लग्नानंतर खूप जणांकडे जेजुरीच्या खंडेरायाचे दर्शन घेण्याची पद्धत आहे. लग्न झाले की, जोडपी लग्नाच्या पोषाखात जेजुरीचा गड चढतात. काही ठराविक लोकांमध्येच ही पद्धत होती. पण आता मालिका, चित्रपटांमधून जेजुरीचा उल्लेख झाल्यामुळे खूप जण लग्नानंतर नवस घेण्यासाठी जेजुरीच्या खंडेरायचे दर्शन घेण्यासाठी अगदी आवर्जून जातात. नववधूला नवरा उचलून घेत काही पायऱ्या चढतो. वर जाऊन खंडेरायावर भंडारा उधळून तिथे गोंधळ घातला जातो. जेजुरीला नवीन जोडप्यांना घेऊन जाऊन बरेच पूजाविधी केले जातात. जे एकप्रकारे मजेशीर आणि खंडेरायाचा आशीर्वाद घेण्यासारखे असते. बरं जेजुरीही फार काही लांब नाही. पुण्यापासून काहीच अंतरावर ही आहे. नवीन जोडपी किंवा इतरवेळीही तुम्ही जाऊन या सोन्याच्या जेजुरीचे दर्शन घेऊ शकता. लग्नासाठी खास उखाणे देखील तुम्ही नक्की घ्या
जेजुरीच्या खंडेराया जागराला या या
जेजुरी हे पुण्यामधील पुरंदर तालुक्यात येते.जेजुरी हा गड 2,356 फूट उंचावर आहे. त्यामुळे त्याच्या पायऱ्यांचा अंदाज तुम्हाला आलाच असेल. या पायऱ्या लाकडी असून त्याच्यामधील अंतर हे जास्त आहे. हा गड चढताना खूप वेळा हा गड चढू की नाही असा प्रश्न पडतो. पण एकदा का हा गड चढायला सुरुवात केली की, काहीही वाटत नाही. थोडं थोडं दमाने हा गड अगदी आरामात चढला जातो. अनेक जणांकडे देवघरातील टाक( घडवलेले देव) घेऊन जाण्याची पद्धत आहे. त्यामुळे तळीत सगळे देव वर गडावर नेले जातात. त्यांना स्वच्छ धुवून अभिषेक घातला जातो. ( ज्यांचा देव खंडोबा आहे. त्यांच्याकडे ही पद्धत आहे) अन्यथा तुम्ही नुसते जाऊनही अभिषेक घालू शकता. जेजुरीत प्रवेश केल्यापासून तुम्हाला जिथे तिथे भंडाऱ्याचा खुटका सगळीकडे दिसतो. या पिवळ्या रंगामुळेच जेजुरी जणू सोन्याची दिसते. गडाच्यावरह तुम्हाला ठिकठिकाणी भंडारा उधळलेला दिसेल. मंदिराच्या समोर एक मोठे पितळेचे कासव आहे. त्या कासवाचे दर्शन घेत मंदिरात प्रवेश केला जातो. मंदिरातील गर्दी पाहता अनेकदा हे कासव दिसत नाही. पण तुम्ही गेल्यानंतर एकदातरी या कासवाचे दर्शन घेऊन तिथे भंडारा उधळायला विसरु नका. लग्नविधी कसा करायचा हे देखील जाणून घ्या.
तळी आणि जागरण गोंधळ
जेजुरीत जाऊन गाभाऱ्यात जायचे असेल तर तुम्ही सोमवार ते शुक्रवार या कालावधीत जायला हवे. याच कालावधीत गेलात तरच तुम्हाला गाभाऱ्यात जाण्याची संधी मिळते. नाहीतर गर्दीमुळे तुम्हाला बाहेरुनच दर्शन घ्यावी लागते. वर गेल्यानंतर खास पासेसची देखील सोय आहे. पास घेऊन तुम्ही थेट गाभाऱ्यात दर्शनासाठी जाऊ शकता. गाभाऱ्यात जाऊन खंडोबाचे दर्शन घेतल्यानंतर बाहेर येऊन तळी भरली जाते. देवावर भंडारा उधळला जातो. तळी भरल्यानंतर जागरण, गोंधळ देखील घातला जातो. जागरण गोंधळाचा कार्यक्रम हा वर केला जात नाही. तर खाली येऊनच केला जातो. खूप जणांच्या घरात हा जागरण गोंधळाचा कार्यक्रम होतो. हा कार्यक्रम तुम्ही तासभर करु शकता. यामध्ये दोन गोंधळी आणि मुरळी असते. जे तुमच्या गोंधळात मजा आणतात. गोंधळ झाल्यानंतर तिथेच जेवणाचा प्रसाद दिला जातो. जर तुम्हाला उत्तम जेवायचे असेल तर तुम्ही जिथे गोंधळ घालताय तिथेच जेवणे कधीही चांगले. कारण या ठिकाणी तुम्हाला उत्तम जेवणाची सोय होते. वरण, भात, भजी, कुरडई, पुरणपोळी असे दिले जाते. त्या सगळ्या धकाधकीत हे जेवण मस्तच लागते. त्यामुळे शक्यतो तुम्ही या ठिकाणीच जेवण घ्या.
जेजुरीला गेल्यानंतर लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की, तिथे ठिकठिकाणी तुम्हाला पैशांची मागणी केली जाते. त्यामुळे तुम्ही जरा जपून पैसे खर्च करा. नाहक सगळीकडे पैशांचा खर्च करणे टाळा. शिवाय जेवणाच्या बाबतीतही इथे तिथे जेवण्याचा विचार करण्यापेक्षा गोंधळीच्या घरीच जेवा.