अभिनेत्री पूर्वी भावे नवीन डान्स सीरिज घेऊन आली आहे. या अंतर्नाद सीरिजमधलं पहिलं ‘भज गणपती’ हे भरतानाट्यम नृत्यशैलीतलं गाणं नुकतंच रिलीज झालं. या अल्बमचं वैशिष्ट्य म्हणजे ‘भज गणपती’ गाण्याला पूर्वी भावेची आई सुप्रसिध्द शास्त्रीय गायिका वर्षा भावे यांनी संगीत दिलं आहे.
डान्स सीरिजची शुभ सुरूवात
अभिनेत्री आणि नृत्यांगना पुर्वी भावे नेहमीच आपल्या नृत्याच्या माध्यमातून विविध आविष्कार साकारत असते. तिच्या या नव्या सीरिजबाबत सांगताना पूर्वी सांगते की, “कोणत्याही शुभकार्याची सुरूवात आपण गणेश आराधनेने आणि वंदनेने करतो. त्यामुळे या सीरिजची सुरूवात ‘भज गणपती’ या गणेशवंदनेने करण्यात आली आहे. लहानपणापासून मी भरतनाट्यम शिकत आली आहे. त्यामुळे सीरिज सुरू करताना पहिलं गाणं भरतनाट्यम शैलीचं असावं, असं मला वाटलं. त्यानुसारच हे गाणं आईने कंपोज केलं. आता या सीरिजमधील पुढील गाण्यामधून तुम्हांला वेगवेगळ्या नृत्यशैली पाहायला मिळतील.” यंदा गणेश चतुर्थी शुभेच्छा (wishes for ganesh chaturthi in marathi) देण्यासाठी तुम्ही या गाण्याचाही वापर करू शकता.
Also Read About मुंबईत नृत्य वर्ग
सुंदर गाणं आणि सुंदर लोकेशनचा मिलाफ
‘भज गणपती’ हे गाणं सिन्नरमधल्या गुंदेश्वर मंदिरात चित्रीत करण्यात आलं आहे. त्यामुळे नृत्यासोबतच आपल्याला येथील सुंदर वास्तूकलेचाही आनंद घेता येतो. हे लोकेशन आणि नृत्याविष्कारच यांचा सुंदर मिलाफ यात दिसला आहे. या गाण्याच्या चित्रीकरणाचा अनुभव सांगताना पूर्वी म्हणाली की, “आम्ही या गाण्याचं चित्रीकरण मे महिन्यात केलं. तेव्हा या मंदिराच्या परिसरातली जमीन एवढी तापायची की, अनवाणी चालणंही कठीण व्हायचं. तसंच ती जमीनही ओबडधोबड होती. त्यामुळे डान्स करणं कठीण जात होतं. पण आम्हांला खूप कमी वेळासाठी परवानगी मिळाली होती. त्यामुळे हे आव्हानही स्वीकारावं लागलं. वेळेच्या अभावामूळे अनेक शॉट वनटेक चित्रीत करण्यात आले आहेत. पण आनंदाची गोष्ट म्हणजे या आव्हानात्मक गाण्याच्या चित्रीकरणाचा रिझल्ट चांगला आहे. तसंच आता युट्यूबवरही गाण्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे मेहनतीचं चीज झाल्यासारखं वाटतं आहे. ”
पूर्वीचे विविध नृत्याविष्कार
या आधीही पूर्वी ही ‘गेम ऑफ थ्रोन्स’ची चाहती असल्याने मालिकेच्या शेवटच्या सिझनचे स्वागत थोडे आगळ्या पध्दतीने केलं होतं. पूर्वीने भरतनाट्यम नृत्याव्दारे या मालिकेला मानवंदना दिली होती. शास्त्रीय नृत्य आजच्या तरूणाईला आपलंसं वाटावं, हा विचार करून तिने त्यावेळी कंटेम्पररी क्लासिक डान्स मालिका आणली होती. त्यामागील कारणही ‘गेम ऑफ थ्रोन्स’चं टायटल साँग निवड्यामागे होतं. भरतनाट्यममध्ये युध्द, पक्षी, प्राणी यावर खूप सुंदर मुद्रा आहेत. त्यामुळे तिला या नृत्यशैलीतून ड्रॅगन, व्हाईट वॉकर्स यासारख्या गोष्टी चांगल्या पध्दतीने मांडता आल्या होत्या. पूर्वीने हा अनोखा नृत्याविष्कार तेव्हा बांद्रा फोर्टमध्ये सादर केला होता. अशाप्रकारे आपल्या अभिनय आणि नृत्यकलेच्या साथीने पूर्वी भावे नेहमीच काहीतरी वेगळं करून तिच्या चाहत्यांना नृत्याची अनोखी मेजवानी देत असते.
गणपतीच्या विसर्जनानंतर ही तुम्ही बाप्पाच्या आठवणीत बाप्पा विसर्जन कोट्स शेअर करू शकता.
हेही वाचा –
जान्हवी कपूरचा बेली डान्स सोशल मीडियावर व्हायरल
‘कुमकुम’ उर्फ जूही परमारने केला मुलीसोबत ‘चोगाडा तारा’ हा डान्स