कार्तिक आर्यनने मिळवली अजून एक तगडी भूमिका

कार्तिक आर्यनने मिळवली अजून एक तगडी भूमिका

कार्तिक आर्यन हे नाव आता बॉलीवूडला नक्कीच नवीन नाही. आपल्या दिसण्याने आणि अभिनयाने कार्तिकने अनेकांचं मन जिंकून घेतलं आहे. कार्तिक सध्या सारा अली खान बरोबर ‘लव आज कल’ या चित्रपटाच्या सिक्वेलमध्ये काम करत आहे. आता कार्तिकने अजून एक तगडी भूमिका मिळवली असून कार्तिक अजून एका सिक्वल मध्ये काम करणार असल्याचं म्हटलं जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कार्तिक 2007 मध्ये प्रदर्शित झालेल्या अक्षयकुमार आणि विद्या बालनच्या ‘भुलभुलैया’ या चित्रपटाच्या सिक्वलमध्ये काम करण्यात असल्याचं म्हटलं जात आहे. हा चित्रपट कार्तिकने स्वीकारल्याचं घोषित केलं तर कार्तिकच्या झोळीत अजून एक सिक्वल पडला असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. 

मेकर्सकडून आयडिया फायनल

Instagram

‘भुलभुलैया’ या चित्रपटाच्या सिक्वलची आयडिया मेकर्सकडून फायनल करण्यात आली आहे. परंतु या चित्रपटाची स्क्रिप्ट अजून पूर्ण लिहून झाली नसल्याचं सांगण्यात आलं आहे. तसंच चित्रपटाची ही संकल्पना कार्तिक आर्यनला ऐकवण्यात आली होती आणि ती ऐकल्यानंतर कार्तिकला ती आवडली असून त्याने या चित्रपटासाठी होकार दिला असल्याचंही आता म्हटलं जात आहे. अजूनही कार्तिककडून याची घोषणा करण्यात आलेली नाही. दरम्यान या चित्रपटासाठी लवकरच दिग्दर्शक निश्चित करण्यात येणार असल्याचंही म्हटलं जात आहे. दिग्दर्शक फायनल झाल्यानंतर या चित्रपटाची अभिनेत्री आणि इतर कलाकार फायनल करण्यात येतील असंही सांगण्यात येत आहे. तसंच मिळालेल्या माहितीनुसार भूषण कुमारला आधीपासूनच या चित्रपटाची निर्मिती करण्यामध्ये इंटरेस्ट होता. त्यामुळे आता त्यांनी या चित्रपटात गुंतवणूक केली असून या चित्रपटाचं शूटिंग हे या वर्षाच्या शेवटी चालू होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. मूळ चित्रपटामध्ये अक्षयकुमार, विद्या बालन, परेश रावल, राजपाल यादव, अमिषा पटेल, शायनी आहुजा हे कलाकार होते. पण या चित्रपटाने बॉक्स ऑफिस आणि प्रेक्षकांचं मन या दोन्हीवर अधिराज्य केलं होतं. यातील विद्या बालन आणि अक्षयकुमारची भूमिका आजही प्रेक्षकांना लक्षात आहे. त्यामुळे आता कार्तिक आर्यन ही भूमिका कशी साकारण याची उत्सुकता प्रेक्षकांना आणि त्याच्या चाहत्यांना लागून राहिली आहे. 

कार्तिकचा हा तिसरा सिक्वल

Instagram

कार्तिक आर्यनने काही दिवसांपूर्वीच 2008 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘दोस्ताना’च्या सिक्वलमध्ये काम करणार असल्याचं घोषित केलं होतं. करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनचा चित्रपट कार्तिकने मिळवला असून आता अजून एका तगड्या भूमिकेत कार्तिक दिसणार असं म्हटलं जात आहे. तसंच कार्तिक सध्या सर्वात व्यस्त कलाकार असून अनन्या पांडे आणि भूमी पेडणेकरसह ‘पती, पत्नी और वो’ या चित्रपटातही तो काम करत आहे. सध्या कार्तिककडे एकूण चार चित्रपट असून कार्तिक यशाची चव सध्या चाखत आहे. ‘सोनू के टिटू की स्वीटी’ नंतर कार्तिककडे तर चित्रपटांची रांग लागली असून सध्या कार्तिक हार्टथ्रोब ऑफ द नेशन झाला आहे असंही म्हटलं जातं. कार्तिकच्या अनेक फिमेल फॉलोअर्स असून कार्तिक सध्या क्लाऊड 9 वर आहे असंही म्हटलं जात आहे. तसंच कार्तिक सध्या सारा अली खानबरोबर चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त असला तरीही यांचे व्हिडिओ सध्या व्हायरल होत असून या दोघांमधील अफेअरच्या चर्चाही जोर धरू लागल्या आहेत. पण यावर कार्तिकने कधीही भाष्य केलेले नाही.