महाराष्ट्रीयन जेवणात आमटी हा असा पदार्थ आहे जो सगळ्या जेवणाचे मुख्य स्थान भुषवतो. आमटी मस्त झाली की, तिचा स्वाद पोळी, भाकरी, पुरळपोळी आणि भात या सगळ्यासोबत एकदम फक्कड लागतो. प्रत्येक स्त्रीला आमटीचे वेगवेगळे प्रकार हे करता यायलाच हवेत. आमटी जितक्या चविष्ट असतील तितकेच जेवण हे अधिक जाते. आता आमटी हा शब्द उच्चारल्यानंतर खूप जणांकडे डाळीपासून तयार झालेल्या रोजच्या डाळींनाही आमटी म्हटले जाते. तर अनेक ठिकाणी जी कांदा- खोबरं किंवा इतर वाटपाच्या मदतीने केली जाते त्याला आमटी म्हटले जाते. कोकणपट्टा असू दे किंवा घाट माथा अनेक ठिकाणी आमटी बनवण्याची वेगवेगळी पद्धत आहे. शिवाय आमटीचे प्रकारही वेगवेगळे आहेत. यासाठीच आम्ही आमटीचे वेगवेगळे प्रकार आणि त्याच्या सोप्या रेसिपीज शोधून काढल्या आहेत. चला तर जाणून घेऊया या आमटीच्या रेसिपी मराठीतून.
कटाची आमटी रेसिपी (Katachi Amti Recipe In Marathi)
घरी पुरणपोळीचा बेत असेल आणि घरी कटाची आमटी बनणार नाही असे मुळीच होणार नाही. तुपाची धार पुरणपोळीवर सोडून खाण्याचा आनंद जरी असला तरी त्यासोबत चमचमीत, गरमगरम कटाची आमटी असेल तर गोडसोबत तिखट एकदम मस्त खाल्ले जाते. चला तर जाणून घेऊया कटाच्या आमटीची सोपी आणि मस्त रेसिपी
साहित्य:
शिजवलेली चणा डाळ (पुरणपोळीचे पाणी गाळताना उरलेली), कांदा- खोबऱ्याचे वाटप, आलं-लसूण पेस्ट, कडिपत्ता, लाल तिखट, गरम मसाला, मीठ, तेल
कृती:
- पुरणपोळीसाठी ज्यावेळी आपण डाळ शिजवायला घेतो. त्याचे पाणी आणि चणा डाळ ही खास कटाच्या आमटीसाठी काढली जाते. तुम्ही नुसती चणाडाळही शिजवून घेऊ शकता. पण असे करताना तुम्ही त्यातले पाणी काढून टाकू नका. ते पाणीच याची चव वाढवते.
- कांदा- खोबऱ्याचे वाटप करणे हे फार सोपे असते. जर तुम्हाला हे वाटप येत नसेल तर तुम्ही साधारण चार जणांसाठी 1 ते 1 ½ वाटी खोबरे घ्या. आणि त्याच्या निम्मे कांदा. तव्यावर तेल गरम करुन त्यावर उभा चिरलेला कांदा परतून घ्या.
- त्यामध्ये आलं-लसूण पेस्ट किंवा अख्खे आलं-लसूण घाला. त्यामध्ये खोबरं घालून ते छान परतून घ्या. थंड झाल्यानंतर ते मिक्सरमध्ये वाटून घ्या. आमटीसाठी हे कायम बारीक वाटून घेणे फारच गरजेचे असते.
- तयार मिश्रणात तुम्ही आधीच लाल तिखट घातले नसेल तर ते तुम्ही नंतर घातले तरी चालू शकेल. आता आमटी करण्यासाठी एक कढई घेऊन त्यामध्ये तेल गरम करुन घ्या. त्यामध्ये कडिपत्त्याची फोडणी घाला. आता तयार केलेले कांदा- खोबऱ्याचे वाटप घाला. ते छान परतून घ्या. आता त्यामध्ये शिजलेली चणा डाळ घाला. आता आमटी किती पातळ हवी त्यानुसार त्यात पाणी घाला.
- एक उकळी आल्यानंतर त्यामध्ये गरम मसाला आणि लाल तिखट गरजेनुसार घालून घ्या. त्यामध्ये मीठ घालून छान उकळून घ्या. कोथिंबीर भुरभुरा तुमची कटाटी आमटी तयार.
डोसा बनवण्याचे निरनिराळे प्रकार (Dosa Recipes In Marathi)
भगर आमटी (Bhagar Amti Recipe In Marathi)
उपवासाच्या वेळी केली जाणारी आमची म्हणजे ‘भगर आमटी’ ही आमटी शेंगदाण्यापासून केली जाते. त्यासोबत मस्त वरीचा भात खाल्ला जातो. उपवासाच्या दिवशी पोट भरीसाठी ही आमटी आणि वरीचा भात पुरेसा असतो. जाणून घेऊया याची सोपी रेसिपी
साहित्य:
1 मोठा बटाटा, 1 वाटी खवलेला नारळ, 1 वाटी भाजलेले शेंगदाणे, लाल तिखट, मीठ, तूप किंवा तेल, जीरं, 1 ते 2 लवंग
कृती:
- बटाट्याच्या साली काढून त्याचे बारीक तुकडे काढून घ्या. एका मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगदाण्याची पूड करुन घ्या. ती काढून त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये खोबरे आणि बटाटा घालून तेही वाटून घ्या.
- एका कढईत तूप गरम करुन त्यामध्ये लवंग घाला. त्यामध्ये बटाटा आणि खोबऱ्याचे वाटप घालून चांगले परतून घ्या. त्याला चांगले तेल सुटले की, त्यामध्ये लाल तिखट घालून चांगले परतून घ्या. त्यात आवश्यकतेनुसार पाणी घालून त्यामध्ये शेंगदाण्याचे कूट घाला.
- सगळे मिश्रण एकजीव करा आणि त्याला चांगली उकळी येऊ द्या. वरुन कोथिंबीर भुरभुरा आणि वरईच्या भातासोबत ही आमटी मस्त लागते.
वाचा – Jaggery Anarsa Recipe In Marathi
बटाट्याची आमटी (Batatyachi Amti Recipe In Marathi)
घरात अगदी काहीही नसेल आणि पटकन काहीतरी करायचे असेल अशावेळी बटाट्याच आमटीसारखा दुसरा कोणताही सोपा पर्याय नाही. बटाट्याची आमटी एकदम झटपट होते ही आमटी करायला फारसा वेळही जात नाही.
साहित्य:
2 ते 3 बटाटे, 1 मोठा कांदा, 1 टोमॅटो, लाल तिखट, गरम मसाला, हळद, दाण्याचे कूट,धणे-जीरे पूड, कडिपत्ता, तेल फोडणीसाठी, कोथिंबीर सजावटीसाठी
कृती:
- बटाट्याची सालं काढून त्याच्या फोडी करुन घ्या.कांदा आणि टोमॅटो बारीक चिरुन घ्या.
- एका कढईत तेल गरम करुन मोहरी, जीर, कडिपत्त्याची फोडणी तयार करा. त्यात हळद घालून कांदा परतून घ्या. कांदा चांगला परतला की त्यामध्ये टोमॅटो घालून गरम मसाला, धणे- जीरे पूड, लाल तिखट चवीनुसार घाला. टोमॅटो चांगला गळण्यासाठी झाकण लावून आच बारीक करा.
- टोमॅटोला पाणी सुटले की, त्यामध्ये सगळे सुके मसाले घालून घ्या.आता त्यात बटाटा घालून पाणी घाला आणि बटाटा शिजवण्यासाठी झाकण लावून घ्या आणि चांगली उकळी येऊ द्या. दोन चार उकळी आल्यानंतर त्यामध्ये दाण्याचे 1 ते 2 चमचे कूट घाला. बटाटा चांगला शिजला की, आमटी तयार.. ही आमटी भाकरी, चपाती आणि भातासोबतही चांगली लागते.
