आई होणार ही भावना सुखावणारी असते. गर्भधारणा झाल्याापासून ते आई होईपर्यंत होणाऱ्या आईला बाळाशी निगडीत वेगवेगळ्या गोष्टी जाणून घ्याव्या लागतात. बाळाचा जन्म झाल्यानंतर बाळाची काळजी घेण्यापासून बाळात होणारे वेगेवेगळे बदल जाणून घेणे फारच गरजेचे असते. बाळाला साधारण चार महिन्यापासून दात यायला सुरुवात होते. पण बाळाच्या वाढीवर दात येणे हे देखील अवलंबून असते. त्यामुळे साधारण 2 महिन्यांपासून दात यायला सुरुवात होते. बाळांना लवकर दात येणाऱ्यांच्या हिरड्यांची ठेवण ही थोडी वेगळी असते. त्यांच्या हिरड्यांचा उंचवटा हा थोडा मोठा असतो. तुम्हाला माहीत आहे का? बाळाचे दात विकसित होण्याची सुरुवात ही आईच्या गर्भात असतानाच होत असते. बाळाला दात येताना त्याच्या वागण्यात अनेक बदल होऊ लागतात. फार चीड चीड आणि रड रड करायला लागते, आणि आपल्याला लवकर ते बाळ रडण्याची कारणे समजत नाहीत. बाळाचे खालचे दोन दात पहिले येतात. 4 थ्या महिन्यात दात यायला सुरुवात झाली की दोन वर्षांनंतर बाळाचे संपूर्ण दात येऊ लागतात. तुमच्याही बाळाचे दोन महिने पूर्ण झाले असतील आणि त्याच्या वागण्यात जर बदल जाणवत असेल तर त्याला दात येण्याची शक्यता आहे. बाळाला दात येऊ लागले की, त्याच्यामध्ये काय बदल होतात. बाळाला दात येतात तेव्हा (balache dat yene) कोणती लक्षणे जाणवतात, बाळांची काळजी कशी घ्यावी ते जाणून घेऊया.
Table of Contents
बाळाला दात येतात तेव्हाची लक्षणे (Symptoms Of Baby Having Teeth)
बाळाला दात येतात तेव्हा काही लक्षणे जाणवून लागतात. बाळ साधारण असे वागू लागले की, त्याला दात येऊ लागले असे समजतात.
चिडचिड
बाळाला दात येऊ लागले की, त्यांच्या हिरड्यांमधून दात बाहेर येताना हिरड्यांची होणारी दुखापत बाळांना सांगता येत नाही. अशावेळी त्यांची चिडचिड होत राहते. त्यांना जेव्हा जेव्हा हिरड्यांना दुखापत होते. त्या त्या वेळी ते रडत राहतात. बाळ नीट जेवत नाही. त्यांचे पोट भरत नाही. त्यामुळेही त्यांची सतत चिडचिड होत राहते. तुमचं दोन ते चार महिन्यांचं बाळ सतत चिडचिड करु लागलं असेल तर कदाचित त्याला दात येत आहेत असे समजावे. दात येताना त्यांना अशाप्रकारे चिडचिड होत असते. हे दात येण्याचे लक्षण समजावे.
बाळाला मालिश करण्याचे फायदे आणि पद्धत
जुलाब
जेव्हा लहान मुलांना जुलाब होण्याचा म्हणजेच पातळ शौचाचा त्रास होऊ लागला की, बाळाला दात येतात तेव्हा असे दिसून येते. इतर दिवसांच्या शौचापेक्षा त्यांना दात येण्याच्या काळात येणाऱ्या शौचामध्ये बराच फरक असतो. पण डॉक्टरांच्य माहितीनुसार जुलाब होण्याचा दात येण्याशी काहीही सबंध नसतो. बाळांना दात येऊ लागल्यामुळे त्यांचे दात शिव शिवू लागतात. अशावेळी बाळ पटकन काही उचलून खात असेल तर त्यामुळे त्यांचे पोट बिघडण्याची शक्यता असते. बाळाचे पोट बिघडले की, त्याला जुलाब होऊ लागतात. त्यामुळे जुलाब झाले तर बाळांची योग्य काळजी घ्यावी. कारण त्यामागे अस्वच्छता किंवा काहीतरी चुकीचे खाल्ले गेले हे समजून जावे.
लाळ गळणे
बाळाच्या तोंडातून कधीकधी अचानक लाळ येऊ लागते. बाळ सतत तोंडात हात घालून लाळ काढत असेल तर अशावेळी बाळांना दात येत आहेत. असे समजावे. दात येण्याचे हे अगदी सुरुवातीचे लक्षण आहे. बाळाच्या तोंडून सतत लाळ गळत असेल तर त्याला लाळेरं बांधावे कारण बाळाला दात येतात तेव्हा ते भरपूर लाळ तोंडातून बाहेर काढते. ओल्या कपड्यांमुळेही त्यांना अधिक त्रास आणि चिडचिड होऊ शकते. त्यामुळे मुलांचे कपडे सतत बदलावे. नाहीतर बाळ अधिक चिडखोर होते.
बाळाला पहिल्यांदा अंघोळ घालताना या गोष्टी ठेवा लक्षात
ताप येणे
खूप बाळांना हिरड्यांच्या दुखापतीमुळे ताप येतो. बाळांना ताप येणे हे देखील अगदीच कॉमन लक्षण आहे. बाळाचे अंग हे गरम लागते. इतरवेळी मस्ती करणारे बाळ थंडावल्यामुळे पालकांना काळजी वाटू लागते. बाळांचा ताप हा अजिबात अंगावर न काढलेला बरा. दात येताना ताप येणं हे स्वाभाविक असलं तरीदेखील अति ताप येत असल्यामुळे बाळाची प्रकृती खराब होऊ शकते. बाळांना जास्त ताप येत असेल तर लगेचच डॉक्टरांशी संपर्क साधा आणि योग्य तो औषधोपचार करुन घ्या
दात शिवशिवणे
लहान बाळ सतत तोंडात काहीतरी घालून चावण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला दात येणार आहेत असे समजावे. हिरड्यांना येणारी सूज त्यामुळे लहान बाळ दाताकडे काही ना काही वस्तू नेऊन चावण्याचा प्रयत्न करते. दात शिवशिवल्यामुळे हा त्रास बाळांना होत असतो. बाळ सतत तोंडात काहीतरी कपडा किंवा खेळणे असे घेऊन जात असेल तर त्यांना स्वच्छ खेळणी द्या. त्यांनी चावणे हेच त्यांच्यासाठी समाधानाची बाब असते. त्यामुळे या काळात त्यांना स्वच्छ खेळणी विशेषत: रबराची खेळणी द्या.
बाळाला दात येतात तेव्हा घ्यायची काळजी (Tips And Care For Babies During Teething)
बाळाचे दात डोकावू लागले असतील तर तुम्ही बाळांच्या दातांची काळजी आधीपासूनच घ्या. कारण बाळाला दात येतात तेव्हा त्या दातांची काळजी घेतली तर पुढे जाऊन बाळांनाही दातांची काळजी घेण्याची सवय लागते.
स्वच्छता राखा
बाळ काही विशेष खात नसले तरी देखील बाळांच्या दातांची काळजी घेणे फार गरजेचे आहे. बाळांना दात यायला सुरुवात झाल्यापासूनच तुम्ही त्यांच्या दातांवरुन हात फिरवा. डॉक्टरांचा योग्य सल्ला घेऊनच बाळांच्या दातांसाठी मिळणारा ब्रश वापरावा. बाळ हे अंगावरचे दूध सतत पित असते. दूधामुळे दातांवर कॅव्हिटी साचण्याची शक्यता असते म्हणूनच बाळांच्या दातांची स्वच्छता राखणे हे गरजेचे असते.
आहार चांगला असू द्या
बाळांना दात येऊ लागले की, बाळ अजिबात खायला बघत नाही. वाढत असल्यामुळे त्यांच्या चवी देखील बदलत असतात. अशावेळी त्यांच्या आहाराकडे दुर्लक्ष करु नका. उलट त्यांच्या आहारामध्ये अन्य काही गोष्टी समाविष्ट करा. डाळीचे पाणी, खीर, शीरा असे काही पदार्थ त्यांच्या आहारात समाविष्ट केल्यामुळे त्यांना चवही लागते. याशिवाय तुम्ही बाळाचा आहारात फळांचा समावेश केला तरी देखील चालू शकेल.
