बाधत नाहीत. यामध्ये गावठी शेंगांचा अधिक वापर करण्यात येतो. पोपटी कशी बनवायची (Popati Mahiti Marathi) ते आपण जाणून घेऊया.
अधिक वाचा – तोंडाला पाणी आणणारे अप्रतिम तांदळाचे पदार्थ (Rice Recipes In Marathi)
पोपटी कशी बनवायची? (Popti Recipe In Marathi)
पोपटी कशी बनवायची (How to make Popti) याबाबत तुम्हाला माहीत आहे का? पोपटीमध्ये सर्वात जास्त वापर होतो तो म्हणजे भांबुर्डीच्या पाल्याचा. पावसाळ्यानंतर हा पाला माळरानामध्ये उगवलेला मिळतो. तर आपल्याकडे वसईवरूनही हा पाला येतो. या भांबुर्डीमध्ये औषधी गुणधर्म आढळतात. पोपटीमध्ये हा पाला जेव्हा घातला जातो तेव्हा पाणी नसतानाही शेंगा चांगल्या शिजतात. तसंच याचा आणि शेंगांचा एकत्र स्वाद हा खूपच मस्त लागतो.
साहित्य
- गावठी वालाच्या शेंगा
- भांबुर्डीचा पाला
- चिरलेला कांदा
- बटाटा सालासकट कापून
- अंडी
- मसाला लावलेले चिकन
- ओवा
- जाडे मीठ
- मातीचे मडके
बनविण्याची पद्धत
- मातीचे मडके घ्या. त्यात तळाला भांबुर्डीच्या पाल्याचा थर लावा आणि मग त्यावर शेंगांचा थर लावा
- त्यावर अंडी, बटाटे, कांदे आणि पुन्हा शेंगांचा थर लावा आणि मग जाडे मीठ आणि ओवा चवीनुसार पसरवा
- पुन्हा त्यावर शेंगांचा थर लावा आणि इतर साहित्यही टाका, सर्व व्यवस्थित थर लागले की मडक्यातील सर्व पदार्थ नीट बसतील असे हलवून घ्या
- त्यानंतर वरून भांबुर्डीच्या पाल्याने मडक्याचे तोंड बंद करा आणि तुम्ही चूल पेटवून त्यावर मडके ठेवा. मडके नसल्यास, तुम्ही पत्र्याच्य डब्याचाही वापर करू शकता. मात्र मातीच्या मडक्यात याची चव अधिक चांगली होते. चांगली धग लागण्यासाठी मडक्यावर गोणपाट टाका. सर्वात महत्त्वाचे म्हणजे मडक्याला सर्व बाजूने धग मिळण्याची गरज आहे
- साधारण अर्धा ते पाऊण तास तुम्हाला हे ठेवावे लागते. पोपटी शिजली आहे की नाही हे कळण्यासाठी वरून पाण्याचे दोन – तीन थेंब टाकावे. लगेच गायब झाल्यास पोपटी शिजली असे समजण्यात येते
- यानंतर मडके उचलून गोणपाटावर उलटे करावे आणि मग सर्व साहित्य काढून पटकन दडपवून घ्यावे
- आता गरमागरम पोपटी खाण्यासाठी तयार
अधिक वाचा – हिवाळ्यात बनवा गरमागरम सूप, खास रेसिपी
पोपटी रेसिपी चे प्रकार (Types Of Popti Recipe in Marathi)
पोपटीचे दोन ते तीन प्रकार आहेत. आपण त्याचीही रेसिपी (popti recipe in marathi) जाणून घेऊया. अगदी पारंपरिक पोपटी कशी बनवायची आणि त्याची बेसिक रेसिपी आपण जाणून घेतली. आता त्यामध्ये अजून कशाप्रकारे पोपटी बनवता येते ते पाहूया.
अधिक वाचा – संध्याकाळच्या नाश्त्यासाठी बनवा असा चटपटीत मेन्यू
कोकण स्टाईल शाकाहारी पोपटी रेसिपी
कोकण म्हटलं की खोबरं आलंच. कोकण स्टाईल शाकाहारी पोपटी रेसिपी नक्की कशी करायची घ्या जाणून.
साहित्य
- दोन ते तीन किलो वालाच्या शेंगा
- बटाटे अर्धा किलो
- भांबुर्डीचा पाला
- कांदे आणि वांगी (तुमच्या आवडीनुसार) अर्धा किलो
- खवलेले ओले खोबरे
- तिखट
- गोडा मसाला
- मीठ
- जाडे मीठ
- ओवा
बनविण्याची पद्धत
- सगळ्यात आधी मडकं, शेंगा आणि भांबुर्डीचा पाला या तिन्ही गोष्टी नीट धुवा आणि पाणी निथळू द्या
- मडक्याच्या तळाशी सर्वात आधी भांबुर्डीच्या पाल्याचा व्यवस्थित थर लावा. त्यावर शेंगा, कांदे, बटाट्याचा थर, वांगीचे तुकडे लावा. त्यावर खोबरं, तिखट, गोडा मसाला, ओवा आणि मीठ पसरवा
- पुन्हा त्यावर भांबुर्डीचा पाला थर लावा आणि उरलेले पदार्थ असेच थरावर थर लावा. त्यानंतर मडक्याचे तोंड भांबुर्डीच्या पाल्यानेच बंद करा
- काही ठिकाणी भाज्यांमध्ये मिरची, कोथिंबीर, खोबरं, आलं आणि लसूण याचं वाटण लावण्याचीही पद्धत आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याचाही वापर करू शकता
- शिजल्यानंतर याचा आस्वाद आपल्या मित्रपरिवारासह घ्या. तेलाशिवाय शिजलेल्या या अप्रतिम आणि हेल्दी पदार्थांचा तुम्ही आस्वाद घेऊ शकता.
गावरान चिकन पोपटी रेसिपी
सर्वाधिक पोपटीचा बनवला जाणारा आणि खाल्ला जाणारा प्रकार म्हणजे चिकन पोपटी रेसिपी (Chicken Popti Recipe). पोपटी रेसिपी म्हटलं की सर्वाधिक डोक्यात येते ते म्हणजे चिकन. कशाप्रकारे बनते गावरान चिकन पोपटी रेसिपी जाणून घ्या
साहित्य
- दोन ते तीन किलो वालाच्या शेंगा
- बटाटे अर्धा किलो
- भांबुर्डीचा पाला
- कांदे आणि वांगी (तुमच्या आवडीनुसार) अर्धा किलो
- एक डझन अंडी
- एक किलो चिकन
- खवलेले ओले खोबरे
- तिखट
- हळद
- आले – लसूण पेस्ट
- चिकन मसाला
- दही
- साजूक तूप
- मीठ
- जाडे मीठ
- ओवा
बनविण्याची पद्धत
- सगळ्यात आधी मडकं, शेंगा आणि भांबुर्डीचा पाला या तिन्ही गोष्टी नीट धुवा आणि पाणी निथळू द्या
- पोपटी तयार करण्यापूर्वी किमान तासभर आधी चिकनला हळद, मीठ, आलं-लसूण पेस्ट, चिकनचा मसाला, तिखट, दही आणि साजूक तूप लावा आणि मॅरिनेट करून ठेवा
- मडकं घ्या त्यात सर्वात पहिले भांबुर्डीचा पाला थर करून लावा. त्यानंतर त्यावर चिकन केळीच्या पानात गुंडाळून सुताने बांधून पोपटीमध्ये टाका. हल्ली यासाठी फॉईल पेपरचाही वापर करण्यात येतो. पण त्यापेक्षा केळीच्या पानातील चिकनचा स्वाद अधिक चांगला लागतो.
- त्यानंतर त्यावर कांदा, बटाटा, वांगी (हवी असल्यास) याचा थर लावा आणि ओवा, मीठ पेरून घ्या
- त्यावर पुन्हा थर लावा आणि मडके नीट बंद करा. मडक्यातून वाफ जाऊ नये यासाठी त्याचे तोंड व्यवस्थित बंद करावे. कारण भाज्या आणि चिकन कच्चे राहू नये यासाठी हे करावे. अन्यथा तुमच्या मेहनतीवर पाणी फिरू शकते. मडकं पुन्हा गरम करून पोपटी शिजवणे कठीण आहे.
- अर्ध्या अथवा पाऊण तासाने साधारण पोपटी शिजते. त्याचा मस्तपैकी शेतावर आस्वाद घ्या
झणकेदार नागपुरी पोपटी रेसिपी
नागपूरच्या भाज्या असो अथवा कोणतेही पदार्थ असोत ते झणकेदार आणि तिखटच असतात. अशीच झणकेदार नागपुरी पोपटी रेसिपी (Popati Recipe In Marathi) जाणून घ्या.
साहित्य
- मोड आलेले वाल अर्थात पोपटी (नागपुरात याला पोपटी म्हणतात)
- 1 कांदा
- 1 टॉमेटो
- 15 फणसाच्या बिया
- 1 चमचा लाल तिखट
- अर्धा चमचा हळद,
- कडीपत्ता
- तेल
- मीठ
बनविण्याची पद्धत
- सर्वात आधी कांदा, मिरची, बटाटे कापून घ्या आणि फणसाच्या बिया सोलून घ्या
- गॅसवर एका पातेल्यात तेल घाला, त्यात कांदा, कडिपत्ता, मिरीची, लाल तिखट, हळद आणि मीठ घालून नीट परतून घ्या
- त्यात टॉमटो, पोपटी अर्थात वाल, फणसाची बी घाला आणि त्यावर थोडं पाणी घालून वरून झाकण घालून वाफवायला ठेवा
- हे शिजल्यावर तुमची नागपुरी पोपटी तयार आहे. भाकरीसह गरमागरम खायला द्या
प्रश्नोत्तरे (FAQ’s)
1. पोपटीसाठी कोणत्या शेंगा वापराव्या?
पोपटीसाठी खरं तर गावठी शेंगानाच प्राधान्य द्यावे. याला अत्यंत चांगली चव असते. याशिवाय याची चव आणि लज्जत ही टिकून राहाते. रायगड जिल्ह्यातील नागोठणे गावातील निडी गावातील शेंगा यासाठी अधिक प्रसिद्ध आहेत. तुम्हाला पोपटी बनवायची असेल तर या शेंगा मिळाल्यास उत्तम ठरेल.
2. मडके चांगले की पत्र्याच्या डबा ?
मडक्याला बरेचदा तडा जातो अथवा त्यातील पोपटी अर्धी कच्ची राहण्याची भीती असते. त्याशिवाय एक वापरलेले मडके पुन्हा वापरता येत नाही. मात्र पोपटी करताना पत्र्याच्या डब्याचा वापर केल्यास हा त्रास राहात नाही आणि डबा पुन्हा वापरताही येतो. पण मडक्यातील पोपटीसारखी चव मात्र लागत नाही.
3. पोपटी पार्टीची मजा कुठे घेता येते?
तुम्हाला रायगड जिल्ह्यात अनेक ठिकाणी याचा अनुभव घेता येतो. तसंच अलिबागमध्ये अनेक रिसॉर्ट्स आहेत जिथे कॅम्पिंगमध्ये पोपटी पार्टी आयोजित केली जाते अथवा काही रिसॉर्टमध्ये पोपटी पार्टी असते जिथे तुम्ही आधी बुकिंग करून त्याचा आस्वाद घेऊ शकता.