दिवाळीच्या फराळामध्ये अग्रभागी असतो तो खमंग, चमचमीत आणि खुशखशीत चिवडा. फराळाचा विषय सुरू असताना चिवडा असं नुकता शब्द जरी ऐकला तरी त्याची खमंग चव जीभेवर रेंगाळते आणि तोंडाला चांगलं पाणीच सुटतं नाही का…शिवाय चिवडा हा असा फराळाचा प्रकार आहे जो दिवाळी व्यतिरिक्त कधीही घरी बनवला जाऊ शकतो. चिवड्याचे अनेक प्रकार आहेत त्यामुळे दर महिन्याला तुम्ही वेगवेगळे प्रकार ट्राय करू शकता. जेवणाच्या मधल्या वेळी अथवा सकाळी, संध्याकाळी नाश्ता करताना चिवडा तुमची भूक भागवतो. शिवाय चिवडा बऱ्याचदा पौष्टिक पदार्थांपासून बववलेला असल्यामुळे चिवडा खाण्यामुळे आरोग्यदेखील बिघडत नाही. यासाठीच जाणून घ्या या खमंग चिवडा रेसिपीज.
भाजलेल्या पोह्याचा चिवडा (Roasted Chivda Recipe In Marathi)
भाजलेल्या पोह्यांचा चिवडा हा अनेकांना आवडतो. दिवाळीत तर या चिवड्याचा सुंगध घरोघरी दरवळत असतो. असा हा चिवडा नेमका कसा करायचा यासाठी साहित्य आणि कृती लिहून घ्या.
साहित्य –
- एक किलो पातळ पोहे
- एक वाटी भाजलेली चणा डाळ
- एक वाटी शेंगदाणे
- एक वाटी खोबऱ्याचे काप
- काजू आणि बदाम
- आठ ते दहा हिरव्या मिरच्या
- कढीपत्ता
- कोथिंबीर
- धणे पावडर
- जीरे पावडर
- हळद
- हिंग
- मोहरी
- मीठ
- साखर
- तेल
पोह्यांचा चिवडा करण्याची कृती –
- पोहे आणि इतर कोरडे साहित्य दोन ते तीन दिवस उन्हात वाळवावे.
- एका मोठ्या कढईत पोहे चांगले भाजून घ्यावे आणि ताटात काढून ठेवावे
- शेंगदाणे, डाळ, काजू, बजाम आणि खोबऱ्याचे काप तेलात तळून घ्यावे
- कढईत तेल आणि मोहरी, मिरची, कढीपत्ता हिंग घालून फोडणी करून घ्यावी.
- हळद, मीठ टाकून फोडणी तडतडू लागल्यावर त्यात धणे जीरे पावडर टाकावी, वरून चमचाभर साखर पेरावी आणि गॅस बंद करावा.
- कढईतील फोडणी पोह्यांवर टाकावी.
- पोहे, फोडणीचे साहित्य, शेंगदाणे, काजू आणि बदाम, खोबऱ्याचे काप एकत्र करून चांगले ढवळून घ्यावे
- थंड झाल्यावर एका मोठ्या हवाबंद डब्यात चिवडा भरून ठेवावा.
ट्राय करा या स्वादिष्ट आणि चमचमीत आवळा रेसिपीज
तळलेल्या पोह्यांचा चिवडा (Fried Chivda Recipe In Marathi)
भाजलेल्या पोह्यांप्रमाणेच तळलेल्या पोह्याचा चिवडाही खमंग लागतो. मात्र तो थोडा तेलकट असल्याने डाएट प्रेमींनी तो कमी प्रमाणात खावा.
