दिवाळी म्हटली की सर्वात पहिल्यांदा घरातील साफसफाई आणि मग फराळ या दोन गोष्टींची अगदी लगबग सुरू होते. त्यातही खमंग चकली, चिवडा, शंकरपाळे हे पदार्थ सहसा घरी बनविण्यावर भर दिला जातो. दिवाळीचा फराळ असतो खास. यामध्ये करंजी, रव्याचे लाडू असे अनेक पदार्थ आपण घरीच बनवत असतो. त्यातही ओल्या नारळाच्या करंज्या म्हटलं की तोंडाला पाणी सुटतं आणि दुसरा आणि खास महत्त्वाचा पदार्थ म्हणजे शंकरपाळे. शंकरपाळे हे खुसखुशीतच असायला हवे. कडक अथवा अति गोड शंकरपाळे नकोसे वाटतात. घरीच शंकरपाळे करणार असाल आणि तुम्हाला खुसखुशीत शंकरपाळे हवे असतील तर खास रेसिपी आणि पद्धत आम्ही शेअर करत आहोत. तुम्हीही घरच्या घरी ही पद्धत वापरून करा शंकरपाळे अधिक खुसखुशीत. दिवाळीच्या तुम्हा सर्वांना शुभेच्छा!
शंकरपाळे बनविण्यासाठी साहित्य
- 2 वाटी मैदा
- 1 सपाट वाटी पिठीसाखर
- 3 चमचे तुपाचे मोहन
- 2 चमचे रवा
- 1/2 वाटी दूध
- तळण्यासाठी तेल
- वेलची पावडर
खुशखुशीत शंकरपाळे बनविण्याची पद्धत
- सगळ्यात आधी तुम्ही मैदा चाळून घ्या. यामध्ये कोणत्याही गुठळ्या असू नयेत
- त्यानंतर त्यात तूप गरम करून त्याचे मोहन घालावे आणि आता वरून त्यात पिठीसाखर आणि रवा, वेलची पावडर (तुम्हाला आवडत नसेल तर नाही घातली तरी चालेल) घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यावे
- सुरवातीला कोरडेच सर्व एकत्र करावे. तूप सर्वत्र पसरवून घ्या आणि मग ते एकत्र करा
- त्यामध्ये आता दूध घालून चांगले मळून घ्या. लक्षात ठेवा तुम्ही हे मळताना तुमच्या हात कोरडा असायला हवा. पाण्याचा हात यामध्ये घालू नका
- गोळा तयार करून झाकून किमान 20 मिनिट्स तरी तसाच ठेवा. हा गोळा तुम्ही जास्त वेळ ठेवला तरी चालेल. नंतर त्याचे काही भाग करून गोळे करून घ्यावे
- एक गोळा घ्या आणि पोळपाटावर लाटा. थोडे जाडसर लाटा. नंतर कटरने आडवे आणि नंतर ऊभे असे कापून घ्या. तुम्हाला त्याचा चौकोनी आकारात तुकडे करून घेता यायला हवेत
- एका कढईत तेल गरम करत ठेवा आणि आता यात एक तुकडा टाकून बघा आणि त्यानुसार गॅस मध्यम आचेवर ठेवून तळून घ्या
- गॅस जलद असेल तर रंग लवकर येतो. मात्र आतून शंकरपाळे भाजले जात नाहीत. त्यामुळे तुम्ही सहसा मध्यम आचेवर गॅस ठेऊनच शंकरपाळे तळावेत. जास्त लालसर तळू नयेत. थंड झाल्यावर शंकरपाळ्यांचा रंग बदलतो
- संपूर्ण थंड झाल्याशिवाय तुम्ही कोणत्याही बरणीत शंकरपाळे भरून ठेऊ नका
टीप –
- वेळ गेला तरीही चालेल तुम्हाला जर खुसखुशीत शंकरपाळे हवे असतील तर तुम्ही मंद अथवा मध्यम आचेवरच शंकरपाळे तळावेत. अन्यथा ते बाहेर काढल्यानंतर कडक होतात.
- तुम्हाला मैदा पूर्ण नको असेल तर तुम्ही मैदा आणि गव्हाचे पीठ एकत्र करूनही शंकरपाळे करू शकता. मात्र त्याची मैद्याच्या शंकरपाळ्याप्रमाणे चव लागत नाही.
- मैदा भिजविण्यासाठी दुधाचाच वापर करा. पाण्याचा वापर अजिबात करू नका. नाहीतर शंकरपाळे फिस्कटतील. तसंच हे दूध तापवलेले असावे. कच्चे दूध वापरू नये. खुसखुशीत शंकरपाळ्यांसाठी दुधाचा फायदा होतो.
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक