बर्याच मुली आणि स्त्रियांना त्यांच्या मासिक पाळीच्या दिवसांत पोटदुखी आणि वेदना हा त्रास सहन करावा लागतो. वेदनादायक मासिक पाळीला वैद्यकीय भाषेत “डिसमेनोरिया” असे म्हणतात. खरं तर मासिक पाळी हा स्त्रीच्या जीवनाचा एक सामान्य भाग आहे. असे असले तरी मासिक पाळीच्या दरम्यान तीव्र वेदना होणे सामान्य नाही. सगळ्यांनाच त्रास होतो, त्यात काय इतकं असे म्हणत स्त्रियांनी हा त्रास अंगावर काढून फक्त सहन करत राहू नये. मासिक पाळीच्या वेदनांवर प्रभावीपणे उपचार केले जाऊ शकतात. जर तुम्हाला मासिक पाळीच्या दिवसांत खूप वेदना व त्रास होत असेल किंवा वेळोवेळी वेदना वाढतच गेल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे. कारण तुमच्या वेदनादायी मासिक पाळीचे कारण एन्डोमेट्रिओसिस असू शकते.
एन्डोमेट्रिओसिस म्हणजे काय?
मासिक पाळीच्या दिवसांत स्त्रियांना खालच्या ओटीपोटात वेदना होतात. किंवा काही स्त्रियांना कंबर, पाठ किंवा पायांमध्येही खूप वेदना होतात.मांड्यांमध्ये गोळे आल्यासारखे वाटतात. तसेच काही स्त्रियांना मळमळ, उलट्या किंवा अतिसार तसेच डोकेदुखी, अस्वस्थ वाटणे असाही त्रास होतो. बऱ्याच वेळेला ज्या स्त्रियांना जास्त प्रमाणात रक्तस्त्राव होतो त्यांना अनेकदा जास्त वेदना होतात. पण एंडोमेट्रिओसिसमध्ये स्त्रियांना जास्त त्रास होतो. मासिक पाळीत होणाऱ्या वेदनांसाठी उपाय केले पाहिजेत. हा त्रास अंगावर काढू नये.
एंडोमेट्रिओसि या आजारात एंडोमेट्रियम (सामान्यतः स्त्रीच्या गर्भाशयाच्या आतील बाजूस असलेला अंतःस्तर) गर्भाशयाच्या बाहेरच्या बाजूला वाढते. हे एंडोमेट्रियम देखील मासिक पाळीत नेहमीच्या गर्भाशयाच्या एंडोमेट्रियम प्रमाणे कार्य करते. मासिक पाळीच्या सायकलच्या शेवटी एन्डोमेट्रियम गर्भाशयापासून वेगळे होऊन बाहेर पडते आणि रक्तस्त्राव होतो. पण गर्भाशयाच्या बाहेरच्या बाजूला असलेले एन्डोमेट्रियम जेव्हा पाळीच्या दिवसांत गर्भाशयापासून वेगळे होते तेव्हा त्या रक्ताला शरीराबाहेर पडण्यास मार्गच नसतो. त्यामुळे गर्भाशयाच्या आजूबाजूच्या भागात सूज येऊ शकते. ओव्हरीज वरचा एंडोमेट्रिओसिस सर्वात सामान्य आहे.
अधिक वाचा – मासिक पाळीमुळे पोटात दुखतंय, मग करा हे सोपे उपाय
एन्डोमेट्रिओसिसची लक्षणे
मासिक पाळीच्या दिवसांत तीव्र पाठदुखी होणे, रक्तस्त्राव होत असताना ओटीपोटात तीव्र वेदना होणे, तीव्र स्वरूपाच्या क्रॅम्प्स येणे, मलविसर्जन किंवा लघवी करताना वेदना होणे विशेषत: मासिक पाळीत या क्रिया करताना वेदना जाणवणे. मासिक पाळीच्या दिवसांत असामान्य किंवा जास्त रक्तस्त्राव होणे. मल किंवा मूत्रातुन रक्तस्त्राव जाणे. अतिसार किंवा बद्धकोष्ठता, शारीरिक संबंध ठेवताना वेदना होणे, सततचा येणारा थकवा व गर्भधारणा होण्यास त्रास होणे ही एन्डोमेट्रिओसिसची काही लक्षणे आहेत.
एन्डोमेट्रिओसिस व प्रजनन क्षमता यांच्यातील संबंध
एंडोमेट्रिओसिस हे वंध्यत्वाचे प्रमुख कारण आहे. प्रत्येक 5 पैकी जवळपास 2 महिला ज्यांना गर्भधारणा होऊ शकत नाही त्यांना एन्डोमेट्रिओसचा त्रास असल्याचे आढळले आहे. जर एंडोमेट्रिओसिसमुळे गर्भाशय किंवा ओव्हरीजवर परिणाम झाला असेल तर त्याचा गर्भधारणेवर गंभीर परिणाम होऊ शकतो. जेव्हा एंडोमेट्रियल टिश्यू तुमच्या ओव्हरीजवर तयार होतो तेव्हा ओव्हरीजमधून एग किंवा ओव्हम बाहेर पडू शकत नाही. किंवा त्या टिश्यूजमुळे शुक्राणूंना तुमच्या फॅलोपियन ट्यूबमध्ये जाण्यापासून प्रतिबंध होऊ शकतो. एन्डोमेट्रियल टिश्यू मुळे फर्टीलाइज झालेले ओव्हम फेलोपियन ट्यूब्स मधून खाली गर्भाशयात जाऊ शकत नाही.
यावर उपाय म्हणून डॉक्टर ऑपरेशन करून गरोदर राहण्याच्या समस्यांचे निराकरण करू शकतात, परंतु एंडोमेट्रिओसिसमुळे तुम्हाला इतर मार्गांनी गर्भधारणा करणे कठीण होऊ शकते: एंडोमेट्रिओसिसमुळे तुमच्या शरीरातील हार्मोनल केमिस्ट्री बदलू शकते.तसेच तुमच्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती गर्भावर हल्ला करू शकते. एन्डोमेट्रिओसिस मुळे गर्भाशयाच्या अस्तराच्या टिश्यूजच्या थरावर परिणाम होऊ शकतो जिथे गर्भाचे रोपण होते.
म्हणूनच जर मासिक पाळीमध्ये तुम्हाला काहीही बदल जाणवत असेल, कुठलाही त्रास होत असेल तर तो अंगावर न काढता त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.
Photo Courtesy – istockphoto
अधिक वाचा – या पोझिशनमध्ये झोपण्यामुळे मासिक पाळीच्या वेदना होतील कमी
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक