Advertisement

Fitness

ही योगासने करुन वाढवा प्रतिकारशक्ती (Yoga To Improve Immune System In Marathi )

Leenal GawadeLeenal Gawade  |  Jul 13, 2020
ही योगासने करुन वाढवा प्रतिकारशक्ती (Yoga To Improve Immune System In Marathi )

Advertisement

देशात सध्या ज्या आजाराने थैमान घातले आहे.त्या आजारावर औषध शोधण्यासाठी संपूर्ण जग प्रयत्न करत आहेत. पण अद्यापही या आजारावर ठोस अशी कोणतीही औषधोपचारपद्धती आपल्याकडे नाही. दररोज आपण कोरोनाच्या वेगवेगळ्या बातम्या आणि त्यावरील वेगवेगळे घरगुती उपाय नेहमीच ऐकत आहोत. या कोरोनामुळे एक गोष्ट आपल्या देशाने नक्कीच करुन दाखवली आहे ती म्हणजे प्रतिकारशक्ती वाढवण्याकडे हल्ली आपला कल अधिक आहे. प्रतिकारशक्ती वाढवत आपण सध्या या आजाराशी  दोन हात करत आहोत. आता प्रतिकारशक्ती वाढवणे म्हणजे अनेक चांगल्या सवयी अंगिकारणे त्यापैकीच एक चांगली सवय म्हणजे ‘योग’ अगदी पूर्वापार चालत आलेला योग तुमच्या आरोग्यासाठी अत्यंत चांगला आहे. तुम्हाला शारीरिक आणि मानसिक स्वास्थ देण्याचे काम योगा करते. त्यामुळेच तुमची प्रतिकारशक्तीही वाढते. सगळीकडे नकारात्मकता पसरलेली असताना तुम्हाला तुमच्या आरोग्याची काळजी घरच्या घरी घ्यायची असेल तर तुम्ही घरीच राहून योगा करु शकता आणि तुमची प्रतिकारशक्ती वाढवू शकता. आज आपण रोगप्रतिकारशक्ती वाढवणारी योगासने पाहुया. चला करुया सुरुवात.

ताडासन (Mountain Pose)

ताडासन - Yoga To Improve immunity In Marathi

Instagram

ताडासन हे आसन दिसायला फार सोपे वाटले तरी प्रत्येक आसनाप्रमाणे याची अचुकता अत्यंत महत्वाची आहे. पर्वत किंवा ताडाचे झाड कसे उंच आणि सरळ उभे असते अगदी तसेच हे आसन आहे. ताडासनाचे अनेक फायदे आहेत. आता हे आसन कसे करायचे आणि त्याचे फायदे काय ते जाणून घेऊया 

असे करावे आसन: 

 • योगा मॅटवर ताठ उभे राहा. दोन पायांमध्ये फार अंतर घेऊ नका. तुम्ही नेहमी जसे उभे असता तसेच राहा.
 • दोन्ही हातांचे पंचे बाहेरच्या दिशेने करुन हात पकडा. (हात कोपऱ्यातून दुमडता कामा नये) 
 • आता सगळ्यात महत्वाची आणि समतोल साधण्याची वेळ आली आता तुम्हाला तुमच्या चौड्यांवर म्हणजेच पायांच्या बोटांवर उभे राहायचे आहे. 
 • असे करताना तुम्हाला तुमच्या श्वासोच्छवास सुरळीत ठेवायचा आहे. 
 • हे आसन पहिल्यांदा करताना तुम्हाला थोडे गडबडल्यासारखे, तोल गेल्यासारखे होईल. पण सवयीने हे आसन तुम्ह योग्य करु शकाल. 
 • तुम्हाला आसन जमत असेल तर तुम्ही तुमचे शरीर या स्थितीत साधारण एक मिनिटभर ठेवण्याचा प्रयत्न करा.

आसनाचे फायदे:

ताडासनाचा सगळ्यात महत्वाचा फायदा म्हणजे हे आसन तुमचा मानसिक आणि शारीरिक ताण कमी करतो. तुमच्या शरीराची ठेवण सुधारण्यासाठी हे आसन फारच उपयुक्त आहे. या शिवाय नितंब आणि पोट यांना टोन्ड करण्याचे कामही हे आसन करते. गुडघे दुखी, कंबरदुखी या आसनामुळे नियंत्रणात राहते. एकूणच तुमच्या शरीराच्या प्रत्येक अवयवासाठी हे आसन काम करते. 

पाठ दुखीतून सुटका मिळवण्यासाठी करा ही दहा योगासने (Yoga For Back Pain In Marathi)

त्रिकोणासन (Triangle Pose)

त्रिकोणासन

Instagram

प्रतिकारशक्ती वाढवून तुम्हाला तंदरुस्त करण्याचे काम त्रिकोणासनही करते. अगदी शब्दश: विचार केला तर या आसनामुळे तुमचे शरीर एखाद्या त्रिकोणाप्रमाणे भासते. या आसनाचेही भरपूर फायदे आहेत. आता हे आसन कसे करायचे आणि त्याचे फायदे काय? हे आपण आता जाणून घेऊया. 

असे करावे आसन: 

 • मॅटवर स्तब्ध उभे राहून दोन पायांमध्ये साधारण तीन फुटांचे अंतर घ्यावे.
 • डावा हात डाव्या पायाच्या घोटाकडे न्या. उजवा हात उजव्या कानाजवळ घेऊन तो सरळ ठेवा. 
 • असे करताना तुम्हाला तुमचा उजवा हात आकाशाच्या दिशेने सरळ ठेवायचा आहे. 
 • तुमच्या शरीराचा त्रिकोणाकृती आकार झाल्याचे तुम्हाला नक्कीच लक्षात येईल.
 • हे आसनही तुम्हाला कमीत कमी 30 सेकंद आणि जास्तीत जास्त 1 मिनिटभर ठेवायचे आहे. 
 • दोन्ही बाजूला तुम्हाला अशाच पद्धतीने आसन करायचे आहे. 
 • हे आसन करताना तुम्हाला कमरेला ताण आलेला जाणवेल. आसन करताना तुमचे डोळे नेहमी उघडे हवेत.

आसनाचे फायदे:

तुमच्या मनावरीव अतिरिक्त ताण या आसमामुळे कमी होतो. तुम्हाला असणारी कंबरदुखी कमी होते. अनेकदा सतत बसून बसून आपले कंबरेकडील स्नायू हे आक्रसले जातात त्यामुळे त्यांना सैल करायचे काम हे आसन करते. तुम्हाला पचनाचा त्रास झाला असेल तर या आसनामुळे तुम्हाला आराम मिळतो. जर तुम्ही हे आसन नियमित केले तर तुम्हाला याचा फायदा नक्की होईल.

उत्कटासन (Chair Pose)

उत्कटासन

Instagram

उत्कट या शब्दामुळेच या आसनाचे नाव उत्कटासन ठेवले असावे. उत्कट या शब्दाचा अर्थ तीव्र किंवा विशाल असा होतो. या आसनाचे अनेक फायदे आहेत. हे आसन केल्यामुळे तुमच्या सगळ्या शारिरीक व्याधी दूर राहतात.हे आसन नेमके कसे करायचे आणि या आसनाचे फायदे काय ते आता जाणून घेऊया.

असे करावे आसन:

 • ताडासनाप्रमाणेच हे आसन तुम्हाला करायचे असते. पाय जवळ घेऊन उभे राहा. हात वर उंचावून ताडासनाप्रमाणे ठेवावी. 
 • आता खूर्चीवर बसल्याप्रमाणे पाय दुमडून घ्यावे. 
 • श्वासोच्छवास नियमित ठेवावा. 
 • साधारण 15 ते 20 सेकंद तरी या आसानामध्ये राहावे. 
 • आसन करताना तुम्हाला मांड्यामध्ये थोडा ताण जाणवेल तुमचे पायही थरथरतील. पण असे असले तरी हे आसन करताना पुढे मुळीच वाकू नका. त्यामुळे तुम्हाला त्रास होईल.

आसनाचे फायदे:

संपूर्ण शरीरासाठी फायदेशीर असा हे आसन आहे. तुमचे पाय, पोटऱ्या, मांड्या, कंबर या सगळ्यांसाठीच हे आजार फारच फायदेशीर आहे. तुमचे सगळे अवयव निरोगी ठेवण्यासाठी आणि तुमच्या शरीराला लवचिक ठेवण्याचे काम हे आसन करते. 

भुजंगासन (Cobra Pose)

भुजंगासन

shutterstock

भुजंग म्हणजे साप.. सापाच्या फणाप्रमाणे हे आसन दिसते म्हणूनच त्याला भुजंगासन असे म्हणतात. हे आसन करायला फारच सोपे आहे असे वाटत असले तरी त्याचे फायदे आपल्या निरोगी आरोग्यासाठी फारच आवश्यक आहे.