साहित्य –
- एक किलो जाड अथवा दगडी पोहे
- एक वाटी खोबऱ्याचे काप
- एक वाटी शेंगदाणे
- एक वाटी काजू बदाम
- बेदाणे
- काळ्या मनूका
- कढीपत्ता
- लाल तिखट
- पिठी साखर
- हळद
- हिंग
- मीठ
- चिवडा मसाला
तळलेल्या पोह्यांचा चिवडा बनवण्याची कृती –
- एका कढईत तेल तापवावे आणि मंद गॅसवर खोबरे, शेंगदाणे, काजू, बदाम, मनूका, कढीपत्ता, पोहे पाठोपाठ तळून घ्यावे
- तेल निथळल्यावर सर्व साहित्य एकत्र करावे
- त्यात हळद, लाल तिखट, चिवडा मसाला, मीठ आणि पिठीसाखर घालावी
- सर्व चिवडा मिसळून एकत्र करावा
- थंड झाल्यावर डब्यात भरून ठेवावा
प्रतिकार शक्ती वाढवणारा आयुर्वेदिक काढा रेसिपी
मखाणा चिवडा (Makhana Chivda Recipe In Marathi)
मखाणा हा सध्या अनेकांच्या डाएटमध्ये समाविष्ट झाला आहे. त्यामुळे मधल्या वेळची भूक भागवण्यासाठी तुम्ही मखाण्याचा चिवडा नक्कीच करू शकता.
साहित्य –
- तीन कप मखाणा
- एक कप शेंगदाणे
- एक कप खोबऱ्याचे काप
- तेल
- मोहरी
- जिरे
- हिंग
- हळद
- लाल तिखट
- कढीपत्ता
- आमचूर मसाला
- चिवडा मसाला
- पिठी साखर
- मीठ
मखाणा चिवडा बनवण्याची कृती –
- मखाणा कढईत मंद आचेवर भाजून घ्यावा
- मखाणा काढून ठेवावा आणि त्या कढईत तेल गरम करावे
- तेलात राई, जिरे, हिंग, कढीपत्ता, शेंगदाणे, खोबऱ्याचे काप परतून घ्यावे. त्यात हळद, लाल तिखट, चिवडा मसाला चांगले एकजीव करावा
- वरून मखाणा आणि आमचूर पावडर मिसळावी
- मीठ आणि पिठी साखर पेरून थंड झाल्यावर चिवडा बरणीत भरून ठेवावा
मक्याचा चिवडा (Cornflakes Chivda Recipe In Marathi)
मक्याच्या पोह्यांचा कुरकुरीत चिवडा जर तुम्हालाही आवडत असेल तर तो घरी बनवण्यासाठी हे साहित्य आणि कृती तुम्हाला नक्कीच माहीत असायला हवी.
साहित्य –
- पाच कप मक्याचे पोहे अथवा कॉर्न फ्लेक्स
- तेल
- मोहरी
- जिरे
- हिंग
- हळद
- लाल तिखट
- कढीपत्ता
- शेंगदाणे
- बदाम
- काजू
- धणे पावडर
- जिरा पावडर
- आमचूर पावडर
- पिठी साखर
- मीठ
मखाणा चिवडा बनवण्याची कृती –
- एका मोठ्या कढईत तेल गरम करून त्यात शेंगदाणे, बदाम आणि काजू तळून घ्यावे
- मक्याचे पोहे अथवा कॉर्न फ्लेक्स तळून तेल निथळू द्यावे
- फोडणीसाठी जिरे, मोहरी, हिंग, लाल तिखट, कढीपत्ता एकत्र करून फोडणीत टाकावा
- तडतडलेली फोडणी तळलेल्या मक्याच्या पोह्यांवर टाकावी
- शेंगदाणे, बदाम, काजू एकत्र करावी
- वरून जीरे पावडर, धणे पावडर, आमचूर पावडर, मीठ आणि पिठीसाखर पेरावी
- सर्व साहित्य एकत्र करावे आणि चिवडा डब्ब्यात भरून ठेवावा
वाचा – पांढऱ्या भाजीचा बटाटावडा
डाएट चिवडा (Diet Chivda Recipe In Marathi)
आजकाल प्रत्येकजण आरोग्याबाबत आणि आहाराबाबत जागरूक झालेला आहे. तुम्ही देखील फिटनेस फ्रिक असाल तर हा डाएट चिवडा कसा करायचा हे जाणून घ्या.
साहित्य –
- तुमच्या आवडीनुसार लाह्या
- तेल
- मोहरी
- जिरे
- कढीपत्ता
- हिंग
- हिरवी मिरची
- शेंगदाणे
- हळद
- मीठ
डाएट चिवडा बनवण्याची कृती
- लाह्या दोन ते तीन मिनिटे भाजून घ्या
- चमचाभर तेलात हिंग, हळद, मोहरी, जिरे, कढीपत्ता, हिरवी मिरचीची फोडणी द्या
- मूठभर शेंगदाणे भाजून त्यात टाका
- त्यात लाह्या टाकून वरून चांगलं परतून घ्या
- जास्त तेलाचा वापर न करता हा डाएट चिवडा तुम्ही तयार करू शकता.
