हळद हा एक मसाल्याचा एक पदार्थ आहे. भारतीय खाद्यसंस्कृतीत हळदीचा वापर जवळजवळ प्रत्येक पदार्थांत केला जातो. कारण हळदीचे तुमच्या शरीरावर अनेक चांगले फायदे होतात. त्यामुळे निरोगी आरोग्यासाठी हळद एक वरदानच आहे. पण यासोबत तुमचं सौंदर्य खुलविण्यासाठी देखील हळद उपयुक्त आहे. म्हणूनच लग्न समारंभातदेखील आदल्या दिवशी वधू आणि वराला हळद लावण्याची पद्धत आहे. यासाठीच हळदीचे हे सौंदर्य फायदे जरूर जाणून घ्या.
त्वचेवरील डाग कमी होतात
सतत बदलणारे हवामान आणि प्रदूषण यामुळे तुमच्या चेहऱ्यावर काळे डाग पडतात. कधी कधी पिंपल्समुळेदेखील चेहऱ्यावर काळे डाग दिसू लागतात. या काळ्या डागांना दूर करण्यासाठी हळद एक उत्तम उपाय आहे. यासाठी दोन चमचे हळद आणि चमचाभर दूध एकत्र करून एक जाडसर पेस्ट तयार करा. ही पेस्ट चेहऱ्यावर लावून वीस मिनीटांनी चेहरा कोमट पाण्याने स्वच्छ करा. महिन्यातून एकदा अथवा दोनदा हा उपाय करून तुम्ही तुमच्या चेहऱ्यावरील डाग कमी करू शकता.
चेहऱ्यावरील केस कमी होतात
चेहऱ्यावरील केस दिसू नयेत यासाठी तुम्ही ब्लिचिंग करता. मात्र सतत ब्लिचिंग केल्यामुळे त्यातील केमिकल्समुळे तुमच्या चेहऱ्याचे नुकसान होऊ शकते. शिवाय चेहऱ्यावरील केस कमी करण्यासाठीदेखील हळद तुम्हाला फायदेशीर ठरू शकते. यासाठी हळदीत कोमट नारळाचं तेल टाकून एक फेस पॅक तयार करा. चेहऱ्यावर हा फेसपॅक लावा आणि काही मिनीटांनी चेहरा स्वच्छ करा. नियमित असे केल्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील केसांची वाढ कमी होण्यास मदत होईल.
चेहऱ्यावर नैसर्गिक चमक येते
हळद, दूध आणि मध एकत्र करून चेहऱ्यावर लावल्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर नैसर्गिक चमक दिसू लागेल. दहा ते पंधरा मिनीटे हा फेसपॅक चेहऱ्यावर ठेवा त्यानंतर हाताच्या बोटांनी हलका मसाज करून कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ करा.
हळद एक उत्तम स्क्रबर
त्वचेवरील डेड स्किन काढून टाकण्यासाठी हळद फारच उपयुक्त आहे. हळद आणि दही एकत्र करून चेहऱ्यावर एखाद्या स्क्रबर प्रमाणे लावा आणि मसाज करा. दहा मिनीटांनी चेहरा थंड पाण्याने धुवा. डेड स्किन निघून गेल्यामुळे आणि रक्ताभिसरण सुधारल्यामुळे तुमची त्वचा एकदम फ्रेश दिसू लागेल.
तेलकट त्वचेसाठी परफेक्ट
जर तुमची त्वचा तेलकट असेल तर चंदन पावडर, हळद आणि संत्र्याचा रस एकत्र करून चेहऱ्यावर लावा. या उपायामुळे तुमच्या चेहऱ्यावरील अतिरिक्त तेल निघून जाईल आणि तुमची त्वचा नितळ आणि मऊ दिसेल.
स्ट्रेच मार्क्स कमी होतात
चंदन पावडर, दूध, हळद आणि गुलाबपाणी स्ट्रेच मार्क्स कमी करण्यासाठी तुम्हाला नक्कीच मदत करू शकतात. या सर्व घटकांना एकत्र करून त्याची पेस्ट तुमच्या स्ट्रेच मार्क्सवर नियमित लावा. दररोज असे केल्यास हळू हळू तुमचे स्ट्रेच मार्क्स कमी होऊ लागतील.
पायांच्या टाचा सुंदर होतात
पायांच्या टाचांना भेगा पडल्या असतील तर कधी कधी त्यातून रक्त येऊ लागतं. अशा वेळी पायांच्या टाचांना हळद आणि नारळाचं तेल एकत्र करून लावा. ज्यामुळे तुमच्या टाचांना आराम मिळेल.
पिंगमेंटेशन कमी होतं
जर वयानुसार तुमच्या चेहऱ्यावर पिंगमेटेशनच्या खुणा दिसू लागल्या असतील तर त्यावर हळदीचा लेप जरूर लावा. हळदीमुळे चेहऱ्यावरील वांग कमी होऊ लागेल.
हळदीचा लेप लावण्यापूर्वी POPxo चा हा व्हिडीओ जरूर पहा.
केस आणि त्वचेच्या सौंदर्यासाठी दही आहे उपयुक्त
तुपाचे ‘हे’ आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहीत आहेत का
ग्लिसरीनच्या वापराने मिळवा सुंदर त्वचा – Glycerine For Skin In Marathi
फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम