xSEO

1 वर्षाच्या बाळाचा आहार | 1 Year Old Baby Food In Marathi

Vaidehi Raje  |  Apr 29, 2022
1 वर्षाच्या बाळाचा आहार

जेव्हा आपल्या घरात बाळ जन्माला येते, तेव्हा संपूर्ण कुटुंब आनंदित होते. घरातील सगळे सदस्य त्या बाळाच्या मागेपुढे दिमतीला असतात. बाळ छोटेसे असते पण ते संपूर्ण घराला नाचवते आणि आईबाबा तर बाळाच्या चोवीस तास बाळाच्या दिमतीला हजर असतातच पण घरातील इतर सदस्य सुद्धा बाळाचे कौतुक करण्यास उत्सुक असतात. बाळाच्या वाढीचे सगळे टप्पे बघण्याचा घरातल्या सर्वांनाच उत्साह असतो. तसेच बाळाला काही त्रास झाला तर सगळ्यांचाच जीव वर-खाली होतो. जोपर्यंत बाळ बोलू शकत नाही तोपर्यंत त्याला नेमके काय हवे आहे असा प्रश्न पालकांसमोर असतो. जरी बाळाला 12 महिने स्तनपान दिले जाते, परंतु जेव्हा ते 1 वर्षाचे होते तेव्हा डॉक्टर त्याला पौष्टिक आहार (1 Varshachya Balacha Aahar) देण्याची शिफारस करतात. अशा परिस्थितीत बाळाला पौष्टिक आहारात कोणत्या गोष्टी द्याव्यात हे आईबाबांनी जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे जेणेकरून त्यांचे बाळ वयाच्या पहिल्या वर्षापासूनच निरोगी आणि बुद्धिमान बनू शकेल. अमेरिकन ऍकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्सनुसार, बाळ 12 महिन्यांचे झाल्यावर त्याच्या चांगल्या आरोग्यासाठी 1,000 कॅलरीज, 700 मिलीग्राम कॅल्शियम, 600 IU व्हिटॅमिन डी आणि 7 मिलीग्राम लोह असलेल्या पौष्टिक आहाराची आवश्यकता असते. तर जाणून घेऊया 1 वर्षाच्या बाळाचा आहार कसा असावा. बाळाच्या सर्वांगीण विकासासाठी बाळाला कुठले पदार्थ पौष्टिक पदार्थ द्यावेत तसेच बाळाला कोणते पदार्थ देऊ नयेत. बाळाच्या आईला कायमच बाळाच्या जेवणाची चिंता असते, बाळाने सगळं पौष्टिक अन्न पोटभर खावं अशीच आईची इच्छा असते. म्हणूनच येथे तुमच्या मदतीसाठी 1 वर्षाच्या बाळाचा आहार तक्ता दिलेला आहे जो तुम्ही तुमच्या बाळासाठी फॉलो करू शकता. 

