आपल्याकडे विशेषतः भारतामध्ये आई होणे, गर्भधारणा होणे याचे महत्त्व काही खासच आहे. गर्भधारणा होत नसेल तर एखाद्या महिलेकडे आजही वेगळ्या नजरेने पाहिले जाते. मात्र गर्भधारणा आणि तो विशिष्ट काळ हा प्रत्येक महिलेसाठी खास अनुभव असतो. गर्भधारणेपूर्वी काही तपासण्या आणि चाचण्या करून घेणे नक्कीच गरजेचे आहे. आजकालचे धावपळीचे आयुष्य आणि शरीरावर होणारे विविध परिणाम यामुळे आपण आपले बाळ व्यवस्थित वाढवू शकतो की नाही अथवा आपले शरीर बाळाला वाढविण्यासाठी योग्य आहे की नाही याबाबत तपासणी करून घेणे हे तितकेच गरजेचे आहे. प्रत्येक महिलेला गर्भधारणेपूर्व तपासण्या आणि चाचण्यांबाबत (Prenatal Checkups and Tests In Marathi) माहिती असायलाच हवी. त्यानंतर गर्भधारणा झाली हे कसे ओळखावे हेदेखील महत्त्वाचे आहे.
गर्भधारणापूर्व तपासणी म्हणजे नक्की काय? (What Does Prenatal Checkup Mean?)
गर्भधारणा तपासणी म्हणजे नेमकं काय असा जर तुम्हाला प्रश्न पडला असेल तर, होणारे आई आणि वडील हे दोघेही सर्व आजारांपासून मुक्त आहेत आणि आई आपल्या बाळाला उत्तमरित्या पोटात सांभाळू शकते हे जाणून घेण्यासाठी, तसंच गर्भधारणा होण्यासाठी कोणताही अडथळा नाही हे कळण्यासाठी गर्भधारणापूर्वी तपासणी केली जाते. यामध्ये डॉक्टर लग्न झालेल्या जोडीच्या वेगवेगळ्या तपासण्या आणि चाचण्या करतात. या चाचण्यांच्या परिणामांच्या आधारावर तुम्ही काय खायला हवे, तसंच तुम्ही कोणता व्यायम करायला हवा, तुमचं वजन किती असायला हवे, कोणत्या सवयी बदलायला हव्यात याबाबत सर्व माहिती डॉक्टरांकडून तुम्हाला दिली जाते. तसंच तुम्ही धुम्रपान अथवा दारूचे सेवन करत असाल तर तुम्हाला या तपासणीनंतर ते सोडावे लागते. गर्भधारणेसाठी या गोष्टी अत्यंत आवश्यक आहेत.
गर्भधारणेपूर्वी तपासणी करणे का आवश्यक आहे? (Why Prenatal Check Up Necessary)
गर्भधारणेपूर्वी तपासणी करणे नक्की का आवश्यक आहे याबाबतदेखील जाणून घ्यायला हवे. होणाऱ्या बाळाचे पालनपोषण नीट होत आहे की नाही अथवा बाळाला पोटात वाढविण्यासाठी स्त्री निरोगी आहे की नाही आणि शारीरिकदृष्ट्या तिची तयारी झाली आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी गर्भधारणेपूर्वी तपासणी करणे आवश्यक आहे. तसंच गर्भधारणेपूर्वी तपासणी केल्यास, शरीराला नक्की कोणत्या गोष्टींची अधिक आवश्यकता आहे याबाबत जाणून घेऊन गर्भधारणेसाठी योग्य उपचार घेता येतात. गर्भधारणेपूर्वी तपासणी आणि चाचणी केल्यास, जन्मजात बाळाला येणारे अपंगत्व अथवा गर्भपाताचा धोका यासारख्या समस्या टळू शकतात. याशिवाय महिला आणि पुरूषांमधील आरोग्याच्या समस्या जाणून घेऊन त्यातील गुंतागुंत सोडविण्यास मदत मिळते. तसंच प्रत्येक स्त्री आणि पुरूषाने कोणत्याही चुकीच्या गैरसमजुतीला बळी न पडता लग्नानंतर बाळ हवे असल्यास, ही तपासणी करून घेणे अत्यंत गरजचे आहे.
गर्भधारणा तपासणीमध्ये काय होते? (What We Have To Check In Prenatal Check Ups)
गर्भधारणा तपासणीदरम्यान तुम्ही गर्भधारणा करून घेण्यासाठी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या तयार आहात की नाही याची खात्री करून घेण्यात येते. याचे स्वरूप नक्की कोणत्या प्रकारचे असते याची सविस्तर माहिती आम्ही तुम्हाला पॉईंट्सनुसार देत आहोत. तुम्हीही याची माहिती घेऊन लग्नासाठी अथवा लग्नानंतर याचा नक्की वापर करावा.
वजनाची तपासणी (Weight)
बाळ हवे असते तेव्हा तुमच्या शरीराचे वजन, तुमच्या शरीराचा आकार बाळ होण्यासाठी योग्य आहे की नाही याची तपासणी व्हायला हवी. तुमचे वजन अति असेल तर गर्भधारणा होण्यास त्रास होतो. ही तपासणी केल्यानंतर तुमचे वजन जर गर्भधारणा करण्यासाठी योग्य नसेल तर डॉक्टर तुम्हाला योग्य तो आहार आणि व्यायाम सुचवतात. गर्भधारणा राहण्यासाठी तुमच्या शरीराचा आकार विशिष्ट राहायला हवा. तोपर्यंत गर्भधारणा होत नाही. तुमच्या उंचीनुसार तुमचे वजन असायला हवे. तसंच पोटाजवळ अतिरिक्त चरबीही असता कामा नये. तसंच तुम्ही योग्य वयात बाळाला जन्म दिल्यास, या गोष्टी टाळता येतात.
मानसिक आरोग्य (Mental Health)
आपल्याकडे आजही अनेक घरांमध्ये गर्भधारणा राहणे अथवा आई होणे याबाबत महिलेच्या मनावर खूपच ताण असतो. कोणत्याही महिलेला चिंता, नैराश्य अथवा भीतीने ग्रासले असेल तर गर्भधारणा होणे कठीण आहे. गर्भधारणा झालीच तर बाळ हे आईच्या मनस्थितीमुळे पोटात नीट वाढू शकत नाही. गर्भधारणेच्या बाबतीत मानसिक आरोग्य ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे. हल्ली तर यासाठी अनेक ठिकाणी कौन्सिलिंगदेखील करण्यात येत आहे. स्त्री च्या मनस्थितीमध्ये सतत बदल होत असल्यामुळे बाळाच्या वाढीत, गर्भधारणेमध्ये त्रास होऊ शकतो. तुम्हालाही असा त्रास असेल तर गर्भधारणेच्या तपासणीत याचा योग्य उपचार डॉक्टरांद्वारे करता येऊ शकतो.
लघवी तपासणी (Urine)
मूत्रपिंडाचे आजार आणि मूत्रसंसर्ग यासाठी गर्भधारणेपूर्वी लघवीची तपासणी करणेही आवश्यक आहे. लघवीच्या ठिकाणीच सहसा सेक्स (Sex) करण्याचा मार्ग असतो. त्यामुळे या ठिकाणी कोणताही त्रास जोडप्याला नाही ना याचीही खातरजमा करून घ्यावी. जेणेकरून गर्भधारणा व्हायला त्रास होत नाही.
स्त्री रोग तपासणी (Health Check Up)
बऱ्याच महिलांना अनियमित मासिक पाळीचा त्रास असतो. पीसीओएस (PCOS) अथवा पीसीओडी (PCOD) ग्रस्त अनेक महिलांना यामुळे गर्भधारणा होण्यास अडथळा येतो. तसंच यामुळे थायरॉईड, फायब्रॉईड्स, साधा ट्युमर अथवा अन्य काही आजारांचीही शक्यता असते. गर्भधारणेपूर्वी तुम्हाला यापैकी कोणत्याही आजाराला सामोरे तर जावे लागत नाहीये ना यासाठी काही स्त्री रोग तपासणी करून घेणे गरजेचे आहे. स्त्री रोगविषयक काही तपासणी करून तुम्ही गर्भधारणेसाठी तयार आहात की नाही हे जाणून घेता येते. गरोदर राहण्यासाठी योग्य उपाय करता येतात.
स्तन, ओटीपोट आणि पोटाची तपासणी (Breast, Natal Check Up)
गरोदरपणात अर्थात गर्भधारणेसाठी पोट, ओटीपोट हे स्त्री चे महत्त्वाचे अंग आहे. तसंच बाळाच्या जन्मानंतर स्तनातून येणारे दूधही तितकेच महत्त्वाचे आहे. त्यामुळे या तिन्ही गोष्टींबाबत तपासणी होणे आवश्यक आहे. ओटीपोटाच्या तपासणीमध्ये यीस्ट अथवा ट्रायकोमोनिआसिस संक्रमणाची तपासणी करण्यात येते. यामुळे गर्भधारणेत समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे वेळीच याची काळजी घ्यावी. तसंच कोणत्याही प्रकारची शारीरिक समस्या नाही आणि बाळाची वाढ व्यवस्थित होऊ शकते की नाही यासाठी पोटाची तपासणी केली जाते. स्तनामध्ये गाठ आहे की नाही अर्थात स्तनाच्या कर्करोगाची काही लक्षणे नाहीत ना यासाठी स्तनांची तपासणी करणे गरजेचे आहे. कारण बाळाला याच स्तनांमधून दुधामार्फत पोषण मिळणार असते.
रक्तदाबाची तपासणी (BP test)
गर्भधारणेमध्ये उच्च आणि कमी रक्तदाबाचा त्रास कोणत्याही महिलेला नाही ना याची तपासणी करण्यात येते. कारण असा त्रास असेल तर बाळाच्या जन्माच्या वेळेला गुंतागुंत होऊ शकते. तिशीनंतर आई व्हायचं असेल तर गुंतागुंत होते. दोघांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे गर्भधारणेपूर्वी आणि अगदी गर्भधारणेनंतरही बाळाच्या जन्मापर्यंत सतत रक्तदाबाची तपासणी करण्यात येते. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत रक्तदाबाची पातळी योग्य आहे की नाही याची तपासणी डॉक्टर करत असतात.
पॅप चाचणी (Pap Test)
गर्भधारणेसाठी पॅप स्पिअर चाचणी हा अविभाज्य भाग आहे. गर्भाशयाच्या मुखाची चाचणी करण्यासाठी महिलेच्या योनीमध्ये सॅल्युलम घालून ही चाचणी करण्यात येते. डॉक्टर या चाचणीनंतर गर्भाशय मुख कापसाने पुसून घेतात आणि त्यावरील पेशींचा अभ्यास करण्यासाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात येते. या चाचणीमुळे एचआयव्ही (HIV), हेपेटायटिस बी, गोनोरिया, लैंगिक संक्रमित कोणताही रोग याबाबत खात्री करून घेण्यात येते. गर्भधारणेपूर्वी याबाबत माहिती होणे आवश्यक आहे. तपासणीच्या दरम्यान डॉक्टरांना काहीही खटकल्यास अथवा असामान्य पेशी जर आढळल्या तर त्यानंतर कॉलोस्कोपी करण्यात येते.
रक्ताची तपासणी (Blood Test)
गर्भधारणेपूर्वी अनेक तपासणी करण्यात येते त्यामध्ये विविध परिस्थितीचा अंदाज घेण्यासाठी रक्ताची चाचणी करण्यात येते. यामध्ये रक्ताची तपासणी विविध गोष्टींसाठी करण्यात येते.
- क्षयरोग
- हिमोग्लोबिन
- व्हिटामिन डी ची कमतरता
- रूबेला
- आरएच घटक
- एसटीडी
- हेपेटायटिस बी
- थायरॉईड
- मधुमेह
आनुवंशिक समस्या (Hereditary Problems)
एखाद्या कुटुंबामध्ये आनुवंशिकतेने काही आजार असतील, अर्थात कॅन्सर, डाऊन सिंड्रोम, मधुमेह अशा समस्या असतील तर त्याविषयी डॉक्टरांना आधीच सांगून गर्भधारणेपूर्वी याच्या तपासणी करून घ्यायला हव्यात. जेणेकरून तुम्ही आणि तुमच्या बाळाचे आरोग्य नीट राहील. बाळाच्या जन्मानंतर आणि जन्माच्या आधी कोणत्याही समस्या येऊ नयेत यासाठी ही तपासणी करून घ्यायला हवी.
प्रश्नोत्तरे (FAQ’s)
1. गर्भधारणेपूर्वी दाताची तपासणी करून घ्यायला हवी का?
अन्य तपासण्यांप्रमाणेच गर्भधारणेपूर्वी दाताचीदेखील तपासणी करायला हवी. आपल्या दातांमधील जंत अथवा अन्य गोष्टी बाळापर्यंत पोहचणार नाहीत याची खात्री करून घ्यावी. तसंच गर्भधारणेदरम्यान दातदुखी होत असल्यास, उग्र रूप धारण करण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण गर्भधारणेदरम्यान तुमची प्रतिकारशक्ती कमी होत असते. त्यामुळे दातांच्या कोणत्याही समस्या तुम्हाला असतील तर गर्भधारणेपूर्वी त्याची तपासणी करून योग्य तो उपचार करावा.
2. डॉक्टरांची भेट घेताना आपल्यासोबत कोणी असणे गरजेचे आहे का?
गर्भधारणेबाबत डॉक्टरांशी चर्चा करायची असेल आणि तपासणी अथवा चाचण्या करायच्या असतील तर आपल्या जोडीदाराला आपल्यासोबत घेऊन जाणे हा निर्णय योग्य ठरतो. बाळ दोघांचेही आहे त्यामुळे दोघांनाही सर्व गोष्टींची माहिती असायला हवी. तपासणीसाठी डॉक्टरांना दोघांनीही भेटण्याचे अनेक फायदे होतात. सध्याची जीवनशैली, आहार, व्यायाम, तुम्ही घ्यायची काळजी या सर्वांची माहिती दोघांनाही डॉक्टर व्यवस्थित समजावून सांगतात. तसंच दोघांनी एकमेकांना कशा प्रकारे साथ द्यायला हवी हेदेखील कळते. त्यामुळे आपल्या जोडीदाराला नक्की सोबत घेऊन जा.
3. डॉक्टरांना नक्की काय विचारावे?
आपण जेव्हा डॉक्टरांकडे जातो तेव्हा त्यांच्याकडे कमी वेळ असतो त्यामुळे तुम्हाला तुमच्या मनात असणाऱ्या शंका एका कागदावर लिहून काढाव्यात. तसंच डॉक्टरांना तुम्ही तुमची माहिती योग्य द्या. तुम्हाला असणाऱ्या शंका या योग्य आहेत की नाही याची एकदा आपल्या जोडीदारासहदेखील चर्चा करा आणि मगच प्रश्न डॉक्टरांना विचारा. गर्भधारणेपूर्वी अनेक शंका आणि प्रश्न असतात पण ते योग्य शब्दात आणि कमीत कमी वेळात विचारू शकता अशी तुम्ही व्यवस्था करा.