कैरीची आमटी (Kairichi Amti Recipe In Marathi)
कैरीचा सीझन आला की, अगदी हमखास केली जाणारी रेसिपी म्हणजे कैरीची आमटी. आंबट-गोड-तिखट आणि चवीला चटपटीत लागणारी अशी ही आमटी तुम्ही नक्कीच ट्राय करायला हवी.
साहित्य:
दोन कैरीचा किस, बेसन, गूळ, लाल मिरच्यांचे तुकडे (सुके), मोहरी, जीरं, मेथी दाणा,सैंधव, तेल,कडिपत्ता,हिंग,लाल तिखट
कृती:
- एका मोठ्या कढईमध्ये तेल गरम करुन त्यामध्ये फोडणी देण्यासाठी त्यामध्ये मोहरी, जीरं, मेथीदाणा आणि कडिपत्ता घालून चांगले परतून घ्या. शिवाय त्यामध्ये लाल मिरच्यांचे तुकडे घाला. हिंग घालून ही फोडणी चांगली करुन घ्या.
- आता त्यामध्ये पाणी घालून लाल तिखट घाला. आता त्यामध्ये कैरीचा किस घाला. कैरीचा किस घातल्यानंतर पाण्यात चांगली बुडेल इतके पाणी घाला. आता त्यामध्ये गूळ घाला.
- एका बाजूला पाण्यात एक ते दोन चमचे बेसन घेऊन त्याची एक थीक पेस्ट करुन घ्या आणि ती या आमटीमध्ये घाला. चांगली उकळ आल्यानंतर ही आमटी मस्त भातासोबत किंवा पोळीसोबत खा
शेंगदाणा आमटी (Shengdana Amti Recipe In Marathi)
उपवासाला केली जाणारी आणखी एक चविष्ट आमटी म्हणजे शेंगदाणा आमटी. ही आमटी चवीला फारच मस्त लागते. उपवासाच्या दिवशी डाऊन झालेली एनर्जी वाढवण्यास ही आमटी नक्कीच मदत करते.चमचमीत ही आमटी कशी बनवावी हे जाणून घेऊया.
साहित्य:
1 मोठी वाटी भाजलेले शेंगदाणे, 3-4 मिरच्या, उकडलेले शेंगदाणे, तूप, लिंबाचा रस, मीठ, जीरं
कृती:
- मिक्सरमध्ये शेंगदाणे आणि मिरच्या वाटून घ्या. हे वाटप एका भांड्यात काढून घ्या.
- एका कढईमध्ये तूप गरम करुन त्यामध्ये जीरं तडतडून घ्या. त्यानंतर त्यामध्ये शेंगदाण्याचे वाटप घाला. आवश्यकतेनुसार त्यामध्ये पाणी घालून घ्या
- दाताखाली शेंगदाण्याची चव येण्यासाठी उकडलेले अख्खे शेंगदाणे घाला.
- आता त्यामध्ये थोडासा लिंबाचा रस घालून ही आमटी चांगली उकळून घ्या. आता तुमची उपवासाची आमटी तयार.
टोमॅटो आमटी (Tomato Amti Recipe In Marathi)
टोमॅटोचा उपयोग करुनही मस्त टोमॅटोची आमटी करता येऊ शकते. टोमॅटोची आमटी ही देखील झटपट होते. ही आमटी आंबट- गोड-तिखट लागते. ही आमटी एकदम झटपट तयार होते. त्यामुळे आठवड्यातून एकदा तरी तुम्ही ही आमटी करायला काहीच हरकत नाही.
साहित्य:
5 ते 6 टोमॅटो, 1 वाटी ओलं खोबरं, लाल तिखट, हळद, लाल तिखट, मीठ, तेल,कोथिंबीर
कृती:
- टोमॅटो बारीक चिरुन घ्या. एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टोमॅटोचे तुकडे आणि ओलं खोबर वाटून घ्या. एक बारीक जाळी घेऊन त्यामधून हे काढून घ्या.
- हा पातळ रस तयार झाल्यानंतर एक कढई गरम करुन त्यामध्ये एक मोठा चमचा तूप किंवा तेल गरम करुन घ्या. त्यामध्ये मोहरीची फोडणी घाला. आता त्यामध्ये टोमॅटोचा रस घालून त्यामध्ये हळद, तिखट घालून आता याला चांगली उकळी येऊ द्या.
- टोमॅटोच्या आमटीवर कोथिंबीर भुरभुरा आणि याचा मस्त आनंद घ्या.
कोळंबी आवडते? मग बनवा झक्कास कोळंबी रेसिपी (Kolambi Recipes In Marathi)
बाजार आमटी (Bajar Amti Recipe In Marathi)
बाजार आमटी हा प्रकार तुम्ही कधी ऐकला आहे का? पंढरपूरमध्ये ही रेसिपी केली जाते. पंढरपूरमध्ये बाजार आमटी ही फारच प्रसिद्ध आहे. चला तर जाणून घेऊया बाजार आमटीची ही सोपी रेसिपी
साहित्य:
मसुर डाळ -2 चमचे मुगडाळ, 2 चमचे, हरबरा डाळ, 2 चमचे, तुरडाळ, 2 चमचे, उडिद डाळ -2 चमचे, 2 टोमॅटो, आलं-लसूण पेस्ट, मीठ, तेल, कांदे 2, धणे-जीरे पूड,मोहरी- जीरे, कडिपत्ता
कृती:
- सगळ्या डाळी एकत्र करुन त्यामध्ये हळद घालून डाळ चांगली शिजवून घ्या. ही डाळ शिजल्यानंतर चांगली घोटून घ्या.
- कांदा आणि टोमॅटो मिक्सरमध्ये वाटून घ्या. त्याची एक पेस्ट तयार करुन घ्या.
- एका कढईमध्ये तेल गरम करु त्यामध्ये मोहरी,जीरे आणि कडिपत्त्याची फोडणी तयार करुन घ्या. त्यामध्ये हळद, जीरे पूड, लाल तिखट घाला.
- थोडासा गरम मसाला घालून आता सगळे चांगले परतून घ्या. आता त्यामध्ये कांदा टोमॅटोची पेस्ट घालून चांगली शिजवून घ्या.
- आता त्यामध्ये शिजवलेली आमटी घालून ही डाळ चांगली शिजवून घ्या. त्यावर छान तर्री येईल या डाळीला कोथिंबीरने सजवा.
मसूरची आमटी (Masoor Amti Recipe In Marathi )
रोज रोज तीच डाळ खाऊन खूपच कंटाळा आला असेल तर तुमच्यासाठी मसूरची आमटी हा एक चांगला पर्याय असू शखतो. व्हेज जेवण असो किंवा नॉन- व्हेज तुम्ही कधीही मसूरची आमटी करु शकता. मसूरची आमटी करणे हे फारच सोपे आहे. तुम्ही दोन वेगळ्या पद्धतीने ही मसूरची आमटी करु शकता.
साहित्य:
मोड आलेले किंवा शिजवलेले अख्खे मसूर, एक मोठा कांदा, एक मोठा टोमॅटो किंवा खोबऱ्याचे वाटप, लाल तिखट,आलं-लसूण पेस्ट, मिसळ मसाला, गरम मसाला, बारीक चिरलेली कोथिंबीर, मीठ, तेल, मोहरी, हिंग, कडिपत्ता
कृती:
- आता दोन प्रकारची आमटी करताना तुम्हाला साधारण कृती ही सारखीच करावी लागते. फक्त वाटप हे वेगवेगळे टाकावे लागते.
- सुरुवातीला एका भांड्यात तेल गरम करुन मोहरी, हिंग, कडिपत्त्याची फोडणी द्या. त्यामध्ये आलं-लसूण पेस्ट घालून परतून घ्या.
- आता त्यात तुमच्या आवडीचे वाटप घाला. खोबऱ्याचे वाटपची कृती ही कटाच्या आमटीमध्ये दिलेली आहे. कांदा- टोमॅटोचे वाटप करताना तुम्हाला खोबऱ्याऐवजी टोमॅटो घालायचा आहे. इतकाच फरक करायचा आहे.