1 वर्षाच्या बाळाचा आहार तक्ता – Meal Plan/ Diet Chart For 1 Year Old Baby

1 वर्षाच्या बाळाचा आहार

सामान्यपणे एक वर्षाच्या बाळांना दात येऊ लागलेले असतात, यासोबतच मुलांचा विकासही झपाट्याने होतो आणि बाळे हळूहळू चालायला लागतात. बाळाला दात येतात तेव्हा  त्यांना त्रास देखील होत असतो. म्हणून यावेळी त्यांना अधिक पोषण मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे बाळाच्या आहाराचा तक्ता बनवताना नेहमी लक्षात ठेवा की त्यांच्या आहारात सर्व पोषक तत्वे मुबलक प्रमाणात असायला हवेत. बाळ एक वर्षाचे झाल्यावर ते हळूहळू अन्न चघळायला शिकतात, त्यामुळे त्यांना असे अन्न द्यायला हवे जे त्यांना हातात पकडणे सोपे आहे. या कोरोनासारख्या काळात आणि भविष्यातही बाळांना मऊ आणि ताजी फळे देणे  हा एक चांगला पर्याय आहे. त्यामधून बाळांना नैसर्गिक पोषण देखील मिळेल, ज्यामुळे तुमच्या बाळाचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. तुम्ही बाळांना बाहेरचे दूध देखील देऊ शकता. दूध आणि दही हे प्रथिने आणि हाडे तयार करणार्‍या कॅल्शियमचे उत्कृष्ट स्रोत आहेत, जे त्यांच्या वाढत्या दातांसाठी खूप फायदेशीर आहेत. हळूहळू तुमच्या बाळाला दूध आणि दुग्धजन्य पदार्थांसह नवीन पौष्टिक पदार्थांची ओळख करून द्या. परंतु एकावेळी एकच अन्न त्यांना द्या आणि जर तुमच्या बाळाला दुधाशी संबंधित कोणतेही नवीन अन्न द्यायचे असेल तर त्यांचे शरीर आधीच्या आहाराला कशी प्रतिक्रिया देत आहे हे बघा. मुले 4 वर्षांची होईपर्यंत त्यांना कडक अन्न चावण्यास व चघळण्यास त्रास होतो. त्यामुळे तोपर्यंत त्यांचे अन्न चांगले मॅश केलेले असावे किंवा त्यांना सहज चघळता येण्याजोगे तुकडे केलेले असावेत.

अधिक वाचा – 9 महिन्याच्या बाळाचा आहार 

दिवस सकाळी उठल्यावर सकाळचा नाश्ता मिड मॉर्निंग दुपारचे जेवण संध्याकाळचा नाश्ता रात्रीचे जेवण 
सोमवार स्तनपान / गायीचे दूध पोहे / इडली / डोसा भाज्यांचे सूप वरण भात तूप / खिचडी व मॅश केलेली बिनतिखट भाजी  मॅश केलेले सफरचंद मेथीचा पराठा व तूप 
मंगळवार स्तनपान / गायीचे दूध मोड आलेल्या मुगाचे घावन/ धिरडं पौष्टीक लाडू पालक खिचडी / बिनतिखट भाजी ,तूप लावलेली पोळी /पराठा मॅश केलेले केळे वरण भात तूप/ खिचडी 
बुधवार स्तनपान / गायीचे दूध नाचणीची पेज / गव्हाची लापशी ज्वारीच्या लाह्या /गव्हाच्या लाह्या बिनतिखट आलू पराठा ,दही/ भाज्या घालून केलेला दलिया मॅश केलेले चिकू पनीर भुर्जी व पराठा किंवा पोळी 
गुरुवार स्तनपान / गायीचे दूध कणकेचा शिरा /बनाना पॅकनेक पोह्याचा पौष्टिक लाडू आमटी भात तूप / तूप लावलेली पोळी व बिनतिखट भाजी ,वरण छोटी वाटीभर द्राक्षे पालक खिचडी व तूप 
शुक्रवार स्तनपान / गायीचे दूध नाचणीचा डोसा / घावन फ्रुट स्मूदी भाज्यांचा पराठा व दही / वरण भात ,तूप व भाजी मऊ पिकलेली गोड पपई पोळी भाजी व वरण /आमटी 
शनिवार स्तनपान / गायीचे दूध क्विनोआ ऍपल खीर पौष्टिक लाडू दलिया व भाज्यांचे सूप बेरी/ संत्री / आंबा भाज्या घालून केलेला पुलाव 
रविवार स्तनपान / गायीचे दूध भाज्यांचा पराठा आणि तूप भाज्यांचे सूप वरण भात तूप/ खिचडी मॅश केलेलं अवाकाडो किंवा केळे भाज्यांचा पराठा व दही 
1 वर्षाच्या बाळाचा आहार तक्ता

1 वर्षाच्या बाळासाठी सर्वोत्तम अन्न – Best Food For 1 Year Old Baby

1 वर्षाच्या बाळाचा आहार

1 वर्षाचे बाळ खूप ऍक्टिव्ह झालेले असते.या ऍक्टिव्ह बाळाची काळजी कशी घ्यायची हा प्रश्न आईबाबांना पडतो. नुकतेच उभे राहायला व कदाचित चालायला शिकल्याने त्याला एका ठिकाणी बसून राहणे आवडत नाही. त्यामुळे सतत हालचाल करत असलेल्या या वाढत्या वयाच्या बाळाला भरपूर पोषणाची आवश्यकता असते. तुमच्या बाळाच्या सर्वांगीण वाढीसाठी त्याला हे अन्नपदार्थ आवर्जून द्या.

केळी, पीच आणि इतर मऊ फळे

मऊ आणि ताजी फळे खाणे खूप फायदेशीर आहे. फळांमध्ये असलेल्या नैसर्गिक पोषक घटकांमुळे बाळाला भरपूर पोषण देखील मिळेल, ज्यामुळे तुमच्या बाळाचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. हळूहळू तुमच्या बाळाला केळी, संत्री, स्ट्रॉबेरी, पीच किंवा आंबा यांसारखी फळे द्या. फळे लहान तुकड्यांमध्ये ठेवा, जेणेकरून त्यांना गिळताना त्रास होणार नाही. द्राक्षे देताना त्यांचे नेहमी दोन किंवा चार तुकडे करा आणि तुमच्या बाळाला खायला द्या. मऊ आणि ताजी फळे वेळेचा अपव्यय न करता सहजपणे कापून तयार करता येतात आणि जेव्हाही तुम्हाला कुठेतरी बाहेर जायचे असेल तेव्हा ते तुम्ही एअरटाइट डब्यात काप करून घेऊन जाऊ शकता. नेहमी लक्षात ठेवा की फ्रीजमध्ये ठेवलेली गार फळे बाळाला देऊ नयेत. ती आधी बाहेर काढून ठेवून मग नॉर्मल तापमानाला आल्यावर बाळाला द्यावीत. बाळाचे पोट साफ होण्यासाठी त्याला आहारात आवर्जून फळे द्या.

 दूध आणि दही

जर तुमच्या बाळाला तुम्ही 12 महिने फक्त स्तनपान देत असाल आणि बाहेरचे दूध देत नसाल तर आता तुम्ही बाळाला गायीचे दूध देण्यास सुरुवात करू शकता. दूध आणि दही हे कॅल्शियमचे उत्कृष्ट स्त्रोत आहेत, जे त्यांच्या हाडांसाठी व दातांसाठी खूप फायदेशीर आहेत. तुम्ही या वयात त्यांना मध देखील देऊ शकता, परंतु 12 महिन्यांपेक्षा कमी वयाच्या बाळाला ते कधीही देऊ नये. असे केल्याने त्यांना बोट्युलिझमचा धोका होऊ शकतो, जो एक गंभीर संसर्ग आहे. तुम्ही तुमच्या बाळाला हळूहळू दूध आणि दुग्धजन्य पदार्थांसह नवीन पौष्टिक पदार्थ देखील देऊ शकता. बाळाला दुधाचे इतर पर्याय देण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. कारण दूध हे बाळाच्या योग्य पोषणासाठी आवश्यक आहे.

 लापशी

मुले 4 वर्षांची होईपर्यंत त्यांना कडक पदार्थ खाण्यास त्रास होतो. त्यामुळे तोपर्यंत त्यांचे अन्न चांगले मॅश केलेले किंवा सहज चघळता येण्याजोगे असावे. ओट्स हा एक उत्तम पर्याय आहे कारण तुमचे बाळ ते सहजपणे गिळू शकते. त्यात प्रथिने, कार्ब्स, जीवनसत्त्वे आणि खनिजे असे पौष्टिक घटक आहेत.तसेच तुम्ही बाळाला लापशी रव्याचा दलिया देखील देऊ शकता. 

फक्त तृणधान्यांपासून बनवलेले पॅनकेक्स

साधारणपणे लहान मुलांना पॅनकेक्स आवडतात आणि संपूर्ण धान्य हे जीवनसत्त्वे, खनिजे आणि फायबरचा समृद्ध स्रोत आहेत. म्हणून तृणधान्यांपासून बनवलेले पॅनकेक्स खाल्ल्याने तुमच्या 1 वर्षाच्या बाळाला चांगले पोषण मिळेल.

अंडी

लहान मुले आणि वृद्ध या दोघांसाठीही अंडी हा एक पोषक आहार आहे. अंड्यांमध्ये प्रथिने, फॅट्स आणि इतर पोषक घटक असतात, जे डोळे आणि मेंदूसाठी फायदेशीर असतात. अंडी उकडून सोलून त्याचे छोटे तुकडे करून बाळाला खायला द्या. अंड्याचे लहान तुकडे करा जेणेकरून तुमचे मूल ते स्वतःच स्वतःच्या हाताने खाऊ शकेल.

टोफू

टोफू हा लोह, कॅल्शियम आणि प्रथिनांचा उत्तम स्रोत आहे. फक्त 1 वर्षाच्या बाळासाठी फक्त 56 ग्रॅम असलेले फर्म टोफू योग्य मानले जाते, कारण ते तुमच्या बाळासाठी सुमारे 1 मिलीग्राम लोह किंवा सुमारे 14% DV प्रदान करते. तुमच्या बाळाला ‘सोया ऍलर्जी’ असेल तर तुम्ही त्याला टोफू देऊ नका.  

अधिक वाचा – 5 महिन्याच्या बाळाचा आहार तक्ता

1 वर्षाच्या बाळाने किती खाल्ले पाहिजे – How Much A Baby Should Eat At This Age

1 वर्षाच्या बाळांसाठी मील प्लॅन किंवा बेबी फूड चार्ट बनवताना हे लक्षात ठेवायाला हवे  की बाळाला दिवसातून किमान 3 ते 4 वेळा आईचे दूध किंवा फॉर्म्युला मिल्क पाजले पाहिजे आणि हळूहळू ते 3 किंवा 2 वेळा पाजण्यापर्यंत कमी करा. परंतु बाळाला किमान 2 वेळा दूध दिलेच पाहिजे. याशिवाय बाळाला दिवसातून दोन ते तीन वेळा स्नॅक्स खायला द्यावे. याचा अर्थ बाळाला 4 ते 5 वेळा घन पदार्थ किंवा अन्न आणि 2 ते 3 वेळा दूध देणे आवश्यक आहे. 

जर तुम्हाला वाटत असेल की तुमचे बाळ घन पदार्थ घेऊ शकत नाही, तर तुम्ही बाळाला सकाळचा नाश्ता आणि दुपारच्या जेवणाच्या दरम्यान दोनदा घन पदार्थ देऊ शकता आणि दुपारच्या जेवणात आणि रात्रीच्या जेवणात बेबी फूड शेक आणि ज्यूस देऊ शकता. तुमच्या बाळाला काय आवडते व पचते त्यानुसार तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने बाळाचा मील प्लॅन तयार करा. 

1 वर्षाच्या बाळासाठी मुख्य पोषक तत्वे कोणती आहेत

1 वर्षाच्या बाळाचा आहार

एक वर्षाच्या आणि त्यापुढच्या बाळांना त्यांच्या जेवणातील सुमारे अर्ध्या कॅलरीज फॅट्समधून मिळायला हव्यात. त्यांच्या विकासाच्या या टप्प्यावर सामान्य वाढ आणि विकासासाठी हेल्दी फॅट्स त्यांच्या शरीरात जाणे खूप महत्वाचे आहे. या वयात त्यांच्या वाढीसाठी आणि विकासासाठी कोलेस्टेरॉल आणि इतर फॅट्स देखील खूप महत्वाचे आहेत. एकदा तुमचे मुल दोन वर्षांचे झाले की, तुम्ही हळूहळू चरबीचा वापर कमी करू शकता. अवाकाडो, ऑलिव्ह ऑईल, मासे, नट बटर आणि दुग्धजन्य पदार्थांत आढळणारे हेल्दी फॅट्स तुमच्या बाळासाठी आणि तुमच्यासाठीही चांगले असतात. तळलेले पदार्थ, फास्ट फूड आणि अनेक पॅकबंद पदार्थांमध्ये आढळणारे अनहेल्दी फॅट्स कोणत्याही वयात आरोग्यदायी नसतात. 

तुम्ही तुमच्या बाळाचे दैनंदिन उष्मांक सुमारे 1,000 कॅलरीजवर ठेवल्यास, तुम्हाला जास्त आहार आणि वजन वाढण्याच्या जोखमीबद्दल काळजी करण्याची गरज नाही. अमेरिकन ऍकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्सच्या मते, बाळ 12 महिन्यांचे झाले की त्याला 1,000 कॅलरीज, 700 मिग्रॅ कॅल्शियम, 600 आययू व्हिटॅमिन डी आणि 7 मिग्रॅ लोह प्रत्येक दिवशी मिळणे आवश्यक आहे. हे लक्षात घेऊन बाळाचा आहारतक्ता तयार करावा.एका वर्षाच्या मुलांसाठीही मोठ्यांना आवश्यक असतात त्याच मूलभूत पोषण गटातील अन्न आवश्यक आहे.तुम्ही तुमच्या मुलाला प्रत्येक मूलभूत अन्नगटातील पदार्थ द्या. बाळाने भरपूर जीवनसत्त्वे असलेला संतुलित आहार घेतला पाहिजे.बाळाला जास्त मसालेदार, खारट, तेलकट किंवा गोड पदार्थ देऊ नका. ते दीर्घकालीन चांगल्या आरोग्यासाठी हानिकारक असू शकतात. बाळाला जे काही द्याल ते मॅश केलेले किंवा लहान, सहज चघळता येण्याजोगे तुकडे केलेले असल्याची खात्री करा.  तुमचे मूल फक्त बसलेले असताना आणि प्रौढ व्यक्तीच्या देखरेखीखाली जेवेल याची काळजी घ्या. 

अधिक वाचा – 6 महिन्याच्या बाळाचा आहार 

1 वर्षाच्या बाळासाठी घरगुती सोप्या रेसिपीज – Homemade Baby Food Recipes For 1 Year Old Baby

1 वर्षाच्या बाळाचा आहार

येथे बाळांना आवडतील अशा आणि पौष्टिक पण बनवण्यास सोप्या अशा पाककृती दिल्या आहेत. यातील काही पदार्थ तुम्ही बाळाला सकाळी नाश्त्याला देऊ शकता, काही पदार्थ दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणात देऊ शकता. 

रव्याची लापशी

साहित्य – रवा 2 चमचे, पाणी  ½ कप, तूप 1 किंवा 2 टीस्पून.,गूळ चवीनुसार, दूध

कृती- रवा मंद आचेवर तुपावर भाजून घ्या. रवा गुलाबी रंगावर भाजा, तपकिरी करू नका. सुगंध आल्यावर बंद करा व बाजूला ठेवा. पाणी उकळून त्यात भाजलेला रवा हळूहळू घाला आणि मिश्रण घट्ट झाल्यावर गॅस बंद करा व त्यात गूळ आणि दूध घाला. याची कन्सिस्टंसी बाळाला खाता येईल अशी पातळसर ठेवा.

खिचडी 

साहित्य: तांदूळ 1 वाटी, मूग डाळ ½ कप, जिरे 1 टीस्पून, तूप 1 टीस्पून, कढीपत्ता, आले, पाणी – 5 कप, मीठ चवीनुसार

कृती – तांदूळ आणि मूग डाळ धुवून अर्धा तास भिजत ठेवा.कुकरमध्ये तूप गरम करून त्यात जिरे घाला.

त्यात आले आणि कढीपत्ता घालून एक मिनिट परतून घ्या. त्यात तांदूळ-डाळ घाला आणि पाणी व मीठ घाला. खिचडी शिजली की त्यातला  कढीपत्ता काढा आणि बाळाला खाऊ घालण्यापूर्वी खिचडी थोडी मॅश करा.

टोमॅटो आणि गाजर सूप

साहित्य- 1 गाजर ,1 टोमॅटो , बारीक चिरलेला कांदा 2 टेस्पून, लसूण 1 छोटी पाकळी बारीक चिरून, तूप 1 टीस्पून, जिरे ¼ टीस्पून, पाणी 1.5 कप, मीठ

कृती – भाज्या पूर्णपणे स्वच्छ करा आणि त्याचे लहान चौकोनी तुकडे करा. प्रेशर कुकरमध्ये तूप गरम करून त्यात जिरे घाला आणि नंतर कांदा व लसूण परतून घ्या. पुरेसे पाणी घालून नंतर त्यात गाजर आणि टोमॅटो घाला. तसेच, मीठ आणि मिरपूड घाला. एक उकळी आणा आणि मध्यम आचेवर तीन शिट्या करा. भाज्या मिक्सरमध्ये बारीक करून सूप गाळून घ्या व पुन्हा एक उकळी काढा. सूप कोमट झाले की बाळाला पाजा. 

आमटी / फोडणीचे वरण 

साहित्य- मूग डाळ: ½ कप, तूर डाळ दीड कप, हळद: 1 टीस्पून,तूप 2 टीस्पून, जिरे 1 टीस्पून, पाणी 3 कप, चवीनुसार मीठ

कृती – डाळ धुवून त्यात हळद व मीठ घाला. कुकरमध्ये पाणी घालून डाळ शिजवून घ्या. डाळ शिजली की थोडी पातळ करून उकळून घ्या व तिला तूप जिऱ्याची फोडणी द्या. 

गव्हाचा डोसा / घावन / धिरडं 

साहित्य- कणिक 2 वाट्या, तांदळाचे पीठ ¼ कप, 1 कांदा बारीक चिरून, आले बारीक चिरून 1 चमचा, जिरे  ½ टीस्पून, पाणी 4 कप,मीठ, तूप

कृती – कणिक, तांदळाचे पीठ, जिरे, चिरलेला कांदा, आले आणि मीठ एकत्र करा. यात आवश्यकतेनुसार पाणी घालून चांगले मिसळा. डोश्याच्या पिठासारखे हे पीठ भिजवून घ्या. नॉन-स्टिक तवा गरम करा आणि त्यावर घावन घाला. तूप घालून दोन्ही बाजूंनी धिरडं खरपूस भाजून घ्या. 

1 वर्षाच्या बाळाला कुठले पदार्थ देऊ नयेत – Which Food To Avoid

लहान मुलांनी जास्त मीठ खाऊ नये, कारण ते त्यांच्या मूत्रपिंडासाठी चांगले नाही. तुमच्या बाळाच्या जेवणात किंवा स्वयंपाकाच्या पाण्यात मीठ घालू नका आणि स्टॉक क्यूब्स किंवा ग्रेव्ही वापरू नका, कारण त्यात अनेकदा मीठ जास्त असते. तसेच तुमच्या बाळाला जास्त साखरेचीही गरज नाही. साखरयुक्त स्नॅक्स आणि पेये जसे की फळांचा रस आणि सरबते बाळाला देऊ नका. याने बाळाचे दात किडणे टळेल. त्याचप्रमाणे बाळाला जास्त प्रमाणात सॅच्युरेटेड फॅट असलेले पदार्थ देऊ नका, जसे की कुरकुरीत तळलेले पदार्थ, बिस्किटे आणि केक इत्यादी. हे पदार्थ मोठ्यांसाठीही हेल्दी नाहीत. 

कधीकधी, मधामध्ये काही बॅक्टेरिया असतात जे बाळाच्या आतड्यांमध्ये विषारी पदार्थ तयार करू शकतात, ज्यामुळे इन्फन्ट बोटुलिझम हा एक अतिशय गंभीर आजार होऊ शकतो. तसेच अख्खे शेंगदाणे व काजू, बदाम बाळाला देऊ नका. कारण ते घशात अडकले तर बाळ गुदमरू शकते.

7 महिन्याच्या बाळाचा आहार

1 वर्षाच्या बाळाच्या आहारासंबंधी पडणारे सामान्य प्रश्न । FAQ 

प्रश्न – एक वर्षाच्या  बाळाला दररोज किती कॅलरी लागतात?

उत्तर – बाळ 12 महिन्यांचे झाले की त्याला 1,000 कॅलरीज, 700 मिग्रॅ कॅल्शियम, 600 आययू व्हिटॅमिन डी आणि 7 मिग्रॅ लोह प्रत्येक दिवशी मिळणे आवश्यक आहे. 


प्रश्न – एक वर्षाच्या  बाळाने दिवसातून किती वेळा खावे? 

उत्तर – बाळ एक वर्षाचे झाल्यावर त्याला  4 ते 5 वेळा घन पदार्थ किंवा अन्न आणि 2 ते 3 वेळा दूध देणे आवश्यक आहे. 

प्रश्न – एक वर्षाचे बाळ सामान्य अन्न खाऊ शकते का?

उत्तर – 1 वर्षाच्या बाळासाठी, घन पदार्थ व आरोग्यदायी स्नॅक्स  हे ऊर्जा आणि पोषणाचे मुख्य स्त्रोत आहेत. तुमचे बाळ दिवसातून तीन ते चार वेळा तीन चतुर्थांश ते एक कप अन्न आणि जेवण दरम्यान एक ते दोन स्नॅक्स घेऊ शकतो. बाळ किमान 2 वर्षांचे होईपर्यंत त्याला पाहिजे तितके स्तनपान चालू ठेवा. आपण खातो तेच अन्न कमी तिखट व बिन मसाल्याचे मॅश केलेले अन्न बाळ खाऊ शकते. 

प्रश्न- एक वर्षाच्या बाळाचे वजन किती असावे?

उत्तर- बहुतेक बाळांचे जन्माच्या वेळेला असलेले वजन पाच ते सहा महिन्यांपर्यंत दुप्पट होते आणि ते एक वर्षाचे होईपर्यंत तिप्पट होते. एका वर्षापर्यंत, मुलीचे सरासरी वजन अंदाजे 19 पौंड 10 औंस (8.9 किलो) असते आणि मुलांचे वजन सुमारे 21 पौंड 3 औंस (9.6 किलो) असते.

तुमच्या एका वर्षाच्या बाळाला निरोगी अन्नाची चव आवडावी यासाठी तुम्हाला थोडे प्रयत्न करावे लागतील. बाळाला हा आहार लगेच आवडेल आणि ते लगेच पटापट सगळं जेवण संपवतील अशी बाळाकडून अपेक्षा करू नका. तुम्ही तुमच्या 1 वर्षाच्या बाळाचा आहार तक्ता बनवला आणि त्याप्रमाणे बाळाला जेवण आवडले नाही तरी काळजी करू नका. बाळाच्या आवडीनुसार तुम्ही त्यात बदल करूच शकता. बाळाने नवीन चवींचे पदार्थ खावेत यासाठी प्रयत्न करत राहणे आवश्यक आहे.  तुमच्या 1 वर्षाच्या बाळाचा आहार हा संतुलित व पौष्टिक घटकांनी युक्त असायला हवा याची काळजी घ्या. संतुलित आहार घेणे ही एक सवय आहे आणि ती सवय लहानपणापासूनच लागली तर पुढेही त्याचा फायदाच होतो.

फोटो क्रेडिट – istockphoto

Read More From xSEO