- यासाठी तांदूळ, ज्वारी, मका अशा कोणत्याही लाह्यांचा वापर केल्यास तो चविष्ट लागू शकतो.
कुरमुरे चिवडा (Kurmuryacha Chiwada Recipe In Marathi)
कुरमुरे पचायला हलके असल्यामुळे मधल्या वेळच्या छोट्या भुकेसाठी कुरमुऱ्यांचा चिवडा नक्कीच बेस्ट पर्याय ठरू शकतो.
साहित्य –
- अर्धा किलो कुरमुरे
- दोन वाट्या बारीक शेव
- एक वाटी शेंगदाणे
- एक वाटी खोबऱ्याचे काप
- कढीपत्ता
- पाच हिरव्या मिरच्या
- चार पाच लसणाच्या पाकळ्या
- हळद
- मीठ
- पिठी साखर
- तेल
कुरमुऱ्यांचा चिवडा बनवण्याची कृती –
- तेल गरम करावे मध्यम आचेवर शेंगदाणे, खोबऱ्याचे काप, लसूण, कढीपत्ता तळून घ्यावे
- कढीपत्ता, हिरवी मिरची, हळदीची फोडणी करावी
- फोडणीत वरून कुरमुरे टाकावे
- वरून मीठ, साखर पेरून चिवडा थंड होऊ द्यावा
- वरून शेव टाकून गरमागरम चिवडा खाण्यास द्यावा
भडंग (Bhadang Recipe In Marathi)
भडंग हा कुरमुरे चिवड्याचाच एक लोकप्रिय प्रकार आहे. त्यामुळे हा चमचमीत चिवडा अनेकांना नक्कीच आवडतो. जर तुम्हालाही भडंग खायची असेल तर ही पद्धत वापरा.
साहित्य –
- अर्धा किलो कुरमुरे
- तेल
- हळद
- लाल तिखट
- कढीपत्ता
- मेतकूट
- शेंगदाणे
- आमचूर पावडर
- मीठ
- साखर अथवा पिठीसाखर
भडंग बनवण्याची कृती –
- कुरमुरे भाजून घ्यावे
- कढईत तेल गरम करून त्यात शेंगदाणे, कढीपत्ता तळून घ्यावा
- फोडणीत हळद, लाल तिखट टाकावे
- त्यात कुरमुरे परतून घ्यावे
- चिवडा गॅसवरून खाली उतरून त्यात मीठ, पिठीसाखर, आमचूर पावडर मिसळावी
- थंड झाल्यावर चिवडा डब्ब्यात भरून ठेवावा
साबुदाणा चिवडा (Sabudana Chivda Recipe In Marathi)
उपवासाच्या दिवशी चिवडा खाण्यासाठी तुम्ही साबुदाणे आणि शेंगदाण्याचा हा चिवडा नक्कीच ट्राय करू शकता.
साहित्य –
- एक वाटी नायलॉन साबुदाणे
- अर्धी वाटी शेंगदाणे
- पाव वाटी खोबऱ्याचे काप
- तेल
- जिरे पावडर
- लाल तिखट
- मीठ
- पिठी साखर
साबुदाण्याचा चिवडा बनवण्याची कृती –
- साबुदाणे तळून निथळत ठेवावे
- शेंगदाणे, खोबऱ्याचे काप तळून घ्यावे
- सर्व साहित्य एकत्र करून त्यात मीठ, लाल तिखट, जिरे पावडर मिसळावी
- थंड झाल्यावर डब्ब्यात भरून ठेवावा
ज्वारीच्या लाह्यांचा चिवडा (Jwarichya Lahyancha Chivda Recipe In Marathi)
ग्लुटेन फ्री डाएटसाठी आणि चिवड्यामधून पुरेसे फायबर्स मिळण्यासाठी तुम्ही ज्वारीच्या लाह्यांचा चिवडा बनवू शकता.
साहित्य –
- अर्धा किलो ज्वारीच्या लाह्या
- एक वाटी शेंगदाणे
- कढीपत्ता
- हळद
- लाल तिखट
- मीठ
- पिठीसाखर
- तेल
- मोहरी
- जिरे
ज्वारीच्या लाह्यांचा चिवडा बनवण्याची पद्धत –
- दोन दिवस ज्वारीच्या लाह्या उन्हात गरम कराव्या
- कढईत लाह्या थोड्या भाजून घ्याव्या
- कढईत तेल गरम करून त्यात जिरे, मोहरी, शेंगदाणे, कढीपत्ता टाकून फोडणी तयार करावी
- लाह्यांवर फोडणी टाकून त्यावर मीठ, पिठीसाखर पेरावी
- सर्व साहित्य एकजीव करावे थंड झाल्यावर डब्ब्यात भरावे
गव्हाचा पौष्टिक चिवडा (Gavhacha Paushtik Chivda Recipe In Marathi)
गहू हे भारतातील लोकांचे मुख्य अन्न आहे. त्यामुळे या गव्हाचा वापर तुम्ही हा पौष्टिक चिवडा बनवण्यासाठी करू शकता.
साहित्य –
- गव्हाच्या लाह्या
- मीठ
- शेंगदाणे
- कढीपत्ता
- लसूण
- जीरे
- मोहरी
- हिंग
- हळद
- लाल तिखट
- मीठ
- साखर
- सर्व साहित्याचे प्रमाण तुमच्या आवडीनुसार घ्या
गव्हाचा पौष्टिक चिवडा बनवण्याची कृती –
- गव्हाच्या लाह्या कढईत भाजून घ्या
- शेंगदाणे तळून घ्या
- लसूणाच्या पाकळ्या तेलात तळून घ्या
- कढईत फोडणी तयार करून त्यात मोहरी, जिरे, हळद,हिंग, कढीपत्ता, लाल तिखटाची फोडणी तयार करावी
- या फोडणीत गव्हाच्या लाह्या टाकाव्या
- वरून मीठ आणि साखर पेरावी
- थंड झाल्यावर डब्बात भरून ठेवावा
बाजरीच्या लाह्यांचा चिवडा (Bajrichya Lahyancha Chivda Recipe In Marathi)
थंडीत बाजरी खाण्याचे अनेक फायदे आहेत. यासाठीच ट्राय करा हा बाजरीच्या लाह्यांचा चिवडा.
साहित्य –
- अर्धा किलो बाजरीच्या लाह्या
- एक वाटी शेंगदाणे
- कढीपत्ता
- हळद
- लाल तिखट
- मीठ
- पिठीसाखर
- तेल
- मोहरी
- जिरे
बाजरीच्या लाह्यांचा चिवडा बनवण्याची पद्धत
- दोन दिवस बाजरीच्या लाह्या उन्हात गरम कराव्या
- कढईत लाह्या थोड्या भाजून घ्याव्या आणि पातेल्यात काढून ठेवाव्या
- कढईत तेल गरम करून त्यात जिरे, मोहरी, शेंगदाणे, कढीपत्ता टाकून फोडणी तयार करावी
- लाह्यांवर फोडणी टाकून त्यावर मीठ, पिठीसाखर पेरावी
- सर्व साहित्य एकजीव करावे थंड झाल्यावर डब्ब्यात भरावे
फणसाचा चिवडा (Jackfruit Chivda Recipe In Marathi)
कोकणात फणसाचे अनेक प्रकार तुम्हाला खायला मिळतात. आरोग्यासाठी फणसाचे फायदे होतात. मात्र जर तुम्ही कोकण प्रांतात राहणारे नसाल तर तुम्ही फळसाचे तळलेले गरे अथवा फणसाचा चिवडा ट्राय करायलाच हवा.
साहित्य –
- कच्च्या फणसाचे गरे
- मीठ
- तेल
- चिवडा मसाला
फणसाचा चिवडा बनवण्याची कृती –
- कच्च्या फणसाचे गरे घेऊन त्याचे एकसमान, पातळ, उभे काप तयार करा
- वाफ देण्यासाठी तोन ते तीन मिनिटं गरे मीठाच्या पाण्यात वाफवून घ्या
- जास्ती पाणी निथळून हे गरे तळून घ्या
- तळलेल्या गऱ्यांवर चिवडा मसाला पेरा
- थंड झाल्यावर बरणीत भरून ठेवा