असे करावे आसन: 

 • योगा मॅटवर पोटावर झोपा. पाय एका रेषेत आणि जवळ असू द्या. 
 • हात दुमडून ते छातीजवळ आणा. 
 • हात सरळ करुन शरीराचा वरचा भाग उचला. 
 • असे करताना तुमची मान आपोआपच मागच्या दिशेला जाईल.
 • तुम्हाला पोटामध्ये आणि पाठीमध्ये ताण जाणवेल. 
 • जर तुम्हाला मानेसंदर्भात विकार असतील तर तुम्ही मार्गदर्शकाचा योग्य तो सल्ला घ्या. 

आसनाचे फायदे:

भुजंगासनामुळे तुमचे पोट, पाठीचा कणा यांच्यावर योग्य तो ताण पडतो. पाठीचे स्नायू ताणल्यामुळे तुमची पाठदुखी कमी होते. पोटावरील चरबी कमी होते. तुम्हाला अपचन आणि मलावरोधाचा त्रास असेल तर तो त्रासही कमी होते. लिव्हर आणि किडनीच्या आरोग्यासाठी हे आसन उत्तम आहे. शिवाय तुमचा बांधा सुडौल करण्यासाठी हे आसन मदत करते. 

पुणेकरांच्या फिटनेससाठी बेस्ट जिम्स (Best Gyms In Pune In Marathi)

वृक्षासन (Tree Pose)

वृक्षासन

Instagram

झाडं ज्याप्रमाणे स्तब्ध असते त्याच्या नावावरुनच या आसनाचे नाव वृक्षासन असे ठेवले असावे. तुमच्या पायांना मजबूत करण्याचे काम वृक्षासन करते. ज्याप्रमाणे झाड आपल्या मुळाशी टिकून राहते अगदी त्याचप्रमाणे तुमच्या शरीराची मुळे म्हणजेच पाय मजबूत करण्याचे काम हे आसन करते. आता हे आसन कसे करायचे आणि त्याचे फायदे काय ते जाणून घेऊया. 

असे करावे आसन: 

 • ताडासनामध्ये उभे राहा. 
 • ताडासनामध्ये आल्यानंतर तुमचा डावा पाय गुडघ्यात मोडून तो उजव्या पायावर ठेवा. असे करताना तुमच्या शरीराचा तोल राखायला विसरु नका. 
 • तुमच्या दोन्ही हातांना एकमेकांवर ठेवून नमस्कार करा.
 • असे करताना तुम्हाला अनेकदा तुम्ही पडत आहात असे वाटेल. पण समतोल राखण्याचा प्रयत्न करा. 
 • श्वास अजिबात रोखू नका. श्वासाची क्रिया अगदी सुरळीत सुरु असू द्या. 
 • आसनातून बाहेर पडताना अलगद पाय खाली करा. 

आसनाचे फायदे:

पायासंदर्भातील त्रास कमी करण्यासाठी हे आसन मदत करते. हे आसन करताना मांड्या, छाती आणि खांद्यामध्ये ताण जाणवतो. तेथील स्नायू मोकळे करण्याचे काम हे आसन करते. शारीरिक संतुलन राखण्यासाठी हे आसन मदत करते. ज्यांना साईटिकाची त्रास असणाऱ्यांसाठी हे आसन फारच फायदेशीर आहे. 

मत्स्यासन (Fish Pose)

मत्यासन

Instagram

मत्स्यासन म्हणजे मासा.. या आसनाची अंतिमस्थिती ही माशासारखी असते. म्हणूनच या आसनाला मत्स्यासन असे म्हणतात. हे आसन करणे थोडे कठीण आहे. जर तुम्हाला सर्वांगासन, हलासन ही आसन जमत नसतील तर त्याला पुरक आसन म्हणून या आसनाचा समावेश होतो. हे आसन दिसायला कठीण असले तरी सवयीने ते करणे सोपे जाते. हे आसन कसे करायचे, या आसनाचे फायदे काय ते आता जाणून घेऊया

असे करावे आसन: 

 • मॅटवर ताठ बसून पद्मासन घालावे आणि मग पाठीवर झोपावे. हातांच्या कोपऱ्याची मदत घेऊन डोकं आणि पाठ वर उचलावी. 
 • तुमच्या पाठीची कमान तयार होईल. आता तुम्ही दोन्ही हातांच्या तर्जनीचा उपयोग करुन पायाचे अंगठे पकडावे. जर तुम्हाला पायांचे अंगठे पकडून ठेवणे शक्य नसतील तर तुम्ही पायापर्यंत हात नेण्याचा प्रयत्न करावा. 
 • अशा स्थितीत सुरुवातील 10 ते 20 सेकंद राहावे. त्यानंतर पुढे हा कालावधी वाढवावा. 
 • आसनातून बाहेर येताना अंगठे सोडावे. पाठ सरळ करावी. उठून पद्ममासन सोडावे. 
 • जर तुम्हाला पद्मासन जमत नसेल तर साधी मांडी घालून हे आसन केले तरी चालेल.

आसनाचे फायदे:

मत्स्यासनामुळे तुमचे रक्ताभिसरण सुधारते. मानेवरील ताण नाहीसा होतो. पाठीचा कणा लवचिक होतो. वाढलेल्या रक्तपुरवठ्यामुळे तुमच्या डोळ्यांचे आणि कानांचे कार्य सुधारते. पोटात साठलेली हवा बाहेर पडते. कृमींचा त्रास होत नाही. फुफ्फुसे अधिक कार्यक्षम होतात.

पावर योगा आणि त्याचे फायदे (Benefits Of Power Yoga In Marathi)

पादंगुष्ठासन (Big Toe Pose)

पादंगुष्ठासन

Instagram

तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढवून तुम्हाला निरोगी करु शकेल असे आणखी एक आसन म्हणजे ‘पादंगुष्ठासन’ आसनाच्या या प्रकाराला मूळ आसन असे म्हटले जाते. हे आसन करण्यासाठी थोडा लवचिकपणा लागतो. या आसनामध्ये तुम्हाला फार काही करावे लागत नाही. पण हे आसन योग्य करण्यासाठी तुम्हाला सराव करावा लागतो. 

असे करावे आसन: 

 • मॅटवर दोन्ही पाय जवळ घेऊन उभे राहावे. दोन्ही हात वर ताठ उंचावून काना जवळ घ्या. 
 • आता कंबरेत वाकून पाय गुडघ्यात न वाकता तुम्ही तुमचे हात पायांना टेकवायचा प्रयत्न करा. 
 • आता पहिल्या प्रयत्नात तुमचे हात लगेच पायाला टेकणार नाही. तुमचे गुडघे वाकतीलही. पण तरीही तुम्ही तुमचे प्रयत्न सुरु ठेवा.
 • तुम्हाला यामध्ये वेगवेगळे प्रकारही तुम्हाला करता येतील. 

आसनाचे फायदे:

पादंगुष्ठासन या आसनामुळे तुमचा रक्तपुरवठा सुरळीत होतो. मेंदूला रक्तपुरवठा सुरळीत झाल्यामुळे तुमचा मेंदू तल्लख राहतो. पोटाचे विकार असतील तर त्या विकारांपासून तुम्हाला हे आसन दूर ठेवते.

सुखासन (Easy Pose)

सुखासन

Instagram

अत्यंत सोपे पण परिणामकारक असे आसन म्हणजे सुखासन. यामध्ये तुम्हाला शरीराचा फार व्यायाम करावा लागत नाही. तर यावेळी तुम्ही तुमच्या शरीराशी एकजीव होऊन जाता. या सुखासनाचा तुमच्या प्रतिकारशक्तीशी काय संबंध आहे ते देखील पाहूया. 

असे करावे आसन: 

 • सुखासन तुम्ही मांडी घालून किंवा पाय सोडूनही करु शकता. 
 • मांडी घालून तुम्ही सुखासन करणार असाल तर तुम्ही ध्यानमुद्रेमध्ये राहा. ध्यानमुद्रा करत असताना तुम्हाला डोळे बंद करुन शांत पडायचे आहे. 
 • जर तुम्ही दोन्ही पाय सरळ ठेवून करणार असाल तर तुम्ही पाय पसरा आणि हातांवर ताण टाकून मागे रेला. असे केले तरी चालू शकते. 
 • या आसनामध्ये किमान 1 मिनिट तरी राहा.

आसनाचे फायदे: 

सुखासनाचा सगळ्यात महत्वाचा फायदा म्हणजे मन:शांती. तुमच्या शारीरिक व्याधी कमी करण्याचे काम तुमचे शांत मन करत असते. त्यामुळे सुखासन तुम्हाला इतर कोणत्याही व्यांधीपासून दूर ठेवते.