प्रतिकारशक्ती वाढवा
दात येण्याच्या काळात बाळ आजारी पडतात. त्यामुळे त्यांची प्रतिकारशक्ती चांगली ठेवणे गरजेचे असते. बाळांची प्रतिकारशक्ती चांगली नसेल तर त्यांना ताप, जुलाब किंवा अन्य काही त्रास सहज होऊ शकतात. त्यामुळे बाळांची प्रतिकारशक्ती कशी वाढेल याकडे अधिक लक्ष देऊन त्यांच्या आहारात या काही चांगल्या गोष्टींचा समाविष्ट करा. त्यांच्यासोबत जास्तीत जास्त वेळ घालवा.
हिरड्यांना मसाज करा
हिरड्यांना मसाज केल्यामुळे मुलांचे दुखणे हे काही अंशी कमी होते. यासाठी हात स्वच्छ करुन आणि नखे कापूनच बाळांच्या तोंडात हात घाला.डॉक्टरांचा योग्य सल्ला घेऊनच त्यांना मसाज करा. मसाज करताना तुम्ही बोटाला थोडेसे तूप लावले तरी चालू शकते. कारण त्यानिमित्ताने त्यांच्या पोटात थोडे तूप जाते. जे त्यांची प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करते.
ताजी फळे द्या
बाळांना ताजी फळे देणे हे नेहमीच चांगले. त्यामुळे त्यांना योग्य प्रमाणात फायबर मिळते. याशिवाय शरीर सुदृढ राहण्यासही मदत मिळते. बाळांना कोणतेही फळ देताना ते अगदी स्मॅश करुन भरवा. त्यांना जी फळ आवडतात ती फळं त्यांना खायला द्या. पण बाळ फळ खाते म्हणून त्यांना प्रमाणाबाहेरही फळं भऱवायला जाऊ नका. कारण असे अति खाणे देखील त्यांच्या आरोग्यासाठी घातक ठरु शकते.
तुम्हाला पडलेत का प्रश्न (FAQ’s)
बाळांना दात आल्यानंतर त्यांच्या वागणुकीत बदल होऊ लागतो. बाळ चिडचिडे होऊ लागतात. त्यांचा आहार बदलतो. त्यांना काहीही खाण्याची इच्छा राहात नाही. अशावेळी बाळांच्या आरोग्याकडे अधिक लक्ष द्यावे. जर त्यांना ताप, उलटी असा काही त्रास होत असेल तर तुम्ही डॉक्टरांचा योग्य सल्ला घ्यावा.
दाढा येताना बाळांना जास्त त्रास होतो. पण प्रत्येक बाळांच्या बाबतीत हे लक्षण असेच असेल असे सांगता येत नाही. दात येताना दातांचे दुखणे हे वेगवेगळे असू शकते. पण दाढा येताना बाळांना अधिक त्रास होतो.
बाळांना साधारण दोन महिन्यांपासून दात येऊ लागतात( दात येण्याचा हा कालावधी वेगवेगळा असू शकतो.) बाळाला पहिले खाली दात येतात. त्यानंतर बरचे दात येऊ लागतात. संपूर्ण दाढा आणि सगळे दात येण्यासाठी साधारण दोन वर्ष जातात. याचे एक वेळापत्रक आहे 4 ते 7 महिने- खालचे दोन दात येण्यास सुरुवात ८ ते १२ महिने- वरचे दात येऊ लागतात ९ ते १६ महिने- मधले दात येण्यास सुरुवात १३ ते १९ महिने- वरच्या आणि खालच्या दाढा यायला सुरुवात १६ ते २३ महिने- सुळे दात येण्यास सुरुवात २३ ते ३१ महिने- खालच्या दाढा येऊ लागतात २५ महिने ते ३३ महिने- सगळे दात येतात.