पावसाने सुरूवात जरी उशीरा केली असली तरी यंदा महाराष्ट्रात दमदार पाऊस पडत आहे. ज्यामुळे नद्या, नाले अगदी दुधडी भरून वाहू लागले आहेत. धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस पडल्याने धरणं भरल्याने धरणाचे दरवाजे उघडण्यात आले आहेत. पावसात असं चित्र असलं तरी उन्हाळ्यात मात्र अनेक ठिकाणी लोकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत असतो. याचं प्रमुख कारण म्हणजे पाणी साठवण्याची आणि वाचवण्यासाठी योग्य पद्धत माहीत नसते. पाणी मुबलक उपलब्ध असतानाच त्याची योग्य साठवण करण्याची आणि पाण्याची गरज असते. यासाठी जाणून घेऊया पाण्याचे महत्व आणि पाणी वाचवण्याच्या काही सोप्या टिप्स
Table of Contents
- पाण्याचे महत्व आणि पाणी बचत करण्याची गरज – Importance Of Water In Marathi
- जागतिक स्तरावर पाण्याबाबत असलेली आकडेवारी – Facts About Water Scarcity
- शासनाकडून राबविण्यात येणारं ‘जलशक्ती अभियान’ – About Jal Shakti Abhiyan
- घरात पाण्याची बचत कशी कराल – How To Save Water In Marathi
- पाण्याची बचत करण्यासाठी सामाजिक स्तरावर करा हे उपाय – Technical Ways To Conserve Water
- पाण्याची बचत करण्यासाठी भारत सरकारकडून केले गेलेले प्रयत्न
- पाणी बचत करण्याबाबत असलेले काही निवडक प्रश्न – FAQs
पाण्याचे महत्व आणि पाणी बचत करण्याची गरज – Importance Of Water In Marathi
पाणी हे जीवन आहे हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे. पृथ्वीची निर्मिती पाण्यापासून झाली आहे असं म्हटलं जातं. जनजीवन सुरळीत सुरू राहण्यासाठी पाणी अत्यंत महत्त्वाचं असूनही पाण्याची बचत करण्याकडे लोकांचा कल कमी प्रमाणात असतो. ज्यामुळे भविष्यात पाणी संकट निर्माण होण्याचा धोका वाढू शकतो. आजकाल पाण्याचा अपव्यय मोठ्या प्रमाणावर होताना दिसून येतो. ज्यासाठी विविध माध्यमातून सरकार पाणी वाचवण्याचा संदेश लोकांपर्यंत पोहचवत असते. मात्र पाणी वाचविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले गेले पाहिजेत. शिवाय यासाठी प्रत्येक व्यक्तीने त्यांच्या घरात आणि वैयक्तिक पातळीवर प्रयत्न केल्यास भविष्यातील पाणीटंचाईचा धोका नक्कीच टाळता येऊ शकतो. यासाठी पाणी बचत उपाय नक्की काय आहेत हे जाणून घेणेही महत्त्वाचे आहे. त्यासोबच घरातील प्रत्येकाला पाण्याचे महत्त्व पटवून दिले पाहीजे.
Shutterstock
जागतिक स्तरावर पाण्याबाबत असलेली आकडेवारी – Facts About Water Scarcity
पुथ्वीवर एकूण पाण्याचे प्रमाण 71 टक्के आहे. मात्र हे सर्व पाणी पिण्यायोग्य नक्कीच नाही कारण पृथ्वीवरील 96.5 टक्के पाण्याचा भाग हा समुद्राने व्यापलेला आहे. ज्यामुळे पृथ्वीवरील फक्त 3 टक्के पाणी हे पिण्यायोग्य आहे. पृथ्वीवरील वाढती लोकसंस्था आणि पाण्याची गरज पाहता हे पाणी वाचवण्याची गरज अधिक आहे.
वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) च्या रिपोर्टनुसार, 2017 सालापर्यंत जागतिक लोकसंख्येमधून केवळ 71 टक्के लोकांना शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध झालेले आहे. जागतिक स्तरावर एकूण लोकसंख्येपैकी कमीतकमी दोन अब्ज लोकांना दूषित पाण्याचा वापर करावा लागत आहे. दूषित पाण्याच्या वापरामुळे जगभरात वर्षातून कमीतकमी 485000 लोकांचा मृत्यू होण्याचे प्रमाण आढळून आले आहे. भविष्यात साल 2025 पर्यंत जगातील निम्म्या लोकसंख्येवर पाणी टंचाईचं संकट येण्याची शक्यता आहे. याचप्रमाणे जगभरात आजही सरासरी 9 लोकांपैकी एका माणसाला शुद्ध पाण्याचा पूरवठा होऊ शकत नाही. ही टक्केवारी पाहता पाणीटंचाईचे संकट फार दूर नाही हेच दिसत आहे. म्हणूनच यासाठी वैयक्तिक आणि सामाजिक पातळीवर सर्वांनीच सहकार्य करणं गरजेचं आहे. यासाठी जेव्हा राज्यात पावसाचे प्रमाण अधिक असते तेव्हा पाण्याचे योग्य व्यवस्थापन करून पाणी वाचवल्यास या संकटापासून मुक्तता मिळू शकते.पाण्याचे महत्त्व पटले की पाणी वाचवणे अंगवळणी पडते. पाणी वाचवण्यासाठी उपाय यासाठी प्रत्येकाल माहीत असायला हवेत.
वाचा – ’50’ पाणी वाचवा घोषवाक्य (Save Water Slogans In Marathi)
Shutterstock
शासनाकडून राबविण्यात येणारं ‘जलशक्ती अभियान’ – About Jal Shakti Abhiyan
जलसंवर्धनाला चालना देण्यासाठी देशभरात जलशक्ती अभियान राबविण्यात येत आहे. विशेषतः राज्यात ज्या ठिकाणी पाण्याची टंचाई जाणवते त्या भागांमध्ये हे अभियान मोठ्या प्रमाणावर राबविण्यात येतं. साल 2019 पर्यंत या अभिनाना अंर्तगत राज्यातील एकूण 256 जिल्हात 3.5 लाखाहून अधिक जलसंधारण उपाययोजना राबविण्यात आलेल्या आहेत. अंदाजे 2.64 लाख लोकांना या अभियानात सहभाग घेतल्यामुळे हे अभियान राबविण्यात यश आलं आहे. अभिनेता अमिर खान आणि किरण राव यांच्या पाणी फांऊडेशनने या अभियानासाठी लोकांना प्रोत्साहन दिले. पाणी फाऊंडेशनने पाणी बचतीचे महत्त्व, त्यासाठी करावे लागणारे प्रभावी मार्ग आणि उपाय सांगून लोकांमध्ये जनजागृती निर्माण केली. भारतात अशा अनेक स्वयंसेवी संस्था आहेत ज्यांच्या मदतीने सरकारच्या जलशक्ती अभियानाला पुढाकार मिळाला. लोकांना स्वतः मेहनत घेऊन पाण्याची बचत करण्यासाठी प्रयत्न केले ज्यामुळे राज्यातील पाणी टंचाईच्या आव्हानाला तोंड देणं सोपं झालं आहे. पाणी वाचवण्यासाठी उपाय हाच त्यावरील योग्य मार्ग आहे. म्हणूनच पाण्याचे महत्त्व पटवून दिल्यास राज्यात पाणी वाचवण्याचा प्रयत्न नक्कीच केला जाईल.
घरात पाण्याची बचत कशी कराल – How To Save Water In Marathi
पाण्याची बचत जशी सामूहिक पद्धतीने करणं गरजेचं आहे. तशीच ती वैयक्तिक पातळीवर आणि स्वतःच्या घरातून करणं गरजेचं आहे. आपण रोजच्या कामासाठी वापरत असलेलं पाणी वाचवून आपण देशावर येणारं पाणीटंचाईचं संकट कमी करण्यासाठी हातभार लावू शकतो. यासाठी घरात पाणी बचत उपाय नक्की कसा करायचा याच्या काही सोप्या टिप्स जरूर फॉलो करा. पाणी वाचवण्याचे उपाय अनेक आहेत फक्त ते नीट फॉलो करता यायला हवेत. पाणी बचतीचे उपाय आपण आता जाणून घेऊया.
बाथरूममध्ये पाण्याची बचत कशी करावी – Tips To Save Water In The Bathroom
1. अंघोळीसाठी नळ अथवा शॉवरचा वापर करण्यापेक्षा बादलीत पाणी घेऊन त्याने अंघोळ करा. ज्यामुळे अंघोळीसाठी कमी पाण्याचा वापर केला जाईल. बऱ्याचदा शॉवर खाली अंघोळ केल्याने मोठ्या प्रमाणावर पाणी वाया जात असते. शिवाय या पाण्याचा पुर्नवापर करणं शक्य होत नसतं. पाणी बचतीचे उपाय करताना हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे.
2. दात घासताना बेसिनचा नळ बंद करा. कारण काही लोकांना ब्रश करत असताना बेसिनचा नळ तसाच सुरू ठेवण्याची सवय असते. मात्र यामुळे पाणी वाया जात असतं. यासाठी फक्त चुळ भरताना नळ सुरू करा इतर वेळी पाणी वाया जाणार नाही याची काळजी घ्या.
3. बेसिनमध्ये हात अथवा तोंड धुताना पाण्याचा नळ तसाच सुरू ठेवू नका. हात अथवा तोंडाला फेसवॉश, हॅंडवॉश लावताना नळ बंद ठेवा आणि फक्त हात अथवा तोंड धुताना नळ पुन्हा सुरू करा.
4. बाथरूममध्ये जर एखादा नळ अथवा पाईप लिकेज असेल तर त्याची लवकरात लवकर दुरूस्ती करा. कारण या लिकेजमधून मोठ्या प्रमाणावर पाणी वाया जाऊ शकते. यासाठी शक्य असल्यास त्वरीत अशी कामे करण्याचा प्रयत्न करा.
5. दाढी करताना बऱ्याच लोकांना बेसिनचा नळ तसाच सुरू ठेवण्याची सवय असते. शक्य असल्यास पाणी एखाद्या भांड्यात घेऊन दाढी करा अथवा नळातील पाण्याचा प्रवाह कमी ठेवा आणि दाढी करा ज्यामुळे पाणी वाया जाणार नाही.
वाचा – पृथ्वी वाचवा घोषवाक्य (Save Earth Slogans In Marathi)
6. घरातील बाथरूममध्ये नव्या तंत्रज्ञानाचा वापर केलेले नळ वापरा. ज्यामधून कमी पाणी जास्त वेगात बाहेर पडते. अशा तंत्रज्ञानामुळे पाणी कमी वापरले जाते. शिवाय आजकाल काही ठराविक प्रमाणात पाणी सोडल्यावर आपोआप बंद होणारे नळ असतात. या नळांमुळेदेखील पाणी वापरले जाते.
7. शॉवरचा वापर शक्य तितका कमी करा. कारण तुम्ही जर सतत शॉवरचा वापर केला जर तुमच्याकडून मोठ्या प्रमाणावर पाणी वाया जाण्याची शक्यता असते.
8. टॉयलेटमधील फ्लशमध्ये वापरण्यात येणारे पाणी हे शक्य असल्यास पुर्नवापर केलेले असेल याची काळजी घ्या. कारण फ्लशमधून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा वापर केला जातो. बऱ्याच हाऊसिंग सोसायटीमध्ये आजकाल या पद्धतीचा वापर केला जातो. ज्यामुळे पाण्याची बचत नक्कीच होऊ शकते.
स्वयंपाकघरात पाण्याची बचत कशी करावी – Tips To Save Water In The Kitchen
1.पाण्याचा पुर्नवापर करून तुम्ही स्वयंपाकघरात पाण्याची बचत करू शकता. यासाठी भाज्या अथवा फळे धुण्यासाठी वापरलेले पाणी साठवून ठेवा आणि ते झाडांना घाला.
2. आजकाल आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी प्रत्येकाच्या घरात डिश वॉशर असतात. मात्र तुम्ही वापरत असलेले डिश वॉशर जास्त पाण्याचा वापर करत आहे का हे जरूर तपासा असं असल्यास डिश वॉशरचा वापर कमी प्रमाणात करा.
3. शक्य असल्यास भांडी हाताने स्वच्छ करण्याचा प्रयत्न करा. कारण या पद्धतीमुळे पाण्याचा वापर कमी करता येऊ शकतो.
4.भांडी घासताना नळ सुरू ठेवू नका. घरी असलेल्या मदतनीसांना भांडी घासताना नळ सोडून ठेवायची सवय असेल तर त्यांना योग्य ते मार्गदर्शन करा. ज्यामुळे पाणी वाया जाणार नाही.
5. भाज्या अथवा फळे नळाखाली धुण्याऐवजी ती एखाद्या भांड्यात घेऊन धुण्याचा प्रयत्न करा ज्यामुळे पाणी कमी प्रमाणात वापरले जाईल.
कपडे धुताना पाण्याची बचत कशी करावी (Tips To Save Water While Washing Clothes)
1. कपडे धुण्यासाठी तुमच्याकडे जुन्या तंत्रज्ञानाचा वापर केलेली वॉशिंग मशीन असेल तर ती बदलून नवीन वॉशिंग मशीन विकत घ्या. कारण आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केलेल्या मशीनमध्ये गरज असेल तितकेच पाणी घेण्याची सोय केलेली असते. ज्यामुळे पाणी वाया जात नाही.
2. कमी कपडे धुण्यासाठी वॉशिंग मशीनचा वापर करू नका. मशीनच्या क्षमतेनुसार त्यात कपडे धुण्यासाठी घ्या. गरज नसेल तर कपडे कोरडे ठेवा आणि ते साठल्यावर मशीनचा वापर करा. गरज नसताना अथवा कमी कपड्यांसाठी मशीन वापरल्यामुळे पाणी वाया जाण्याची शक्यता अधिक असते.
3. कपडे वारंवार धुणे टाळा. कारण गरज नसताना दिवसातून दोन ते तीन वेळा कपडे धुण्याची सवय काही जणांना असते. यामधून अनेक लीटर पाणी वाया जाऊ शकते. यासाठी दिवसभरात एकदाच कपडे धुवा.
4. कपडे धुत असताना पाण्याचा नळ चालू ठेवू नका. कपडे धुण्यासाठी बादलीचा वापर करा. ज्यामुळे कमी प्रमाणात पाणी वापरता येईल.
5. कपडे विसळल्यानंतर राहीलेले पाणी तुम्ही तुमची गाडी धुण्यासाठी, अंगण अथवा व्हरांडा, टेसेस, ब्लाकनी धुण्यासाठी वापरू शकता.
6. कपडे धुतलेले पाणी बाथरूम स्वच्छ करण्यासाठी अथवा टॉयलेट फ्लश करण्यासाठी वापरा. ज्यामुळे पाण्याचा अपव्यय होणार नाही.
घराबाहेर पाण्याची बचत कशी कराल (Tips To Save Water Outdoors)
1. गार्डनमध्ये झाडांना पाणी घालण्यासाठी नळाचा पाईप वापरू नका. कारण मुळात झाडांना एवढ्याा पाण्याची गरज नसते. गरजेपेक्षा अधिक पाणी घातल्यामुळे झाडांचे नुकसान होऊ शकते. शिवाय अशा पद्धतीने पाणी वापरल्यामुळे ते वाया जाते.
2. गाडी स्वच्छ करण्यासाठी बादली वापर करा. कारण पाण्याच्या पाईप वापरून गाडी धुतल्यास पाणी वाया जाण्याची शक्यता अधिक असते.
3. दररोज गाडी धुण्यापेक्षा आठवड्यातून दोन ते तीन वेळा गाडी धुवा. इतर वेळी गाडी फक्त कापडाने पुसून घ्या.
4. घराबाहेरील नळ अथवा पाईप लिकेज असतील तर त्यांची लगेच दुरूस्ती करून घ्या. कारण जरी त्या लिकेजमुळे तुमच्या घरात काही त्रास होत नसला तरी त्यामुळे अनेक लीटर पाणी वाया जाऊ शकते.
5. स्विमिंग पुल अथवा वॉटर पार्कमध्ये जाणे शक्य तितके टाळा. कारण या माध्यमातून मौजमजा करण्यासाठी आपण अनेक लीटर पाण्याचा अपव्यय करत असतो.
6. बागेतील झाडांना पाणी घालण्यासाठी तुषार सिंचन अथवा ठिंबक सिंचन पद्धतीचा वापर करा.
वाचा – जागतिक पर्यावरण दिनानिमित्त घोषवाक्य (Save Environment Slogan In Marathi)
पाण्याची बचत करण्यासाठी सामाजिक स्तरावर करा हे उपाय – Technical Ways To Conserve Water
पाण्याचा अपव्यय दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. ज्यामुळे भूजल पातळीत बदल होत आहे. बदललेली जीवनशैली, बांधकामासाठी सिमेंट कॉक्रिंटचा अती वापर, वृक्षतोड याचा परिणाम जमिनीखालील पाण्याच्या पातळीवर होत असतो. जमिनीखालील भूजल साठा पूर्ववत करण्यासाठी अनेक पद्धतींचा वापर केला जाऊ शकतो.
रेन वॉटर हार्वेस्टिंग (Rain Water Harvesting)
रेन वॉटर हार्वेस्टिंग म्हणजे पावसाचे पाणी वाहून जाऊ न देता ते योग्य पद्धतीने जमिनीत मुरेल याची व्यवस्था करणे. या पद्धतीमध्ये घर अथवा बिल्डिंगच्या धतावर साठणारे पाणी पाईपच्या मदतीने एखाद्या टाकीत अथवा हौदात साठवले जाते. त्यानंतर ते नैसर्गिक पद्धतीने शुद्ध करून योग्य पद्धतीने जमिनीत मुरवले जाते. ज्यामुळे जमिनीखालील पाण्याची पातळी वाढण्यास मदत होते. ज्या भागांमध्ये पावसाचे प्रमाण कमी असते अशा ठिकाणी जमिनीखालील पाण्याची पातळी वाढवण्यासाठी या पद्धतीचा वापर अनेक वर्षांपासून केला जात आहे.
कृत्रिम तलाव अथवा जलतळी (Ponds)
शेततळी अथवा कृत्रिम तलाव करून पावसाचे पाणी आपण साठवून ठेवू शकतो. या पद्धतीमुळे ज्या ठिकाणी कमी पाऊस पडल्यास पिकांचे नुकसान होत नाही. कारण वेळ पडल्यास या तळ्यांमधील पाणी पिकांसाठी वापरता येऊ शकते. मानवी अतिक्रमणामुळे दिवसेंदिवस पाण्याचे नैसर्गिक स्त्रोत कमी होत चालले आहेत ते टिकवून ठेवण्यासाठी कृत्रिम तलाव अथवा जलतळी बांधणे गरजेचे झाले आहे. ज्यामुळे निसर्गातील इतर प्राणीमात्रांसाठी पाण्याचा स्त्रोत निर्माण होऊ शकतो.
चर खणणे
जलशक्ती अभियाना अंर्तगत शासन आणि अनेक सामाजिक, सेवाभावी संस्था जलसंधारणाचे कार्य करत आहेत. या माध्यमातून चर खणणे, शेततळी निर्माण करणे, तलाव जोडणे असे विविध प्रकल्प राबविण्यात येत आहेत. पाणी अडवा आणि पाणी जिरवा अशा पद्धतीने यासाठी जनजागृती केली जात आहे. यासाठी डोंगरावर अरूंद आणि आडवे चर खणले जातात डोंगरावरून पावसाचं पाणी वाहून जाताना बऱ्याचदा जमिनीची धूप होत असते. मात्र या पद्धतीने चर खणल्यामुळे पाणी आणि माती या खड्यांमध्ये साठून राहते. अशा पद्धतीने चर खणल्यामुळे आज अनेक गावांमधील जमिनीची धूप कमी झाली आहे. पाणी अडल्यामुळे आणि योग्य पद्धतीने जमिनीत जिरल्यामुळे जमिनीखालील पाण्याची पातळीदेखील वाढल्याचं दिसून येत आहे.
झाडे लावणे (Plant Trees)
घरे, इमारती, कारखाने बांधण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड केल्यामुळे राज्यावर पाणीटंचाईचे संकट केव्हा येईल हे सांगता येणार नाही अशी परिस्थिती आहे. कारण झाडांमुळे जमिनीची धूप कमी होते, पावसाचे प्रमाण वाढते. या पार्श्वभूमीवर शासनाने वृक्षारोपण अभियानाला सुरूवात केली आहे. सामाजिक स्तरावर या अभियानाला जसे प्रोत्साहन मिळत आहे तसेच वैयक्तिक पातळीवरदेखील यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी योग्य प्रमाणात झाडे लावणं गरजेचं आहे. मात्र झाडे लावण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी प्रत्येकाला पाण्याचे महत्त्व पटवून दिले पाहिजे.
पाण्याची बचत करण्यासाठी भारत सरकारकडून केले गेलेले प्रयत्न
पाणी वाचविण्यासाठी भारत सरकारकडून अनेक महत्वाची पाऊलं उचलली जात आहेत. ज्यामुळे भविष्यात देशीतील पाणीटंचाईच्या संकट टळू शकतं.
1. जलसंवर्धनासाठी पंजाबमध्ये अतिरिक्त पाणी साचून राहू नये यासाठी ड्रेनेज लाईन्स टाकण्यात आल्या आहेत.
2. तेलंगणामधील थिमयपल्लीत पाण्याच्या टाक्या बांधल्यामुळे ग्रामस्थांचे जीवन समृद्ध झाले आहे.
3. राजस्थानमधील शेतांमध्ये छोटी छोटी शेततळी बांधल्यामुळे लोकांच्या जनजीवनात अमुलाग्र बदल झाले आहेत.
4. तामिळनाडूतील वेल्लोरमध्ये 20 हजार महिलांनी एकत्र येऊन नागा नदीला पुर्नजीवन दिलं आहे.
5. महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागात पाणी फांऊडेशनमुळे शेततळी आणि चर खणण्यामुळे अनेक भागात विहीरींना पुन्हा पाणी लागलं आहे.
पाणी बचत करण्याबाबत असलेले काही निवडक प्रश्न – FAQs
घरात पाणी वाचवल्यामुळे फरक पडेल का ?
सामाजिक स्तरावर आणि शासनाच्या अभियानाला सहकार्य केल्यामुळे पाण्याचे संवर्धन करणे नक्कीच शक्य आहे. मात्र त्यासाठी घरातूनदेखील योग्य प्रयत्न केल्यास या कार्याला चांगला हातभार लागू शकतो. यासाठी प्रत्येकाने स्वतः पाण्याची योग्य बचत करण्याचे वचन दिले पाहिजे.
घरातील लहान मुलांना पाणी वाचवण्याची सवय कशी लावावी ?
लहान मुले मोठ्या माणसांकडे बघूनच आचरण करत असतात. पालक त्यांचे सर्वात पहिले आदर्श असतात. त्यामुळे आई-वडील आणि घरातील माणसं जशी वागतात तसंच वागण्याचा ते प्रयत्न करत असतात. म्हणूनच जर तुम्हाला लहान मुलांना पाण्याची बचत करायला शिकवायचं असेल तर आधी स्वतः तसे आचरण करण्यास सुरूवात करा.
Shuttertock
पाणी वाचवण्यासाठी सार्वजनिक स्तरावर काय करावे ?
पाणी वाचवण्यासाठी सामाजिक स्तरावर कार्य करण्यासाठी याबाबत जनजागृती करणे गरजेचे आहे. जर लोकांना या समस्येचं मुळ समजलं तर ते नक्कीच पाणी बचत करू शकतील. त्यामुळे शक्य असेल तितकी जनजागृती यासाठी करायला हवी.
अधिक वाचा
पाणी पिण्याचे हे ‘11’ आश्चर्यकारक फायदे तुम्हाला माहित आहेत का
फ्रिजचं थंड पाणी प्यायल्याने होणारे साईड ईफेक्ट्स
दररोज कोमट पाणी पिणे आरोग्यासाठी असे आहे फायदेशीर
फोटोसौजन्य – शटरस्टॉक
Read More From लाईफस्टाईल
Diwali Padwa Wishes, Quotes, Messages In Marathi 2022 | दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा
Dipali Naphade