अशी वाढवते योगा तुमची प्रतिकारशक्ती (How Yoga Improves Immunity In Marathi)

अशी वाढवते योगा तुमची प्रतिकारशक्ती

Instagram

आता वर पाहिलेल्या योगासनांचे अन्य काही फायदे पाहता तुम्हाला विचार पडला असेल की, योगा नेमकी तुमची प्रतिकारशक्ती कशी वाढवते. 

 1. योगा तुमच्या शरीराचा आणि मनाचा ताण कमी करण्याचे काम करतात. अनेकदा काही आजार हे आपल्या अस्वस्थ मनाचा भाग असतात. योगा केल्यामुळे तुम्हाला त्या ताणातून मुक्त व्हायला होते. 
 2. योगा तुमच्या शरीराला बळकटी देण्याचे काम करते. त्यामुळे तुमचे शरीर तंदुरुस्त राहते. तुम्ही कोणत्याही वयी योगा करु शकता. 
 3. अनेक योगासने तुमच्या शरीरातील काही भागांना लक्ष्य करतात. त्यामुळेही तुम्हाला त्याचा फायदा होतो. 
 4. पोटाचे विकार, ह्रदयरोग, फुफ्फसे, मूत्रपिंडाचे विकार दूर ठेवण्यास योगा मदत करते. कारण प्रत्येक योगासनांमध्ये तुम्ही योग्य रित्या श्वासोच्छवास करत असता. 
 5. योगासनांच्या नित्य आचरणामुळे तुम्हाला त्याचे वेगवेगळे फायदे मिळत राहतात. तुमचे शरीर निरोगी राहिले म्हणजेच तुमची प्रतिकारशक्ती वाढली.

तुम्हाला पडलेत का प्रश्न (FAQ’s)

1. तुमची प्रतिकारशक्ती कमी झाली आहे हे कसे ओळखावे ? 

शरीराचे थकणे वयोमानानुसार आणि कामासनुसार अगदी साहजिक आहे. अनेकदा आपण आजारी पडतो म्हणजे सर्दी, ताप, खोकला हा त्रास कधीतरी आपल्याला होतोच. पण जर तुम्हाला हा त्रास वारंवार होत असेल. तुम्ही सतत आजारी पडत असाल. तुम्हाला अगदी क्षुल्लक कारणामुळे तब्येत नरम वाटत असेल याचा अर्थ तुमची प्रतिकारशक्ती कमी झाली आहे.सर्दी, ताप, खोकला यांच्याशी लढण्यासाठी आपले शरीर कमजोर होणे म्हणजेच तुमची प्रतिकारशक्ती कमी होणे आहे. 

2. प्राणायम केल्यामुळे तुमची प्रतिकारशक्ती वाढते का? 

प्रतिकारशक्ती वाढवणे म्हणजे तुमचे शरीर फक्त आजारांसाठी तयार करणे असे नव्हे. तर तुमची मानसिक स्थिती सुधारणे, तुमचे मन शांत करणे हाही तुमच्या निरोगी आयुष्याचा एक भाग आहे. प्राणायम केल्यामुळे तुमच्या शरीराला सकारात्मक उर्जा देण्याचे काम करते. प्राणायम करताना आपण श्वासावर नियंत्रण मिळवतो. योग्य पद्धतीने श्वासाचे वहन झाल्यामुळे तुमच्या शरीरातील थकवा आणि ताण निघून जातो. त्यामुळे तुमचे शरीर कोणत्याही आजारासाठी लढण्यासाठी तयार होते. त्यामुळे प्राणायम केल्यामुळेही तुमची प्रतिकारशक्ती वाढू शकते. 

3. दीर्घ श्वासोच्छवास तुमची प्रतिकारशक्ती वाढवू शकते का?

प्राणायमामध्येच हा प्रकार मोडतो. त्यामुळे अर्थात तुमच्या शरीरातून नकारात्मक उर्जा बाहेर काढून तुमच्या फुफ्फुसांना मजबूत करण्याचे काम श्वासोच्छवास करते यासोबतच तुमचे ह्रदयही निरोगी करते. तुमच्या शरीरातील मुख्य अवयव निरोगी राहिले की, तुमची प्रतिकारशक्ती चांगली राहते. 

आता जर तुम्हाला प्रतिकारशक्ती चांगली ठेवायची असेल तर ही काही सोपी आसनं घरी नक्की करुन पाहा. तुम्हाला कोणत्याही साथीच्या आजारांना घाबरण्याची गरज भासणार नाही.