- आता मसाला चांगला भाजून घ्या त्यामध्ये उकडलेले मसूर घाला. लाल तिखट, गरम मसाला, थोडासा मिसळ मसाला घालून आवश्यकतेनुसार पाणी घाला आणि चांगली उकळी येऊ द्या. मसूरची झणझणीत आमटी तयार
मिश्र डाळीची आमटी (Mix Dal Amti Recipe In Marathi)
मिश्र डाळींपासूनही तुम्ही मस्त चविष्ट अशी आमटी बनवू शकता. जाणून घेऊया मिश्र डाळीची ही चविष्ट आणि चमचमीत आमटी
साहित्य:
तुमच्या आवडीची डाळ प्रत्येकी 2 चमचे, बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, कडिपत्ता, कोथिंबीर, तेल, लसूण, कडिपत्ता, हळद, लाल तिखट,मोहरी, जीरं, हिंग
कृती:
- एका भांड्यात सगळ्यात डाळी घेऊन त्या स्वच्छ धुवून घ्या. कुकरच्या भांड्यामध्ये ही डाळ गळेपर्यंत चांगली शिजवून घ्या.
- आता एका कढईमध्ये तेल गरम करुन त्यामध्ये मोहरी, जीरं, हिंग,कडिपत्ता आणि कांदा, लसूण घालून फोडणी चांगली चमचमीत करुन घ्या. त्यामध्ये हळद, तिखट घाला. टोमॅटो घालून ते चांगले गळू द्या.
- आता त्यात शिजलेली डाळ घालून त्यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी घाला. मीठ घालून कोथिंबीर भुरभुरुन ही डाळ सर्व्ह करा.
आमटी डाळ (Dal Amti Recipe In Marathi)
आमटी म्हणजे एकदम साध्याच्याच डाळीचा प्रकार आहे. ही डाळ एक प्रकारची फोडणीचीच डाळ असते. तुम्हालाही ही आमटी बनवायची असेल तर जाणून घ्या याची कृती
साहित्य:
शिजवलेली तूरडाळ, बारीक चिरलेला कांदा आणि टोमॅटो, गूळ, मोहरी, जीरं, हिंग, तेल, मीठ,हळद, लाल तिखट
कृती:
- एका भांड्यात तेल गरम करुन त्यामध्ये मोहरी, जीरं आणि हिंगाची फोडणी द्या. कांदा, टोमॅटो चांगले परतून घ्या.
- त्यामध्ये हळद, तिखट घालून त्यामध्ये पाणी घाला. आता शिजवलेली डाळ घालून त्यामध्ये गूळ घाला. ही आमटी छान तिखट आणि थोडीशी गोड लागते.
- आता त्यामध्ये कोथिंबीर घालून ही आमटी सर्व्ह करा.
ओल्या नारळाची रेसिपी मराठीत खास तुमच्यासाठी (Olya Naralachi Recipe In Marathi)
चिंच गुळाची आमटी (Chinch Gulachi Amti Recipe In Marathi)
महाराष्ट्रीयन पद्धतीत येणाऱ्या डाळीचा एक प्रकार म्हणजे चिंच- गुळाची आमटी. ही आमटी खूप जणांच्या आवडीची असते. मस्त भात आणि ही आमटी खूप जणांच्या आवडीची देखील असेल. जाणून घेऊया या आमटीची सोपी कृती
साहित्य:
तुरडाळीचे वरण (उकडून घोटलेली तूरडाळ), चिंचेचा कोळ, गूळ, काळा मसाला, मीठ, तिखट, हळद, हिंग, मोहरी, तेल, कोथिंबीर, कडिपत्ता, मीठ
कृती:
- एका भांड्यात तेल गरम करुन त्यामध्ये हिंग, मोहरी, हळद, कडिपत्ता, तिखटाची फोडणी द्या. त्यामध्ये पाणी घाला. शिवाय यामध्ये तुम्ही चिंचेचा कोळ आणि गूळ घाला. त्यात काळा मसाला घाला.
- घोटलेली तूरडाळ घालून आता या आमटीला फोडणी द्या. चिंच गूळाचीआंबट गोड अशी आमटी तयार. वरुन कोथिंबीर भुरभुरायला विसरु नका.
आता या काही आमटी घरीच तयार करा आणि जेवणाचा आनंद घ्या.