कोरोना काळामध्ये (Corona) प्रेक्षकांना सर्वात जास्त साथ दिली असेल तर वेबसिरीजने (Webseries). अनेकांना वेगवेगळ्या वेबसिरीजची प्रतीक्षा होती. कोरोनामुळे थिएटर बंद आणि घरात मनोरंजनाचे दुसरे कोणतेही साधन नसल्याने वेबसिरीजने अनेक प्रेक्षकांना आधार दिला. 2021 वर्ष संपायला आता काहीच कालावधी बाकी आहे. यावर्षी अनेक वेबसिरीज प्रदर्शित झाल्या आणि त्यापैकी अशा काही वेबसिरीज आहेत ज्यांनी प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला आहे. गुल्लक, द फॅमिली मॅन 2, द एम्पायर अशा अनेक वेबसिरीज आहेत ज्यांनी यावर्षी कमाल केली आणि उत्तम रेटिंग्जही मिळवले. तसंच यामध्ये काम केलेल्या कलाकारांचीही वाहवा झाली. 2021 मध्ये अशा कोणत्याही वेबसिरीज आहेत ज्या तुफान गाजल्या त्याबाबत घेऊया आढावा.
अधिक वाचा – प्रतिक्षा संपली, Money Heist चा होणार शेवट
स्कॅम 1992 (Scam 1992)
रेटिंग – 9.6/10
प्रतीक गांधीने (Pratik Gandhi) काम केलेली ही सिरीज यावर्षी सर्वात जास्त गाजली. प्रतीक गांधीचं काम आणि हर्षद मेहता याची केलेली भूमिका प्रेक्षकांना फारच भावली. इतकंच नाही तर ही कथा इतकी सुंदररित्या गुंफण्यात आली होती की, ही वेबसिरीज पाहायला लागल्यानंतर संपेपर्यंत आपल्याला उठताच येत नाही. अप्रतिम कथा, दिग्दर्शन आणि कलाकारांच्या भूमिकेमुळे तुम्ही ही वेबसिरीज चुकवूच शकत नाही. याची केवळ कथाच नाही तर याला देण्यात आलेले संगीतही फारच गाजल्याचे दिसून आले.
गुल्लक (Gullak)
रेटिंग – 9.3/10
2021 मध्ये प्रदर्शित झालेली गुल्लक सीझन 2 वेबसिरीजची खूपच चर्चा झाली. ही वेबसिरीज ओटीटीवर प्रदर्शित करण्यात आली. मध्यमवर्गीय कुटुंबाच्या कथेवर आधारित ही वेबसिरीज प्रेक्षकांना खूपच आवडली. वास्तविक 2019 मध्ये याचा पहिला सीझन आला होता. पहिल्या सीझनमध्ये 5 आणि दुसऱ्या सीझनमध्ये याचे 10 भाग आहेत. याची कथा आणि यातील कलाकारांनी केलेले काम हे प्रेक्षकांना खूपच आवडले आणि म्हणून या वेबसिरीजला अधिक रेटिंग्जदेखील मिळाले.
अमला मॅटर्स (Amla Matters)
रेटिंग – 8.5/10
2021 सर्वात जास्त प्रसिद्ध झालेल्या वेबसिरीजमध्ये अमला मॅटर्स हीदेखील समाविष्ट आहे. ही वेबसिरीज म्हणजे एक डॉक्युमेंटरी सिरीज आहे. प्रेक्षकांना ही वेबसिरीज खूपच आवडली. या सिरीजमधील मुख्य पात्र आहे ते म्हणजे विद्यार्थी आणि संस्थान. याच्या अवतीभोवती ही कथा फिरते. काही रूढीवादी विचारांविरूद्ध आवाज उठवण्याचे काम या सिरीजमार्फत करण्यात आले आहे. तुम्ही आतापर्यंत ही सिरीज पाहिली नसेल तर तुम्ही नक्कीच पाहायला हवी.
अधिक वाचा – ‘नागिन 6’ मध्ये महक चहल आणि रिद्धिमा पंडितची एन्ट्री
बॉम्बे बेगम्स (Bombay Begums)
रेटिंग – 5/10
ही वेबसिरीज यावर्षी खूपच चर्चेत होती. अलंकृता श्रीवास्तवद्वारे बनविण्यात आलेली ही नेटफ्लिक्सची वेबसिरीज म्हणजे भारतीय ड्रामा वेबसिरीज आहे. यामध्ये सर्व प्रमुख भूमिका या महिलांच्या आहेत. यामध्ये पूजा भट, शहाना गोस्वामी, अमृता सुभाष यांच्या मुख्य भूमिका होत्या. यातील काही प्रसंगावर अनेक वादही झाले त्यामुळेदेखील ही वेबसिरीज गाजली होती.
द फॅमिली मॅन 2 (The Family Man 2)
रेटिंग – 9.2/10
पहिल्या सीझननंतर द फॅमिली मॅनच्या दुसऱ्या सीझनची खूपच प्रतिक्षा होती आणि हा दुसरा सीझनही प्रेक्षकांना खूपच आवडला. याचे नाव वाचून बऱ्याच जणांना ही कौटुंबिक कथा असावी असं वाटलं होतं. मात्र एका कुटुंबाच्या अवतीभोवती असणाऱ्या देशाच्या संरक्षणाभोवती ही कथा फिरते. मनोज वाजयपेयी (Manoj Bajpayee), समंथा प्रभू (Samantha Prabhu), शरद केळकर (Sharad Kelkar) आणि अनेक कलाकारांनी या वेबसिरीजमध्ये अप्रतिम काम केल्याने ही अधिक गाजली. एका गुप्तहेराची अशी कहाणी यामध्ये दर्शविण्यात आली आहे जो असाधारण काम करतो मात्र अन्य सामान्य माणसाप्रमाणेच तो आहे.
अधिक वाचा – ही मराठमोळी अभिनेत्री नव्या भूमिकेसाठी तयार, लवकरच होणार आई
टीव्हीएफ एस्पिरेंट्स (TVF Espirants)
रेटिंग – 9.6/10
यावर्षी सर्वात जास्त चर्चेत राहणारी वेबसिरीज म्हणजे टीव्हीएफ एस्पिरेंट्स. विद्यार्थी वर्गात ही वेबसिरीज जास्त प्रसिद्ध झाली. कारण विद्यार्थ्यांचे आयुष्य अर्थात हॉस्टेल लाईफ, परीक्षा, कोचिंग यासर्व विषयांवर ही सिरीज बेतली असल्याने विद्यार्थ्यांना ही कथा अधिक आपलीशी वाटली. यामध्ये तीन मित्रांची कथा आहे, जो युपीएससी उत्तीर्ण होण्याचे स्वप्न घेऊन दिल्लीमध्ये जातात. त्यांचा संघर्ष, भांडण आणि मेहनत हे सर्व बघण्यात प्रेक्षकांना मजा आली. याशिवाय यामध्ये काम करणाऱ्या कलाकारांनीही जीव ओतून काम केल्याने अधिक चांगली वाटली.
सनफ्लॉवर (Sunflower)
रेटिंग – 7.7/10
ही एक क्राईम कॉमेडी वेबसिरीज असून यावर्षी प्रेक्षकांनी याला आपली पसंती दिली आहे. मुख्य भूमिकेत सुनील ग्रोव्हर (Sunil Grover) असून त्याच्यासह आशिष विद्यार्थी, रणवीर शौरी, गिरीष कुलकर्णी, मुकुल चढ्ढा असे तगडे कलाकार आहेत. याशिवाय या वेबसिरीजमध्ये मोठ्या शहारांमधील हाऊसिंग सोसायटीमध्ये होणारे भेदभाव यावर ही कथा आधारित आहे. तुम्ही जर ही वेबसिरीज पाहिली नसेल तर नक्की पाहा.
द एम्पायर (The Empire)
रेटिंग – 7.5/10
ही वेबसिरीज खूपच गाजली. मुगल वंश आणि साम्राज्याच्याबाबत या सिरीजमध्ये कथा मांडण्यात आली आहे. मुगल बादशाह बाबर आणि त्याच्या आयुष्याच्या काही घटना यामध्ये दाखविण्यात आल्या आहेत. ही वेबसिरीज मुळात अलेक्स रदरफोर्डद्वारे लिहिण्यात आलेल्या ‘द एम्पायर ऑफ मुगल’ वर आधारित आहे. तुम्हाला ऐतिहासिक कथा आवडत असतील तर तुम्ही नक्कीच ही सिरीज पाहायला हवी. कुणाल कपूर, डिनो मोरिया, द्रष्टी धामी, शबाना आझमी यांच्या प्रमुख भूमिका असणारी ही सिरीज अप्रतिम आहे.
अशाच अजून काही वेबसिरीज यावर्षी गाजल्या, त्यामध्ये नोव्हेंबर स्टोरीज, आश्रम, महाराणी, जीत की जिद, हाऊस ऑफ सिक्रेट्सचादेखील समावेश आहे. तुम्ही यावर्षी या सिरीज पाहिल्या नसतील तर नक्की हे वर्ष संपायच्या आत वेळ काढून पाहा.