DIY फॅशन

गुडीपाडव्यासाठी साडी लुक्स | Gudi Padwa Saree Looks In Marathi

Dipali Naphade  |  Mar 8, 2022
gudi-padwa-saree-looks-in-marathi

गुढीपाडवा अर्थात चैत्र पाडवा हा मराठी नववर्षाचा पहिला दिवस. मराठी घराघरांमध्ये या दिवशी गुढी उभारून नववर्षाचा दिवस साजरा करण्यात येतो. गुढीपाडव्याची माहिती आणि याचे महत्त्व सर्वांनाच माहीत आहे. गुढीपाडवा साजरा करण्याचा शुभ दिवस आणि मुहूर्त हा दरवर्षी तिथीनुसार असतो. या दिवशी घराघरात गुडीपाडव्यासाठी खास पदार्थ करून नेवैद्य दाखवून गुढी उभारण्यात येते आणि नवीन कपडे घालून आणि महिला खास वेगवेगळ्या पद्धतीच्या साड्या नेसून या दिवशी घराघरामध्ये हा दिवस साजरा करतात. पण गुढीपाडव्यासाठी महाराष्ट्रीयन महिला (Gudi Padwa Maharashtrian Saree) कोणत्या साड्या नेसू शकतात याबाबत तुम्हाला माहिती आहे का? पूर्वपरंपरागत नऊवारी साडी हा पेहराव या दिवशी सहसा करण्यात येतो. पण गुढीपाडव्यासाठी साडी लुक्स (Gudi Padwa Saree) खास आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. तुम्ही या साड्यांचाही या पाडव्यासाठी उपयोग करून घेऊ शकता आणि द्या गुढीपाडव्याच्या शुभेच्छा!

गुढीपाडवा साडी लुक्स 1 : पारंपरिक नऊवारी

पारंपरिक नऊवारी

गुढीपाडव्यासाठी सर्वात पहिला लुक म्हणजे अर्थातच पारंपरिक नऊवारी. नऊवारी साडी (Gudi Padwa Nauvari Saree) ही आपल्या प्रत्येक मराठमोळ्या घरातील जिव्हाळ्याचा विषय आहे. विशेषतः नववर्षाच्या दिवशी अथवा लग्न, मुंज अशा समारंभात नऊवारी साडी आपल्याकडे नेसली जातेच. तुम्हाला नऊवारी साडी नेसता येत नसेल तर बाजारामध्ये अनेक दुकाने आहेत जिथे तुम्हाला नऊवारी साडी शिऊनही मिळते. गुढीपाडव्यासाठी तुम्ही जर पारंपरिक नऊवारी लुक करणार असाल तर या साडीचा रंग पारंपरिक, गडद आणि उठावदार असावा हे नक्की लक्षात ठेवा. यामध्ये पैठणी, इरकल, खण, राजमाता, जिजामाता अशा अनेक साड्यांचे प्रकार आहेत. नऊवारी साडी प्रकार आणि खास डिझाईन्स तुम्हाला अनेक ठिकाणी मिळतील ज्याचा तुम्ही गुढीपाडव्याच्या लुकसाठी विचार करू शकता. तसंच तुम्हाला मिनिमल मेकअप हवा असेल तर तुम्ही POPxo कलेक्शनमधील मेकअप किटचा वापर करून मेकअप करू शकता. 

गुढीपाडवा साडी लुक्स 2 – पैठणी साडी

पैठणी साडी

हँडलूम साड्यांची फॅशन कधीही जुनी होत नाही आणि अशातच महाराष्ट्रीयन साड्यांची शान म्हणजेच पैठणीचा वेगळाच तोरा आणि साज आहे. महाराष्ट्रीयन लग्न असो अथवा काही खास कार्यक्रम असो पैठणी साड्यांना खूपच महत्त्व आहे. गुढीपाडव्यासाठीदेखील तुम्ही पैठणीचे वेगवेगळे डिझाईन्स नक्कीच ट्राय करू शकता. ही साडी सिल्कपासून तयार होते. यामध्ये जरी बॉर्डरच्या पदरावर मोर, कमळाचे फूल, पोपट तसंच अनेक हँडलूम डिझाईन्स तयार करण्यात येतात. प्युअर सिल्कची ही साडी असल्यामुळे बाजारात या मूळ साडीची किंमत ही खूपच आहे. पण हल्ली बाजारामध्ये सेमी पैठणीही मिळतात. ज्यांना महाग साड्या परवडत नाहीत आणि पैठणीदेखील हवी आहे, त्यांच्यासाठी हा उत्तम पर्याय आहे. गुढीपाडवा साडी (Gudi Padwa Saree) लुक्ससाठी तुम्ही पैठणीचा वापर करू शकता.  

वाचाभारतातील विविध साड्यांचे प्रकार

गुढीपाडवा साडी लुक्स 3 – खणाची साडी

खणाची साडी

आजकाल अनेक कार्यक्रमांना खणाच्या साडीचा ट्रेंड दिसून येतो. खणाच्या साडी आणि खणाच्या साडीचे विविध ब्लाऊज डिझाईन्स आणि त्याचे गडद उठावदार रंग हे अप्रतिम दिसतात. अगदी तरूणाईपासून ते अभिनेत्रींपर्यंत खणाच्या साड्यांनी सर्वांनाच भुरळ पाडली आहे. तुम्हाला ऑनलाईनदेखील अनेक डिझाईन्स गुढीपाडव्यासाठी (Gudi Padwa Saree Online) मागवून घेता येतील. गुढीपाडव्याच्या दिवशी तुम्ही अगदी घरातील सर्वांना ट्विनिंग कपडेदेखील शिऊन घेऊ शकता. आजकाल खणाचे ट्विनिंग कपडेही ट्रेंडमध्ये आहेत. गुडीपाडव्यासाठी साडी लुक करायचा असेल तर तुम्ही हा पर्याय नक्कीच निवडू शकता. या ट्विनिंगमध्ये हाथी – मोर खण साडी कलेक्शन, बहीण भावाचे खणाचे फ्रॉक आणि सदरा – धोतर कॉम्बिनेशन, नवरा – बायको आणि बाळासाठी योग्य कॉम्बिनेशन असे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. यासह योग्य मेकअपदेखील तुम्हाला हवा. त्यासाठी तुम्ही मायग्लॅमचे योग्य फाऊंडेशन वापरून तुमचा लुक अधिक सुंदर करू शकता.  

गुढीपाडवा साडी लुक्स 4 – नारायण पेठ

नारायण पेठ

नारायण पेठी साडी हीदेखील महाराष्ट्रीयन पारंपरिक साडी असून आपल्याकडे अनेक सणांना या डिझाईन्सच्या साड्या नेसण्यात येतात. तुम्हीही गुढीपाडवा साडी लुक करण्यासाठी नारायण पेठचे डिझाईन्स निवडू शकता. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ही साडी अजिबातच जड नसते आणि अंगाला अत्यंत चापूनचोपून बसते. त्यामुळे ज्यांना साडीची सवय नाही त्यांच्यासाठी गुडीपाडव्यासाठी या साडीचा पर्याय उत्तम आहे. तसंच ही साडी हलकी असल्याने सांभाळायलाही त्रास होत नाही. ज्या मुली नुकत्याच साडी नेसायला लागल्या आहेत. त्यांच्यासाठी ही साडी नक्कीच दिलासादायक ठरते. तसंच यामध्ये अत्यंत सोबर आणि डोळ्यांना त्रासदायक न ठरणारे असे रंग असून ज्यांना चकमक आवडत नाही अशा महिलांसाठी या साड्या म्हणजे वरदान आहे. नारायण पेठ या साडीचा काठ सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. ही साडी पाचवार, सहावार आणि नऊवार या तिन्ही प्रकारात मिळते. लग्नामध्ये महिला ही साडी अगदी आवर्जून नेसतात. कारण धावपळ करायला लागली तर ही साडी अतिशय हलकी असल्यामुळे जास्त सांभाळावी लागत नाही. तसंच या साडीमध्ये जास्त गरमही होत नाही. 

गुढीपाडवा साडी लुक्स 5 – इरकल

इरकल

इरकल ही सोलापूर ठिकाणची स्पेशालिटी आहे. इरकल हीदेखील अशी साडी आहे जी नेसायला सोपी आणि सावरायलाही सोपी आहे. मुळात या साडीमध्ये सर्वच गडद रंग असतात जे तुमचा लुक अतिशय सुंदर करतात. या साडीवर लहान लहान जरीचे बुट्टे असतात. शिवाय नेहमीच्या साड्यांच्या रंगांपेक्षा या साड्यांचे रंग थोडे वेगळे असल्यामुळे सणाला नेसण्यासाठी या साड्या अधिक जपल्या जातात. या साडीला इल्कल असंही म्हटलं जातं. ही साडी मूळची ‘इल्केकल्लू’ नावाच्या विजापूरजवळच्या गावातील आहे. एकदम तलम आणि मऊ मुलायम असणारी ही साडी गर्भरेशमी असते. मूळची कर्नाटकातील असूनही आता मात्र ही साडी संपूर्णतः महाराष्ट्राची झाली आहे. घराघरातील आजीकडे अशी साडी पूर्वी असे. पण आता महाराष्ट्रीयन लग्नामध्येही या साडीला महत्त्व प्राप्त झालं आहे. ही साडी यंत्रमाग आणि हातमाग अशी दोन्ही स्वरूपातील असून हातमागावर विणलेल्या साडीची किंमत जास्त असते. या साडीवरील कशिदादेखील खूपच प्रसिद्ध आहे. यावरून मराठीमध्ये ‘रेशमाच्या रेघांनी, लाल काळ्या धाग्यांनी, कर्नाटकी कशिदा मी काढीला’ हे गाणंदेखील लिहिण्यात आलं होतं.  गुढीपाडव्याच्या साडी लुकसाठी  (Gudi Padwa Saree) इरकल साडीही तुम्ही नेसू शकता. महत्त्वाचं म्हणजे या साडीवर न्यूड शेडपासून ते गडद शेडपर्यंत कोणत्याही लिपस्टिक तुम्ही वापरू शकता. 

गुढीपाडवा साडी लुक्स 6 – कांजिवरम साडी 

कांजिवरम साडी 

गुढीपाडव्याला अनेक ठिकाणी शोभायात्रा काढण्यात येतात. यावेळी अनेक जणी नऊवारी साडी नेसतात. पण तुम्हाला नऊवारी साडी लुक नको असेल आणि तरीही रॉयल लुक हवा असेल तर तुमच्यासाठा कांजिवरम साडीचा लुक (Gudi Padwa Saree) हा पर्याय आहे. कांजिवरम साडीमधील रंग हे वैशिष्ट्य आहे. तसंच ही साडी अत्यंत रॉयल दिसते. अनेकदा लग्नामध्ये महिलांना या साडीमध्ये पाहिलं जातं. पण गुढीपाडव्यासाठीही तुम्ही ही साडी नेसू शकता. यावर साजेसे दागिने आणि योग्य मेकअप केला की तुमचा लुक परिपूर्ण होतो. 

गुढीपाडवा साडी लुक्स 7- काठापदराची साडी 

काठापदराची साडी 

गुढीपाडवा म्हटलं की पारंपरिक सण आणि या दिवशी पारंपरिक साडीच नेसावी असं अनेक जणींना वाटत असतं. पण काही जणींना जड साड्या नेसणे जमत नाही. मग अशावेळी काठपदराच्या साडीचा पर्याय अधिक चांगला ठरतो. काठापदराची साडी सिल्कची असो वा कॉटनची दोन्ही साड्या हा हलक्या असतात. त्यामुळे सणाच्या दिवशी घरात अनेक पाहुणे असतील, धावपळ करायची असेल तर अशा साड्या नेसणे अधिक चांगले. तुम्हाला नेहमी साडी नेसायची सवय नसेल तर अशी साडी निवडा. जेणेकरून सणाची दिवशी पारंपरिक साडी नेसणे आणि आरामदायी साडी असणे हे दोन्ही हेतू साध्य करून घेता येतील. 

गुढीपाडवा साडी लुक्स 8- जरीची साडी 

जरीची साडी 

जरीची साडी हीदेखील पारंपरिक साडी असून गुढीपाडव्याला नेसण्यासाठी चांगली निवड आहे. जरीच्या साडीवर आपण अनेक मराठी गाणीही ऐकली आहेत. ज्याप्रमाणे नवरीसाठी ही साडी अप्रतिम आहे, तसंच गुढीपाडव्याच्या सणासाठीही मराठी पारंपरिक लुकसाठी जरीची साडी अप्रतिम दिसते. पारंपारिक जरीची साडी, कपाळी चंद्रकोर, गळ्यात मोत्याची माळ, कानात झुमके अशा मराठमोळ्या साजामध्ये तुम्ही नक्कीच अप्रतिम आणि आकर्षक दिसता. मराठमोळ्या सणासाठी असा मराठमोळा लुक नक्कीच आकर्षक आणि उठावदार ठरतो. 

गुढीपाडवा साडी लुक्स 9 – बनारसी साडी 

बनारसी साडी 

अगदी पूर्वीपासून बनारसी शालू आणि साडी ही परंपरा चालत आली आहे. मात्र आता बनारसी साड्यांमध्येही वेगवेगळे ट्रेंड आणि फॅशन आली आहे. तर साडी कशी नेसावी हेदेखील महत्त्वाचे आहे. बनारसी साडीचा लुक हा अत्यंत रॉयल असून याचे रंग अधिक आकर्षक असतात. बनारसी साडी ही सदाबहार आहे.  कधीही आऊट ऑफ ट्रेंड न होणारी ही साडी गुढीपाडव्याला नक्कीच तुमच्या लुकमध्ये आणि आकर्षकतेमध्ये भर घालते.  बनारसी साडी ही दिसायला अत्यंत सुंदर आणि रॉयल असल्यामुळे आजकाल सणांनाही याची खरेदी जास्त प्रमाणात होते.  योग्य रंगाची निवड झाल्यावर त्याबरोबर लागोलाग लागणारी लिपस्टिकही निवडून टाका. MyGlamm च्या विविध शेड्स तुम्हाला निवडता येतील. 

गुढीपाडवा साडी लुक्स 10 – उपाडा सिल्क 

उपाडा सिल्क 

हलकी साडी आणि तरीही आकर्षक साडी हवी असेल तर सध्या उपाडा सिल्क हा उत्तम पर्याय आहे. सांभाळायला हलकी आणि दिसायला रॉयल अशी ही साडी गुढीपाडव्याच्या लुक्ससाठी अप्रतिम निवड ठरते. या साडीचे रंग आणि त्यावरील डिझाईन्स हे त्याचे वैशिष्ट्य आहे. तसंच ही साडी अंगावर अगदी उत्तम दिसते. अधिक फुलत नाही. त्यामुळे अगदी बारीक मुलींपासून ते प्लस साईज असणाऱ्या महिला वर्गालाही ही साडी अप्रतिम आणि सुंदर दिसते. तुम्हाला तुमच्या गुढीपाडव्यासाठी काही वेगळा लुक हवा असेल तर तुम्ही या साडीचा पर्याय निवडू शकता. 

या गुढीपाडव्यासाठी तुम्हाला या साड्यांपैकी कोणता लुक करायला आवडेल ते नक्की आम्हालाही सांगा आणि POPxo मराठीला तुमच्या या खास लुकमध्ये टॅग करायला विसरू नका. सर्वांना मनःपूर्वक गुढीपाडव्याच्या शुभेच्छा!

Read More From DIY फॅशन